तिला सावरणारा पुरुषोत्तम..

 ©कांचन सातपुते 'हिरण्या'


रडून रडून स्वप्नालीचे डोळे सुजले होते.

आई डोक्याला हात लावून बसलेली . 
 
दारात येरझाऱ्या घालणाऱ्या बाबांचा तर संताप संताप होत होता. गणिताची शिकवणी करून आलेला दिपकही एकदा आईकडे एकदा ताईकडे पाहत गप्प बसला होता. 

शेजारच्या पुष्पा वहिनी भाजी आणि चपात्या घेऊन आल्या, “भारतीताई, चार घास खाऊन घ्या सगळे. सकाळपासून अन्नाचा एक कण नाही तुमच्या कोणाच्या पोटात. 

आता झालं ते झालं, पोरगी चुकली पण आपल्या लेकरांना आपणच जवळ करायला हवं, गेलेली वेळ परत येणार आहे का?"

 भारतीताई पुष्पावहिनींच्या गळ्यात पडून खूप रडल्या, “वहिनी, कार्टीनं काळं फासलं हो तोंडाला. तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आम्हांला चार लोकांत. 
मोठ्या दोन्ही पोरी आज मानानं सासरी नांदताहेत अन हिलाच काय अवदसा सुचली त्या भामट्याबरोबर जाऊन शेण खायची." 

असं म्हणून त्या स्वप्नालीच्या अंगावर धावल्या. पुष्पा वहिनींनी अन दिपकने त्यांना धरलं, त्या रागानं अन दुःखाने थरथरत होत्या. कसंतरी पुष्पावहिनींनी बळेच जेवायला बसवलं अन त्या गेल्या. 

फसवल्या  गेल्याच्या अन अपराधीपणाच्या भावना जणू स्वप्नालीचा श्वास कोंडून टाकत होत्या. 

मनिषच्या भोळ्या चेह-यामागचं विद्रुप सत्य बाहेर आलं होतं. 

घरातल्यांचा विश्वासघात करून आणि मनिषवर विश्वास ठेवून तिनं घरातून पळून जाण्याचा केवढातरी मोठा अन चुकीचा निर्णय घेतला. 

ज्याच्यासाठी आई बाबांना  सोडून गेली, त्यानं तिलाच धोका देऊन सोडलं होतं. 

आत्महत्या करायला निघालेली पण रस्त्यात शेजारच्या किरण आणि राजूनं पाहिलं अन ओढतच घरी घेऊन आले.

मोठ्या दोन्ही बहिणींच्या लग्नात मिरवलेली त्यांची पाठराखीण म्हणून गेलेली स्वप्नाली चारचौघीत उठुनच दिसायची. 

शिवाय हसणं खिदळणं, अनोळखी माणसांशीही लगेच खूप ओळख असल्यासारखं बोलणं या गुणांमुळे तर लगेचच नजरेत भरायची. 

अभ्यासात फारशी प्रगती नसल्यामुळे बारावी झाली अन ओळखीतल्या प्रणालीताईच्या ब्युटीपार्लरमध्ये तिला मदतनीस म्हणून जाऊ लागली.

सकाळ संध्याकाळ आईला घरात मदत करायची. दिवसभर पार्लरमध्ये पगारही मिळत होता बऱ्यापैकी. 

सुभाषराव एका कंपनीत प्रॉडक्शन विभागात कामाला होते त्यामुळं त्यांना शिफ्ट असायच्या आणि भारतीताई तेवढाच घराला हातभार म्हणून घरबसल्या एक दोन खानावळींमध्ये पोळ्या करून द्यायच्या.

ब्युटीपार्लरच्या शेजारीच थोड्या अंतरावर असलेल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये मनिष काम करायचा. थोडे दिवस येता जाता पाहून आधीची हसण्यापूरतीच ओळख आता एकमेकांशी बोलण्याएवढी वाढली. 

बघता बघता मनिषनं स्वप्नालीला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात कधी ओढली तिलाही कळलं नाही. 

मग पार्लरच्या नावाखाली अधून मधून सिनेमा पहायला, फिरायला जाणं सुरू झालं.

 आणि एक दिवस त्यानं जाळं टाकलंच .

 “स्वप्ना मी जर आत्ता तुझ्या बाबांकडे तुझा हात मागितला तर ते तयार होणारच नाहीत. ही छोटीशी नोकरी, चाळीतील एका खोलीचं छोटं घर. त्यापेक्षा आपण असं करू गपचुप लग्न करू. 

मी नवीन घरासाठी अन नोकरीसाठी प्रयत्न करतोच आहे. आधीच तुझ्या मोठ्या बहिणींच्या लग्नात तुझ्या वडिलांचा खूप खर्च झालाय. दिपकचं ही शिक्षण आहे. 

निदान तुझ्या लग्नाच्या खर्चातून तरी वाचव त्यांना. आपण उद्याच लग्न करू पण आत्ता कोणाला काही सांगू नकोस." 

या साळसूद बोलण्याला स्वप्नाली फसली अन दुसऱ्या दिवशी सकाळी पार्लरला निघालेली ती त्या संध्याकाळी घरी आलीच नाही. 

बाबा, दीपक, शेजारची पोरं तिला शोधत फिरत होती. पोलीस चौकीत तक्रारही नोंदवली.

पार्लरवाली प्रणालीताई म्हणाली, “ती आज पार्लरला आलीच नाही. आजकाल सुट्ट्याही बऱ्याच घ्यायची आई आजारी आहे म्हणून."

 मग शेजारचा किरण पटकन बोलला,
" मी तिला एक दोनदा एका मुलासोबत बघितली होती. पंधरा दिवसांपूर्वी तर मित्रांबरोबर सिनेमा बघायला गेलो तिथेही मला ती दिसली. पण लांबूनच मला पाहिल्यावर गर्दीत निघून गेली. तुम्हांला सांगितलं असतं तर मलाच बोलले असते की आमच्या पोरीची बदनामी करतो..."

मनिष स्वप्नालीला घेऊन एका चाळीतल्या खोलीवर आला. थोडंफार सामान होतं खोलीत. “हे आपलं छोटसं घर. पण थोड्या दिवसांसाठीच. मी एका वकिलांकडं जाऊन आलोय. आपण उद्याच मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊ. मग लगेच लग्न." आणि तिच्या जवळ आला. 

त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवलेली तीसुद्धा त्याला नाही म्हणू शकली नाही. 

इकडं पोरीचं काही बरं वाईट झालं नसेल ना या विचारानं आई वडील सैरभैर झालेले. बहिणीही भेटून गेल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मनिष किराणा सामान घेऊन येतो म्हणून जो गेला तो दुपार झाली तरी परतलाच नाही. 

शेवटी तिनं चाळीत आजूबाजूला विचारलं तेव्हा कुजबुज ऐकू आली .

 “ही नवी आणली वाटतं संजानं. "स्वप्नालीनं शेजारच्या एका बाईकडे चौकशी केली तर आधी ती काही बोलेनाच. पण तिने खूप गयावया केली तेव्हा समजलं की “त्याचं खरं नाव मनिष नाहीच संजय असं सांगतो. 

"महिन्या दोन महिन्यांनी वेगळ्याच मुलीला घेऊन येतो. आमच्या डोक्याला नुसता ताप झालाय. पण असल्याच्या नादी कोण लागणार. " हे ऐकलं आणि स्वप्नाली वाट फुटेल तिकडं चालत सुटली. 

तिला काही दिसत नव्हतं काही ऐकू येत नव्हतं जणू. फक्त चालत होती. एका गाडीसमोर येणार इतक्यात शेजारच्या किरण अन राजुने बाजूला ओढलं अन घरी आणली.

पंधरा दिवस झाले असतील या सगळ्याला. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी चौकीत स्वप्नालीला तिच्या आई बाबांसोबत बोलावलं, “मनिष, अरे कुठं होतास तू? सांग ना या सगळ्यांना , आपण लग्न करणार आहोत." 

ती वेड्यासारखी पुन्हा पुन्हा तेच बरळत राहिली. “मी ओळखत नाही हिला. कधीच पाहिलं नाही." मनिष उर्फ संजा उर्फ अतुल अशी कितीतरी नावं बदललेला आणि अनेक मुलींना फसवलेला तो बोलला तसं पोलिसांनी तिथंच मुस्काटात ठेवून दिल्या त्याच्या. 

खेड्यातून आलेल्या त्यानं मित्राच्या ओळखीने चाळीत भाड्याने खोली घेतली होती. 

चार सहा महिने झाले की नोकरी बदलायचा. खूप पगाराची अपेक्षा नसल्यामुळं कामही पटकन मिळायचं. 

त्याची रवानगी तुरुंगात झाली. पेपरमध्ये बातमी आली - ‘निष्पाप मुलींना फसवणारा भामटा तुरुंगात'. 

पण स्वप्नालीचे काय ? तिला तर मोजमाप करता येणार नाही एवढी मोठी शिक्षा मिळाली होती...

पाच सहा महिने लोटले मध्ये. 

घरात माणसं असून नसल्यासारखी होती. आई थोडंफार तरी बोलायची पण बाबा तर आतल्या आतच घुसमटायचे. बोलणंच बंद केलं होतं त्यांनी सगळ्यांशी. बहिणींच्या सासरच्यांनी या कठीण काळात समजून घेऊन आधार दिला होता. पण पुढं काय?

हळूहळू घरातली सगळी कामं स्वप्नाच करत होती. घराबाहेर पडलीच नाही  किती दिवसांपासून.
स्वयंपाकाची आवड असल्यामुळे तिच्या हाताला आधीपासूनच चव होती.

एकदा रात्री सगळे जेवायला बसलेले. दारात प्रणालीताई अन तिचा भाऊ यतीन उभे होते.

 “तुमची काही हरकत नसेल आणि स्वप्नाली तयार असेल तर मला आवडेल तिच्याशी लग्न करायला." यतीनने सरळ सरळ सांगितलं. 

“आम्हाला कोणाचे उपकार नकोयत  आणि सगळं माहीत असतांना तुम्ही हे कसं विचारता? कोणत्याच बाबतीत तुमची आणि आमची बरोबरी होऊ शकत नाही."

 स्वप्नालीच्या बाबांचे हे कोरडं बोलणं ऐकून यतीन पुढं झाला . 

“तुम्हाला खरं सांगतो. ताईच्या पार्लरमध्ये मी बऱ्याचदा स्वप्नालीला पाहिलं होतं. 

तिचा मोकळा स्वभाव, वागणं सगळंच आवडलं होतं. ताईशी मी तसं बोललो ही होतो. तुमच्याकडे तिचा हात मागायला येणार त्या आधीच हे सगळं घडलं. आता नाही म्हणू नका आणि नात्यांमध्ये उपकारांची भाषा तर आणुच नका."

 इतके महिने गप्प असणारे तिचे बाबा अक्षरशः रडले यतीन पुढे.

यतीन अन स्वप्नालीचा संसार सुरू झाला. गोंडस बाळाचे आई बाबा झाले ते दोघं. 

स्वयंपाकाची आवड असलेल्या स्वप्नालीला यतीननं प्रोत्साहन दिल्यामुळे आता तिचे स्वतःचे कुकिंग क्लासेस आहेत आणि अनेक मुली या अन्नपूर्णेकडून शिकून गेल्यावर तिला आवर्जून कळवतात. 

पण या सगळ्याचं श्रेय यतीनलाच बरं का वाचकांनो. जिथं एका पुरुषानं आपल्या कथेतील भोळ्याभाबड्या नायिकेला मोहात पाडून तिला सोडून दिलं तिथंच एक पुरुषोत्तमानं तिच्या भरकटलेल्या आयुष्याला वळण देऊन तिचं सगळं आयुष्यच सांभाळलं.


©कांचन सातपुते 'हिरण्या'

सदर कथा लेखिका कांचन सातपुते (हिरण्या)  यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने