© सौ. अश्विनी टेंबे
लकी अंकल ना बघून निखिलच्या आईचा पारा पुन्हा चढला.
लकी अर्थात लक्ष्मण अंकल, निखिलच्या बाबांचा सर्वात खास मित्र. इतके की एक दिवस जरी ते एकमेकांना भेटले नाहीत, तरी त्यांना चैन पडायची नाही.
तासनतास ते दोघेच कुठल्या ना कुठल्या विषयावर अखंड गप्पा मारत असायचे.
पण निखिलची आई त्यांच्यावर सतत चिडायची.
ते आलेले पाहून छोट्या निखिलला खेळायला बाहेर पाठवायची.
ते निखिलला खेळण्यासाठी बाहुल्या आणायचे. घर आणायचे. कधी कधी तो मुलगा आहे हे माहित असूनही त्याला भातुकलीची खेळणी आणायचे.
अर्थात त्यावेळी निखिल अगदीच लहान होता. त्याच्या दोन चुलत बहिणींसोबत तो नेहमीच खेळत असायचा.
तेही त्याच्या आईला आवडायचे नाही.
निखिलने मैदानावर जावून खेळले पाहिजे, आपल्या बरोबरच्या मुलांमध्ये खेळले पाहिजे असे तिला वाटायचे. त्यामुळे ती सतत निखिलला बाहेर जा बाहेर जा अशी कटकट करायची.
निखिलही आता आईच्या कटकटीला कंटाळला होता.
लकी अंकल इतके चांगले आहेत, नेहमी त्याच्याशी त्याच्या बरोबरचे होवून खेळतात.
घरातही सर्वांशी त्यांचे चांगले जमते, मग आईच का अशी करते... याचं निखिलच्या बालमनाला पडलेलं कोडं काही सुटत नव्हतं.
आजही पुन्हा लकी अंकल नेहमीप्रमाणे त्याच्या घरी आले. त्यांना लांबून पाहूनच आईने चिडचिड सुरु केली.
‘निखिल, आता घरी खेळणं पुरे झालं, जा आता ती मुले बोलवत आहेत, त्यांच्याशी जावून खेळ...‘ आईने आवाज दिला.
आई..... थांब ग लकी अंकल आले आहेत ना. मला त्यांच्याशी खेळायचय. निखिलने उत्तर दिलं.
त्यावर आई काही बोलण्याआधीच दारात चप्पल काढत असलेल्या लकी अंकलच्या निखिल पार अगदी अंगावरच चढला.
आईची क्रोधाने भरलेली नजर चुकवत लकी अंकल आत आले. निखिलचे बाबा सतिश हॉलमध्येच टीर्व्ंही पहात बसले होते.
आपल्या बायकोची आणि लक्ष्मणची झालेली नजरानजर त्यांच्याही लक्षात आली.
लक्ष्मणचं सततच घरी येणं आपल्या बायकोला आवडत नाही हे सतिश ना लक्षात येत होतं. पण काय करणार ते दोघेही अगदी जिवश्च कंठश्च मित्र होते.
लकी आलास... थॅक्यू. सुमनच वागणं फारस मनावर घेवू नको.
तू आल्यावर निखिलला चुकीच्या सवयी लागतात, असं तिचं म्हणणं आहे. पण प्लिज.... निखिलच्या बाबांनी लकी अंकलसमोर चक्क हात जोडले.
ते हात हातात घेत लकी अंकल म्हणाले, अरे वेड्या मी तुझ्यासाठी, तुझ्या मैत्रीसाठी इथे येतो. निखिलनेही मला जिव लावला आहे. तो अजून लहान आहे त्यामुळे मी त्याला अशी खेळणी देत असतो. सुमनचा काहीतरी गैरसमज होतोय...‘असे बोंलून लकी अंकल आणि निखिलचे बाबा आजही बराच वेळ गप्पा मारत होते.
त्या दोघांना त्यांच्यामध्ये कुणीही आलेलं आवडायच नाही.
त्यांची ही मैत्री आणि लकी अंकल निखिलची प्रत्येक गोष्ट मान्य करुन त्याला हवी ती गोष्ट अगदी विनासायास घेवून देतात, या गोष्टी सुमनला खूपच खटकत होत्या.
निखिलचा वाढदिवस आला. लकी अंकलना सोंडून सर्वांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं.
आता निखिल केक कापणार, इतक्यात त्याचे लकी अंकल दारात हजर.
त्यांना दारात पाहून सुमनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती चरफडतच आत गेली.
‘ए सुमन अग असं काय करतेस, इतकी का चिडलीस. तो आला म्हणून.‘ सतिशने तिला विचारल त्यासरशी एकदम खवळून ती म्हणाली, त्यांना बोलवायचं नाही आपलं ठरलं होतं ना... मग.‘
इतक्यात निखिल आत आला, आई बाबांचा वाद ऐकून तो म्हणाला, काकांना बाबांनी नाही, मी बोलावलं. ते मला खूप आवडतात. मी त्यांच्याशिवाय वाढदिवस करुच शकत नाही. हे बघ किती मोठं घर त्यांनी माझ्यासाठी आणलं आहे. आता तर मी त्या घरात स्वत: ही जावू शकतो.‘
निखिलचा आनंद पाहून सुमनने पुन्हा राग गिळला.
निखिल इथे राहिला तर लकी त्याचे नको नको ते लाड करणार.
त्यांचे येणे जाणे कधीही बंद होणार नाही.
त्यामुळे कुणाला कितीही दु:ख झालं तरी निखिलला आता हॉस्टेललाच ठेवायचं.
सुमनने त्याच रात्री हा निर्णय घेतला आणि निखिलची रवानगी थेट हॉस्टेलमध्येच केली.
रडून रडून लाल झालेल्या आपल्या त्या पोराकडे पाहून सुमनचही काळीज चिरत होतं, पण ती तरी बिचारी काय करणार.
अखेर आईबद्दलचा राग आणि लकी अंकल बद्दलचं प्रेम मनात घेवून निखिल हॉस्टेलवर गेला.
इकडे निखिल गेल्यापासून लकी अंकलचही मन तिथे लागेना. निखिलच्या वडिलांना भेटायला कधीकधी यायचे पण आता हा क्रम खूपच कमी झाला होता.
निखिलच्या बाबांनाही ते जाणवत होतं.
काळ कुणासाठीच थांबला नाही. ना लकी अंकलसाठी, ना निखिलसाठी, ना सतिशसाठी आणि ना सुमनसाठी.
निखिल आता इंजिनिअर झाला. एक यशस्वी इंजिनिअर. स्वत:च्या पायावर उभा राहिला.
इतक्या वर्षात त्यानें आपल्या आईचे तोंडही पाहिले नाही. त्याला तशी इच्छाही नव्हती.
लकी अंकलपासून, त्यांच्या प्रेमापासून आपल्या आईने आपल्याला तोडले.
वडिलांनाही एकटे पाडले याची सल त्याला सतत टोचत राहिली.
शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या गावात आल्यानंतरही तो आईच्या घरी गेलाच नाही, तो आजीकडे गेला.
निखिल आल्याचे सुमनला समजले. तसेच त्याचा आपल्यावरचा रागही तिला समजला. प
ण शेवटी ती आईच ना... मनाचा हिय्या करुन आपल्या लेकराला भेटण्यासाठी ती आजीकडे गेली. तिच्या डोळ्यात फक्त माया, प्रेम होतं आपल्या निखिलसाठी.
त्या छोट्याशा देहाचं पुरुषात झालेलं रुपांतर तिला पहायचं होतं.
आईला पाहून निखिलचा पारा अधिकच चढला.
‘तूच मला तझ्यापासून दूर लोटलस ना, मग आता कशाला आलीस‘ निखिल रागाने म्हणाला.
‘अरे, बाळा झाली माझी चूक, पण इतकी वर्षे मी तुला पाहिले नाही, पण आता तरी माझ्या वृद्धात्वात तरी माझा असा छळ करु नकोस रे...‘ सुमन अगदी काकुळतीला आली.
‘छळ मी तुझा केला की तु माझा आणि बाबांचा केलास... बघितलस ना बाबांची तब्येतही बिघडली आहे. तीही फक्त तुझ्यामुळे. मी माझ्या घरापासून, बाबांपासून, लकी अंकलपासून लांब राहिलो ते तुझ्यामुळे... इतका कसला राग होता ग तुझा त्यांच्यावर...‘ निखिल खूपच भडकला होता.
‘निखिल, बाबा शांत हो. तुझ्या तिरस्काराची आग आता मला जाळून टाकेलं....‘ सुमनचं बोलणं पूर्ण होण्याआधीच निखिल म्हणाला, ‘ती जाळण्यापूर्वीच तू इथून निघून जा, मला तुझ्याशी नाही बोलायचं. प्लिज जा.‘
निखिलच्या या टोकाच्या वागण्यामुळे सुमन अगदीच हतबल झाली. इतक्यात बाबांना त्रास होतोय हे समजलं.... आणि आई निघून गेली.
बाबांनीही फक्त लक्ष्मण, लक्ष्मण अशा धोशा लावला होता, त्यामुळे सुमनने तातडीने लकी अंकलना बोलावून घेतले. लकी अंकल आलेले पाहून निखिलला खूप आनंद झाला, त्यांना भेटण्यासाठी तोही घरी आला.
लक्ष्मणला भेटून निखिलच्या बाबांना खूपच आनंद झाला. पण त्यांचा त्रास काही कमी होत नव्हता. त्यांनी निखिललाही डोळेभरुन पाहिलं, लक्ष्मणचा हात हातात घेवून बराच वेळ त्यांच्याशी बोलत होते.
सुमनलाही त्यांनी जवळ बोलावून तिची क्षमा मागितली आणि क्षणार्धातच निखिलच्या बाबांनी इहलोकाची साथ सोडलाी.
सारे अंत्यसंस्कार आटोपून लकी अंकल कायमचे फॉरेनला जाणार होते.
पण तत्पूर्वी त्यांनी निखिलला भेटायला बोलावले. आणि त्याच्या हातात एक पत्र ठेेवले. ‘मी इथून गेल्यावर हे पत्र वाच आणि तुझ्या पुण्यवान आईला माफ कर.
आज तू जो काही आहेस तो केवळ तिच्यामुळेच आहेस. प्लिज तिचा तिरस्कार करु नको.
इतकी वर्ष आपल्या मुलापासून दूर राहिली, तिने खूप त्रास सहन केलाय, खूप भोगलय... पत्र वाचल्यानंतर जमल तर मला माफ कर...‘ असं बोलून मागे न बघता लकी अंकल निघूनही गेले.
पत्र हातातच ठेेवून त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत निखिल बराच वेळ उभा होता.
त्यानं थरथरत्या हातानेच पत्र उघडलं आणि वाचलं..... आणि त्याला असं वाटलं की या जमिनीने आपल्याला आपल्या पोटात घ्यावं, आईबाबत इतकी मोठी चुक आपल्या हातून घडली आणि ती मात्र बिचारी इतकी वर्ष अव्यक्त च राहिली. आपल्या नवर्यासाठी, त्याने केलेल्या चुकीच्या गोष्टींसाठी.
त्याचं सर्वात जास्त प्रेम असणारे त्याचे लकी अंकल ‘गे‘ आहेत. त्यांचे त्याच्या वडिलांसोबतचे अनैसर्गिक संबंध आईने पाहिलेले असतात. त्यामुळेच त्यांचे घरी येणे, वडिलांशी तासनतास गप्पा मारणे, निखिलशीही तासनतास खेळणे, त्याला खेळणी म्हणून भातुकली, बाहुल्या आणणे... या गोष्टी आईला खटकत होत्या.
एक दिवस तर निखिलने साडी नेसून बाईसारखा मेकपही केलेला आईने पाहिलेला असतो.
त्यामुळेच संतापून, चिडून तिने आयुष्यभर अव्यक्त राहून निखिलला या वातावरणापासून मुद्दाम लांब ठेवलं की जेणेकरुन आपला मुलगा वडिलांसारखा न निपजता एक पूर्ण पुरुष म्हणून नावारुपाला यावा.
आज निखिल जो काही आहे तो केवळ अन केवळ त्याची आई सुमनमुळेच.
पत्रातून हे सारे समजल्यावर तो आईेसमोर जातो आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवतो.
तिची क्षमा मागतो.
त्याच्या डोळ्यातील अखंड वाहणार्या त्या अश्रूतून त्याला झालेला पश्चाताप आईच्या लक्षात येतो आणि इतक्या वर्षांपासून मुलाच्या प्रेमाला आसुलेली आई त्याला घट्ट मिठीत घेते.
आई मुलाचे अव्यक्त राहिलेले प्रेम.... व्यक्त होते......
© सौ. अश्विनी टेंबे, कोल्हापूर
सदर कथा लेखिका सौ. अश्विनी टेंबे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.