मंगळसूत्र

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)



जिल्हा निबंधक कार्यालयातून रजिस्टर लग्न करून सोहम अन् शुभ्रा दोघे घरी परतले. 

दरवाज्यात सोहमच्या आईनं.. आसावरीनं दोघांच्याही हातावर सॅनिटायझर शिंपून त्यांचं स्वागत केलं अन् सजवून ठेवलेलं माप ओलांडून शुभ्रा घरात प्रवेश करती झाली‌. 

घरातल्या मोठ्यांच्या पाया पडून नवीन जोडप्यानं आशीर्वाद घेतले.. अन् दोघेही सजवून ठेवलेल्या सोफ्यावर स्थानापन्न झाले.

सोहमच्या आईचं लक्ष  शुभ्राकडे गेलं अन् शुभ्राचा मोकळा गळा बघून तिच्या मनात कालवाकालव झाली.

"सोहम, अरे मी तुला मंगळसूत्र दिलं होतं ना शुभ्रासाठी ? एकमेकांच्या गळ्यात हार घालाल तेव्हा शुभ्राच्या गळ्यात घाल असं म्हटलंही होतं.. विसरलास का रे ?" सोहमच्या आईनं अजीजीनं म्हटलं..

खरं तर एकुलत्या एका मुलाच्या लग्नाची किती स्वप्नं बघितली होती सोहमच्या आईनं! सोहमच्या वडिलांचं अकाली निधन झालं तेव्हा सोहम अवघा सहा वर्षांचा होता. 

पण आसावरीने मोठ्या कष्टानं आपल्या दिवंगत पतीचा व्यवसाय सांभाळला.. तरुण मुलाच्या अकाली मृत्यूने हतबल झालेल्या वयस्कर सासूबाईंना सावरलं.. सोहमला‌देखील उत्तम संस्कार देऊन मोठं केलं.

पण ह्या सगळ्यात त्या एकट्या आहेत असं त्यांना कधीच वाटलं नाही.. कारण आजही त्यांच्या गळ्यात मिरवत असलेलं मंगळसूत्र! 

सोहमच्या‌ बाबांनी लग्नात तिच्या गळ्यात घातलेलं ते मंगळसूत्र! दोघांच्या जन्मोजन्मीच्या नात्याची खूण!

"जोडीदाराच्या निधनानंतरदेखील जर पतीपत्नीचं नातं संपत नसेल तर मग त्या नात्याची खूण असलेलं हे मंगळसूत्र मी का काढावं??" आसावरीचं म्हणणं तिच्या सासूबाईंना पटलंच असं नाही.. पण त्या काही बोलल्या नाहीत. 

"सुनेचा मोकळा गळा बघून मला क्षणोक्षणी पुत्रविरहाची जाणीव होत राहील.. त्यापेक्षा तिनं मंगळसूत्र घातलेलं बरं! निदान मला माझ्या मुलाचं अस्तित्व तिच्या मंगळसूत्राच्या रूपाने जाणवत राहील!" आसावरीच्या सासूबाईंनी स्वतःच स्वतःची समजूत काढून घेतली अन् तो विषय दोघींच्यात तात्पुरता का होईना बंद झाला.

यथावकाश सोहमचं शिक्षण पूर्ण झालं. आसावरीने पतीचा व्यवसाय पूर्णपणे सोहमच्या स्वाधीन केला अन् पूर्णवेळ गृहिणी होणं स्वेच्छेनं स्वीकारलं. 

तिच्या सासूबाईंचंही आता वय झालं होतं. त्यांनाही नातसूनेचे वेध लागले होते.

आसावरीने मुली बघायला सुरूवात देखील केली पण सोहम एक दिवस शुभ्राला घरी घेऊन आला.

सोहमपेक्षा किंचित उंच असलेली शुभ्रा वर्णाने मात्र स्वतःच्या नावाच्या अगदी विरूद्ध..

 सावळी!  पण आत्मविश्वासाचं अन् शिक्षणाचं तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. तिच्या भविष्याच्या योजना अगदी स्पष्ट होत्या. 

कोरोना अन् लॉकडाऊन विचारात घेता फारसा खर्च न करता झटपट नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचा प्रस्ताव तिने पहिल्याच भेटीत मांडला. 

आसावरीला शुभ्रा मनापासून आवडली.. आजीलाही नातसून पसंत पडली पण हे नोंदणी विवाहाचं काही त्यांच्या पचनी पडेना!

"निदान सप्तपदी अन् लाजाहोम तरी करू या गं घरच्या घरी!" आजीचा हट्ट सुरूच होता.. 

"होमाच्या वेळी नवरदेव नवऱ्यामुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो अन् दोघेही एकमेकांना सात जन्म साथ देण्याची वचनं देतात अन् मगच विवाह संपन्न होतो!" आजी त्यांची बाजू धरून होत्या.

"आई, मुलं बरोबर बोलताहेत. बाहेर कोरोनाने किती गोंधळ घातलाय बघा. संपूर्ण शहर बंद आहे. त्यात भटजींना घरी बोलवायचं.. सोसायटी परवानगी देणार नाही! त्यापेक्षा रजिस्टर लग्न खरंच चांगलं आहे!" आसावरीनं सासूची समजूत काढली अन् पर्याय नसल्यामुळे त्याही गप्प बसल्या.

लग्नाच्या दिवशी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये गर्दी नको अन् आजींनीही ह्या वयात बाहेर पडणं धोक्याचंच म्हणून शुभ्राचे आईवडील अन् सोहमचे दोन मित्र जाऊन लग्न अक्षरशः उरकून घरी आले. 

बॅंडबाजा नाही.. मानपान नाही.. वरात नाही .. निदान सुनेच्या गळ्यात मंगळसूत्र तरी असावं म्हणून सोहमच्या आजीनं आसावरीला बाहेर पाठवलंच. 

तिनेही मुद्दाम जवळच्या सोनाराला मागच्या दरानं दुकान उघडायला लावून चढ्या भावाने मंगळसूत्र खरेदी केलं. 

सोहमला वारंवार बजावून सांगितलं.. "सह्या झाल्या की एकमेकांच्या गळ्यात हार घालाल तेव्हा शुभ्राच्या गळ्यात हे मंगळसूत्र घाल!"

अन् तरीही नववधू शुभ्राचा मोकळा गळा बघून नाही म्हटलं तरी आसावरी नाराज झालीच.

"आई, नाही.. मीच नको म्हटलेलं सोहमला.." शुभ्रानं लगेच खुलासा केला अन् तिच्या बाजूला बसलेल्या ‌आजीला ठसका लागला..

पाण्याचा पेला घेऊन सोहम, शुभ्रा अन् आसावरी आजीकडे धावले.. 

पाण्याचा पेला हातानेच नाकारत आजी म्हणाली.. "शुभ्रे, काय म्हणालीस गं? मंगळसूत्रास नको म्हणालीस का तू? का बरे? मला कळू दे तरी!"

"आजी, तुम्ही पाणी घ्या बघू.. मग बोलू आपण.." शुभ्रानं प्रेमानं दटावलं अन् नाही म्हटलं तरी शुभ्राच्या समजूतदारपणाने आजी सुखावली. 

आजीला बळेबळेच दोन घोट पाणी पाजून शुभ्रा आपल्या जागेवर जाऊन बसली.

काही क्षण निःशब्द शांततेत गेले अन् हळूच शुभ्रानं बोलायला सुरूवात केली ..

"माझी मतं सोहमला आधीपासूनच ठाऊक आहेत अन् ती त्याला मान्यही आहेतच. म्हणूनच आम्ही लग्नाच्या बंधनात अडकलोय.. पण वरून ह्या मंगळसूत्राचं बंधन नकोय मला.. मी स्पष्टच सांगितलं होतं ह्याबद्दल सोहमला.." शुभ्रानं सोहमकडे बघत बघत आपलं वाक्य पूर्ण केलं.

सोहमच्या आईनं आणि आजीनं एकदमच सोहमकडे बघितलं.. सोहमनंही होकारार्थी मान हलवून शुभ्राच्या बोलण्याला दुजोरा दिला.

"हे लग्नाच्या बंधनात अडकणे म्हणजे काय गं? अन् मंगळसूत्राचे बंधन नको म्हणजे तरी काय?" आजीनं शुभ्राला प्रतिप्रश्न केला..

"म्हणजे आजी, मला माझं स्वातंत्र्य गमवावं लागणार ना लग्नानंतर.. आणि कुठंतरी बंधनं असणारच माझ्यावर ह्या लग्नामुळे आलेली.. म्हणूनच मला मुळात लग्न नकोच होतं..

पण आईबाबांच्या हट्टामुळे मी लग्नाला तयार झाले..  पण ही गुलामीची निशाणी असलेलं मंगळसूत्र काही घालणार नाही मी गळ्यात!" शुभ्राचे विचार ठाम आणि स्पष्ट होते..

"पण लग्न म्हणजे तू समजतेस तसलं बंधन नव्हे, बरं मुली.. लग्न म्हणजे दोन जीवांनी.. दोन कुटुंबांनी.. एका धाग्यात बांधलं जाणं .. " आजी बोलू लागली.

"जर फुलं विखुरलेली असली तर पायदळी तुडवल्या जाण्याची शक्यता जास्त.. पण तीच जर एका सूत्रात बांधली गेली तर सुंदर हार किंवा गजरा तयार होतो अन् तो देवाच्या मूर्तीची किंवा तरुणीच्या केसांची शोभा वाढवतो .. तसंच लग्नाच्या धाग्यात वर अन् वधू कुटुंबासह गुंफले जातात अन् परिवार मोठा होतो.. साहजिकच वर अन् वधू स्वैराचारापासून वाचतात..‌ त्यांची संसारवेल समाजाची शोभा वाढवते.."

"बरोबर आहे तुमचं आजी.." शुभ्रा समजूतीच्या स्वरात म्हणाली.." पण त्याकरिता मंगळसूत्राचं बंधन कशाला? बिना मंगळसूत्राचंही लग्न होऊ शकतंच की !"

"बरोबर आहे तुझं.." आसावरी म्हणाली.. "मंगळसूत्राशिवायही संसार होऊ शकतोच.. पण मंगळसूत्र एक प्रतीक आहे म्हणूया .. पतीपत्नीच्या नात्याचं.. अन् प्रेमाचंही.. त्याला उगाच बंधन किंवा लोढणं नको म्हणूया.. सोहमच्या बाबांना जाऊन इतकी वर्षं झालीत.. मी अजूनही जपतेय हे प्रतीक.. अन् ह्या मंगळसूत्राच्या रूपाने अजूनही सोबत करतात ते मला!" आसावरी भावूक झाली होती.

"पण आई..‌मंगळसूत्र मीच का घालायचं ? प्रेमाचं प्रतीक असेल तर सोहमनीही घालावं ते !"  शुभ्रानं आपला बिनतोड युक्तिवाद केला ..

"प्रेम किंवा नातं पेलणं इतकं सोपं नसतं बरं, मुली.. " आजीनं बोलायला सुरुवात केली.. "म्हणून ती जबाबदारी  मुलींकडे दिली असावी.. नक्की मला ठाऊक नाही.. अन् आम्हाला कधी असले प्रश्न देखील पडले नाहीत.." आजीनं‌ दिलखुलासपणे सांगितलं.

"पण तुमच्या पिढीला हे प्रश्न पडतात हे एका परीने बरंच आहे.. उगाच आंधळेपणाने रितीभाती पाळण्यापेक्षा समजून उमजून पाळलेल्या बऱ्या.." आसावरीनं निर्वाळा दिला..

 "आणि पिढ्यन्पिढ्या बहीण भावाला राखी बांधत आलीय ना ? तिथे कुठे प्रश्न पडला.. मी का राखी बांधायची भावाला..? भाऊ मला का बांधत नाही म्हणून.. ! राखी हा जसा भावाबहिणींच्या प्रेमाचा धागा तसाच मंगळसूत्र हा पतीपत्नीच्या नात्याचा धागा.. त्यात रक्षाबंधनात जसं प्रेमाच्या धाग्यात गुंफणं आहे ना.. अगदी तसंच आहे मंगळसूत्र.." आसावरी म्हणाली.

शुभ्राला सोहमच्या आईचं म्हणणं तितकंस पटलेलं दिसलं नाही . " म्हणजे मी मंगळसूत्र घालायलाच हवं  असं माझ्यावर बंधन आहे तर.." शुभ्रा उद्गारली..

"छे ग! बंधन नव्हे, इच्छा म्हण हवं तर.. पूर्ण कर किंवा नको करूस.. पण घाई देखील नको करूस.. काहीही ठरवण्याची.. " आसावरी म्हणाली.. 

"पण एक‌ लक्षात ठेव.. हे कुंकू किंवा मंगळसूत्र नाकारणं वगैरे सगळं वरवरचं आहे ग.. प्रतीकात्मक.. 

जर खरंच बंधनात अडकायचं नसेल ना.. तर अदृश्य बेड्या तोड.. 

तुझ्या मनाला भरारी ‌घेऊ देत ..अन् कर्तृत्वालाही.. एक स्त्री म्हणून तू स्वतःचा सन्मान कर अन् दुसऱ्या स्त्रीचाही.. तरच तुला डाचत असलेल्या बंधनातून मुक्त होशील तू..!' आसावरी बोलत होती .. अन् शुभ्रा ऐकत होती ..

लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिला दोन नव्या मैत्रिणी मिळाल्या होत्या अन् बंधनातलं खरोखरीचं स्वातंत्र्य गवसल्याचं समाधान शुभ्राच्या चेहऱ्यावर विलसत होतं.

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने