वेश्येचे पोर...



© वर्षा पाचारणे



संध्याकाळचे सात वाजले होते... मीरा, मेहेर, बानी, पिंकी सगळ्याजणी गडद मेकअप करून अत्तरांचे फवारे मारून माडीच्या पायऱ्यांवर एक एक करून बसल्या होत्या. 

शुभांगी मात्र शून्यात नजर लावून गबाळ्या अवस्थेत बसलेली पाहून तिचा दलाल खसकन अंगावर धावून आला. "ए, तू काय स्वतःला जास्त शाणी समजते काय? तुला काय वाटतं, तू अप्सरा आहेस, की कशीही थांबलीस तरी लोक स्वतःहून तुझ्याकडे येतील'..... 'जा, खोलीत जाऊन पटकन तयार होऊन बस'..... दलाल एवढं बोलला खरा, पण शुभांगीचे मात्र त्याच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नव्हती.

दोन वर्षांपूर्वी सासरच्या जाचाला कंटाळून शुभांगीने घर सोडलं.

शुभांगिने सासर सोडताना मात्र तिच्या अगदीच जीवाभावाच्या मैत्रिणीला "मी हे घर कायमचं सोडून चालले आहे", असं सांगितलं.

 "मी कुठे जाणार? काय करणार? याची मलाही कल्पना नाही, फक्त तू अधेमध्ये आई-बाबांकडे जाऊन त्यांची विचारपूस करत जा", हे मात्र तीनं न चुकता सांगितलं.

नीरजाने तिला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु शुभांगी मात्र आता तिच्या निर्णयावर ठाम होती.

डोळ्यातले अश्रू सावरत शुभांगी वणवण भटकत पुण्याला पोहोचली खरी पण अर्धा जीव मात्र आई बाबांमध्ये अडकला होता. 

माहेरच्यांनी खूप शोध घेऊनही शुभांगीचा मात्र काहीही पत्ता लागला नाही. 

शुभांगीचे काहीतरी बरेवाईट झाले असेल, या विचारांनी आई वडीलांना धक्का सहन न झाल्याने आणि आपण आपल्या मुलीसाठी चुकीचं सासर निवडलं का? या अपराधीपणाच्या भावनेने दोघांनीही रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केली.

सासरच्या जाचाने आई बाबांचा जीव तर गेलाच होता, पण शुभांगीचे आयुष्यही अंधारात ढकलले गेले होते.

शुभांगी पुण्यात पोहोचली, तेव्हा साधारण संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत.

 जवळ पैसा पाणी नाही, रहायचा पत्ता नाही आणि या अनोळखी शहरात जगण्याचं काही साधनही नाही याची जाणीव होऊन शुभांगीला रडू अनावर होत होतं.

तितक्यात रस्त्यावर एक अतिशय जख्खड म्हातारी भीक मागत बसली होती. तासभर शुभांगी एकटीच रडत बसलेली पाहून त्या म्हातारीचा जीव कळवळला. 

तिने जवळ येउन शुभांगीच्या डोक्यावर मायेने हात फिरवला, विचारलं 'पोरी एकटीच का गं बसलीया? मगा धरनं म्या बघतीया, तू नुसतीच रडत हायेस'... पण शुभांगी मात्र काहीही सांगू शकत नव्हती. तिचा जीव भुकेने हैराण झाला होता.

शेवटी त्या म्हातारीने तिच्या समोरच्या वाडग्यातून चार पाच नाणी हातात घेऊन शेजारीच वडापावच्या गाडीवाल्याला एक वडापाव द्यायला सांगितला. 

तो वडापाव शुभांगीसमोर पकडत "ये पोरी, नसल सांगायचं तर सांगू नको, पर येवढा वडापाव खाऊन घे", म्हणत तो वडापाव शुभांगीच्या हातात टेकवत म्हातारी परत तिच्या जागेवर जाऊन बसली..

शुभांगीने निमूटपणे तो वडापाव खाऊन घेतला. एकाच जागेवर असं किती वेळ बसून राहणार, या विचाराने शुभांगी तिथून निघाली. 

जाताना तिने त्या आजीबाईला नमस्कार करून मिठी मारली आणि म्हणाली "तुम्ही आईच्या रूपानं मला भेटलात.. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही", असं म्हणून पुन्हा अश्रू लपवत ती तिथून निघाली.

आता जवळपास रात्रीचे नऊ वाजले होते. 

गजबजलेल्या गल्लीबोळात माणसांची गर्दी तुडुंब वाहत होती. 

नकळत शुभांगी नको त्या गल्ली बोळात शिरली आणि त्या दिवसापासून तिच्या आयुष्याला एक वेगळंच गालबोट लागलं.

 शुभांगी एका अशा गल्लीबोळात येऊन पोहोचली होती, जिथे अनेक महिला नटून थटून माडीच्या पायऱ्यांवर कोणाची वाट पाहत असल्यासारख्या बसल्या होत्या. 

बावरलेली, एकटीच बसलेली शुभांगी पाहून त्यातली एक महिला तिला आपुलकीनं चौकशी करत असल्याचे नाटक करत स्वतःजवळ बोलावून म्हणाली "तुझ्यासारख्या अनेक लेकींना मी इथं आसरा दिला आहे.. तू घाबरू नको". 

तिथल्या आजूबाजूच्या मुलींना पाहून शुभांगीला वाटलं, 'ही बाई निराधार मुलींसाठी खरंच राहायची सोय करत असावी', पण तिचा विचार किती चुकीचा होता, हे तिला नंतर समजलं...

झुबेदा मावशीने शुभांगीबरोबर चार प्रेमाच्या गप्पा मारून तिला आपल्या जाळ्यात ओढलं होतं... "हे बघ शुभांगी, तू दिवसभर वणवण भटकून थकली असशील, तेव्हा हे कपडे घे आणि आतमध्ये जाऊन बदल.. तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते", असं म्हणून झुबेदा मावशीने शुभांगीला एका खोलीत पाठवले.

थोड्यावेळाने तिच्यासाठी छान गरमागरम जेवणाचं ताट घेऊन झुबेदा मावशी खोलीत आली आणि म्हणाली," आजपासून तू कसलीही काळजी करायची नाही.. जशा माझ्या इतर मुली, तशीच तू हि तिथे रहा",.... तिच्या बोलण्याने शुभांगीला धीर वाटत होता. 

ती हात जोडून झुबेदा मावशीला धन्यवाद देत म्हणाली ,"मावशी, तुमचे उपकार मी कसे फेडू... नाहीतर या अनोळखी शहरात माझं आज काय झालं असतं? याचा विचारही करवत नाही".... 

 "मी रात्री तुझ्यासोबत झोपायला येते", असं सांगून थोड्यावेळाने झुबेदा मावशी निघून गेली. 

शुभांगी कपडे बदलून आता थोडी बिनधास्त होऊन जेवली... जेवण झाल्यावर अचानक तिच्या डोळ्यांवर गुंगी यायला लागली आणि पाच एक मिनिटात ती खाटेवर झोपी गेली.

रात्री साधारण अकरा साडेअकराला कोणीतरी आपल्या शरीराबरोबर विचित्र काहीतरी करत आहे, हे तिला जाणवत होतं, परंतु डोळ्यांवर गुंगी असल्याने ती जागेवरून उठून शकत नव्हती.

असहाय्य, अस्वस्थ अवस्थेत ती तळमळत तशीच पडून होती.

तो माणुस तिच्या शरीराचा उपभोग घेत पहाटे निघून गेला... दुसऱ्या दिवशी आपल्यासोबत काय झालं, हे अर्धवट आठवून शुभांगी मात्र हादरली होती.

पण त्याचवेळी झुबेदा मावशीने तिथे येऊन तिला दम दिला ,"इथून जर बाहेर पडलीस, तर माझी माणसं पाठवून मी तुझा जीव घेईल..... तुझं आयुष्य असंही उध्वस्त झालं आहे, त्यामुळे बाहेर पडायचे नसते प्रयत्न करू नको"..… असं म्हणून झुबेदा मावशीने तिचा खरा रंग दाखवला.

आपल्यासारख्याच अनेक मुली इथे आसरा घेण्यासाठी नाहीतर फसवल्या गेल्यामुळे आल्या आहेत, याची जाणीव शुभांगीला त्याच क्षणी झाली.

'या बरबटलेल्या आयुष्यातून बाहेर पडणे आता शक्य नाही', हे तिने ओळखले होते... रोज सगळ्या मुलींच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून, मुलींना फसवून झुबेदा मावशी वेश्याव्यवसाय करत होती... रोजच्या होणाऱ्या त्या पर पुरुषांचा स्पर्श जणू काही टोचणाऱ्या सुयांसारखा नकोसा वाटणारा असला, तरीही साऱ्याजणीच हतबल होत्या. एका अदृश्य कैदेत त्या सार्‍या अडकल्या होत्या.

अशातच शुभांगी प्रेग्नंट असल्याचे कळाले.... हे पोर नक्की कोणाचं हे माहित नव्हतं.

शुभांगीला स्वतःचीच किळस वाटत होती.

तिने झुबेदा मावशीला तिला हे मूल वाढवायचे असं सांगताच, मावशीने तिच्या खाड्कन मुस्कटात मारली... 'तू हे पोर वाढवणार, म्हणजे नऊ महिने मी काय हातावर हात धरून बसू... माझा धंदा कसा चालणार... तुझं बघून इतर पोरी अशाच मागे लागतील... या साऱ्या पोरींचा कितीतरी वेळा गर्भपात केला आहे, त्यात तू एक.... त्यामुळे तू नसत्या गोष्टीसाठी हट्ट करू नको.... नाहीतर उगाच आणखी त्रासाला बळी पडशील".... झुबेदा मावशी तिच्या ठरलेल्या डॉक्टरकडे शुभांगीला घेऊन गेली.

परंतु आता गर्भपात होऊ शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्याने ते मूल वाढवण्याशिवाय काहीच पर्याय राहिला नव्हता. 

शुभांगीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिला त्या मुलाला खरंतर या वेश्यावस्तीत ठेवायचे नव्हते, परंतु दुसरा काहीच पर्याय नव्हता... तो मुलगा चार पाच वर्षाचा झाला अन त्याच्या तोंडातही तिथल्या लोकांप्रमाणे शिव्या येऊ लागल्या... तेव्हा मात्र आता काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे, हे शुभांगीने मनोमन ठरवले.

रात्रीचे अकरा वाजले होते रोजच्याप्रमाणे दारावर टकटक झाली. एक रुबाबदार, उंचापुरा तरुण खोलीत आला. त्याला पाहून शुभांगीला खरं तर आश्चर्य वाटलं.

 'सुशिक्षित दिसणाऱ्या या तरुणाला इथे येण्याची काय गरज असावी?', हा प्रश्न तिच्या मनात पिंगा घालत होता. त्या तरुणाने खोलीची कडी आतून लावली.. 

त्याबरोबर आता रोजचाच प्रकार होणार, म्हणून शुभांगी निमूटपणे खाटेवर जाऊन पडली... पण तिचे लक्ष तापाने फणफणलेल्या तिच्या लहानग्या धीरजवर केंद्रित झाले होते... 'आईकडे जायचं', म्हणणाऱ्या धीरजला झुबेदा मावशीने कानाखाली मारली होती...

इतक्यात तो तरुण शुभांगीला म्हणाला ,'तुम्ही स्वतःहून आलात का इथे? का तुम्हाला जबरदस्ती आणलं गेलंय?'... त्याचा हा प्रश्न शुभांगीसाठी अनपेक्षित होता. 

ती पाच मिनिटं काहीच बोलली नाही.. त्यावर त्या तरुणाने पुन्हा तोच प्रश्न विचारला. तशी शुभांगी 'नाही' अशी मान हलवत खिडकीकडे टक लावून बसली... 'मग तुम्ही इथे कश्या?'... असं म्हणताच शुभांगीने घडलेली हकीकत त्याला सांगितली... कदाचित आज पहिल्यांदाच कोणीतरी तिचे मनोगत ऐकून घेण्यासाठी उत्सुक होतं.

सगळी कहाणी सांगून झाल्यानंतर शुभांगी हुंदके आवरत म्हणाली ,"साहेब, आज माझं लेकरू बाहेर तापानी फणफणलं आहे.... मला त्याला या घाणीतून बाहेर काढायचं आहे... पण कसं ते सुचत नाही".

त्यावर तो म्हणाला," तुम्ही काळजी करू नका.. मी उद्या पुन्हा येईल, आपण या विषयावर बोलू"... असं म्हणून तो निघून गेला. 

शुभांगीच्या मनात आशेची नवी पालवी पल्लवित झाली... आज दिवसभर ती खूप आनंदात होती... कधी एकदा रात्र होते, याची वाट पाहत होती.

आज रात्री तिला जेवण खाण काहीच नको होतं. तिचे डोळे त्याच्या वाटेकडे लक्ष लावून बसले होते. 

रात्री पुन्हा अकरा साडे अकराच्या दरम्यान दारावर टकटक झाली. शुभांगीने धावत जाऊन दार उघडलं... दारात तोच तरुण उभा होता... त्याने शुभांगी समोर एक प्रस्ताव ठेवला... 'मी तुमच्या मुलाला माझ्यासोबत घेऊन जातो... आणि थोड्या दिवसांनी तुम्हालाही घेऊन जाईल', असं आश्वासन दिलं.

मुलाशिवाय आयुष्याचा विचारच शुभांगीने कधी केला नव्हता... परंतु त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला विरह सहन करण्याशिवाय गत्यंतर दिसत नव्हतं... तिने तो प्रस्ताव मान्य केला... आता मुलाची भेट कधी होईल? हे ती सांगू शकत नव्हती... तिने त्या माणसाचा फोन नंबर लिहून घेतला.

'ही नसती ब्याद आपल्या इथून जाणार' म्हणून झुबेदा मावशीपण खूप खुश होती.. शिवाय त्या मुलाच्या बदल्यात तिने त्या तरुणाकडून भरपूर पैसे उकळले होते. तो तरूण त्या मुलाला घेऊन गेला. 

दोन महिन्यांनी त्याने अवैध देहविक्री चालणाऱ्या त्या अड्ड्याची पोलिसांना माहिती देऊन शुभांगीला स्वतःसोबत नेले.

त्या दोन महिन्यात त्याने धीरजला चांगलंच वळण लावलं होतं. 

धीरजच्या तोंडातील शिव्या पूर्णपणे गायब झाल्या होत्या.

अशा कितीतरी मुली आणि महिलांना मदत करणारा तो देवमाणूस होता.

 जिथे वासना शमवण्यासाठी एक पुरुष महिलेच्या शरीराचा उपभोग घेतो, तिथेच अशा कितीतरी पीडित महिलांना वाचवण्याचं काम त्याने आजवर केलं होतं... अशा निराधार महिलांना एका आश्रमात राहण्याची सोय करून त्याने आधार दिला होता.

शुभांगीने देखील तिच्या पुढच्या आयुष्यात त्याच्या कार्यात मदत करत आयुष्यभर त्याला साथ दिली. 

कुठलंही नातं नसताना त्या दोघांमध्ये एक मैत्रीचं घनीष्ठ नातं तयार झालं होतं..

सिंगल मदर असलेली हीच शुभांगी आज धिरजची आई असल्याचा अभिमान बाळगत होती.

त्याला कारणही तसंच होतं, कारण पोलीस अधिकारी बनलेला धीरजने आजवर अनेक पीडित मुलींची सुटका केली होतीच, पण वेश्यावस्ती वर छापा टाकताना एक निरागस, निष्पाप आयुष्य उध्वस्त होताना वाचवून त्याने स्वतः त्या मुलीचा जोडीदार होण्याची हिंमत दाखवली होती... एका भरकटलेलं आयुष्य क्षणात स्थिरावलं होतं.

'वेश्यावस्तीतील मुलगी आपली सून होणार', हे कुठल्याही आईला चालणार नाही, परंतु शुभांगीने ते दुःख स्वतः सहन केल्याने, तिला त्याची दाहकता नक्कीच जाणवली होती. झुबेदाच्या तावडीतून सुटून त्या तरुणाच्या मदतीने झालेली तिची सुटका आणि मातृत्वाच्या वाटेवर धीरजचं आयुष्य घडवतानाचा प्रवास आज आठवताना, डोळे मात्र धीरजच्या कर्तृत्वाच्या आनंदाश्रूंनी पाणावले होते.

एका वेश्यचं पोर म्हणून नाही तर एक जबाबदार व्यक्ती म्हणून आज त्याच्याकडे समाज बघत एक कहाणी सुफळ संपूर्ण झाली होती. 

एका अध्यायाचा सुखद अंत झाला होता... भळभळणा-या जखमेतून एक लखलखीत व्यक्तिमत्व उभं करण्याचे श्रेय आज नक्कीच शुभांगीला होतं... तिच्या संस्कारांचं बीज धीरजमध्ये खऱ्या अर्थाने पेरलं गेलं होतं.


© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने