सासूबाईंची भिती


© अस्मिता देशपांडे




शैलेश हा सुमनताईचा एकुलता एक मुलगा. 

श्रीधरराव शैलेश लहान असतानाच कुठल्याश्या बारीक तापाचे निमित्त होऊन देवाघरी गेले.

सुमनताईवर संकंटांचा पहाडच कोसळला.

जीवनाची उमेदच हरवून गेली. पण लहानग्या शैलेश कडे पाहून त्या सावरल्या..

श्रीधरराव छोट्याश्या सहकारी बँकेत काम करायचे त्यामुळे पेन्शन वगैरे काहीच मिळाली नाही.

भविष्याची काहीच तरतूद केलेली नव्हती त्यांनी.. त्यांच्या मागे सुमनताईचे आयुष्य म्हणजे एक भयाण पोकळीच झाले होते..

पण म्हणतात ना देव काहीतरी काढून घेतो तेव्हाच दुसरं काही तरी देतही असतो.

सासरच्या मंडळींनी नेहमीप्रमाणे तुझे तू बघून घे म्हणून हात वर केले..

पण माहेरच्या माणसांनी साथ दिली.. 

सुमनताई स्वाभिमानी होत्या त्यांनी भावाला सांगितले की मला फक्त चांगली शिलाई मशीन आणून दे.. 

त्याचे सुद्धा पैसे मी हळूहळू फेडून टाकेल.

त्यांनी साड्या फॉलपिको आणि ब्लॉऊझ शिवून द्यायला सुरुवात केली. 

दिवसभर त्या मशीनवर बसत असत हळूहळू चांगला जम बसला.

शैलेशला आईच्या कष्टांची जाणीव होतीच त्यामुळे त्याने अभ्यासात कधीच कुचराई केली नाही.

शाळेत नेहमी अव्वल नंबरात राहत तो चमकत राहिला. 

पुढेही स्कॉलरशिप मिळवून इंजिनीरिंग केलं आणि लवकरच उत्तम पगाराची नोकरी सुद्धा पटकावली.

शैलेशसाठी स्थळं पाहायला चालू केली आणि त्यात सीमाचे स्थळ सांगून आले.

सीमा नाकीडोळी नीटस, सुंदर होती.. पण शिक्षण थोडे कमी होते.

शैलेशला सीमा आवडली आणि मग लग्न झाले.

सुमनताईना भरून पावल्यासारखे वाटले.. 

मुलाचे आयुष्य चांगले मार्गी लागावे यापेक्षा दुसरं काय असते मागणे एका आईचे..

लग्न झाले आणि महिन्या दोन महिन्यातच सीमाच्या पायगुणाने की काय म्हणा शैलेशला बढती मिळाली. 

गारात घसघशीत वाढ झाली. 

तिघेही खूप खूष झाले.

सीमाला सुद्धा सासूबाईच्या कष्टाची जाणीव करून दिली होती शैलेशने... 

त्यामुळे तिनेही मनोमन ठरवले होते आता सासूबाईंना खूप सुखात ठेवायचं..

 आणि म्हणूनच तिने लगेचच सगळी कामे आपल्या हातात घेतली होती..

सीमा जात्याच कामसू आणि सुगरण होती त्यामुळे रोज काहीतरी वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायची तिला आवड होती.

शैलेश तर आपल्या बायकोवर बेहद खूष होता म्हणतात ना पुरुषांच्या हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग पोटातूनच जातो.

तो आईसमोर सीमाचे खूप कौतुक करायचा.

पण सुमनताई मात्र आताशा बदलू लागल्या होत्या. 

शैलेशने सीमाचे कौतुक केलं की त्यांच्या मस्तकात कळ उठायची..

तिने कुठला वेगळा पदार्थ केला की, शैलेश भरभरून दाद द्यायचा ते त्यांना बिलकुलच आवडायचं नाही.

त्यातच एकदा तिने वेगळीच डिश बनवली तेव्हा शैलेश म्हणाला, आई तू कधी काही बनवलेच नाहीस गं असे...

झालं.. ठिणगी पडायला एकच संधी मिळाली सुमनताईना...

रागाने तडतडत त्या म्हणाल्या... मला कुठे वेळ होता वेगवेगळं काही बनवायला.. पोटाची खळगी कशी भरायची आणि उद्याचा दिवस कसा काढायचा यातच माझा दिवस जायचा..

त्यांना तशीही सैपाकात फारशी गती नव्हतीच आणि पुढे जबाबदाऱ्या वाढत गेल्याने त्यांनी सैपाकात कधी फारसा रसच घेतला नव्हता..

त्यामुळे शैलेशला फक्त पोळीभाजी, भातवरण एवढेच पदार्थ माहिती होते.. 

फारतर सणाला काहीतरी गोडधोड..

त्यामुळे सीमाने केलेले पदार्थ तो चापून खायचा.. 

आणि नेमकं हेच शल्य सुमनताईला खूप बोचायचं...

त्या प्रसंगानंतर सुमनताईचे सीमाशी वागणेच बदलून गेलं..

शैलेश सीमा कधी रविवारी बाहेर जाऊन येतो म्हणाले की तोंड वाकडं करायचं किंवा काहीतरी कारणांनी त्यांच्या जाणे रद्द करायचे असे त्या करू लागल्या. 

 तिचं कौतुक करणे तर सोडाच पण शैलेश नसताना सतत तिला टाकून बोलणं, आयत्या पिठावर कशी रेघोट्या मारते,तुझ्यामुळे घरातला किराणा सामानाचा खर्च वारेमाप वाढलाय, असं काहीही त्या तिला बोलायला लागल्या.

पण सीमा समजूतदार होती.. 

गप्प राहिली..

आज ना उद्या त्यांना त्यांची चूक समजेल आणि त्या पहिल्यासारख्या वागायला लागतील या आशेवर ती होती.. 

त्यामुळे तिने शैलेशला याबाबतीत काही सांगणे टाळलेच होते.

एक दिवस त्या असेच काहीतरी बोलत असताना शैलेश अचानक आला आणि त्याने आईचे सगळे बोलणे ऐकले.. 

त्याला वाईट वाटले की सीमा हे किती दिवस सहन करत असेल..

तो आल्याबरोबर सुमनताई चपापून गप्पच बसल्या.

शैलेशने सीमाला खूप वेळा खोदून विचारल्यावर मग मात्र सीमाने पहिल्यापासून सगळी स्टोरी सांगितली..

आपली आई अशी काही वाईट वागत असेल असे त्याला वाटलेच नव्हतं...

आताच्या आता आईला जाब विचारतो म्हणाला तोच सीमा त्याला थांबवत म्हणाली...

अहो, मला त्यांच्या वागण्याचा अजिबातच राग आला नाहीये.. 

कारण या सगळ्यामागे आहे त्यांना वाटत असलेली भीती....

शैलेश म्हणाला... कसली भीती

सीमा म्हणाली.. अहो त्यांना असं वाटतं असेल की लहानपणापासून मी वाढवलेला मुलगा आता सुनेच्या कह्यात जातो की काय... 

असुरक्षितता जाणवतेय त्यांना.. 

एकतर त्यांनी एकटीने तुमचा सांभाळ केला त्यामुळे त्या तुमच्या बाबतीत ओव्हर पझेसिव्ह झाल्या आहेत. 

त्यामुळे आपला मुलगा आता दुसऱ्या व्यक्तीच्या खूप जास्त जवळ जातो आहे, तिचे खूप कोडकौतुक करत आहे ही गोष्ट त्यांना सहनच होत नाहीये. 

त्यामुळे त्या अशा वागत आहेत.. आपण थोडे दिवस थांबू.. आणि त्यांना चूक कळेल अशी अपेक्षा ठेवुयात.

शैलेश सीमाकडे अवाक होऊन पाहतच राहिला.. माझी आई असूनही तूच माझ्यापेक्षा आईला जास्त समजून घेतलंस....

सीमा हसतहसत म्हणाली.. हो तर मग.. 

आज त्यांच्यामुळेच तुम्ही मला मिळालात ना पती म्हणून... 

त्यासाठी थोडा सासूबाईचा लटका राग सहन करावाच लागेल नाही का...

आणि मला खात्री आहे त्या एक दिवस नक्की बदलतील आणि तुमच्यावरचा माझा हक्कही आनंदाने मान्य करतील...

समाप्त


  © अस्मिता देशपांडे

सदर कथा लेखिका अस्मिता देशपांडे यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क  त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने