तुला बदलावंच लागेल!

 


तुला बदलावंच लागेल!

©कांचन सातपुते ‘हिरण्या

“झालं ! आलं डोळ्यात पाणी! कशी गं मनू तू ? 

मी फक्त म्हणालो आज पोहे करताना लक्ष कुठं होतं बाईसाहेबांचं. जरा मीठ जास्त झाल्यासारखं वाटलं. " 
मानसीनं पटकन डोळ्यातलं पाणी पुसलं. 

जाता जाता अनिषनं, “बरं ऐक ना मनू , आज जरा नव्या घरी चक्कर मारून येशील का ? फर्निचरचं काम ऑलमोस्ट झालंय असं म्हणालाय निनाद. दुपारी मला फोन कर. बाय" म्हणून तो गेलाही...

तिनं पोह्यांचा पहिला घास खाल्ला आणि.. खारटच की! 
स्वत:चाच राग आला . 
" अशी कशी मी ? अनिष एवढं समजून घेत असतो , समजावतो ,  जराशी तरी बदल ,एवढी हळवी राहिलीस तर कसं होणार गं तूझं ? "

"खरंच, कधीच बदलू शकणार नाही का मी ? "

 मानसीने किचनमधली कामं आटोपली. 
"वरूण , ए बाळा , चला उठा . आपण आपल्याला नव्या घरी जायचंय . बाबा सांगून गेलाय ."

"बाबा गेला ऑफिसला ? मला उठवलं नाही आज तू लवकर .मला त्याला बाय करायचं होतं ना . " 

"वरूण बाळ छान झोपलंय , मी त्याला दुपारी फोन करेन असं म्हणाला बाबा . " 

वरूणची समजूत काढून मानसीनं त्याचं आवरलं आणि त्याला घेऊन ती निघाली. 

अनिषने राहत्या घरापासून जवळच टु बीएचके फ्लॅट बुक केलेला. टेरेसही आहे मोठ्ठं. खरं तर मानसीची फूलांची, झाडांची आवड जपता यावी म्हणूनच मोठं टेरेस असलेला फ्लॅट त्यानं घेतलाय.  

 रस्त्याने जाता जाता मानसीचं विचारचक्र चालूच होतं.
 संस्कृत घेऊन एम ए केलं तेव्हाच ठरवलं होतं पुढे काहीतरी करायचं . पण लगेच लग्न जमलं ,नंतर वरूणचा जन्म  आता नव्या घरी राहायला गेल्यावर तिला लहान मुलांसाठी संस्कृत भाषेचे वर्ग सुरू करायचेत . 

  टेरेसमध्ये छान फुलबाग फुलवायचीय, मोगरा,अबोली तर किती आवडीची . 
आणि हॉल, किचन, बेडरूम्समधे कूठे काय काय करायचं , लग्नाआधी वाल पेंटींग्जही किती सुंदर करायचे , तेही करणार आता . मोठ्ठी यादी विचारांची , न संपणारीच....

  तीन वर्षांच्या वरुणला जवळच्याच एका शाळेत प्रवेशासाठी अर्जही भरलाय. विचार करता करता नवं घर आलं. इतका वेळ वरूण तिचा हात धरून गप्प चालत होता, अगदी तिच्यासारखाच शांत...

  "आई ," 
"काय रे वरूण ? " 
"आलं ना आपलं नवं घर ? " 

नव्या घरात पाऊल टाकलं, पाहिलं तर अनिषने अन तिने फर्निचरसाठी जो रंग आणि डिझाईन निवडलं होतं त्यामध्ये बऱ्यापैकी फरक दिसत होता.

 मानसीनं काम करणाऱ्या कारागिरांना विचारलं तर त्यांनी , 

“मॅडम काममे डिस्टर्ब मत करो. हमारे साबको फोन करो . "
 असं म्हणून तिला बाजूला उभं राहायला सांगितलं. तिनं फर्निचरचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या निनादला फोन लावला तर तो , 
 “अहो वहिनी, थोडासाच बदल झालाय. एवढं काय ? मी करणारच होतो आज अनिषला फोन. बरं मी ठेवतो फोन. माझ्या समोर एक क्लायंट आहे."  
त्याचं असं उडवाउडवीचं बोलणं तिला  खटकलंच. 

 तेवढ्यात अनिषचा फोन आला, “अगं मनू, जरा शाळेत जाऊन ये ना. आपण अर्ज भरलाय त्यात अजून काही माहिती पाहिजे त्यांना. आणि हा, सॉरी सकाळी तुझ्या डोळ्यांत पाणी आलं . वरूणला दे बरं फोन . 
काय खाऊ आणायचा आज  बेटा ? "

बाबा गुलाबजाम आण , आईला आणि मला खूप आवडतात माहितीये ना तूला ." 

 मानसीनं फोन घेतला , पलिकडून अनिषचा हसण्याचा आवाज, तिलाही खरं हसू आलं . 
"नंतर करते मी फोन, बाय ."

 मानसी मग तिथून शाळेत निघाली. ऑफिसमध्ये जाऊन ती संबंधित व्यक्तीला भेटली. 

“मॅडम बसा पाच मिनिटं बाहेर ,  मी बोलावतो." पाचची पंधरा मिनिटं झाली.
 तिच्यानंतर तीन चार पालक ऑफिसमध्ये येऊन गेलेही.   मानसी पुन्हा ऑफिसमध्ये गेली. त्या माणसाने माहिती लिहून घेतली. पण हिलाच उपदेशाचे डोस दिले . 
 “अहो मॅडम, पाच मिनिटांनी यायचं. आम्हालाही बरीच कामं असतात ना. 

" “थॅंक्यु" म्हणून मानसी आता घरी निघाली.

 वरुणच्या डोक्यावरून हात फिरवला, “आपण खाऊ घेऊ हं शहाण्या मुलाला ."

 आणि परत चालता चालता तिचे विचार सुरू झाले. सकाळचं अनिषचं बोलणं, फर्निचरचे काम करणाऱ्या कारागिरांचे बोलणं, निनादचं फोनवरचं बोलणं आणि शाळेच्या ऑफिसमधला माणूस, या सगळ्यांचं एक वेगवान चक्र तिच्यात डोक्यात फिरत होतं.

 तेवढ्यात वरूणनं तिला आठवण करून दिली, “आई, खाऊ ? "

 तिनं सफरचंद आणि द्राक्षे घेतली त्याला आवडतात म्हणून आणि शेजारच्या मेडिकलमध्ये गेली. तिथे नेहमीची मुलगी नव्हती आणि गर्दीही बरीच होती.

 “काय पाहिजे मॅडम?" दुकानातील माणसानं विचारलं.

 “एक व्हिस्परचा पॅक द्या." मानसीने सांगितलं. त्याने व्हिस्परचा पॅक तिला देण्यासाठी हातात घेतला पण तो मानसीला न देता हातात घेऊन गोल गोल फिरवत दुसऱ्याच ग्राहकाशी बोलत राहिला.  मानसीला जरा अवघडल्यासारखं झालं . बाजूला उभी असलेले दोन तरूण हसले . तिने पुन्हा सांगितलं .

 “देतो मॅडम , " म्हणून परत त्याच्या बोलणं चालूच! 
आता  मात्र तिचा संयम सुटला .

 “काय हो, एवढी साधीगोष्ट कळत नाही का तुम्हांला ?  साधे शिष्टाचार नाहीत. मी काही वेळ जात नाही म्हणून इथे थांबले नाही. किती वेळ हातात तो पुडा घेऊन फिरवताय. 
तो माणूस जरा गोंधळला. तेवढ्यात दुकानातील नेहमीची मुलगी आली. झालेला प्रकार तिच्या लक्षात आला .

 “सॉरी मॅडम, मी देते हं तुम्हांला." तिने खाकी कागदाच्या पिशवीत तो पॅक करून तिला दिला.  
“अगं तू कशाला सॉरी म्हणतेस.  नेहमीचंच आहे यांचं .या अशा लोकांची ना तक्रारच केली पाहिजे ग्राहक सेवा मंचाकडे. म्हणजे डोकं ठिकाणावर येईल.  

“सॉरी मॅडम , तुमचा गैरसमज झाला बहुतेक , "तो म्हणाला .

 पण मानसी पैसे काउंटरवर ठेवून निघाली. वरुणही आज नेहमी शांत असणाऱ्या आईकडे बघत राहिला.
 तिथून जाणाऱ्या शेजारच्या मनोरमा काकूंनी हे सगळं पाहिलं. त्यांनाही आज बरं वाटलं.
 सांगून सांगून त्या थकल्या होत्या, “मानसी अगं इतकं शांत राहून चालत नाही बाळा..."

   “वरुण बघ तुझ्या आवडीचा खाऊ ,गुलाबजाम." अनिषनं त्याच्या हातात बॉक्स दिला.

 “बाबा, आज आई खूप चिडली होती त्या दुकानातल्या काकांवर . "
तसा अनिष हसला , “तुझ्या आईला रागावता पण येतं का ?
माझ्यावर तर कधीच रागवत नाही, मला तर आवडेल  तूझ्या आईचं रागावणंसूध्दा . "
 
  “का ? रागवायचा हक्क फक्त तुम्हालाच दिलाय का ?  चेष्टा सुचतीये ना , करा तुम्हीही चेष्टा करा . आत्ताही रागानं डोळ्यांत पाणी आलंच .

 अनिषनं मानसीला जवळ बसवलं, “अगं हो हो, आज दुर्गावतार धारण केलास की काय ? मला कळलंय मनोरमा काकुंकडून सगळं आणि निनादचाही फोन आला होता . त्याच्याशीही झालंय बोलणं .

 वेडाबाई, या दुनियेत टिकून रहायचं असेल तर जशास तसं वागावं लागतं. चुकीच्या ठिकाणी आवाज उठवावाच लागतो. त्याची सुरुवात तू आज केलीस हेच तर मला हवं होतं. पण तूझ्या डोळ्यांत पाणी ठरेल तर शप्पथ .मला माझी मानसी कणखर झालेली बघायचीय अशी मूळूमुळू रडूबाई राहिलीस तर कसा निभाव लागणार तूझा या दुनियादारीत . 

आता कळालं ना तुला बदलावंच लागेल मानसी... बदलशील ना ? माझ्यासाठी,वरूणसाठी आणि तूझ्या स्वत:साठी. "

तिनं त्याचा हात हातात घेतला ,काही सांगायची गरज नव्हती . तिचे डोळेच सांगत होते , तिच्यातल्या बदलाची सुरूवात झालीय ....

©कांचन सातपुते ‘हिरण्या
सदर कथा लेखिका कांचन सातपुते"हिरण्या" यांची असून "माझी लेखणी" वेबसाईटचा त्यावर कोणताही अधिकार नाही. कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
✍️माझी लेखणी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने