लेक लाडकी या घरची !...

© नीलिमा देशपांडे 




"लेक लाडकी या घरची, होणार सून तू त्या घरची....होणार सून तू त्या घरची...."


मैत्रिणी, मावशी सोबत आई देखील लग्नाची मेंदी काढून घेण्यासाठी हात पुढे करुन बसलेल्या सरिताला चिडवत होते.

"सरिता, एकदातरी तू राघवशी खास त्याच्या आईला आणि मावशीला कोणता रंग आवडतो ते बोलून जाणून घे.अजुनही वेळ गेली नाही, आपण सगळा आहेर पटना शहरातील त्यांच्या राहणीमानाच्या तोलाचा वाटेल असाच घेतला असला तरी त्या निमीत्ताने कुणाची आणखी काही वेगळी आवड आहे का, हे समजेल.”

सरिताला तिची आई जाणून बुजून तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी म्हणजे राघवशी तिने बोलावे असे सुचवत होती. जेणेकरुन त्यांचा आपसातील बुजरेपणा कमी होईल. 



आईच्या सांगण्यावरुन सरिताने तिची नोकरी देखील महिनाभर आधीच सोडून आई बाबांसोबत लग्नाच्या तयारी बरोबरच लग्नानंतर मुंबईहून पटना येथे सासरी जावे लागेल यासाठी स्वत:ची मानसिक तयारी केली होती.

"सरिता तुझ्या सासू बाई जास्त आजारी आहेत. त्यामूळे तुझे, सासरी गेल्यावर लगेच परत इकडे लवकर येणे होणार नाही पण तू स्वत:ची आणि सगळ्यांची नीट काळजी घेशील याची आम्हाला खात्री आहे...."

लेकीची पाठवणी करताना सरिताचे बाबा तिला समजावत होते.

 लग्नं होऊन सरिता सासरी आली आणि तिथलीच झाली.

" सरिता, तू नवी नवरी असून माझ्या लास्ट स्टेज कैंसरमुळे लगेच जबाबदारीने पदर खोचून कामाला लागलीस. तू खूप समजूतदार आहेस. माझ्या माघारी देखील माझ्या राघवला अशीच साथ दे. दोघे सुखाने संसार करा."

सरिताची सासू भरभरून तिच्याशी बोलत होती. 

आजारपणामूळे सरिता आणि राघवच्या लग्ना नंतर अवघ्या तीनच महिन्यात ती देवाघरी गेली. 

अनेक महिने झाले तरी राघव त्या दु:खातून वर येवू शकला नव्हता. त्याची अवस्था पाहून एकदा सरिताने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

" राघव तू आईच्या खुप जवळचा होतास. त्यामूळे तुझे दू:ख मी समजू शकते. पण आता तू थोडे खंबीर होणे गरजेचे आहे. एकुलता एक मुलगा असुनही, तू आणि मी इथे परक्या सारखे कोणतेेही अधिकार न ठेवता राहत आहोत आणि मावशी आणि त्यांची मुले पुर्ण घरावर कब्जा...."

तिला मधेच तोडत राघव म्हणाला,

"सरिता, मावशीने या घरासाठी खूप केलं आहे. दोन लहान लेकरं माघारी तिच्या पदरात सोडून काका वारल्यावर, ती तिच्या सासरी राहू शकली असती पण आईच्या देखरेखीसाठी ती इथेच थांबली. 

मुळात मला सध्या तरी हे कोणतेच विषय नकोत".....

राघव ऐकून घ्यायला तयार नव्हता आणि सरिता तिच्या मावस-सासू आणि सासरे यांच्यात जे काही घडत होते, ते सगळे लक्षात आल्यावर गप्प राहू शकत नव्हती. 

उघडपणे दाखवत नसले तरी, ते केवळ काळजी घेत आहेत असे वाटत नव्हते. 

वेगळ्या नावानेे एका हळूवार बंधनात ते दोघे जगत आहेेेत हे सरिताला समजले होते. एका कामाच्या निमीत्ताने ती मग माहेरी आली.

" आईबाबा मी आता परत तिथे जावू इच्छीत नाही. राघव ऐकून घेत नाही आणि मावशी आणि तिच्या दोन्ही मुलांचे टोमणे, मुद्दाम दिला जाणारा त्रास सहन करणे आता मला शक्य नाही.

आई वडिलांच्या मदतीने सरिताने मॅरेज कोचला भेटण्याकरता वेळ घेतली. 

कोचशी झालेल्या चर्चेत तिने अनेक गोष्टी शेअर केल्या.

" तुमच्याशी मी पुर्ण सहमत आहे की, सध्या राघवला माझ्या आधाराची जास्त गरज आहे. तो त्याच्या वडिलांसमोर काहीच बोलू शकत नाही. 

त्यामूळे त्याला भावनिक आधार देण्याचा मी प्रयत्न करते. 

आम्ही दोघांनी घर सोडून जावे ही मावशीची आणि तिच्या मुलांची इच्छा आहे. 

सासरेही त्यांना साथ देत आहेत. फक्त त्यांना हे उघडपणे बोलण्याची हिंमत नाही. ते त्यांच्या नावाला जपत आहेत. मी लगेच राघवकडे जाते. आम्ही एकत्र मिळून बोलतो काही दिवसांत घरी."

त्यांनतर सरिता सासरी गेली. राघवची हिंमत वाढवत तिने हळूहळू त्याला आजवर न दिसलेल्या सत्याची जाणीव करून दिली. 

दरम्यान राघवने घरचा बिझनेस सोडून नोकरी शोधली.

मग नोकरीच्या निमित्ताने राघव आणि सरिताने घर सोडले व जवळच नोकरीच्या गावी जाऊन सूखात राहू लागले.

नवरा बायको एकमेकांची ढाल बनून आधारवड बनत असतील तर श्रीमंती, पैसा सगळे सोडून एकट्याच्या हिमतीने देखील सुखी होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले.


*ही कथा 'Millennial' Marriage Coach लीना परांजपे ह्यांच्या अनुभवांवर आधारीत असून मी ती शब्दबद्ध केली आहे. यातील मुद्दे, कथानक हे सत्यकथांवर आधारीत असल्याने त्यातील नमुद केलेल्या अडचणी किंवा उपाय हयात बदल न करता, स्थळ काळ, नावे असे गरजेचे बदल केवळ करुन कथा लिहिल्या आहेत. 

त्यामूळे हया कथां कडे 'आमची मते वैयक्तिक मते किंवा विचार देणाऱ्या' अशा दृष्टीकोनातून न पाहता जागरुकता म्हणून वाचल्यास त्या आपल्याला खूप काही सांगून जातील हे निश्चीत!

© नीलिमा देशपांडे 

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने