गोष्ट 'त्या' घराची

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)



"उंच निळ्या आकाशात पक्ष्यांचे थवे ...

शार्दूलच्या नि माझ्या संसारात मला सासू-सासरे हवे.."

गृहप्रवेशाला शिल्पानं.. नव्या नवरीनं.. उखाणा घेतला अन् तेथे हजर असलेले सगळेच चमकले.

"आजच्या काळात जिथं कुणालाच सासू-सासरे नकोत, तिथं ह्या मुलीला सासू-सासऱ्यांची हौस.. असो बापडी.." शेजारणींनी मनात म्हटलं.

दोघं ऑस्ट्रेलियाला फिरायला जाऊन आले अन् नंतर तिच्या माहेरी. 

लग्नानंतरचा एक महिना कसा उलटला दोघांनाही कळलं नाही.‌ 

दोघांचीही रजा संपली अन् उद्याच त्यांना नोकरीवर रुजू व्हायचं होतं...

"आई, मी कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवून देते..उद्या सोपं पडेल !" शिल्पानं सासूबाईंना सांगितलं. 

सासूबाईंना तिची ही युक्ती पसंत पडलेली दिसली नाही..

"अगं नको ! मी करेन ना सकाळीच..! किती वाजता निघायचं तुला?"

"आठ वाजता .."

"असू दे.. मी सहा वाजताच उठते.. तुझ्यापुरत्या पोळ्याभाजी करून देईन.."

शिल्पा हिरमुसली झाली.. किती स्वप्नं रंगवली होती तिनं तिच्या संसाराची..! 

तिनं स्वयंपाक करावा.. साऱ्यांना खाऊ घालावं.. तिचं कौतुक व्हावं अन् तिनं नम्रपणे त्या कौतुकाला स्विकारावं..!

एक दिवस सायंकाळी घरी येताना तिनं भाजी आणली.

कांदे,बटाटे, टॉमेटो, मिरच्या, सगळंच.. गवार खूप छान मिळाली..कोवळी.. म्हणून तीही घेतली ..अर्धा किलो..!  

आज घरी गेले की निवडून ठेवेन.. उद्या भाजीला होईल .. तिनं स्वप्नरंजन केलं.

"गवार आमच्याकडं कुणी खात नाही.." सासूबाईंनी नाक मुरडलं.

"आई, मी खूप छान करते गवारची भाजी.. माझ्या बाबांना खूप आवडते माझ्या हातची.. पप्पांना आणि शार्दूलला नक्की आवडेल..आणि तुम्हालाही.. एकदा खाऊन तर बघा .."

"नको..अगं.., शार्दूल लहान असताना पानात गवारीची भाजी बघितली अन् ताटच उलटून दिलं त्यानं.." सासूबाईंनी स्वतःचं म्हणणं रेटलं..

"ती म्हणतेय तर करू दे की तिला भाजी .." तिचे सासरे बाहेरून आत येत म्हणाले.." छान करत असेल ती तुझ्यापेक्षा .." त्यांनी सासूबाईंची मस्करीही केली.

ती फ्रेश होऊन आली.. गवार निवडायला म्हणून बघू लागली.. "अगं, मी ती वॉचमनला देऊन टाकली !" सासूबाईंनी सांगितलं.

शिल्पा त्यांच्या खोलीत गेली.. उशीत तोंड खुपसून रडायला लागली. 

सासूबाईंना तिचा मूडऑफ जाणवला तशा त्या लगबगीनं तिच्या खोलीत शिरल्या.

"तुला राग आलाय का? बेटा,आपल्या घरच्या आवडीनिवडी समजायच्यात  तुला ..! रागवू नको बरं ..चल तोंड धू.. थोडं खाऊन घे..!"

तिनं बळेच चार घास पोटात ढकलले..

काळाचं चक्रही गतिमान होऊ लागलं...

तिच्या सासूबाई तशा मायाळू होत्या. 

सकाळी कितीही घाई झाली तरी एक पोळी तिला खायलाच लावत. आयता डबा हातात देत.  तिच्या डब्यात पोळीभाजी आणि रोज काहीतरी वेगळं .. कधी गुळांबा तर कधी दाण्याचा लाडू...

शिल्पाच्या सगळ्या मैत्रिणी तिचा हेवा करत . 

आजच्या काळात कोणती सासू सुनेला आयता डबा हातात देते ?

शिल्पाला मात्र बसून खाण्याची लाज वाटे..!

विक-एंडला लागून सुट्टी आली अन् तिनं स्वतःच इडल्यांचा बेत ठरवला.

सासूबाईंच्या नकळत तिनं उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घातले.. सांभार करण्यासाठी भाज्या आणल्या आणि चटणीसाठी ओलं नारळही..!

सासूबाईंच्या लक्षात आलं पण काहीही बोलल्या नाहीत. शिल्पाला हायसं वाटलं. 

मागचा तो 'गवारी'चा प्रसंग घडल्यापासून ती स्वयंपाकात स्वतःहून काहीही करायला बिचकत असे. 

काम करायचं ते सासूबाईंच्या हाताखाली.. त्यांनी सांगितलं तसं अन् तेवढंच ! इतर वेळी तिला सुट्टी..!!

संध्याकाळी आठवणीनं तिनं भिजवलेले डाळ-तांदूळ मिक्सरला लावले अन् दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून इडल्यांच्या तयारीला लागली. 

सांभारची खमंग फोडणी नाकात गेली तसा शार्दूल स्वयंपाकघरात घोटाळू लागला.. "अजून किती वेळ ..?" म्हणत त्यानं तिला भंडावून सोडलं.

पप्पांनीही स्वयंपाकघराकडे दोन फेऱ्या मारल्याचं तिला जाणवलं !

तिनं तिच्या लग्नात आहेर मिळालेली क्रोकरी बाहेर काढली . 

डायनिंग टेबलवर नीट सजवून ठेवली अन् तिघांनाही हाका मारल्या तसा शार्दूल टुणकन उडी मारून नाश्त्याला येऊन बसला.

पप्पाही येऊन खुर्चीवर बसले ..सासूबाई आल्या पण खुर्चीवर न बसता सरळ ओट्याकडे निघाल्या..

"आई, सगळं झालंय.. तुम्ही बसा.. मी गरम-गरम वाढते .." आज शिल्पाचं संसारचित्र साकारणार होतं !

"अगं, आमच्यासाठी उकडपेंडी भाजते..ह्यांना आंबवलेलं सहन होत नाही.. पोट दुखतं.. मलाही आयुर्वेदिक औषध सुरू आहे.. पथ्यपाणी सांभाळायला हवं बाई !"  सासूबाईंच्या स्वरात तिला तीव्र नाराजी जाणवली.

शिल्पाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं .

"अगं, भरल्या घरात डोळ्यातून पाणी नको काढूस बाई.. तुम्ही दोघं खा.. आम्हाला तब्येती जपायला हव्यात.." सासूबाईंनी शिल्पाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

"शिल्पा, वाढ ग मला इडल्या.. सांभाराच्या नुसत्या वासानं भूक खवळलीय माझी .." पप्पांनी वातावरणातला ताण हलका करण्याचा प्रयत्न केला..

"अहो, आता खाल पण मग पोट दुखतं म्हणून ओवा मागाल.." सासूबाईंनी पप्पांकडे तिरपा कटाक्ष टाकत त्यांची कान उघाडणी केली.

"काही नाही होत ..मागच्या आठवड्यात त्या सरदेसाईच्या नातवाच्या वाढदिवसाला इडल्याच होत्या.  दोन खाल्ल्या मी.. काही त्रास नाही झाला.." पप्पांनी सासूबाईंना समजावून सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

तेवढ्यात सासूबाईंनी गरम उकडपेंडीचं ढेकूळ घाईघाईनं त्यांच्या बशीत ढकलून दिलं ! 

"अशा चिनीमातीच्या बश्या नको घेत जाऊस ग जेवायला.. घरीच घासाव्या लागतात.. पारूबाई एकाच दिवसात एकाच्या दोन करील .." सासूबाई तिच्याकडं बघत पुटपुटल्या पण ते दोघा पुरुषांनाही ऐकू गेलं..

त्या रात्री दोघांच्या बेडरूममधला आवाज जरा वाढला होता. बाहेर हॉलमध्ये डोळे मिटून पडलेल्या सासूबाई आणि पप्पा दोघांनीही कान टवकारले होते.

"आपण वेगळे राहू या.." ती शार्दूलला म्हणत होती.

"अगं तुला तर हौस होती नं सासू-सासर्‍यांची ..?

"हौस होती नाही रे..आहे! अजूनही आहे.. पण मला संसाराचीही हौस आहे रे ..! पण हा संसार 'माझा' कुठाय ? हा तर आईंचा संसार ! त्या म्हणतील तसं आणि तेवढंच..!

"पण आई कुठं सासुरवास करतीय तुला ?"

"नाही रे ..त्या मायेनेच करतात.. अगदी सगळं हातात देतात..मला जराशीही तोशीस लागू देत नाहीत !  म्हणूनच तर रे परक्यासारखं वाटतं मला ! 

त्या मला काही करायला सांगत नाहीत आणि मी स्वतःहून काही करायला गेले तर त्यांना पटतही नाही ! 

खूप उपरेपणा जाणवतो रे..  घरातल्या काडीवरही सत्ता नकोय मला ..पण इकडची काडी तिकडं ठेवण्याचं स्वातंत्र्यही नाहीये मला..हे घर 'माझं' वाटतच नाही मला ..!"

सासूबाई आणि पप्पा सुन्न होते.

महिन्याभरातच एक दिवस शार्दूल घरी येताना पेढे घेऊन आला. 

देवापुढे नैवेद्य केला. 

आईपप्पांना पेढा देऊन नमस्कार केला.. अन् सांगितलं, "आम्ही नवा टू बीएचके बुक केलाय.. पुढच्या महिन्यात पझेशन मिळेल मग आम्ही दोघं तिकडंच राहायला जाऊ..!"

सासूबाई आणि पप्पा दोघंही एकमेकांकडे टकमक बघत राहिले. 

दोघांनाही काही सुचेना..!

नव्या फ्लॅटचं पझेशन मिळालं अन् दोघंही नव्या घरी राहायला गेले. 

सासूबाईंनी तिच्या लग्नातलं आंदण, भांडीकुंडी अगदी जश्शीच्या तश्शी  ठेवली होती.. पॅकबंद.. त्यांनी सगळं सुनेला सुपूर्द केलं..कर्तव्यभावनेनं..!

शिल्पाच्या सासरच्या घरात आता फक्त तिघंच..सासूबाई, पप्पा आणि भयाण शांतता !

              ***

नव्या फ्लॅटवर शिल्पाची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली..

रविवारची सकाळ. घरात भरपूर पसारा अन् त्या पसार्‍यात शार्दूल लॅपटॉपवर काम करत बसलेला.. शिल्पा कांद्याची भजी तळण्यात व्यस्त..

डोअरबेल वाजली ..नाईट ड्रेस अन् केसांचा बुचडा अशा अवतारात शिल्पानं दार उघडलं अन् दारात सासूबाई आणि पप्पांना बघून चांगलीच गडबडली.

शार्दूलनंही भराभर पसारा आवरत आईपप्पांना बसायला जागा करून दिली.

"बेटा, त्या रात्री आम्ही तुमचं बोलणं ऐकलं होतं" पप्पांनी बोलायला सुरुवात केली.

" 'ते' घर शिल्पाचं घर .. तिचा 'संसार' नाही होऊ शकलं.. आम्ही तिला आमच्या संसारात नाही सामावून घेऊ शकलो.. सॉरी, खरंच सॉरी.." पप्पा भावनाप्रधान झाले होते.

"बेटा, मी तुला माझ्या संसारातला वाटा नाही देऊ शकले.." सासूबाईंनी बोलायला सुरुवात केली.. "पण, तू आम्हाला तुझ्या संसारात सामावून घेशील?"

'त्या' चौघांच्याही अश्रूधारा मुक्तपणे वाहू लागल्या होत्या..अन् 'ती' दोघं आईच्या कुशीत विसावली होती..

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने