आठवणीतला पहिला हापूस आणि आठवणीतली सुजाता

 ©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे


आमच्या दोघींच्या हातात दोन आंबे देऊन सुजाता घरात गेली. आंबे हातात देताना तिने ते माचवून दिले होते. कदाचीत रस बाहेर सांडू नये म्हणून असावे. 

सोबत माझी भाची होती. 

मी तिला म्हणाले, संगीता बाळा ! आंबा आपण घरी खातो तसा नको खाऊ. म्हणजे कोय बाहेर काढून,  कोय आणि साल चोखत बसू नको. फक्त रस पिऊन आंबा ठेऊन दे.

आंबा चोखता चोखता ती हळूच म्हणाली. मावशी हा आंबा वेगळाच आहे नाही का ग ? 

हो ! 

याला हापूस म्हणतात. 

आत्ताच बोलले ना सुजाता मावशी ! 

हो !

 मावशी इतका भारी आंबा आणि तू बोलते घुई चोखू नको. 

काय ग मावशी ?

 बाळा हे आपले घर नाही ! 

आपले हे असे चोखलेले आंबे  बघून माझ्या मैत्रिणीच्या घरचे काय विचार करतील आपल्या बद्दल?  

मग ती म्हणाली, बर मावशी फक्त रसच चोखते. 

झाले तुझे समाधान. 

आम्ही दोघींनी आंबा चोखला . घुई , साल न चोखता पहिल्यांदा आंबा टाकून दिला.  त्यातल्या त्यात हापूस ! 

मी तर फक्त भूगोलाच्या पुस्तकात नाव वाचले होते. 

हात धुऊन तिच्या घरून निघालो. डोक्यात एकच विचार  येत होता. हे दोन आंबे इथे न खाता आपण घरी घेऊन गेलो असतो तर!!!

सुजाताला आपण म्हणालो असतो, सुजाता आम्ही आंबे इथे नाही खात . घरी जावून खाऊ ! 

तर !!!!

तर,  आज प्रत्येकाला हापूसची चव कळली असती. 

मनात हा ही विचार येऊन गेला, आपण गावरान पंधरा आंब्याचा रस करतो. कदाचित तेवढाच रस या दोन आंब्यातून निघाला असेल. तो सुध्दा घट्ट. 

गावरान आंबे म्हणजे कोय मोठी , रस कमीच तो सुध्दा पातळ. 

रस करणे हाही एक सोहळाच. एका बादलीत आंबे भरपूर पाण्यात टाकून ठेवायचे. 

त्याचा चिक आणि वरची घाण निघून जाते. शिवाय रस थंड निघतो. तेव्हा काही फ्रीज नव्हता. मग हा उद्योग .

मग मस्त आंबे माचवायचे. एका भांड्यात रस पिळून , दुसऱ्या भांड्यात साल ठेवायचे. मग त्या रसातली कोय मुठीत घट्ट दाबून सगळा रस काढून घ्यायचा.  

साल उलटे करून घ्यायचे. आता  सर्व कोयीवर मीठ टाकायचे. मग ते चोळून चोळून त्यात पाणी घालून धुवायचे. चांगले दोनतीन वेळा. मग मोर्चा वळायचा साली कडे. 

साल सुध्दा अशीच दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची ते सगळे धुतलेले पाणी रसात टाकायचे.

साधारण अंदाज घ्यायचा निदान घरातल्या प्रत्येक माणसाला एक वाटी रस मिळाला पाहिजे. कधी आंबा छोटा असेल, किंवा रस कमीच असेल तर मग अजून एखाद्या पाण्याने जास्त धुवायचे. मग त्यात आंब्याच्या चवी नुसार साखर विराजमान व्हायची. 

आता पुढचा कार्यक्रम एकदम भारी. ते धुतलेले साल आणि घुया जवळ घेऊन सगळे बहिण भावंड पुन्हा चोखत बसायचो. आमच्यात जणू स्पर्धा लागायची कोणाची घुई जास्त पांढरी शुभ्र होते. 

कुरडया, सांडळ्या , खीच्चे तळले जायचे. आई तेल लावून मस्त घडीच्या पोळ्या करायची. तो दिवस आम्ही सणासारखा साजरा करत होतो. 

आज दोन हापूस आंबे  घुई न काढता खाल्ले. आपल्या गरीबी वर कुणी हसू नये म्हणून. 

माझे मलाच हसू आले. 

 हापूसची चव अजूनही जिभेवर रेंगाळत होती. 

  हापूसची साठा उत्तराची कहाणी घरी जाऊन कधी एकदा घरच्यांना सांगते याची उत्सुकता लागून राहिली होती.  

  मधेच भाची विचारायची, मावशी ! आपण ते घुई आणि फोतर का नाही चोखले ग ? का आंबा तसाच फेकून दिला? 

  तो पण इतका भारी!!

  हापूस....!

 मला इतकचं वाटत होत, आपल्या गरिबीचे कुठे वाभाडे निघायला नको. 

 झाकली मूठ सव्वा लाखाची. तिच्या या निरागस प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे सुध्दा नव्हते.

  असा हा माझ्या बालपणात पहिला,  अवीट गोडीचा, आजही जिभेवर त्याची चव रेंगाळणारा ,हापूस ....!

   

  "आठवणीतली सुजाता "   

पाचवीत असतांना सुजाता आमच्या शाळेत आली. पहिल्या दिवशी तिने वर्गात प्रवेश केला. आम्ही सर्व मुली तिच्या कडे पाहतच राहिलो. उंच बांधा, अंगाने जरा धष्टपुष्ट ,  गोरीपान, चाफेकळी नाक, जाड, काळेभोर गुडघ्याच्या खाली जातील इतके लांबसडक केस. दोन घट्ट वेण्या दुमडून वर  लाल रिबन बांधलेल्या. सर्वांना भुरळ पाडेल असे अप्रतिम सौदर्य. 

तिच्या बोलण्यातून कळले, तिचे वडील स्टेट बँकेत मैनेजर होते.  

त्या बँके समोर एक छोटीशी को- ऑपरेटिव्ह बँक होती. तिथे माझे बाबा ड्रायव्हर . सुजाताचे क्वार्टर आणि माझे घर चालत पाच मिनिटांचा रस्ता.

 त्यांचे क्वार्टर आणि आमच्या शाळेची compound wall  एकच. 

खाली बँक असल्यामुळे त्यांना खेळायला अजिबात जागा नव्हती. मग ती माझ्या घरी अधेमधे यायची. तिला माझ्या घरी खूप मस्त वाटायचे .

ती आली की मग आम्ही लंगडी, लगोरी, आबाधुबी, टीक्कर बिल्ला, अष्टचंग खेळत बसायचो.

ती आमच्या घरी आता चांगलीच रुळली होती.अताशी ती रोजचं येत होती. 

आई म्हणायची दिव्याचे दीपक तुटेल पण या पोरींचे येणे नाही. फार लाघवी पोर. 

तिला आमचे शेणाचा सडा घातलेले अंगण, शेणामातीने सारवलेले घर, ती चूल आणि त्या चुलीवर बनवलेले जेवण सगळे खूप आवडायचे.

कधी कधी आई विचारायची सुजाता जेवते का? 

ही पट्कन हो म्हणायची. 

नंतर आईच्या लक्षात यायचे आपल्या कडे पामोलीन तेलात भाज्या करतो. त्यात रेशनचे गहू, तांदूळ डाळ.

आई म्हणायची नको अग सुजाता ! 

आमचे जेवण तुला नाही चालणार !

तिचा भाबडा प्रश्न .

का काकु ? 

का नाही चालणार ?

अग बाळा ! आमच्या कडे सगळे रेशनचे आहे. 

तेल सुध्दा पामोलीन ?

तुला नाही सहन  होणार ते ! उगाच आजारी बिजारी पडायची ? 

नकोच बाई !

मग ती म्हणायची,काकु ! 

काही होणार नाही मला  ! 

आणि तुम्ही खाता न! 

तुम्हाला काही होत का ? 

आई म्हणायची , अग आम्हाला सवय आहे! 

मग ती विचारायची, काकु  आज कोणती भाजी केली तुम्ही? 

अहाहा ! 

काय सुंदर, खमंग सुगंध येतोय! 

काकु एक घास खाऊन बघते. असे म्हणून सुजाता चुलीवरची भाकरी आणि वांग्याची भाजी पोटभर जेवायची. 

पण तिने कधी सांगितले नाही की तुमच्या घरचे खाऊन त्रास झाला म्हणून. तीच्यातला साधेपणा आमच्या वाड्यात सगळ्यांनाच खूप आवडायचा. 

सुजाता आता जवळ जवळ रोजच आमच्या घरी खेळायला येत होती. कधी तिची धाकटी बहीण सुचिताला घेऊन यायची.

मग आम्ही खूप दंगा मस्ती करायचो. दोघी पण दिले ते खाऊन घ्यायच्या. कधीच नाव ठेवले नाही.

उलट खूप आवडीने खायची. मी एका साध्या ड्रायव्हरची मुलगी  आणि ती मॅनेजरची मुलगी,  ही दरी सुजाता ने कधीच मिटून टाकली होती.

 मी मात्र भीत भीत एकदोन वेळा  तिच्या घरी गेले. तिचे आईवडील, भाऊ आणि बहीण सगळेच प्रेमळ. 

म्हणायचे येत जा ग तू पण कधी कधी. गेल्यावर काहीतरी खायला द्यायच्या.  एकदा डिश मध्ये काहीतरी खायला दिले. 

मी विचारले काय हे? तर म्हणाल्या फोडणीची पोळी. 

मी विचारात पडले ही कोणती नवीन डिश. खाल्यावर समजले ते कुटके होते. त्यांनी ते खूप बारीक करून घेतले होते.  वरून भरपूर तेल , कांदा घालून केले होते. आमचे चमचाभर तेलात ,जाड जाड कसे चांगले होतील. हो पण त्या नंतर आम्ही पण पोळ्या छान बारीक करून घेऊ लागलो. तेल, कांदा मात्र वाढवू शकतो नाही. आम्ही पण कुटक्याचे नामकरण केले . फोडणीची पोळी.

असेच छान मजेत दिवस जात होते.  चार वर्ष होत आली. 

सुजाताच्या बाबांची बदली झाली. सुजाता आम्हाला सोडून गेली. त्यावेळी काही फोन नव्हते. पत्ता घ्यावा हे डोक्यात राहिले नाही. आता फक्त आठवणी होत्या. 

माझे लग्न लवकरच झाले. त्या नंतर पाच सहा वर्षाने कळले सुजाताचे पण लग्न झाले आणि ती पण मुंबई, म्हणजे कल्याणला आहे.  

त्यानंतर बाहेर पडले की सतत नजर सुजाताला शोधायची. कुठेतरी, कधीतरी नक्की दिसेल. पण निराशाच पदरी पडत होती. अशीच चार पाच वर्ष गेली. पण माझी नजर सुजाताचा शोध घेतच होती. 

काय आश्चर्य??

सुजाता मी भाजी घेत होती त्याच्या बाजूलाच भाजी घेत होती. तिने जसा भाजीचा भाव विचारला, माझे मन मला म्हणाले हाच तो आवाज !

हीच ती ! 

माझी मैत्रीण सुजाता ! मी वळून पाहिले ती सुजाताच होती !   

सुजाता  ! सुजाता ! वेड्या सारख्या तिथल्या तिथे तीनचार आवाज दिले ! ती सुध्दा डोळे विस्फारून , प्र !!! भा!!! थोडावेळ तिचा आ तसाच होता. 

मग दोघी रस्त्याच्या बाजूला उभ्या राहिलो. सुजाता म्हणाली, मला माहित नव्हते ग तू पण कल्याणला आहे. मी म्हणाले, मला माहित होते. प्रत्येक वेळी बाहेर पडले की माझी नजर तुला शोधायची कुठेतरी नक्की दिसेल ही आशा होतीच.

दोघींनी एकमेकींना  घट्ट मिठी मारली. माझे लक्ष तिच्या केसांवर गेले. खूप पातळ , आणि अगदी खांद्या पर्यंत . माझा माझ्या डोळ्यावर विश्वास च बसेना. शेवटी न राहवून सुजाता ला म्हणाले, सुजाता अग तुझे केस. 

असे कसे झाले ग!

 आम्ही शाळेत अस तांना तिच्या केसांना सारखा हात लावत होतो. 

तिला आम्ही विचारत होतो, सुजाता तू केस कसे आणि किती दिवसाने धुते. कारण ते खरच खूप जाड आणि लांब सडक होते. 

ती सांगायची मी फक्त रविवारी केस धुते . ते सुध्दा एका उंच स्टूल वर बसून. अर्थात मला नाही धुता येत आईच धुवून देते आणि आता हे असे केस. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. 

 नंबर घेऊन दोघी आपापल्या घरी गेलो. 

घरी येऊन मी शाळेतली मैत्रीण भेटल्याचा आणि तिचे लहानपणीचे आमच्या घराशी असलेले प्रेमाचे वर्णन करण्यात रंगून गेले. 

त्या नंतर फोन, एकमेकींकडे जाणे येणे सुरू झाले. पुन्हा नव्याने मैत्री फुलत गेली. प्रत्येक वेळी भेटलो की पुन्हा नव्याने बालपणात जात होतो. जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. 

काल सुजाताचा खूप दिवसाने अचानक फोन  आलेला. 

मी जरा रागावून म्हणाले, सुजाता तु मला भेटलीस ना, की काठीने झोडपून काढते. 

काय ग? 

तुला कधी फोन बिन करावासा वाटत नाही का ????

खूप जोरजोरात हसत होती. तितकेच निरागस हसू. 

बालपणात होते तसेच, खरच आजही ती तितकीच निरागस भासली मला. 

म्हणाली, कोरोना संपला की नक्की ये काठी घेऊन. मी वाट पाहते. खाऊन घेते तुझे प्रेमाचे दोन फटके. खूप हसलो आम्ही दोघी. 

आज पुन्हा ती म्हणाली, प्रभा!  काकु कशा आहेत ग. बरी आहे. 

काकूंच्या हातची चुलीवरची ती वांग्याची भाजी आणि भाकरी. अजूनही मला आठवते, आणि ती चव जिभेवर रेंगाळते. 

आता काकूंच्या हातची नाही,पण तुझ्याच हातची गॅसवर बनवलेली खायला येते. पण हा कोरोना संपला की. 

होय सखी,

लवकरच भेटण्याचे आश्वासन देऊन फोन ठेवला. 

 सुजाता ही पहिली मैत्रीण, जिच्याशी आज जवळ जवळ ४२,४३ वर्ष झाले मैत्री असून पुन्हा नव्याने  भेटून जवळ जवळ तीस बत्तीस वर्ष झाले.

 अशीच आमची मैत्री कायम राहो ही प्रभू चरणी प्रार्थना. 


 ©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे

  कल्याण.

सदर लेख लेखिका सौ प्रभा निपाणे यांचा आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने हा लेख आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने