करायला गेली काय

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)



 "आई, शिरीषभाऊजींसाठी माधुरी कशी वाटते तुम्हाला?" किर्तीनं तिच्या भावी सासूबाईंजवळ विषय काढला अन् किर्तीच्या आईनं तिच्याकडे पाहून डोळे वटारले..

"ही माधुरी कोण ग?" सासूबाईंनी उत्सुकतेनं विचारलं.

"अहो, ती कीर्तीची मैत्रीण नाही का ? साखरपुड्याचे वेळी हिच्या मागेमागे होती ती..!" कीर्तीच्या आईनं परस्पर उत्तर देऊन टाकलं.

"नुसती मैत्रीण नाही.. अगदी जिवाभावाची सखी आहे हां ती माझी.. अगदी दो दिल एक जान म्हणतात ना तसं..!" किर्तीनं मैत्रिणीची बाजू राखली..

 "आम्हाला एकमेकींशिवाय मुळी करमत नाही.. आम्हीच झालो सख्ख्या जावा तर चालेल का तुम्हाला, आई?" किर्तीनं अजीजीनं विचारलं..

"अग हो..पण शिरीषचं मत घ्यायला हवं ना ?" सासूबाईंनी विषय पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला.

"मी दोघांची भेट करवून दिलीय.. भाऊजींना पसंत आहे माधुरी.. पण त्यांची हिंमत होत नव्हती तुमच्याजवळ विषय काढण्याची.. म्हणून मग मी म्हटलं.. मीच बोलते आईंशी.."

खरं तर कीर्तीचा हा आगाऊपणा तिच्या आईला मुळीच आवडला नव्हता.

"माधुरीच्या घरची परिस्थिती तेवढीशी बरी नाही.. वडील म्युसिपालिटीत कारकून अन् चौघी मुलीच.." कीर्तीच्या आईनं वस्तुस्थिती सांगितली..

"तशी माधुरी गुणी आहे हो.. मी पहिलीत असल्यापासून बघतेय ना तिला.. आमच्या कीर्तीची मैत्रीण म्हणून आमच्याकडे असते बरेचदा.." कीर्तीच्या आईनं आपला विरोध अगदीच जाणवायला नको ह्या बेतानं हळूच सांगितलं..

"तरीही शिरीषला शोभेल असं दुसरं स्थळ बघू की आपण..!" शेवटी कीर्तीच्या आईला राहवलं गेलंच नाही ..

कीर्तीच्या भावी सासूबाईंची पाठ वळताच आईनं कीर्तीचा पाठ घ्यायला सुरुवात केली.." तुझंच लग्न व्हायचंय अजून..सासरी बस्तान बसायचंय..'त्या' घरी जायच्या आधीच तुला कशाला हव्यात उठाठेवी ?"

कीर्तीचा स्वभाव लाघवी ..पण हट्टीदेखील.. मनाला जे आलं ते करणारच.. 

तिनं आपल्या आईला मनवलं अन् भावी सासूलाही..! 

माधुरीच्या घरी जाऊन स्वतःच बोलणीही करून आली..

"आम्ही दोघी सोबत असू ना‌ तर सासरी जड नाही जाणार.. दोघींनाही.. एकमेकींना सांभाळून घेऊ दोघीही.." कीर्तीनं माधुरीच्या घरी सांगितलं.. 

पण तिलाही मनातून वाटत होतं..  'मैत्रिणच जाऊ झाली तर ऐकण्यात राहील.. दुसरी कोणी आली अन् आपल्याला वरचढ झाली तर!' माधुरी स्वभावानं गरीब अन् दिरालाही वहिनीची मैत्रीण पसंत होती.. 

दोघा भावांचं 'शुभ मंगल' एकाच मांडवात पार पडलं..

किर्तीनं मैत्रिणीच्या घरच्यांना खर्चाची अगदी तोशीस लागू दिली नाही.. एकाच मांडवात लग्न झाल्यानं बराच खर्च तिच्या आईवडिलांनी उचलला होता.. 

दोघी मैत्रिणी अगदी खुश होत्या.. इतक्या की सासरी निघताना त्यांना रडू देखील आलं नाही.

दोन्ही जोडपी मधुचंद्राकरिता एकत्रच गेली..  अन् घरी परतली.. काही दिवसांनी रूटीन सुरू झालं.

किर्तीचं माहेर सुखवस्तू.. तिला उशिरापर्यंत झोपण्याची सवय.. 

माधुरीला‌ मात्र पहाटे लवकर उठून धुणीभांडी, केरंपोतेरं करण्याची सवय .. अन् तिच्या हाताला कामाचं वळणही.. तिला कामाचा उरकदेखील भरपूर.. कामं कुठल्याकुठं आटपून जात.. कळतही नसे..

माधुरी पहाटेच उठे.. किर्ती उठण्यापूर्वीच तिची सडा रांगोळी झालेली असे.. 

सासू सून एकत्र बसून चहा घेत गप्पा मारत.. किर्ती उठली की माधुरी लगबगीनं तिच्यापुढेही चहाचा कप आयता ठेवी..

सगळं काही नीट चाललेलं.. 

पण आताशा कीर्तीच्या मनात नाही नाही ते विचार येत.. 

"माधुरीचं सतत आईंच्या पुढे पुढे सुरू असतं.. सक्काळी उठून कसल्या कानगोष्टी करतात.. देव जाणे !" तिनं एक दिवस आईला फोनवर बोलूनही दाखवलं.

त्यात सासूबाईंच्या तोंडी सतत माधुरीच्या नावाचा जप.. "माधुरी तोंडल्याची भाजी खूप छान करते.. माधुरी रांगोळी फार सुंदर काढते.. माधुरीचं अमूक नि माधुरीचं तमूक !"

कीर्तीला नकळतच असुरक्षित वाटे.. 

"माधुरी जिवाभावाची मैत्रीण खरी.. पण सासरी तीच डोईजड होऊ लागली" ..कीर्तीच्या मनानं कितीही झिडकारलं तरी विचार तिचा पिच्छा सोडत नसत.

अशातच मंगळागौर आली अन् रक्षाबंधनही.. ! 

"माधुरीच्या माहेरची परिस्थिती बरी नाही अन् तिला भाऊ देखील नाही.." किर्तीनं आपल्या माहेरी कळवलं..

 "तुम्ही दोघींसाठीही सारखाच आहेर आणा.. ती कुठं कमी दिसायला नको.." कीर्तीनं आपल्या परीनं मन मोठं केलं..

माधुरीच्या माहेराहूनही आहेर आलाच.. पण त्यांच्या ऐपतीचा.. माधुरीच्या आईनं साडीला फॉल पिको अन् ब्लाऊजही शिवून आणलं..

 माधुरीनं संध्याकाळी हळदी कुंकवाकरिता नेसायला म्हणून  माहेरची साडी काढली..

"अगं अगं.. ही‌‌ साडी नेस.." किर्तीनं माधुरीला रोखलं.. अन् तिच्या माहेराहून आलेली आहेरची साडी पुढं केली..

"अग असू दे.. तू नेस..मी आईनं आणलेली नेसेन.. हो किनई हो आई.." माधुरीने सासूबाईंच्या कोर्टात बॉल टाकला..

"अग नेसू दे की तिला तिच्या माहेरची साडी.." सासूबाईंनी माधुरीची कड घेतली. 

हे असंच होणार.. कीर्तीला अनुभवानं कळून चुकलेलं.. 

तिच्या हट्टी स्वभावानं डोकं वर काढलं.. "अग दोघी जावांनी सारख्या नेसायच्यात साड्या.. म्हणून म्हटलं मी.." किर्तीनं बळेबळेच माधुरीच्या हातात साडी कोंबली.. 

अन् दोघी मैत्रिणी नव्हे,दोघी जावा भारीच्या साड्या नेसून तयार झाल्या..

आलेल्या बायकांना किर्ती आवर्जून सांगत होती.. दोघी मैत्रीणीना तिच्या माहेरून सारख्या साड्या आल्यात म्हणून..

दिवाळसणाला व्याह्यांना दोघींच्याही माहेराहून आमंत्रण होतं.. 

पण कीर्तीच म्हणाली.. एकाच गावात तर जायचयं..  शेजारी शेजारी.. 

आपण माझ्या घरी जाऊ या.. माधुरीच्या घरच्यांनाही तिथेच बोलावू जेवायला..

"पण वहिनी, लग्नानंतर एकदाही गेलो नाहीय मी त्यांच्याकडे राहायला.. असं करा.. तुम्ही नि दादा तुमच्या घरी जा.. आम्ही दोघं माधुरीच्या माहेरी राहू.. आईबाबांना ठरवू देत.. हवं तर ते दोन्ही ठिकाणी राहतील.. एक एक दिवस.." दिरानं बायकोची बाजू मांडण्याचा दुबळा प्रयत्न केला.

"नको..नको.. असं कशाला.. आपण सगळेच माझ्या घरी राहू.. तसंही माझं घर मोठंय.. आणि माधुरीचे आईबाबा पण येतीलच ना तिथे ? आणि माझं माहेर ते माधुरीचं पण माहेर.. आम्ही सख्ख्या मैत्रिणी आहोत म्हटलं.." किर्तीनंच विषय संपवला..

पाडव्याच्या दिवशी सगळे कीर्तीच्या माहेरी पोहोचले.. "अजूनही तुम्ही एकावर एक फ्री का ग ? तिनं तिच्या माहेरीच जायला हवं होतं.." कीर्तीच्या आईचं पुटपुटणं माधुरीला ऐकू गेलं.

दिवाळी आटोपताच माधुरीला बाळाची चाहूल लागली.. अन् सासूबाईंच्या माधुरीच्या कौतुकात आणखीनच भर पडली..

"एकाच दिवशी लग्न करून आल्या दोघी सूना.. पण धाकटीनं आधी नंबर लावला बरं का !" सासूबाईंच्या मैत्रिणी म्हणत..

किर्ती खजील होई.. खरं तर तिनं ठरवलेलं.. आपण दोघी घट्ट  मैत्रिणी.. एकाच घरात.. 

आपलं सगळं काही सोबत व्हायला हवं.. त्यात मी मोठी जाऊ.. आता धाकटीला आधी दिवस राहिले म्हटल्यावर लोक चार तोंडानं बोलणारच ना ?

"माधुरी,‌आपलं ठरलं होतं ना ग .. दोन वर्षे प्लॅनिंग करायचं म्हणून.. मग इतकी काय ग घाई तुम्हाला?" कीर्तीनं सरळच विषय काढला ..

"अग, हे काय? हा काय दोन मैत्रिणींतला विषय आहे का ? मला माझ्या नवऱ्याचा कल बघायला नको ? तसंही आपल्या आईंना घाई झालीय नातवंड बघण्याची.. आणि माझ्या आईलासुद्धा.." माधुरीनं पहिल्यांदाच रोखठोक उत्तर दिलं..

"काहीतरी बोलू नकोस.." किर्ती चिडली होती.. 

"आई मला नाही कधी असं बोलल्या ते ? तुलाच बरं बोलल्या ? तू मुद्दाम करतेस.. आईंच्या नजरेत चांगली होण्यासाठी.." कीर्तीच्या मनातला जळफळाट आता तिच्या ओठांवर आला होता.

"चांगलं नि वाईट काय ग? हा आमच्या नवरा बायकोचा वैयक्तिक विषय आहे.. मूल कधी होऊ द्यायचं ते.. तुम्हाला करायचंय प्लॅनिंग तर करा नं तुम्ही ? तुम्हाला कोण अडवतंय ?" माधुरीचा एवढा मोठा आवाज घर पहिल्यांदाच ऐकत होतं.

"वा गं वा ! मी जुळवून आणलंय तुझं लग्न.. मी रदबदली केलीय आईंजवळ.. नाहीतर मिळालं असतं का तुला एवढं तालेवार सासर अन् एवढा देखणा नवरा ?" कीर्तीचा तोल सुटला होता..

दोघींच्या आवाजानं घर खडबडून जागं झालं होतं.. 

घरातले सगळेच खोलीच्या दाराबाहेर मैत्रिणींची खडाजंगी बघत खिळल्यासारखे  उभे होते..

माधुरीच्या डोळ्यात पाणी होतं.. तिचा नवरा झटकन पुढे झाला अन् त्यानं माधुरीचा हात धरून तिला खोलीबाहेर नेलं.

"आई, आम्ही दोघं वेगळं राहू.. मी हिच्याशी लग्न केलंय.. वहिनीची मैत्रीण म्हणून नव्हे.. मला मनापासून आवडली म्हणून.. वहिनीने रदबदली नसती केली तरी ती ह्या घरात आलीच असती.. आत्ता नाही तर वर्षा दोन वर्षाने.. पण ह्या दोघींची मैत्री जपण्याच्या नावाखाली आम्ही एकत्र नाही राहू शकत आता.." कीर्तीचा दीर लग्नानंतर पहिल्यांदाच इतकं धाडसानं बोलला.

"नाही रे.. तुम्ही नाही.. आम्ही घर सोडू.." किर्तीनं चमकून पाहिलं.. तिचा नवरा बोलत होता..

किर्तीचंही अवसान गळालं होतं.. तिचा हिशेब चालला होता.. 

आपल्या हट्टानं तिनं मैत्रिणीला 'जाऊ' करून काय काय गमावलं...मैत्रीण.. सासर .. बंगला..अन् बरंच काही..

समाप्त 

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने