हम दो हमारा एक -बिघडलं कुठं ?

© सौ.वैशाली प्रदीप जोशी



अलीकडेच फेसबुकवर एक लेख वाचनात आला "हम दो हमारे दो" चा नारा देणारा आणि "सगळ्यांना कशी दोन दोन मुलं व्हायलाच हवी हं !" असा प्रेमळ आग्रह करणारा !

तसं हे इंटरनेट,फेसबुक वगैरे सगळं आभासी आहे त्यामुळे इथलं फार काही सिरीयसली घ्यायचं नसतं हे मला माहित आहे आणि त्यामुळे इथल्या मतांवर प्रतिक्रिया देणं मी टाळतेच. त्यात विषय सकारात्मक असेल, हृदयाला भिडणारा असेल तर लेखकाचा किंवा लेखिकेचा उत्साह वाढावा म्हणून प्रतिक्रिया देतेही.

पण "हम दो हमारे दो" हा विषय वाचून प्रतिक्रियेस्वरूप हा लेख लिहिण्याचा मोह मला टाळता आला नाही.

अगदी परवाच एका महिलेशी जुजबी ओळख झाली. मला 25 वर्षांचा एक मुलगा आहे ही माहिती मिळताच त्यांनी प्रतिक्रिया दिली -"दादाला बहीण पाहिजे होती !"

मला अश्या लोकांचं खरंच आश्चर्य वाटतं-दोन दिवसांच्या जुजबी ओळखीवर हे किती खाजगी वक्तव्य करू शकतात? तेही समोरच्या व्यक्तीचं वय, परिस्थिती लक्षात नं घेता?

खरं तर मूल अर्थात संतती होणं हा जोडप्याचा अतिशय खाजगी विषय आहे असं मला वाटतं. त्यात शक्यतो घरच्यांनीदेखील मर्यादित दबाव टाकायला हवा.पण असं होत नाही आणि बरेचदा बिकट परिस्थिती निर्माण होते त्याची ही काही उदाहरणं-

संदीप आणि स्वाती हे निम्नमध्यमवर्गीय जोडपं. संदीपचा छोटेखानी व्यवसाय तर स्वाती गृहिणी.लग्नानंतर दोन वर्षांनी एक मुलगा झाला..

वास्तविक पाहता त्यांची आर्थिक परिस्थिती यथातथाच ! पण स्वातीच्या आईचा आग्रह- "दुसरा चान्स घ्या. म्हणे जिसने चोंच दी है वो चुंगी भी देगा !" ह्यावेळी मुलगी झाली. पण तुटपुंज्या उत्पन्नात दोन मुलांचा खर्च भागवणे अवघड जाऊ लागले..

सतत आर्थिक तंगी आणि त्या तणावामुळे नवराबायकोत भांडणं ! 

मुलांच्या लहानमोठ्या गरजांकरिता नातेवाईकांच्या तोंडाकडे बघावे लागते...सतत मदत करून नातेवाईकही कंटाळले आहेत.

प्रशांत आणि प्रणिता ह्यांचा प्रेमविवाह.प्रणिता दिसायला जितकी सुंदर तितकीच आळशी.

नेहमी नटणे- मुरडणे आणि मित्रमैत्रिणींमध्ये रमणे हाच एकमेव कार्यक्रम.छानछोकीची आवड आणि तीच लाईफस्टाईल ! 

स्वैपाक करण्यात विशेष रस नाही.त्यामुळे रोजचा स्वैपाक असा होतंच नाही.

आठवड्यातून एक-दोनदा काहीतरी स्पेशल चीझ-पनीरचे पदार्थ बनवणार ! त्यामुळे प्रशांत घरात विकतचा फराळ आणून ठेवतो आणि स्वतःचं बरेचदा  बाहेरच मॅनेज करतो. 

लग्नानंतर दोन वर्षांनी पहिली मुलगी झाली. तिच्या "थोरल्या जावेला दोन मुलं मग  मलाही दोन" हवीच म्हणून दोन वर्षात दुसरा मुलगाही झाला.

पण हिला मुलांचं करायचा अतिशयच कंटाळा.हिचं मुलांप्रती कर्तव्य म्हणजे फक्त दोघा मुलांना छान-छान कपडे, चपला, गॉगल आणि वाट्टेल तेव्हढी खेळणी घेऊन देणं ! मुलांचं बारसं आणि पहिला वाढदिवस थाटात साजरे केले अन् हिच्या आईपणाची इतिकर्तव्यता झाली !

हिला मुलांच्या जेवण-खाणाची फिकीर शून्य ! 

स्कुटी काढून एकदा घराबाहेर पडली की घरी परतण्याची वेळ अनिश्चित.अन् घरी असली तरी व्हाट्सअप नि फेसबुक!  मग मुलं जेवली की नाही, त्यांची शाळा, शाळेचा अभ्यास, कश्शाकश्शाचं सोयरसुतक नाही.

मुलं बिचारी भुकेनं व्याकुळ झाली की दोघंही बाबांची वाट बघत बसतात.रोज रोज विकतचे समोसे-कचोरी, चायनीज अन् पावभाजी नको असतात त्यांना ! घरचं भाजी पोळी जेवावंसं वाटतं ! 

हिच्या स्वभावामुळे स्वैपाकाला बाई टिकत नाही.ऑफिसमधून प्रशांतलाही घरी यायला उशीर होतो.मग आहेतच जवळ राहणारे काका-काकू ! तेच ह्या भुकेल्या मुलांना जेऊ-खाऊ घालतात.

पण प्रणिताच्या अश्या बेजबाबदारपणामुळे आलेल्या अतिरिक्त जबाबदारीनं तिचे दीर-जाऊ त्रस्त झाले आहेत !

वैभव आणि नेहाची कहाणीदेखील अशीच काहीशी...

वैभव खाजगी नोकरी करतो तर नेहा ब्युटीपार्लर चालवते.दोघेही कमावते असल्याने तसे खाऊन पिऊन सुखी आहेत.

ह्यांनाही पहिली मुलगी अन् "बहिणीला भाऊ हवाच!" ह्या नेहाच्या सासूच्या हट्टापायी दुसरा चान्स घेतला अन् दुसरी मुलगीच झाली.

वैभव त्याच्या नोकरीत बिझी अन् नेहा तिच्या पार्लरमध्ये. 

दोन मुलांचं संगोपन करण्याची मानसिक तयारी नसताना ज्या सासूबाईच्या भरवश्यावर हा निर्णय घेतला त्या सासूबाई छोट्याश्या आजारपणाचं निमित्त होऊन निर्वतल्या.ह्यावेळी मोठी दिशा 4 वर्षांची अन् धाकटी श्लोका फक्त दीड वर्षांची होती.

वैभव-नेहाच्या संसाराची गाडी दोघांच्या कमाईमुळेच सुरळीत सुरु होती त्यामुळे मुलींच्या संगोपनासाठी ब्रेक घेणे दोघांनाही शक्य नव्हते...मग सुरु झाली ढकलगाडी.

कुणीही जवळचे भेटले की एकच पालुपद -"मुलीं तुमच्याकडे येतो म्हणतात, तुमच्याकडे पाठवतो.त्यांचा काहीच त्रास नाही.तिथेच राहू द्या काही दिवस !" जवळचे नातेवाईक असले म्हणून काय झालं प्रत्येकाला आपापला संसार आणि जबाबदाऱ्या आहेतच ना ! 

ही अतिरिक्त जबाबदारी नेहमी-नेहमी कोण, कशी आणि कां घेणार?

मग तेच ते- वैभव आपल्या मुलींना कोणत्या तरी नातेवाईकाच्या गळ्यात टाकू इच्छितो आणि नातेवाईक ही नसती ब्याद कशी टाळता येईल ह्या साठी नवनवीन कारणं शोधत बसतात !

विनोद आणि सीमाची तर अजबच कथा ! 

लग्नानंतरचे गुलाबी दिवस संपले अन् दोघांमध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली.

वर्षात घरात पाळणा हलला.पण बाळाच्या आगमनानंतरही दोघांतले वाद कमी झाले नाहीत.
घरात सततची भांडणं !.कधी तर इतकी टोकाची भांडणं की सीमा तावातावात माहेरी निघून जात असे. 

त्यात विनोदला दारूचे व्यसन लागले.अश्यातच पाच वर्षे निघून गेली.एकदा सीमाच्या कुणीतरी मावशी का आत्यानं सीमाला सल्ला दिला की अजून एक मूल होऊ दे, बघ सगळं ठीक होईल." अन् दुसऱ्या बाळाचा जन्म झाला.

पण त्या "तथाकथित" सल्लागारानं सांगितलं तसं काही झालंच नाही.

विनोदचं व्यसन आणि दोघांमधली भांडणं विकोपाला गेली.शेवटी कंटाळून सीमा नवऱ्यापासून विभक्त झाली. दोन्ही मुलांचे हालच हाल ! आधी पालकांच्या भांडणामुळे आणि नंतर घटस्फोटामुळे !

ह्या सर्व घटनांचा एका दुसऱ्या दृष्टीनं विचार करून बघूया - ह्या सर्व जोडप्यांना एकच अपत्य असतं तर???

त्यांची परिस्थिती बदलली असती कां? -बदलली नसती पण सुसह्य झाली असती !

पहिल्या उदाहरणात "चोंच आणि चुंगीचं" गणित सांगणाऱ्या त्या बाईनं "आमच्याकडे काय घबाड आहे!ज्याचं त्यानं सांभाळावं"असं म्हणत हात झटकले अन् संदीप-स्वातीवर दोन मुलांची न पेलवणारी जबाबदारी येऊन पडली.

 कदाचित मर्यादित उत्पन्नात उदरनिर्वाह करायचा असल्याने एकच मूल असतं तर त्याला चांगलं  जीवन देता आलं असतं ! आणि एकच मूल आहे तर नातेवाईकांनीदेखील आनंदानं मदत करत निभावून नेलं असतं !

दुसऱ्या उदाहरणात प्रणिताच्या स्वभावाचा अंदाज घेता तिला प्रपंचाच्या आणि मातृत्वाच्या जबाबदारीची जाणीव नाही आणि त्याकडे तिचा कल ही नाही हे प्रशांतनी जाणून घेतलं असतं तर एकच मुलावर ब्रेक घेऊन त्याचं संगोपन एकट्याच्या भरवश्यावर करणं कदाचित प्रशांतला आणि त्याच्या भाऊ-भावजयीला जड गेलं नसतं...पण मुलांना जन्म दिला अन् बारसं आणि पहिला वाढदिवस थाटात केला म्हणजे मुलांप्रती कर्तव्य पार पडलं असं समजणाऱ्याना कोण सांगणार?

वैभव आणि नेहानं सासूबाईंच्या भरवश्यावर दुसरा चान्स घेतला.दोघांपैकी कुणाचीही मुलींसाठी त्यांच्या कामातून ब्रेक घ्यायची तयारी नाही किंबहुना ते दोघंही कमावतात म्हणून घरचं गाडं व्यवस्थित सुरु आहे. 

त्यांची मोठी मुलगी दिशा स्वतःच इतकी लहान आहे की धाकटया बहिणीला सांभाळू शकत नाही.ती शाळेत गेल्यावर श्लोकाला कुठं ठेवायचं हाही प्रश्न येतोच. 

दुसऱ्या बाळाचा विचार करताना त्यांनी स्वतःच्या भरवश्यावर केला असता तर हे असं त्रांगडं होऊन बसलं नसतं !

सीमाच्या बाबतीत तिनं स्वतःच्या सांसारिक  परिस्थितीचा आढावा घेत स्वतःच्या जबाबदाऱ्या वाढवल्या नसत्या तर...??? तिला एक मूल सांभाळणं कठीण झालं नसतं..

सुस्थितीत असलेल्या नातेवाईकांना देखील एका मुलाची जबाबदारी घ्यायला जड झालं नसतं...तसंही आता तिनं एकाला स्वतःजवळ आणि दुसऱ्याला भावाजवळ ठेवलंय !

म्हणजे दुसरं मूल होऊच देऊ नये असा माझा आग्रह अजिबात नाही बरं ! तो निर्णय ज्याचा त्यानंच  घ्यावा.कुणालाही फुकटचे सल्ले देऊन भरीला पाडू नये असं माझं मत आहे.

ज्यांना असे कुठलेही प्रॉब्लेम्स नाहीत पण त्यांना करिअरची आवड आहे ते एका मुलावर थांबण्याचा निर्णय घेऊन करिअरला प्राधान्य देतात.

ज्यांना करिअर as such करायचं नसतं तरी चांगल्या लाईफ स्टाईल साठी दोघांनी नोकरी करणं आवश्यक असतं पण मुलांना सांभाळण्यासाठी घरून मदत मिळू शकत नाही.ते एका मुलावर/मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतात.काय हरकत आहे?

दोन मुलं असावीत ह्यासाठीचे तर्क इतके अजब असतात नं ! माझा मुलगा लहान असताना मी त्याला घेऊन एका परिचितांकडे गेले होते. त्यांच्याकडच्या वयस्क बाईंनी माझी आणि सुयोगची चौकशी केली आणि हा एकुलता एक आहे म्हटल्यावर दुसरं मूल हवंच असं सांगताना "एकाला काही झालं तर दुसरं असावं" असा युक्तीवाद केला ! 

म्हणजे आपल्या बाळाला काही झालं तर आपलं नुकसान नको असा व्यावहारिक वाईट विचार करायचा???  आणि दोघांना काही झालं तर? असं म्हणून तिसरं होऊ द्यायचं आणि तिघांना काही झालं तर म्हणून चौथं???

आपण भावंडांमधल्या शेअरिंगबद्दल बोलतो की दोन मुलं असली की त्यांच्यातली शेअरिंगची भावना किंवा बॉण्डिंग वाढतं ! 

हा लॉकडाऊनचा मर्यादित काळ वगळता जग इतकं जवळ आलंय की आजकाल आते-मामे-मावस-चुलत भावंडदेखील एकमेकांच्या खूप जवळ आहेत. 

आमच्याकडे तर चुलत-मावस भाऊबहीण ही संकल्पनाच निकालात निघाली आहे.ते एकमेकांचे फक्त भाऊ-बहीण आहेत.चुलत-मावस नव्हे ! तसंही दोन भावंड एकत्र रहात असली तरी प्रत्यक्ष कमी आणि मोबाईलवर जास्त बोलतात !

माझ्या पाहण्यातल्या एका घरात त्या बाईची प्रकृती ठीक रहात नसतानाही त्यांनी मोठ्या मुलीला सोबत असावी म्हणून दुसरा चान्स घेतला अन् मोठीला धाकट्या बहिणीची सोबत झाली.

पण मुली मोठया होत असताना दोघी बहिणींचे टोकाचे मतभेद आणि भांडणं होत.मोठीचं लग्न झाल्यावर तिला पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आणायचं नाही ह्या हट्टानं धाकटीनं इतका वितंडवाद केला की तो ताण असह्य होऊन तिची हार्टपेशंट आई दगावली!

एका घरी तर मी सख्ख्या भावंडाचं एकमेकांपेक्षा चुलत भावंडांशी जास्त बॉण्डिंग असल्याचं बघतेय..!

त्यामुळे "हम दो हमारे दो" स्वागतार्ह आहेच पण "हम दो हमारा/हमारी एक" असलं तर बिघडलं कुठं?

© सौ.वैशाली प्रदीप जोशी

सदर लेख लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांचा आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने हा लेख आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 

साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.



2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने