दिसतं तसं असतं?? (भाग २)

सौ.वैशाली प्रदीप जोशी 




अमृता हताश झाली होती... निराश झाली होती...तिनं क्वार्टर मिळण्यासाठी अर्ज करण्याचा निश्चय केला अन् हिंमत जुळवून एकदा बोललीच घरात सगळ्यांशी.

"रोहितनी इतका पैसा लावला नागपूरच्या घराला आणि मीच राहू नये का इथं? असं कसं? माझा काहीच हक्क नाहीये का " अमृता वैतागून बोललीच सासूबाईंना..

"नक्कीच आहे तुझा हक्क...पण तो आमची सून म्हणून...घराला पैसा लावला म्हणून नव्हे !" सासूबाईंना पहिल्यांदाच इतकं स्पष्ट बोलताना ऐकत होती ती.

"सांगू नये, पण रोहित आमचा मोठा मुलगा.अभ्यासात हुशार. इंजिनियरिंग करायचं हा हट्ट धरून बसला तेव्हा आमची ऐपत नव्हती गं तेव्हढी.पण ह्यांनी राहतं घर गहाण टाकून त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली.अन् ते कर्जही तुझ्या सासऱ्यांनीच फेडलं...अगदी पोटाला चिमटा घेऊन...दोन मुलांना इतकं शिक्षण देणं परवडणारं नव्हतं आम्हाला म्हणून अभ्यासात जेमतेम असलेल्या अभयला साधं बी एस्सी करायला लागलं. ह्या घरावर कर्ज काढून रोहितचं शिक्षण झालं त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून हे नको नको म्हणत असताना रोहितनं पैसा दिला घराच्या रिनोव्हेशनकरिता.." सासूबाई भूतकाळात रमल्या होत्या.

"आणि सकाळी आईची साधी भाजी निवडायला सुद्धा मदत होत नाही असं वाटतंय ना तुम्हाला वहिनी, तुम्हाला तर माहितेय दादांचा स्वभाव अती तापट. आईला कुठलीच गोष्ट कधी तिच्या मनाप्रमाणे नाही करता आली आजवर. आता आयुष्याच्या उत्तरार्धात फुलापानांत रमतेय ती म्हणून आम्हीदेखील तिच्या मनाप्रमाणे वागू देतो तिला.

तसंही जरा स्पष्ट बोलतो राग नका मानू पण इथे यायचा निर्णय तुम्ही तुमचा घेतलात, सगळं स्वतःच ठरवून टाकलंत, आम्ही आधीपासून इथं राहतोय पण ह्याबद्दल चर्चाही करावीशी नाही वाटली तुम्हाला. 

पण कुणी विरोध नाही केला तुमच्या इथे राहण्याला. तुमची नोकरी, माझं दुकान, अमेयची शाळा, आपल्या वेगवेगळ्या वेळा आणि त्यामुळे वेगळी जीवनशैली असणारच ना ! मग गेल्या 12 वर्षांची आमची लाईफस्टाईल बदलायला अनघालाही वेळ लागतोय त्यात तिची काय चूक?" अभयने त्याची बाजू मांडली.

"मी महिनाभर आजारीच होते वहिनी..मला टेन्शन आलं ना की माझे हातपाय नाही चालत. अभयला अन् आईंना माहितेय हे म्हणून मला बोलत नाहीत काही. 

माझ्या दादा- वहिनीमध्ये खूप भांडणं झालीत हो...अगदी घटस्फोटापर्यंत! आईकडून सगळं कळत होतं मला. म्हणून दार लावून बोलत राहायचे दादाशी, आईशी, वहिनीशी...

आता अमेयला काय सांगायचं म्हणून त्याच्या मनाला पटेलसं कारण सांगत असते मी, बी पी ची गोळी घ्यायला विसरले म्हणून ."

"काय गं अनघा, मी किती गैरसमज करून घेतला ! मला सांगायचंस तरी !"

"काय सांगणार वहिनी? पण देवाची कृपा सगळं व्यवस्थित आहे आता" बोलतानाही पाणावलेल्या डोळ्यांनी अनघानं हात जोडले.

"वहिनी, तुम्हाला कधी मनाई केलीये का कुणी कशाची? तुम्ही स्वतःहून भाजी-फळं आणत होतात त्याला आम्ही विरोध नाही केला इतकंच...आणि आम्ही इतकी फळं नव्हतो आणत हो आधी.आम्हाला नाही परवडत रोज फळं खायला".अनघा किंचित संकोचली होती.

"अन् आईचं काय मनावर घेता हो, पंच्याहत्तरच्या वर वय झालंय तिचं...त्यात दादांच्या धाकात गेलेलं उभं आयुष्य ! कधीकधी हट्टीपणा करतेच ती -बरं नसताना पोळ्या कर म्हणते...तुम्हालाही म्हणाली ना भाजी नसेल तर लोणचं पोळी खाऊन जा म्हणून...एकदा तर दोघींना सारख्या साड्या घ्यायला हवंचं पालुपद लावलेलं...अनघानं सांगितलं मला." अभय आठवणींच्या पोतडीतून एकेक आठवण उलगडू लागला.

"म्हातारपण हे दुसरं बालपण असतं वहिनी.. तिचं किती ऐकायचं आणि किती दुर्लक्ष करायचं हे अनघाला बरोब्बर कळायला लागलंय आता...त्याबाबतीत तिची पी.एच.डी.झालीये अन् तुम्ही चौथ्या वर्गात आहात अजून." अभयनं अमृताची थट्टा केली अन् वातावरणातला ताण हलका करण्याचा प्रयत्न केला.

"राहता राहीला तो खर्चाचा प्रश्न तर दोनदा सिलेंडरचे पैसे तुम्हीच दिलेत...पण आईनं नाही सांगितलं मला.विसरली असेल कदाचित.वय झालंय तिचं.पण तुमच्या मनाला डाचत होतं तर डायरेक्ट माझ्याशीच बोलायचं ना तुम्ही.

आणि हो, तुमच्याकडून इलेक्ट्रिकचं बील भरून घेतलं मी.पण लास्ट डेट आलेली अन् एका हॉस्पिटलला पुरवलेल्या मालाचं पेमेंट अडकलं त्यामुळे फार तंगी आलेली गेल्या महिन्यात. 

त्यात अमेयच्या शाळेची अन् ट्युशनची फी पण भरायला लागली.ही म्हणाली -मी बोलेन वहिनीशी.सध्या घेऊया पैसे त्यांच्याकडून म्हणून..."

"आणि तुम्ही स्वतःसाठी घेतलेली साडी फार आवडली मला म्हणून साडीची किंमत बघितली अन् तश्शीच दुसरी मिळावी अशी इच्छा होती माझी.. माझ्या वहिनीसाठी पाठवली असती..सगळं गोड झालं माझ्या दादाच्या संसाराचं म्हणून...पण नाही बोलू शकले मी." अनघाच्या ह्या बोलण्याने अमृता ओशाळली.

"आपण आपली औषधं अगदी हक्कानं भाऊजींच्या मेडिकल स्टोअरमधनं मागवतो ते कधीच त्याचे पैसे घेत नाहीत अन् अनघा अमेयला शाळेत सोडायला माझी गाडी घेऊन जाते तर मी मात्र महिना 300 रुपयांच्या पेट्रोलचा हिशेब धरून बसलेय !" तिला स्वतःचीच लाज वाटली.

"पण तू शेजारच्या काळेबाईंना काय सांगत होतीस गं माझ्याबद्दल? मी पर्स हलवत ऑफिसला जाते अन् कामानं तुझा पिट्ट्या पडतो वगैरे वगैरे..." अमृतानं आज सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवलंच होतं.

"ते मात्र चुकलं माझं." अनघानं प्रांजळपणे चूक कबूल केली. 

"कधीकधी तुम्ही टूरवर जाता, कधी मिटिंगसाठी घरून लवकरच निघून जाता मग तुमच्या खोलीचीही साफसफाई करतेच ना मी ! तुम्ही इथे यायचं ठरलं तेव्हा पोळ्यांना बाई लावूया असं ठरलं होतं आमचं पण तुम्ही घरीच काम करण्याबद्दल उत्साही होतात अन् कामाची वाटणी करून मोकळ्याही झाल्यात.

आमचं मत मांडूच नाही शकले मी. कामाचं ओव्हरलोड झालं की माझी चिडचिड होतेच हो कधी कधी..पण परक्या व्यक्तीजवळ असं नको होतं मी बोलायला...खरंच माझं चुकलं."

अमृताला आठवलं, ऑफिसमध्ये उशीर झाला, काम जास्त असलं की त्या सगळ्या मैत्रिणी मिळून "हाऊसवाइफ" महिलांबद्दल अशी शेरेबाजी करीत- "ह्यांना कामं काय असतात? दुपारी झोपा काढायला मिळतात इ.इ." पण ह्याचा अर्थ असा कधीच नव्हता की त्यांच्या मनात गृहिणींबद्दल आदर नाही...असं बोलणं फक्त एक फ्रस्ट्रेशन काढण्याचा बहाणा होता. मग अनघाचंही असंच होत असेल का? अमृता आता दुसऱ्या बाजूनेही विचार करू लागली.

"आम्हाला तुम्ही हव्या आहात इथे आमच्यासोबत..पण आपल्या वेळा वेगळ्या, जीवनशैली वेगळी.सगळ्यांचा एकत्र ताळमेळ जमेल का इथं?" अभयनं आता मुद्द्याला हात घातला.

"नाहीतर वरच्या दोन खोल्यांमध्ये तुम्ही रहा.तुमचं स्वैपाकपाणी तुमच्या वेळेवारी होईल अन् आमचंही रुटीन बदलणार नाही. शिवाय सुख दुःखाला, अडीअडचणीला आहोतच आपण एकमेकांना.दीडेक वर्षाचा तर प्रश्न आहे." अभयचं म्हणणं अमृताला पटू लागलं होतं.

"रविवारी, सुट्टीच्या दिवशी अन् सणावारी मात्र आपण एकत्र असणार आहोत बरं" सासूबाईंनी अमृताच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला !

आजवर फक्त आपली बाजू खरी असं वाटणाऱ्या अमृताला आता नाण्याला दुसरी बाजूही असते ह्याचं खरंखुरं प्रात्यक्षिक मिळालं होतं !

© सौ.वैशाली प्रदीप जोशी

सदर कथा लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.

साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.


धन्यवाद.!!!

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने