अंतर्वस्त्र.. फॅशन का आणखी काही?...

 


अंतर्वस्त्र.. फॅशन का आणखी काही?...

©®वर्षा पाचारणे

आजही लोकलमध्ये तुडुंब गर्दी होती. अगदीं श्वासंही घ्यायला त्रास होत होता. इतके दाटीवाटीने लोक चेंगरुन लोकलच्या डब्यांमध्ये उभे होते. त्या गर्दीतून स्मिताचे लक्ष खिडकीच्या बाजूला बसलेल्या तरुणीकडे गेले. वाऱ्याने तिचे केस छान भुरभुरत होते. मेकअपने अतिशय गोरा केलेला चेहरा, त्यावर डार्क लाल रंगाची लिपस्टिक आणि सगळ्यात लक्षवेधक म्हणजे जाळीदार पांढऱ्या रंगाच्या शर्टच्या आत घातलेली डार्क लाल रंगाची डिझायनर ब्रा... तो वरचा पांढरा शर्ट इतका ट्रान्सपरंट आणि जाळीदार होता की जणू काही त्या अंतर्वस्त्राचं प्रदर्शन करण्यासाठीच जणू तो घातला असावा. तिचं वागणं स्मिताला थोडं विचित्रच वाटत होतं.


योगायोगाने स्मिता आणि ती मुलगी एकाच रेल्वे स्टेशनवर उतरल्या. गाडीतून उतरल्यावर पुन्हा प्लॅटफॉर्मवरती एका बाकड्यावर बसून तिचा मेकअप आणि नट्टापट्टा सुरू झाला. स्मिताला मात्र घाई असल्याने ती तरातरा तिच्या रस्त्याने निघून गेली. 'काय ही आजकालची फॅशन', म्हणत तिचे मन आधुनिकतेला दोष देत होते. ती प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडत मुख्य रस्त्याला लागली. शेअरच्या रिक्षाची ती वाट पाहत असताना, कशीबशी एक रिक्षा तिच्यासमोर थांबली. रिक्षामध्ये आधीच एक जोडपं एकमेकांना अगदी घट्ट चिकटून बसलं होतं. मुलीने अगदीच तोकडा असा स्कर्ट आणि त्यावर केवळ 'ब्रा'च्या आकाराचा काहीसा टॉपही म्हणावा की नाही, या प्रकारचा कपडा घातला होता. कधी तो मुलगा तिच्या केसांच्या बटांवरून हात फिरवत गालाला कुरवाळत होता, तर कधी तिच्या उघड्या पायांवर आपली बोटं फिरवत बसला होता. रिक्षावाल्याचीही नजर अर्धी त्यांच्या या असल्या अश्लील चाळ्यांवर होती. स्मिताला मात्र त्या दोघांची फार चीड येत होती. 'एकमेकांबद्दलची शारिरीक जवळीक अशी चार चौघात चव्हाट्यावर आणताना या आजकालच्या पिढीला काहीच लाज लज्जा शरम कशी वाटत नाही?' या विचाराने तिचे मन सुन्न झाले होते.

फॅशनच्या नावाखाली सुरू असलेले अंगप्रदर्शन नक्की कशासाठी? स्वतःचे सौंदर्य दाखवण्यासाठी, दुसऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी, का असे तोकडे कपडे घालून आपण किती पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी? फॅशनेबल कपडे नक्कीच घालावेत, प्रश्न तो नाहींच... पण त्याबरोबरच अंगप्रदर्शन हा त्यातला हेतु नक्कीच नसावा आणि त्यातही जरी तोकडे कपडे घातले तरी हे असले विभित्स प्रकार कशासाठी?

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा स्मिता घरातून बाहेर पडली तेव्हा गेटच्या बाहेरुन तिला गाडीवरून जाताना तीच कालची रेल्वेमधील मुलगी दिसली. आजही अंगावर केवळ नाड्यानाड्यांनी विणलेला, खांद्यावर उघडा असलेला एक टॉप आणि त्यातून अगदी स्पष्ट दिसणारी गडद निळ्या रंगाची ब्रा साऱ्यांचं लक्ष वेधून घेणार होती. पूर्वी बायका नवीन साडी नेसली, की त्यावर मॅचिंग कानातले गळ्यातले आणि बांगड्या लिपस्टिक वगैरे वापरायच्या... पण या मुलीने मात्र तिच्या त्या अंतर्वस्त्रावर मॅचींग असं बाकीचं सारं काही परिधान केलं होतं. आज तर तिने केसांनाही कलर केल्याने ती जणू सिंगापूरी पोपट वाटत होती. आज सुट्टीचा दिवस असल्याने लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती. स्मिताला देखील मार्च एंडिंग असल्यामुळे कामाला जाणे गरजेचे होते. त्यामुळे आज लोकलमध्ये पूर्ण प्रवासात तिची नजर त्या मुलीवरुन काही हलेना. एकदोन स्टेशन गेल्यानंतर त्या मुलीची आणि स्मिताची नजरानजर झाली. ती मुलगी स्वतःहून स्मिता बरोबर हसली आणि म्हणाली," ताई, तुम्ही रोज याच गाडीने जाता वाटतं... कारण मी तुम्हाला रोज पाहते".

तिचं असं अचानक आपल्याशी बोलणं एकून खरंतर स्मिता थोडी गडबडली. 'हिने कितीही प्रयत्न केला तरी, मी हिच्याशी ओळख करून घेणार नाही', असं जणू मनाशी पक्कं ठरवूनच स्मिताने नुसती 'हो' असं म्हणून मान हलवली आणि पुन्हा खिडकीच्या बाहेर बघू लागली. थोड्यावेळाने त्या मुलीने तिच्या पर्समधून लिपस्टिक बाहेर काढली आणि छोट्याशा आरशात बघून तिचा मेकअप सुरू झाला. आता मात्र स्मिताच्या डोक्यात तिडीक उठली होती. 'आधीच एवढा भडक मेकअप असताना काय गरज पडते हिला सारखा सारखा मेकअप करण्याची?'... 'जाऊ दे, मला काय करायचे?' असे म्हणून तिने दुर्लक्ष केले.  इतक्यात त्या मुलीला कोणाचातरी फोन आला. फोनवरचं नाव वाचून, त्या मुलीच्या चेहर्‍यावरचे हावभाव बदलले.. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तणाव जाणवत होता. डोळ्यात एक वेगळीच संतापाची भावना दिसत होती. न राहून शेवटी स्मिताने तिला विचारले," काय गं, आत्ता तर तुझा मुड छान होता... काही प्रॉब्लेम आहे का? तू एवढी टेन्शनमध्ये का दिसते?.... नाही, तसं माझा विचारण्याचा काहीच संबंध नाही, पण सहज वाटलं म्हणून विचारलं"..... स्मिताच्या प्रश्नाने त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. डोळे ओले झालेले पाहून स्मिताला वाटलं,' आपण अगदीच चुकीचं काहीतरी विचारलं वाटतं', ती म्हणाली, "सॉरी, मी असं तुला विचारायला नको होत"...   तितक्यात तिचा हात हातात घेत ती मुलगी म्हणाली," नाही ताई, डोळ्यात पाणी त्यामुळे नाही आलं, आज पहिल्यांदाच कोणीतरी इतक्या प्रेमाने, आपुलकीने चौकशी केली... नाहीतर आजपर्यंत मला फक्त लोकांनी स्वार्थापुरतं वापरून घेतलं".

तिच्या या अशा बोलण्याने स्मिताला काहीच कळेनासं झालं. तितक्यात दोघींचेही स्टेशन आल्याने तो विषय तिथेच थांबला. पण तिच्या मनातली उत्सुकता काही जाईना. प्लॅटफॉर्मवर उतरून तिला बाय करताना स्मिता म्हणाली, "चल उद्या भेटू काळजी घे"... त्या मुलीने हसून बाय केलं. दोघीही आपापल्या मार्गाने निघून गेल्या. स्मिताचे मात्र काही केल्या कामात आज लक्ष लागत नव्हते. आधीच कामाचा ताण जास्त असल्याने आणि त्यात त्या रेल्वेतील मुलीच्या विचाराने तिचे डोके भणभणू लागले होते. ती दुसऱ्या दिवशीच्या सकाळची आतुरतेने वाट पाहत होती. 'आज ती मुलगी भेटताच मी तिला सारं काही विचारणार', या विचाराने तिने सकाळची कामं गडबडीत आवरली. डब्बा, पाकीट, पाण्याची बाटली, पर्समध्ये घाईने टाकत, रेल्वेस्टेशनच्या दिशेने निघाली.... पण आज सोमवार.. आठवड्याचा पहिलाच वार... त्यामुळे लोकल आजही तुडुंब गर्दीने भरलेली होती.. पण एवढ्या गर्दीतही त्या मुलीने स्मिताला हात दाखवून स्वतःजवळ बोलावून घेतले. स्वतः जागेवरून उठून तिने स्मिताला जागा करून दिली. पण आज एवढ्या गर्दीत कुठल्याच विषयावर एकमेकींशी बोलणं शक्यच नव्हतं. स्मिताची घालमेल त्या मुलीला जाणवली... तिने एक स्मितहास्य करत स्मिताला सांगितले "ताई ,मला तुमच्या मनात काय प्रश्न आहे, हे जाणवतंय... पण त्याबद्दल बोलण्याची आता वेळ नाही. एवढ्या गर्दीत मी माझं मन मोकळं करू शकणार नाही.. त्यापेक्षा पुन्हा कधी शक्य असल्यास आपण भेटलो तर नक्कीच बोलणं होईल".... आजंही ती त्याच प्रकारचं अगदी कागदासारखा पातळ शर्ट आणि त्याच्यात घातलेली भगव्या रंगाची ब्रा अगदीच सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होती.. लोकलमधील इतर बायका तिच्याकडे बघून एकमेकींमध्ये काहीबाही कुजबुजत होत्या पण त्या मुलीला आता ते सवयीचं झालं होतं. या रविवारी ही स्मिताला ऑफिसमध्ये काम असल्याने तिला जाणं गरजेचं होतं

शेवटी आठवडाभराची वाट पाहिल्यानंतर, स्मिता आणि ती मुलगी एकमेकींना लोकलमध्ये निवांत भेटल्या. दोघींनाही एकमेकींना पाहून हायसं वाटलं. इतका आठवडाभर ज्या मुलीला भेटण्याची, तिच्याशी बोलण्याची उत्सुकता मनामध्ये होती, ती शेवटी आज स्मिताच्या समोर बसली होती. पाचेक मिनिटे इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यानंतर, स्मिता तिला काहीतरी विचारणार, तेवढ्यात मागच्यावेळी प्रमाणेच त्या मुलीच्या मोबाईलवर फोन खणखणला. तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव नकळतपणे बदलले. पण आज डोळ्याच्या कडा पाणावल्याच नाही, तर ती स्मिताचे हात हातात घेऊन हमसून हमसून रडू लागली आणि म्हणाली," ताई, मोठे स्वप्न मनात घेऊन शिक्षण पूर्ण करत होते. एमबीए करून उच्च पदावर नोकरी मिळवावी, हे स्वप्न होतं. आई-बाबांपासून लांब होस्टेलला राहून मी शिक्षणासाठी मुंबईला गेले होते. एका छोट्या शहरातून आलेल्या माझ्यासारख्या मुलीला ती मुंबईची मायानगरी खुणावत होती. एरवी जीन्स-टॉप घालणारी मी, त्या माया नगरीतील फॅशनला पाहून हरखून गेले होते. अगदी सर्रासपणे तोकडे कपडे घालणार्‍या मुली पाहिल्या, की आपणही असेच कपडे घालून एका वेगळ्याच आत्मविश्वासाने वावरावे, ही तीव्र इच्छा मनात जागृत व्हायची. हॉस्टेलमधील रूममध्ये आम्ही तीन मुली राहत होतो. इतर दोघी अतिशय देखण्या आणि श्रीमंता घरच्या होत्या. त्यांचे कपडे पाहून मला माझीच कधीकधी लाज वाटायची. 'काय ते नेहमी जीन्स-टॉप घालायचे, कधीतरी आपल्यालाही असं मिनी स्कर्ट, स्लीव्हलेस, बॅकलेस टॉप घालता यावेत', असं हळूहळू वाटायला लागलं होतं. एक दिवस रूममधल्या रूम पार्टनरने, मला तिचा मिनी स्कर्ट आणि एक शॉर्ट टॉप घालायला दिला. तो घातल्यानंतर मला माझी मीच खूप सुंदर वाटायला लागले. माझ्या मैत्रिणीने माझे खूप फोटोज काढले. वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढताना, मला मी हीरोइन असल्याचा एक उगाच वेगळाच फिल आला. ते फोटोज मी लगेच सोशल मीडियावर अपलोड करून मग लोक काय म्हणतील? याची आतुरतेने वाट पाहू लागले. त्या फोटोजवर कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव झाला आणि बघता बघता माझ्यातला आत्मविश्वास वाढू लागला.

आता अभ्यासाकडे पुरते दुर्लक्ष होत होते. 'आपण कुठले स्वप्न घेऊन या मायानगरीत आलोय', याचा मला पूर्णपणे विसर पडला होता. केवळ रोज सकाळी उठून दुसऱ्याचे फॅशनेबल कपडे घालून, फोटो काढायचे आणि ते सोशल मीडियावर टाकायचे, हा माझा जणू रोजचा कार्यक्रमंच झाला होता. 'लुकिंग हॉट, ग्लॅमरस', अशा कमेंट वाचून मला हवेत असल्यासारखं वाटत होतं. 'आई-बाबांना याबाबत काय वाटेल?'... याची जराही चिंता मी करत नव्हते. अभ्यासाच्या पुस्तकांची खरेदी करायची, या नावावर मी त्यांच्याकडून पैसे उकळून, त्यामध्ये अशा तोकड्या कपड्यांची खरेदी करत होते. लवकरच मला उन्मेश नावाचा मित्र भेटला. तो सोशल मीडियावर माझा खूप मोठा फॅन होता आणि तसंच कॉलेजला देखील आम्ही एकत्रच असल्याने, आमचं बोलणं चालणं होतं... तो अतिशय श्रीमंत घरचा असल्याने, त्याचा खिसा नेहमीच पैशाने भरलेला असायचा.

एक दिवस त्याने सोशल मीडियावर मला एक मेसेज केला," मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचं आहे", एवढं बोलून त्याने पत्ता पाठवला... आधीच मनात त्याच्याबद्दल प्रेमाची भावना असल्यामुळे, मीही छानपैकी स्लीवलेस शॉर्ट टॉप आणि मिनी स्कर्ट, हाय हिल्स आणि एक महागडी पर्स हातामध्ये घेऊन, ठरलेल्या पत्त्यावर पोहोचले. एका आलिशान बिल्डिंगच्या अकराव्या मजल्यावर, एका फ्लॅटमध्ये उन्मेश माझी वाट पाहत होता. मला आलेली पाहताच त्याने 'हाय', म्हणत मला घट्ट मिठी मारली. कॉलेज लाईफमध्ये एकमेकांना असं मिठी मारणं आमच्या ग्रुपमध्ये अगदीच कॉमन होतं. पण मला त्याच्या मिठीत अगदी उबदार वाटलं. त्याने माझा हात हातात घेऊन मला आतमध्ये बोलवलं आणि दार लावलं. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर मी त्याला विचारलं," उन्मेश, मला असं घाईघाईने का बोलावून घेतलं?" त्यावर अगदीच लाजत, गुडघ्यावर बसत, त्याने माझ्यासमोर रेड रोझ पकडून फिल्मी स्टाईलने प्रपोज करत 'माझी होशील ना?' म्हणून विचारलं. ज्याच्यावर मनातल्या मनात मी प्रेम करत होते, त्याने असं समोरून प्रपोज केल्यावर नकार देण्याचा प्रश्नंच कुठे होता?... मी एका क्षणात त्याच्या मिठीत विसावले... हळूहळू ती मिठी इतकी घट्ट होत गेली, की आम्ही आमचे भान हरपून एकमेकांचे झालो. त्या आलिशान फ्लॅटमध्ये प्रणयाने उच्च सीमा ओलांडली होती. भानावर आल्यावर देखील 'आपल्या हातून काही चूक झाली', अशी भावना दोघांच्याही मनात नव्हती. कारण प्रेम म्हणजे समर्पण एवढंच काय तो विचार होता... पण समर्पण म्हणजे लग्नाआधीच असं स्वैराचार आणि सर्वस्व अर्पण करणं चुकीचं होतं, हा विचार तेव्हा मनाला शिवलाही नाही. त्या फ्लॅटमधून बाहेर पडताना आपण काही गमावल्याचा नाही, तर मला उन्मेशचं प्रेम कमावल्याचा आनंद जास्त वाटत होता...

शिक्षण पूर्ण करता करता वर्षभर आमचं हे असं एकरूप होणे सुरू होतं. ज्या तोकड्या कपड्यांसाठी, मी खोटं बोलून आई-बाबांकडून पैसे मागत होते, त्याची आता मला गरज नव्हती... कारण उमेश स्वतः मला शॉपिंगला नेऊन अगदी हवं ते घेऊन देत होता. फायनल एक्झामच्या आधी दोन दिवस मी त्याला विचारलं," उन्मेश, आपण लग्न कधी करूयात?"... त्यावर त्याने माझा हात झिडकारत सांगितले "या लग्नाच्या भानगडीत मला पडायचं नाही, म्हणून तर तुझ्यासारख्या मुलींना मी फिरवतो... माझी हौस भागवतो आणि तुमची गरज.... नाहीतर काय होते तुझ्याकडे?.. पुन्हा जर लग्नाचा विषय काढला, तर गाठ माझ्याशी आहे".... एवढं म्हणून धाडकन दार आपटत तो फ्लॅटच्या बाहेर पडला. त्या आलिशान फ्लॅटमध्ये आता फक्त कोंदट, भयानक, सुन्न करणारे वातावरण होते. इतके दिवस ज्या फ्लॅटमध्ये उन्मेशबरोबर झोपून तिने तिचं सर्वस्व पणाला लावलं, त्या फ्लॅटमध्येच आत्महत्या करण्याचे विचार  मनात घोळू लागले. "कसबस स्वतःला सावरत, मी पुन्हा होस्टेलवर परतले... आजपासून यापुढे पुन्हा कधीही उन्मेशचं तोंडही पाहणार नाही, या विचाराने मी रात्रभर हमसून हमसून रडले"...

"एक्झाम संपून आता कायमचं आई-बाबांकडे निघून जायचं, म्हणून बॅगा भरल्या आणि हॉस्टेलच्या रूमबाहेर पाऊल टाकणार तोच उन्मेशचा फोन आला. त्याने आज पुन्हा मला भेटायला बोलावलं होतं. मी दोन-चार शिव्या हासडत त्याला पुन्हा न भेटण्याचं सांगितलं... पण त्यावर उन्मेशने मला आमच्या दोघांचा शारीरिक जवळिकीचा माझा विवस्त्र असलेला, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली".... असलं नसलेलं हातापायातील अवसानंच गळून पडलं होतं. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं ते..... ते मुळात प्रेमंच नव्हतं... होती ती फक्त वासना... हे तेव्हा जाणवलं..... पण फार उशीर झाला होता. 'आपल्या अब्रूचे धिंडवडे निघू नये' म्हणून त्या दिवसापासून मी उन्मेश जेव्हा-जेव्हा बोलवायचा, तेव्हा जात राहिले"..

मी पुण्यात परतल्यानंतर नेमकेच उन्मेशलाही पुण्यात नोकरी मिळाली. मी त्याला ब्लॉक करून किंवा मोबाईल नंबर बदलण्यात काहीच अर्थ नव्हता.... कारण माझ्या प्रत्येक हालचालींवर त्याचे बारीक लक्ष होते. त्याच्यासाठी मी जणू एक खेळणं झाल्यासारखं झाले होते... वापरून मग फेकून द्यायचं, अशा पद्धतीने त्याने तो खेळ सुरू ठेवला होता... आई-बाबांना कळू द्यायचे नाही, या भीतीने नकळत मी त्या खेळात गोवले गेले होते. आता त्याने स्वतःच्या वडिलांच्या जीवावर एक नवीन कंपनी सुरू केली आहे. मला रोज हवं तसं वागवता यावं, म्हणून त्याने त्याच्याच कंपनीत, त्याची सेक्रेटरी म्हणून मला अपॉईंट केलं. मी जर नोकरी केली नाही, तर पुन्हा तोच 'व्हिडीओ व्हायरल करण्याचा जीवघेणा खेळ खेळेल', अशी धमकी देत, त्याने मला नोकरी करण्यास भाग पाडलं... त्यात फक्त त्याची एकट्याची चूक नाही..... चूक आहे, ती माझीच.... कारण तसं पाहता, त्याची कंप्लेंट करून मी हा प्रकार संपवू शकले असते... पण त्यामध्ये आईबाबांचा माझ्यावर असलेला विश्वास कायमचा तुटणार आणि हा धक्का सहन न झाल्याने ते स्वतःच्या जीवाचं काही तरी करून घेणार, याची मला खात्री आहे... आज त्यांच्या उतारवयात, मी केलेल्या अक्षम्य चुकीमुळे ते उगाच नरकयातना भोगतील... या एका विचाराने, मी रोज त्याच्या शारीरिक वासनेची बळी पडत आहे. रोज जितके जमतील तितके ट्रान्सपरंट आणि तोकडे कपडे घालून जाणं हा जणू माझ्यासाठी एक नियम बनला आहे. घरातून निघताना जीन्स टॉप घालून बाहेर पडणारी मी अनेकदा रेल्वे स्टेशनवरच्या लेडीज टॉयलेटमध्ये ड्रेस चेंज करते आणि हे असे तोकडे कपडे घालते. आता अनेक दिवस आई-बाबा गावाला गेल्याने मी घरून निघतानाच हे कपडे घालून येते.....

त्याचं लवकरच लग्न होणार आहे. त्या दिवसापासून मी नक्कीच एक वेगळं आयुष्य जगेन, याची मला खात्री आहे. कारण ज्या मुलीशी त्याचे लग्न होणार आहे, ती त्याच्या आईबाबांनी पसंत केलेली एका बड्या घरातील मुलगी आहे... आणि तिच्या मान-सन्मानासाठी तरी त्याला आयुष्यभर नीट वागावे लागेल... ज्या दिवशी त्याचं लग्न होईल, त्या दिवशी तो नाही तर, मीच त्याला तो व्हिडिओ पोलिसांना दाखवण्याची धमकी देईल.... शेवटी म्हणतात ना 'हर एक कुत्ते का दिन आता है'l राजकीय घराण्याशी संबंधित असलेल्या त्याच्या सासरच्या प्रतिष्ठेपोटी तरी, त्याला हा खेळ थांबवावाच लागेल, नाहीतर त्याचे परिणाम तोच नाही तर त्याची सारे घरदार सहन करेल.... या भीतीने तो माझा नाद नक्कीच सोडून देईल.. त्यादिवशी आमचे दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झालेले असतील... आणि या असल्या हव्यासापोटी परिधान केलेल्या 'लाल, निळ्या ब्रा', पुन्हा कधीही प्रदर्शनासाठी वापरल्या जाणार नाहीत... एवढं बोलून ती ढसाढसा रडत होती.... आज खरंतर स्टेशन कधीच येऊन गेलं होतं... लोकल पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाली होती. आज नकळत किंवा मुद्दाम स्मिताने ऑफिसला दांडी मारली होती. परतीला निघालेल्या लोकलप्रमाणे रेल्वेतील त्या मुलीचे आयुष्य देखील पुन्हा एक सुखद प्रवास लवकरच करेल, या विचाराने दोघीही एकमेकांना मिठीत घेत, अश्रूंचा वर्षाव करत होत्या... ओळखपाळख नसलेल्या 'त्या' दोघी एकमेकींशी ऋणानुबंधाच्या गाठी असल्याप्रमाणे दुःख वाटून घेत होत्या...

खरंतर हे सगळं सत्य सांगून त्या मुलीची आणखी एक चूक ठरली असती, जर स्मिता विश्वासघातकी असती तर ... कारण आज-काल कुणालाही मनातली गोष्ट सांगायची झाली, तर ती गुपित म्हणून किती काळ जपली जाईल, याची शाश्वती राहिलेली नाही.. त्यात एवढी चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासारखी घटना तर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सांगणे नक्कीच विश्वासार्ह नाही.... कदाचित कोणाबरोबर तरी दुःख शेअर केल्याने ते हलके होईल या विचाराने त्या मुलीने ही गोष्ट स्मिताबरोबर शेअर केली असेल..... किंवा कदाचित एक पडलेलं चुकीचं पाऊल अनेक चुकीच्या मार्गांवर माणसाला ढकलत तसंच काहीसं झालं असेल... पुढे त्या मुलीचं आयुष्य कदाचित मार्गी लागलं असेल किंवा त्या खेळात हार मानून तिने स्वतःचे आयुष्य संपवून टाकले असेल ते तिचं तिलाच माहित.....

नकळत वयात चमकत्या चंदेरी दुनियेलाच सत्य समजून पाहणाऱ्या तरुणाईची होणारी एक अक्षम्य चूक आयुष्य उध्वस्त करू शकते.... पालकांना त्रास होऊ नये, या विचारासाठी आपल्या प्रत्येक वागण्याचा, कृतीचा जर आधीच विचार केला, तर पालकांना त्रास नाही तर कायम आपल्या पाल्यांच्या अभिमानंच वाटेल.... एक सोनेरी क्षण कमावताना, हजार सोनेरी क्षणांनी भरलेली अत्तराची कुपी असलेले आपले 'आई बाबा' रात्रंदिन आपल्यासाठी झटत असतात, याची जाणीव ठेवली, तर समोर कितीही प्रलोभनं आली, तरीही त्यात अडकण्याची चूक नक्कीच होणार नाही...

©®वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून, माझी लेखणीचा त्यावर कोणताही अधिकार नाही.  कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने