फिरकी


© वैदेही जोशी




हाय....ए...ऐक ना..इकडे बघ माझ्याकडे,मनवा..मी श्रुतकिर्ती हाक मारतेय तुला...आवाजाच्या दिशेने मनवाने मान वळवली..आणि तीला प्रश्न पडला..ही कोण? मला कशी काय ओळखते?
तरीही ती थांबली.. चालत येणाऱ्या या स्त्री ला आपण भेटलोय का? किंवा हीची कुठे भेट झाली हे काही आठवतय का..हे मनात रेखत मनवा ती जवळ येईपर्यंत उभी राहिली..


आपला डोलारा संभाळत ती येत आहे हे मनवाच्या डोळ्यांनी टिपलं..हो डोलाराच..कारण उंचीच्या मानाने देहयष्टी मजबूत होती तीची...


रंग सावळाच..पण कांती तुकतुकीत... कमरेचा घेर मोठा होता...पण चालत मात्र भरभर होती..हातातली छोटीशी पर्स पायाच्या गतीप्रमाणे मागेपुढे होत होती.


अग..किती हाका मारल्या..तुझं लक्षच नाही.. ती जवळ आल्या आल्या म्हणाली...तू मनवा सरदेशमुख.. ना...खालच्या आळीतली? कधी आलीस माहेरी? मला ओळखलस कि नाही?, नाही ना अजून? अगो...तुझ्या घराशेजारी नवाथे काकू राहतात ना....त्यांच्या मावस बहिणीची भाची मी...आता इथेच आलेय बदली होऊन...झाली 3/4 वर्षे...
आपली भेट नव्हती इतक्या वर्षात..


मनवाला हसावं कि तीला ओळख नाही असं सांगून कटवावं...समजेना...ती कसनुस हसली...हो हो...असं म्हणाली..पण चेहरा मात्र निर्विकार ठेवला..काय माहित.... गळ्यात पडते कि काय? "अच्छा...काय म्हणता...?" असा बोलायचा सूर लावला...पण..


तीच म्हणाली...ऐक...तु मला ओळखले नाहीस हे समजलय मला...पण आत्ता मी गडबडीत आहे...तु आई कडे रहाणार असशील ना 8/10 दिवस? मी सवडीन येईन...


मनवाच्या उत्तराची वाट न पहाता...ती...आली तशीच...डोलदार चालत गेली..सुध्दा...
ती गेली....


पण मनवा मात्र घरी जाईपर्यंत.... अनेक प्रश्नांनी घेरुन गेली...आईशी बोलायला हवं...निदान वहिनी ला तरी विचारायला हवं...
ही कोण?...


आपली काम आवरुन मनवा घरी आली...आई दारातल्या बाकड्यावर बसून लसूण सोलत होती...तीला बघून मनवा म्हणाली...आई..नवाथे काकुंची मावसबहीण कोण ग? माझ्या लक्षातच येत नाही... कधी आली होती का इकडे रहायला...काकूंकडे? म्हणजे मी इथे असेपर्यंत तरी...."
हातातल्या पिशव्या बाकड्यावर टेकवत...शेजारी बसत मनवाने विचारले..


" हो...आठवतेय तर...नवाथे काकूंची मावशी लवकर गेली मग तीची मुलगी येयची मधे च कधीतरी.."
आईने सुरुवात केली...


पण मनवा तुला आता मधेच का आठवल? मग मनवाने वाटेत घडलेला प्रसंग सांगितला..


"अच्छा..असं का...ती श्रुतकिर्ती भेटली होती का...खूप बडबड करते..आली होती दोन वेळा मागच्या महिन्यात... तुझी चौकशी करत होती खरी..." 

तेवढ्यात वहिनी बाहेर आली म्हणाली ".वन्स..आलात का? ...संध्याकाळी दडपेपोहे करुया का? म्हणजे तशी तयारी करायला घेते..."


मनवाने वहिनीला हो म्हटलं..आणि घरात आत निघून गेली..


सगळं तीघी मिळून करत होत्या..गप्पा टप्पा चालूच होत्या..हसत खेळत काम चालू होती...


शहरात हे असं निवांत नाही जगता येत...मुंबई सारख्या धकाधकीच्या आयुष्यात तर नाहीच...मनवा माघारपणाचा आनंद भरभरून घेत होती..


दुपारच्या चहा नंतर थोडा वेळ विश्रांती ची म्हणून तीघी गार वारा अंगावर घेत अंगणात बसल्या...


वहिनी..ती श्रुतकिर्ती माझ्या मनातून काय हलत नाही ग...मनवाने वहिनीला अपेक्षित ठेवून बोलण केलं..


"अग...किती बिनधास्त पणे आली..माझ्या जवळ...हक्काची मी असावी असं भेटून..नंतर निवांत येते ग..म्हणाली ती..." म्हणजे आता ती कधी येतेय याची वाट बघत मी बसायचं...नकळत...गृहीत धरुनच चालली ती की मी..."


"वन्स..ती येऊ दे तर...काय म्हणते ऐकून घ्या..तसच काही वाटलं तर आम्ही आहोतच की...आणि मुळात आम्ही ओळखतो तीला..तुम्हाला ती आठवत नाही... हे सोडून द्या..ती बोलायला लागली की कदाचित आठवेल..." वहिनीने मनवाची समजुत काढली..आईने तीच्या म्हणण्याला दुजोरा दिला...


कधी कधी आयुष्यात हे असच घडतं...आपल्या स्मृतीतून काही व्यक्ती साफ पुसल्या जातात..अन् दुनिया गोल आहे...हे पटवायला त्या अचानक अशा समोर येतात..कि मागचे सगळे स्वच्छ आठवते..


कधी कधी त्यातुन फुंकर मिळते..तर कधी खपली काढली जाते.. नशीब हे असच असतं.


त्यानंतर दोन तीन दिवस अगदी रोजच्या धमालीचे गेले..आई..दादा वहिनी आणि भाचवंड...ती ही कॉलेज ला जाणारी त्यामुळे जो तो आपल्या आपल्या विश्वात रमून आनंद घेणारी..


दादा नेहमी प्रमाणे सगळं आवरुन कामावर जायचा त्यामुळे दिवसभर या तिघीच..गप्पांचा पूर येयचा अक्षरशः..
एकीकडे बोलता बोलता काम पण पटपट व्हायची..


दुपारची जेवण झाली... पंखा लावून हॉलमध्ये मनवा आरामखुर्चीत बसली होती...तेवढ्यात बाहेरून आवाज आला..." सरदेशमुख वहिनी... येऊ का...काकु आहेत का घरी...आणि माहेरवाशीण आहे ना जागी..?"...


मनवाने आवाज ओळखला....श्रुतकिर्ती...आज मनातल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळणार....मिळणार ना???


दरवाजा उघडून श्रुतकिर्ती आत आली.


.मनवाने हसून "बसा हं..पाणी आणते" म्हटलं ..आणि ती स्वयंपाक घरात गेली..


चालून आल्यामुळे हाशहुश करतच श्रुतकिर्ती सोफ्यावर बसली. वहिनीला हळूच चिमटा काढून मनवा पाण्याचा तांब्याभांड घेऊन आली..वाटीत नारळाची वडी आणली..


"हे घ्या.." मनवाने पाणी पुढे केलं.


श्रुतकिर्ती ने पाणी घेतलं..मनवा तीच्या समोरच बसली..
पाण्याचा घोट पिऊन ..श्रुतकिर्ती ने बोलायला सुरुवात केली..


"मनवा...परवा मी तुला बघितले तेव्हा पासून भेटायला येयच मनात होतं..आज योग आणि वेळ आली.." मनवा ने स्मित करुन तीला पुढे बोलत ठेवलं..


कपाळावरचा घाम पुसत ती म्हणाली..मनवा...माझ्या मिस्टरांची बदली होऊन आम्ही तीन वर्ष झाली इथे रहायला आलोय..माझे शिवणकामाचे हळूहळू बस्तान बसतय...जसं जसा परिचय होईल तसे ते काम वाढेल.


नवाथे काकू आता नाहीत... त्यामुळे त्यांच्या घरी जाणं येणं राहीलच नाही.. एक तुमचच घर असं आहे जिथे मी हक्काने येते...तू लहान होतीस तेव्हा पासून येतेय...तुझ्या सगळ्या आठवणी माझ्या पाशी आहेत.." ती बोलत होती..


मनवा ते ऐकत होती....तीची बोलण्याची ढब...चेहऱ्यावर चे हावभाव.. बोलता बोलता हाताने केसाची बट मागे करणं..हे बघता बघता...तीला एकदम लख्ख आठवलं...अरे...ही....ही...


मनवा तीच्या कडे एकटक बघत एकदम जोरात म्हणाली...तू...तू...सरला...सरला ना?.....तू कशी होतीस आणि आता कशी झालीयस...इतक्या वर्षात कधीच भेटली कशी नाहीस? किंवा संपर्क ही कसा केला नाहीस? माझ्या घरी येत जात होतीस...तर नंबर घेऊन फोन का केला नाहीस कधी? त्याही पेक्षा... तू अशी इतकी कशी बदललीस?"
घरात एकदम क्षणभर शांतता पसरली..


आता पर्यंत त्या दोघींना निवांत बोलू दे..म्हणून आई ,वहिनी.. कुणीच बाहेर हॉलमधे आल्या नव्हत्या.. मनवाचा आवाज ऐकून त्या चटकन बाहेर आल्या...


आतून दारात येऊन उभ्या राहिलेल्या आईकडे बघत..मनवा म्हणाली.".आई ही..सरला ..तूला माहिती होतं..मग आधी का कल्पना दिली नाहीस ग..?"


आई म्हणाली.."मनवा, तीची तशीच इच्छा होती..म्हणून आम्हाला माहिती असूनही आम्ही बोललो नाही.. अग ती इथं रहायला आल्या पासून तुझी चौकशी करत होती..पण प्रत्यक्षात भेटल्यावरच बोलेन..म्हणून तीने बाकी काही च केल नाही..


मनवा..तीच्याकडे पाहत राहीली.. आठवली ही कोण.....सारे संदर्भ लागले...स्मृती पटल स्वच्छ लख्ख पुसलं गेलं....तीने तीच्या कडे पाहिले... श्रुतकिर्ती.. डोळ्यातले पाणी पुसत होती...


डोळे पुसता पुसता ती मनवा कडे बघून कसनुसं हसली..आई वहिनी दोघी तिथेच बसल्या...मनवाच्या मनातल्या असंख्य प्रश्नांना तीने उत्तर द्यायला सुरुवात केली.मनवा तुझ्या मनात अनेक प्रश्न आले असतील....हो ना.?..सांगते..सारं....


एकतर...माझ्या बद्दलच्या तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते.... हो..मी सरलाच...तेव्हा ची तुझ्याबरोबर ची..दंगामस्ती धमाल करणारी..ती मीच..


आज माझ्या देहयष्टी कडे जाऊ नको...थायरॉईड चा त्रास आणि तीन बाळंतपण यातून बनलेली ही मी...अशी...तुझ्या लग्नानंतर आपला अजिबात तच संपर्क राहिला नाही..


अगदी मोबाईल च्या काळात सुध्दा आपण संपर्क करु शकलो नव्हतो..माझ्या मिस्टरांची बदलीची नोकरी त्यामुळे जिल्हे बदल होत होत आम्ही विंचवाचे बि-हाड पाठीवर घेत फिरत होतो..


आज जवळजवळ 20 एक वर्षे झाली असतील..आपण भेटतोय.. आम्ही या गावात आल्यानंतर मी पहिलं काय केल असेल तर...काकुना येऊन भेटले..तुझी चौकशी केली...तुझे सगळे नीट छान चाललय हे ऐकल्यावर खूप बरं वाटलं...पण तरी तुला भेटायच होतच...मनापासून.. कारण...तुझं देणं द्यायच होतं...


मनवाच्या मनातल्या साऱ्या शंका एक एक करुन दूर होत होत्या..कारण खरचं लग्नानंतरचा काळ इतका भराभर गेला होता...तीच्या नवऱ्याची जहाजावरची नोकरी..संसार..सासुसासरे यांची जबाबदारी.. मुलं...आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे बाकी काही च प्रश्न नव्हता... पण...
आपण ही हिला साफ विसरून कशी गेलो? एवढ्या वर्षात... कधीच काहीच कसा उल्लेख ..आठवण आपल्याला झाली नाही?


श्रुतकिर्ती मधेच थांबली.. अन् मनवा कडे बघितलं...मनवाच्या चेहऱ्यावर खूप काही दाटून आलं होतं...


आपण हिला विसरलो याची खंत...आपली मैत्री इतकी कशी....याचं दुःख... आपण आपल्या जगात वावरताना इतके कसे भान सोडून वागलो...याची सल...पण चुकीचे काहीच नव्हते..जे चारचौघींच्या बाबतीत होतं तेच तर घडलं होतं..मग....नक्की सलतय काय? बोच कशाची? काय हरवलय आपलं? आणि काय शोधून सापडत नाहीय्ये?


आई वहिनी दोघी ही स्तब्ध होत्या..कारण या सगळ्या गोष्टींच्या त्या नकळत साक्षीदार होत्या..आणि घटनांमधे त्यांचा सहभाग ही होता..कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात..आपण त्यात असतो ही..नसतोही...घटना घडून जात असते..अन् आपण पटावरच्या सोंगट्या बनून राहतो..


श्रुतकिर्ती...मनवाजवळ गेली..तीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली...अग हे सारं सर्वसामान्य आयुष्यासारखं आहे..त्याच विशेष काही नाहीच...हे असं कुणाच्याही बाबतीत घडू शकतं..नव्हे घडलं ही असेल...त्यामुळे तू त्याचा विचार करू नको...काकू..वहिनी त्या दोघीही नकळत यात आहेतच..पण..मी वाटेत मुद्दाम थांबून तुझ्याशी का बोलले...माहिती आहे?


तुझं देणं..तुला परत करायचय...म्हटलं नं...ते हेच...ही वही...तुझी परत करायची होती..


तुझ्या विसरभोळ्या स्वभावाची आम्हाला तिघींना ही कल्पना आहे..होती..म्हणून मीच काकुंशी पैज लावली होती...कि..."मनवा च्या या स्वभावाची मी फिरकी घेते...तुम्ही फक्त मला साथ द्या...मी खूप गंभीर होऊन सगळा प्लँन करेन...तीच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवेन...दोन दिवस येणार नाही... मग...आपोआप तीची उत्सुकता शिगेला पोहोचली कि मी येईन...गंभीर पणे....


आठवतेय..का? कॉलेजच्या शेवटच्या वर्षी माझ्या शी बेट लावली होतीस....कि आयुष्यात मला कधीच कधीच विसणार नाहीस... असं या वहीत..लिहून ठेवून..सही करून दिली होतीस..
आणि असं घडलं तर...मी देईन ती शिक्षा भोगायची तयारी आहे...अस ही लिहीलयस...


बघ..वाच..." श्रुतकिर्ती ने वही दिली आणि आई वहिनी.. तीघी मोठमोठ्यांनी हसायला लागल्या...


मनवाने वही हातात घेतली...तारीख वार..सगळं पाहिलं...आता मात्र रडत रडत हसायची तीची पाळी होती...डोळ्यातुन पाणी वाहत होतं...तरी मोठ्या मिठीसाठी हात पसरून...म्हणाली...सरले....मावशील ना ग या मिठीत???...आज ही तशीच आहेस...देह वाढला..वय वाढलं...पण समोरच्याची फिरकी घेण्याची वृत्ती गेली नाही... ढमे....नालायके...माझी भंबेरी उडवली होतीस..."


श्रुतकिर्ती.. तीच्या मिठीत शिरत म्हणाली..." विसरू नको....नाही.. विसणारच नाहीस आता.तू..अगं नेहमीच काही तरी गंभीर...भयानक घडावं इतकं ही आयुष्य देव देत नाही.. कधी तरी असा..हळूच चिमटा..कधी कधी मैत्रीत अशी फिरकी हवीच ना? नेहमीच आपल्याला अपेक्षित असतं ते घडतच असं नाही... आयुष्य ही घेतं..मधेच अशी....फिरकी..!!!."


काय खरं ना?


© वैदेही जोशी



सदर कथा लेखिका वैदेही जोशी यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.




धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...


अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने