मैत्री

© पल्लवी घोडके-अष्टेकर.




आज संध्याकाळी अर्णव जरा शांत शांत होता,टीव्ही टाईम मध्ये रिमोटने सारखं सारखं चॅनल बदलत होता. त्याचं लक्ष टीव्हीमध्ये नव्हतंच, तो सतत चुळबुळत होता.

त्याला फार अस्वस्थ वाटत होतं.

काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. 

संध्याकाळची वेळ असल्याने आई स्वयंपाकात व्यस्त होती. त्याला तिला काहीतरी सांगायचे होते पण हिंमत होत नव्हती. पण सांगावे तर लागणारच होते. 

ती ओरडेल, बाबांना नाव सांगेल, फार फार तर एखादी थोबाडीत देईल, तर तीही खाऊन घेऊ. निदान ही भीती, सतत वाटत असलेला धाक तरी कमी होईल. 

तो चॅनेल बदलतच होता.डोक्यात सतत विचार चक्र चालू होतं. कशीबशी हिम्मत करून तो आईला सांगायला किचनमध्ये गेला.

 तेवढ्यात"अरे….टीव्हीचा आवाज जरा कमी कर आणि अभ्यास झालाय का तुझा? बाबा येतील आता,पसारा नाही ना घरात ? आल्या आल्या घरात पसारा बरा वाटत नाही." आईने भराभर त्याला प्रश्न विचारले. 

"करतो आवाज बारीक.." म्हणून पाणी पिऊन अर्णव पुन्हा हॉलमध्ये गेला आणि टीव्ही बंद केला.

जे घडलं ते सरळ सरळ तिला सांगून त्यात माझी काही चूक नाहीये हे पटवून द्यावे असं त्याला मनोमन वाटत होतं. 

पण आपण आईला सगळं सांगितलं आणि आपल्याला मदत करण्याऐवजी तीच घाबरून गेली तर ? 

ती घाबरून रडू लागली तर? तिने आपल्यावर विश्वास ठेवला नाही तर? 

ह्या सगळ्या विचारांनी त्याला आणखीनच भीती वाटू लागली.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. 

अर्णवने घाबरतच दार उघडले, दारात बाबा नुकतेच ऑफिस मधून घरी आले होते. त्यांना पाहून अर्णवला थोडी भीती वाटली. 

तो तसाच दारात उभा राहिला. मग बाबांनीच अर्णवला हसत विचारले "काय रे….. आत येऊ देणार नाहीस का?" त्या प्रश्नाने अर्णव भानावर आला व बाजूला सरकला. 

बाबा आत आले तशी आई धावतच पाणी घेऊन आली.

अर्णवचे बाबा स्वभावाने अतिशय शांत होते. 

ते कधीच अर्णववर ओरडत नसत, आईचे आणि बाबांचेही कधी भांडण होत नसे. 

पण आईला बाबांचा खूपच धाक होता. 

ती सतत अर्णवला बाबा रागवतील,बाबा चिडतील, मलाच बोलतील अशा धमक्या देत. 

अर्णव तसा बाबांसारखाच स्वभावाने शांत,अभ्यासू,मेहनती व गुणी मुलगा होता. 

तो कधीच आई बाबांना दुःख होईल असे वागत नव्हता.

पण आज …….आज त्याच्याकडून एक चूक झाली होती. 

त्याचा त्याला मनोमन पश्चात्तापही झाला होता. 

पण पुढे काय ? त्याचे काही मित्र त्याला त्या चुकीसाठी आता ब्लॅकमेलही करत होते. 

एक चूक लपवण्यासाठी आपण वारंवार दुसऱ्या चुका करणे योग्य नाही हे त्याला समजत होते पण मित्रांचे ऐकण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 

त्याचे आता अभ्यासात लक्ष लागत नव्हते. तो सतत दडपणाखाली राहत होता. 

या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तो शोधत होता आणि आईला सांगून मोकळं व्हावं, मग ती बाबांना समजावेल असे वाटून त्याने आज आईला सांगण्याचे ठरवले होते पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

मुलांना सगळ्यात जवळचे वाटतात ते आपले आई-वडीलच.

त्यांना पडलेले प्रश्न ते इतर कुणाला कसे विचारतील? 

आपले मूल जर संकटात सापडले असेल तर त्याला मदत करणे हे आई-वडिलांचेच कर्तव्य आहे पण इथे अर्णवची आई त्याला सतत बाबांचा धाक लावत असे. 

बाबांना आवडणार नाही…..बाबा रागवतील…... चिडतील…..आणि तिच्या अश्या सततच्या सांगण्याने अर्णवच्याही मनात बाबांबद्दल थोडी भीती निर्माण झाली होती.

बाबा कधी रागवत नसले तरी त्यांच्या शांत स्वभावामुळे ते अर्णवशी फार बोलतही नसे.

त्यामुळे डायरेक्ट बाबांना काही सांगणे त्याच्याकडून शक्यच नव्हते.

शितलचे म्हणजेच अर्णवच्या आईचे बालपण अगदी धाकात गेले होते. 

तिचे वडील अतिशय रागीट स्वभावाचे होते,शिवाय कडक शिस्तीचे असल्याने त्यांना सगळेच फार घाबरत असे. 

शीतलची आई सतत तिच्या बाबांच्या धाकात राहत व मुलींनाही सतत धाकात ठेवत.

शितलच्या मनात वडिलांबद्दल एवढी भीती होती की, तिच्या त्यांच्या नुसत्या ओरडण्याने पण ती रडू लागे. (अगदी आजही.)

आजोळी जाणे अर्णवला आवडत नसे. कारण तिथेही आई आजोबांच्या धाकात राहत व अर्णवला ही सतत हे करू नकोस ते करू नकोस म्हणून बजावत असत.

तिच्या मनावर जे संस्कार झाले होते तेच संस्कार ती नकळत अर्णवच्याही मनावर करत होती.

अर्णवमध्ये आता बदल होत होता, गेल्या महिनाभरापासून तो सतत चिडचिड करू लागला होता.

बाबांना त्यातील होणारा बदल जाणवत असल्याने त्यांनी त्याबद्दल शितल कडेही चौकशी केली.

पण तिला नेमकं काय घडलं याची कल्पना नव्हती. अशातच शाळेत P.T.A मिटींग असल्याने बाबा मिटींगला जाणार हे अर्णवला माहीत होते. 

अर्णवच्या टीचर शी बोलून बाबा घरी आले. 

तिकडे अर्णव अतिशय घाबरलेला होता. आपले अभ्यासात होणारे दुर्लक्ष त्याला जाणवत होते. 

बाबा आपल्याला ओरडतील, कदाचित मारतील ही असे त्याला वाटले होते. 

पण तसे काहीच झाले नाही उलट दुसऱ्या दिवशी आपण बाहेर फिरायला जात आहोत कसे झोपतांना बाबा अर्णवला सांगून गेले.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अर्णव व बाबा फिरायला गेले.

अर्णवला बसायला सांगून बाबा आईस्क्रीम आणायला गेले.

आईस्क्रीम खातांना ते अर्णवच्या जवळ बसले. त्याच्या पाठीवर मायेने हात ठेवून त्यांनी,"तुला काही सांगायचे आहे का?" म्हणून अर्णवला विचारणा केली.

त्याने घाबरतच बाबांकडे पाहिले. "तुझ्या मनावर कसले दडपण आहे का? असेल तर मला निसंकोचपणे सांग." असे प्रेमाने विचारताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

त्याने लगेच हातातले आईस्क्रीम फेकून देऊन बाबांना मिठी मारली. 

बाबांनीही त्याला प्रेमाने थोपटले, मनसोक्त रडून दिले. मग मात्र अर्णवने डोळे पुसले व तो बोलू लागला.

"बाबा….तुम्ही रागवाल,तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मी बोललो नाही,पण आता तुम्ही मला शिक्षा दिली तरी चालेल पण मी आज तुम्हाला सांगणारच आहे." असे म्हणून अर्णव सगळं सांगू लागला.

त्याच्या कॉलनीत एक नवीन कुटुंब दिल्लीहून राहायला आले होते. 

त्यांचा मुलगा अर्णवच्याच वयाचा होता. त्याच्या वडिलांच्या बदलीमुळे ते येथे शिफ्ट झाले होते.

संध्याकाळी सगळी मुलं कॉलनीत गप्पागोष्टी करत जरा वेळ बसत असत. त्या मुलाला थोड्या वाईट सवयी होत्या.

त्याने एक दिवस त्याच्या बाबांची एक सिगारेट आणली होती व मी पण कधीतरी चोरून बाबांची सिगारेट ओढतो असतो तो मुलांना सांगत होता. 

त्याने सिगारेट ओढण्याची ॲक्शन करून दाखवली व प्रत्येकाच्या हातात दिली. 

अर्णव तर सिगारेट ला हात लावायलाही घाबरत होता. "तू तर आता 9th Std.मध्ये आहेस आणि इतका भेकड कसा रे?" म्हणून तो अर्णव ची खिल्ली उडवत होता. 

नंतर सिगारेट हातात घेऊन ओढण्याची नुसती ॲक्शन कर म्हणून त्याने अर्णवला आग्रह केला व तसे करत असतांना त्याने त्याच्या नव्या मोबाईल मध्ये अर्णवचा फोटो काढला व तेव्हापासून तो फोटो दाखवून तो मुलगा अर्णवला ब्लॅकमेल करत होता. 

पॉकेटमनी, वॉच,लंच बॉक्स घेणे, अर्णव कडून होमवर्क करून घेणे, त्याचा पेपर बघून लिहिणे अशा बऱ्याच प्रकारे त्याने अर्णवला ब्लॅकमेल केले होते आणि हे सगळं नाही केले तर तुझा फोटो तुझ्या वडिलांना दाखवेल. अशी धमकी तो वारंवार अर्णवला देत होता.

अर्णव कडून सगळं खरं कळल्यावर बाबांनी त्याला जवळ घेत सांगितले की तू आता मोठा झाला आहेस.काय योग्य आणि काय अयोग्य हे तुला समजायला हवं.

आपल्याला विनाकारण कोणी त्रास देत असेल तर त्याचा प्रतिकार करणे तुला यायला हवं. 

तसेच आई-वडील हे तुझे मित्र आहे हे लक्षात ठेवून तू सगळ्या गोष्टी त्यांना सांगायला हव्यास. 

तुझ्या प्रत्येक संकटात आम्ही तुझ्या सोबत आहोत व तुला हवी ती मदत करण्यासाठीच तर आम्ही आहोत. 

तू जर आमच्यापासून गोष्टी लपवल्या तर लोक त्याचा फायदा घेणारच. आज नंतर तू कुठलीही गोष्ट आमच्यापासून लपवू नकोस. 

आणि खोटं हे कधीच लपून राहत नाही हे लक्षात ठेव.

परत आल्यावर मात्र अर्णवला घरी पाठवून बाबा तडक त्या मुलाच्या घरी गेले. 

थोड्या वेळाने ते शांतपणे घरी आले, तेव्हा अर्णव टीव्ही पाहत होता. 

त्याला बऱ्याच दिवसांनी असं शांत पाहुन आई व बाबा दोघांनाही बरे वाटले.

मुलांना शिस्त व धाक लावणे गरजेचे आहे. त्यांनी घरातील मोठ्यांचा आदर केला पाहिजे हे जरी खरे असले तरी पालकांमध्ये व मुलांमध्ये नेहमी मैत्रीपूर्ण संबंध असावेत. 

प्रत्येक चुकीला शिक्षा न करता ही चूक कशी महागात पडली असती हे मुलांना समजावून सांगितले तरी मुले ती चूक परत करत नाहीत. 

असे समजावून न सांगता त्यांना सतत घालून पाडून बोलल्याने पालकांमध्ये व मुलांमध्ये एक दरी तयार होते.त्यालाच आपण नवी पिढी व जुनी पिढी असे संबोधन देऊन मोकळे होतो.

आमच्या वेळी असं नव्हतं, तसं नव्हतं म्हणून मुलांना दोष देत राहतो, पण त्यांच्या बरोबर आपणही जुन्या पिढीतून नव्या पिढीत आलेलो आहोत हे आपण विसरून जातो.

ज्या घरात पालकांमध्ये व मुलांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध असतात त्या घरात अशी पिढींची दरी निर्माण होत नाही. 

कितीतरी घरांमध्ये मुलांचे आई-वडीलांपेक्षाही आजी-आजोबांबरोबर जास्त पटत असते. तिथे तर दोन पिढ्यांचे अंतर असते पण त्याची दरी बनत नाही. 

आपल्या मनातील भीती आपण वेळीच काढली नाही तर नकळत ती भीती आपण आपल्या मुलांच्याही मनात निर्माण करत असतो. 

हे अर्णवच्या बाबांनी शितलला समजावले. 

तिलाही तिच्याकडून अर्णवच्या मनावर नकळतपणे भीतीचे संस्कार निर्माण केल्याची जाणीव झाली.

पण जगात अशी कुठलीही चूक नसते जी आपण सुधारू शकत नाही. 

त्याप्रमाणे शीतल ने ही तिची चूक सुधारण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली.


समाप्त

© पल्लवी घोडके-अष्टेकर.

सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने