लेखक - श्रीकांत काटे
सुगंधाताईंनी पुन्हा एकवार समोरच्या ड्रॉईंगरूमवर नजर फिरवली.
सोफ्याची कव्हर्स नवीनच चढवली होती. समोरच्या शोकेसची धूळही साफ केली होती. शोकेसमधला रंगीत दिवा सुरू आहे ना याची त्यांनी पुन्हा पुन्हा खात्री केली.
दिवाणावरची चादर आणि लोडकव्हर्स एकाच रंगाची आहेत हे बघितलं.
टीपॉयवरचा पसारा आवरून आत ठेवला आणि तिथे आजचे ताजे वर्तमानपत्र व दोन-तीन मासिके ठेवली.
टीपॉयवरच्या फुलदाणीतली लाल गुलाबाची फुलेही एखाद् दुसऱ्या पानांसह रचून ठेवली.
कपबशा तीन-चारदा बघितल्या. हो ! एखाद्या कपाचा किंवा बशीचा कपचा उडलेला नको किंवा त्यावर धूळीचा एखादा कणही बसलेला नको.
आज कारणही तसंच होतं.
त्यांच्या मुलाला – महेशला दाखवण्यासाठी मुंबईचे कुळकर्णी त्यांच्या मुलीसह येणार होते.
तसं बघितलं तर त्यांनीच मुंबईला मुलीकडे जायला हवं होतं, पण वधू-वर सूचक मंडळाचे निळकंठराव म्हणाले- “मुलीची आई म्हणतेय की जिथे मुलीला कायम रहायला जायचं ते घर आधी बघणंच इष्ट. म्हणजे ज्या घरात मुलीला जायचं तिथलं वातावरण-कल्चर-स्टेटस कसं आहे हे बघायला नको कां ?”
सुगंधाताईंनाही ते पटलं. आधीच महेशच्या कुंडलीत लग्नाचे योग फार कडक होते.
तिशी पार केलेली पण बऱ्याच ठिकाणी मुलीची व महेशची पत्रिकाच जुळत नव्हती. कधी गण आडवा यायचा तर कधी राशी.
जोशी गुरुजी त्यांचे अतिशय जवळचे विश्वासू ज्योतिषी.
त्यांच्या मते निदान बावीस ते पंचवीस गुण तरी जमायलाच हवे. त्यामुळे बरेचसे मुलींचे विवाह-प्रस्ताव ह्या गुणाकारामुळे जमत नव्हते.
शिवाय सुगंधाताई आणि महेश या दोघांचाही पत्रिका जुळण्यावर खूप दांडगा विश्वास होता. जरी लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात तरी त्या गाठी कशा आहेत, ती सुरगाठ तर ठरणार नाही ना हे तर बघायलाच हवं होतं.
सुगंधाताईंच्या परिचयातले दोन-तीन अनुभव तर विचित्र होते. ‘आमचा कुंडली-पत्रिका यावर अजिबात विश्वास नाही’ असा टेंभा मिरवणाऱ्या त्या कुटुंबात लग्नानंतर घटस्फोटांची व कटकटीची मालिकाच सुरू झाली होती.
प्रत्यक्ष त्यांच्या जावेच्या मुलानंच कुंडली-पत्रिका धुडकावून विवाह केला आणि तीन-चार महिन्यांतच त्याची पत्नी जी माहेरी निघून गेली ती आजतागायत सात वर्षे झाली तरी परत आली नाही.
शेजारच्या मोकाशींच्या मुलाचंही तसंच ! त्यानंही कुंडली-पत्रिका हे सगळं थोतांड आहे असं म्हणत आंतरजातीय विवाह केला आणि लग्नानंतर दीड वर्षातच एका भीषण अपघातात त्याला एक हात आणि दोन्ही पाय गमवावे लागले.
आजकाल कुंडली-पत्रिका हे एक फॅडच आहे असं म्हणणारे ही उदाहरणे कां लक्षात घेत नाहीत हा प्रश्न सुगंधाताईंना छळत असे.
शेवटी आपल्या पूर्वजांनी, वाडवडीलांनी ज्या प्रथा घालून दिल्या त्या कां नाकारायच्या ? त्यांना खोटं कां ठरवायचं ?
आणि म्हणूनच बहुतेक प्रस्ताव गण-गोत्र-रास यांच्या खांद्यावरून पसार व्हायचे.
सुगंधाताईंना हे पटत होतं. महेशचीही त्याला संमती होती, नव्हे तो त्याचा आग्रहच होता.
आणि म्हणूनच मुंबईच्या कुळकर्णींच्या मुलीचा प्रस्ताव त्यांच्याकडे आला तेव्हा त्यांनी आठवणीने त्या मुलीची – नीलिमाची कुंडली मागवली.
जोशी गुरूजींना त्या कुंडलीवर बरीचशी चौकशी केली.
कुळकर्ण्यांनीही जोशीगुरूजींना हवा तो तपशील पुरविला. आणि अखेर नीलिमाची कुंडली महेशच्या कुंडलीशी जुळली.
एकुण तीस गुण जुळत होते. तसंही सगळे छत्तीस गुण जमणं ठीक नसतं असं जोशीगुरूजींनी सांगितलं होतं.
फक्त एकच अडचण होती. ती म्हणजे मुला-मुलीच्या वयातील अंतरासंबंधी.
कमीत कमी पत्नी पाच-सहा वर्षे वयाने लहान असावी असं महेशला आणि सुगंधाताईंना वाटत होतं. पण कुळकर्णींच्या नीलिमाचं वय महेशपेक्षा फक्त दोन वर्षांनी कमी होतं.
पण आता सगळंच कसं मनासारखं जुळणारं ? कुठेतरी एडजेस्टमेण्ट करायलाच हवी, करणं भागच होतं !
बरीच भवती न भवती होऊन कुळकर्णींना होकार द्यावा असा विचार दोघाही मायलेकांनी केला. कुळकर्णींना निमंत्रणही धाडले.
महेशही आता तिशी पार करणार होता. वय वाढल्यावर कुठे मुली सांगून येणार ? म्हणूनच आजचा हा कार्यक्रम सुगंधाताईंनी पक्का केला.
'काय गं सूनबाई ? कधी येणाराय मुलीकडची मंडळी?' आतून सुगंधाताईंच्या वृद्ध सासूबाईंनी विचारणा केली.
या म्हातारपणातही त्यांची उत्सुकता उतावीळ होती, अगतिकही होती.
‘येतील गं ती मंडळी ! गाडी लेट झाली असेल ! असं म्हणून सासरेबुवांनी सासूबाईंना समजावलं.
सासू-सासरे दोघेही आता नव्वदीच्या घरात होते.
सुगंधाताईंचे यजमान हे आपल्या आई-वडिलांचं एकुलतं एक अपत्य ! ना सख्खी नणंद ना सख्खा दीर ! सुगंधाताईंचे यजमान दोन वर्षांपूर्वीच हृदयविकाराने निधन पावले होते.
त्यामुळे ह्या म्हातारा-म्हातारीला सांभाळणं त्यांना क्रमप्राप्तच होतं.
शिवाय घरही सासऱ्यांच्या स्वकष्टार्जित कमाईचं.
महेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याच्या मोठ्या दोन बहिणी लग्न होऊन परदेशात स्थायिक झालेल्या.
सुगंधाताईंनी पतीच्या कमाईला हातभार म्हणून एका खाजगी वाचनालयात नोकरी केली. पण पती-निधनानंतर त्या सूनबाईच्या प्रतिक्षेत घराकडेच अधिक लक्ष देऊ लागल्या.
महेशही इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेऊन एका फॅक्टरीत कामाला होता.
महेशचे वडील एक साधे शाळामास्तर. तुटपुंज्या पगाराला जोड म्हणून सुगंधाताई वाचनालयात नोकरी करू लागल्या. त्यामुळेच त्यांचं स्वत:चं घर काही होऊ शकलं नाही. आणि म्हणूनच सासऱ्यांच्या घरात राहणं त्यांना भाग होतं.
तरी बरं, नवऱ्याच्या फंडातून मिळालेल्या रकमेने त्यांनी घराची बरीच डागडूजी केली. दोन-तीन खोल्यांचं नूतनीकरणही केलं.
सासऱ्यांची थोडीशी पेंशन-सुगंधाताईंचा जेमतेम पगार आणि आता त्यात महेशचा पगार. घराला बरे दिवस आले होते.
'आले ! आले !!’ कॉलबेलचा आवाज ऐकून त्यांनी दार उघडलं. समोर महेश उभा होता.
‘केंव्हा येणाराय कुळकर्णी कंपनी ?’ महेशनं आत शिरता-शिरताच प्रश्न केला.
“अरे, येतीलच आता काही वेळात ! चार वाजता येऊ म्हणाले. आता कुठे पावणे चार होताहेत.” सुगंधाताईंनी त्याला समजावलं.
“तसं नाही आई ! मी फक्त दोन तासांची सुटी घेऊन आलोय. उशीर होऊन नाही चालणार ! आज एक कमिटमेंट पूर्ण करूनच घरी जा असं बॉसनं सांगितलं !” वैतागत महेश म्हणाला.
महेशनं फॅन सुरू केला.
धावपळीनं तो घामाघूम झाला होता. त्यात फॅक्टरीत परत जायची घाई. “अरे सावकाश ! ती फुलदाणीतली फुलं उडून जातील बघ !” सुगंधाताईंनी म्हटलं.
‘आणि हो, आजी-आजोबांना म्हणावं आम्ही बोल्यावल्याशिवाय तुम्ही बाहेर येऊ नका ! नाहीतर येतील आगंतुकासारखे- न बोलावता ! महेश मोठ्यानं पुटपुटला.
तेवढ्यात पुन्हा कॉलबेल वाजल्याचा आवाज ऐकू आला.
महेश समोर जाणार तेवढ्यात “तू आत जाऊन जरा फ्रेश हो. आणि हो ! तो गुलाबी रंगाचा शर्टच घाल. गुलाबी रंग तुला खूप शुभ आणि लकी आहे असं जोशीबुवांनी सांगितलं.
मी बघते कोण आहे ते ?” असं म्हणत सुगंधाताईंनी दार उघडलं.
समोर एक मध्यमवयीन जोडपं आणि त्यांच्यामागे सलवारसूट घातलेली एक मुलगी उभी होती.
“नमस्कार ! मी कुळकर्णी ! पावसामुळे ट्रेन जरा उशीरा आली. आम्हाला उशीर तर नाही ना झाला ? असं म्हणत ते तिघेही घरात शिरले.
“छे हो ! प्रवास म्हटला की वेळ थोडी मागेपुढे व्हायचीच.” सुगंधाताईंनी त्यांचं स्वागत करत म्हटलं.
समोरच्या सोफ्यावर कुळकर्णी दांपत्य विराजमान झालं. ती मुलगीही बाजूच्याच खुर्चीवर बसली.
“किती उकाडा हो सध्या ! दिवसा गर्मी अन रात्री पाऊस !” काहीतरी बोलायचं म्हणून सुगंधाताई पुटपुटल्या.
“आम्हाला पुन्हा सातची गाडी पकडायला हवी. मुलगा घरीच आहे ना तुमचा ? सौ कुळकर्णींनी जराशा त्रासिक स्वरातच म्हटलं.
“हो, तर ! मघाशीच आला तो ! त्यालही फक्त दोन तासांची सुटी मिळालीय ! महेश बेटा ! येतोय ना बाहेर ?” सुगंधाताईंनी आत बघत विचारलं.
तेवढ्यात आईनं सांगितल्याप्रमाणे फ्रेश होऊन अन गुलाबी रंगाचा शर्ट घालून महेश बाहेर आला.
“काय घेणार, आपण ? चहा, कॉफी की थंड सरबत ? फरसाणाच्या बशा टीपॉयवर ठेवत सुगंधाताईंनी विचारलं.
“मी चहाच घेत असतो. आमच्या सौभाग्यवती मात्र कॉफीशिवाय काहीच घेत नाहीत. आणि तू गं नीलिमा ?” मुलीकडे बघत कुळकर्णींनी विचारलं.
‘मला बाई थंड सरबतच चालेल. कोण उकाडा हा ?” मुलीनं पटकन उत्तर दिलं.
“आणते हं !” असं म्हणत सुगंधाताई आत शिरल्या. मुलगी त्यांना अनुरूप वाटली होती. रंगाने गोरी होती. डोळॆ काळेभोर होते. महेशला नक्कीच शोभेल ! असा विचार करत त्या आत शिरल्या.
महेशची फॅक्टरी, मुलीचं शिक्षण, आवड-निवड अशा जुजबी चौकशीनंतर कुळकर्णी स्वत:च म्हणाले,“नीलू ! तुला जर अजून काही बोलायचं असेल ! विचारायचं असेल तर आत्ताच सांग हो ! नंतर झिकझिक नको. काय हो ! बरोबर ना ?” पत्नीकडे बघत कुळकर्णी घराचं निरीक्षणही करू लागले.
“पपा ! मला थोडं महेशशी बोलायचं ! चालेल ना ?” मुलीनं विचारलं.
“ओह यस ! व्हाय नॉट ? तुम्ही आतल्या रूममध्ये जाऊन बोलू शकता !” सुगंधाताईंनी दोघांकडेही बघत म्हटलं.
तेवढ्यात आतल्या खोलीतून महेशच्या आजोबांचा खोकल्याचा आवाज आला.
‘अच्छा ! तुमच्याही घरातही डस्टबीन आहे म्हणायचं ! किती ? एक की दोन ?” सौ. कुळकर्णींनी सुगंधाताईंकडे बघत विचारलं.
“डस्टबीन ? छे हो ! आजच तर सगळं घर स्वच्छ केलंय ! इथं सकाळीच कचरा नेणारी गाडी येऊन जाते !” त्यांच्या प्रश्नाचा रोख न उमजून सुगंधाताईंनी उत्तर दिलं.
त्यांच्या या भाबड्या उत्तरावर हसत हसत कुळकर्णी म्हणाले – “अहो, ताई, डस्टबीन म्हणजे ? घरी अजून कोण कोण असतं ?”
“माझे सासू-सासरे, मी अणि महेश ! बस्स ! चौघेच फक्त !” पुन्हा भाबडेपणानं सुगंधाताईंनी उत्तर दिलं.
“अहो, तेच ते ! डस्टबीन म्हणजे अजून किती म्हातारी माणसं घरात आहेत असं ह्यांना विचारायचं होतं. “ सौ कुळकर्णींनी स्पष्टीकरण दिलं.
म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांना डस्टबीन म्हटल्याबद्दल आलेली नाराजी मोठ्या प्रयासाने लपवत सुगंधाताईं म्हणाल्या – “सासू-सासरे आहेत घरात ! घरही त्यांचंच आहे ! हो, येत्या दोन-चार वर्षात आम्ही एखादा स्वत:चा फ्लॅट बुक करू.”
“म्हणजे घरात डस्टबीन ठेवण्याऐवजी तुम्हीच डस्टबीनमध्ये राहता असं सांगा की !” खो खो हसत कुळकर्णी खूप मोठा विनोद केल्याच्या आविर्भावात म्हणाले.
“आता जे आहे ते कसं टाळणार ? “ अपराधी भावनेनं सुगंधाताईंनी उत्तर दिलं. जणू काही त्यांनी खूप मोठी चूक केली होती.
“त्याचं काय आहे, ताई ! आमची नीलू जरा चोखंदळच आहे. अहो ! प्रत्यक्ष मुंबईतली कमी कां स्थळं बघितली ? पण आम्ही राहतो दादरला ! काही स्थळं घरं ईस्टर्न रेल्वेच्या लाईनवर म्हणून तिनं ती नाकारली. आम्ही दादर वेस्टला राहतो ना ! तिच्या मैत्रिणी तर हार्बर लाईनवरच्या स्थळांचा विचारही करायला तयार नसतात ! त्यामानाने आमची नीलू फार समजूतदार आहे हो ! तिला वेस्टर्न किंवा सेंट्रल रेल्वेवरच्या स्थळांचं वावडं नाही. पण ईस्ट म्हणजे फारच झालं नाही ?” सौ कुळकर्णींनी जरा जास्तच स्पष्टीकरण दिलं.
तेवढ्यात आतल्या खोलीतून महेश व नीलिमा बाहेर आले.
नीलिमाच्या चेहऱ्यावर विशेषत: कपाळावर आठ्यांचं जाळं बघून कुळकर्णींनी विचारलं –“ तुमचा स्वत:चा फ्लॅट केव्हा होणार म्हणालात ? त्याचं काय आहे महेश, माय डॉटर डिसलाईक डस्टबीन्स ! सॉरी ! पण जे आहे ते सांगितलं पाहिजे !”
कुळकर्णी कुटुंब उठत दाराकडे निघाले ! चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता !
कसाबसा त्यांना निरोप देऊन सुगंधाताईंनी दार बंद केलं.
महेशही फॅक्टरीत निघून गेला. तो रात्री उशीरा येणार होता.
मघाच्या स्वच्छ कव्हर्स घातलेल्या सोफ्यावर निराशेनं डोळॆ मिटत त्या बघू लागल्या, एका मोठ्या डस्टबीनमध्ये स्वत:चं शरीर आणि महेशचं भविष्यही. त्यांना त्यांच्या स्वच्छ घरात आता तीन-तीन डस्टबीन दिसू लागल्या.
लेखक - श्रीकांत काटे
( ही कथा साधारण १० वर्षांपूर्वी घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत आहे )
सदर कथा दिवंगत लेखक श्रीकांत काटे यांची असून कथेचे सर्व हक्क त्यांच्या पत्नी वीणा काटे यांचेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
