दृष्ट


©️ धनश्री दाबके



"आरती sss अगं झालं का तुझं ? चल ग लवकर. बस चुकेल नाहीतर आपली. आज शार्प नऊला पोचायचय मला. गेल्या गेल्या महत्त्वाची मीटिंग...." सौरभचे पुढचे शब्द मनातच राहिले.

कॉटनचा नाजूक एंब्रोयडरी केलेला पिंक लॉंग टॉप, पांढरी सलवार. त्यावर सुंदर पिंक बॉर्डरची पांढरी ओढणी घेतलेली, स्टेप कट मधले केस मोकळे सोडलेली आणि हलकासा मेकअप केलेली आरती बेडरूम मधून बाहेर आली आणि आपल्या सुंदर बायकोकडे बघताना सौरभचे भान हरपले.

" हो रे. झालच माझं. चल निघुया" आरती डबा पर्समधे ठेवत म्हणाली.

"मी काय म्हणतो आज तू इतकी सुरेख दिसतीयेस आणि तुझा ड्रेसही इतका डेलिकेट आहे की जाऊ दे बस . आपण टॅक्सीने जाऊ म्हणजे अजून थोड्या वेळाने निघालो तरी चालेल." सौरभने सुचवले.

"नको. मीटिंग आहे ना तुझी महत्वाची. तर वेळेच्या आधीच गेलेले बरे आणि तसही सकाळी इथे टॅक्सी तरी कुठे लगेच मिळते? त्यापेक्षा बसच बरी. चल चल निघ." आरतीने त्याचा इरादा ओळखुन त्याला बाहेर काढले.

दोघं बस स्टॉपवर आले आणि बस आली. अगदी वेळेवर. विशेष म्हणजे आज गर्दीही बेतात होती. 


बसमधे चढायला पुढे जाणार इतक्यात पुढच्याच सीटवर बसलेली 'ती' आरतीला दिसली आणि आरती लगेच मागे फिरली. 

सौरभचा हात ओढून त्याला चढणाऱ्या लोकांच्या गर्दीतून मागे नेत म्हणाली "नको ही बस आज. तू म्हणत होतास ना तसं टॅक्सीनेच जाऊया." तो काही म्हणायच्या आत आरती टॅक्सी थांबवायलाही लागली. 

सौरभ एकदम चक्रावला. असं काय करतेय ही ? बस मधे चढता चढता अचानक टॅक्सी? 

मी म्हणत होतो तेव्हा टॅक्सी मिळत नाही म्हणाली आणि आता कशी मिळणारे? पण आरती काही ऐकण्याच्या मूडमधे नव्हतीच. 

तीन जणांनी नाही म्हंटल्यावर शेवटी एकदाचा चौथा टॅक्सीवाला तयार झाला आणि दोघं निघाले.

"काय झालं ग अचानक? मूड चेंज? " सौरभने विचारले.

"अरे सहजच. म्हंटलं तेवढाच तुझ्या बरोबर अजुन वेळ मिळेल" असं म्हणून आरतीने त्याचा हात हातात घेतला.

काहीतरी आहे मनात पण ही आपल्याला सांगत नाहीये हे सौरभच्या लक्षात आले पण त्याने लगेच तिला खोलात जाऊन काही विचारायचे टाळले. 

त्याने पुढे काही विचारले नाही त्यामुळे आरतीनेही सुटकेचा निश्वास टाकला. 

जवळजवळच असलेल्या आपापल्या ऑफिसमध्ये पोचल्यावर दोघांचा कामाचा व्याप सुरु झाला आणि दोघही सकाळचे टॅक्सी प्रकरण विसरून गेले.

रात्री जेवतांना त्याला उद्या ऑफिसच्या दुसऱ्या ब्रॅंचला कामासाठी जायचय असे सौरभने सांगितल्यावर आरती एकदम रिलॅक्स झाल्याचे सौरभला जाणवले.

" अरे ! उद्या आपण एकत्र जाणार नाही सकाळी. मला वाटलं तू मला मिस करशील पण तुला तर बरंच वाटतय बहुतेक. मी रोज तुझ्या बरोबर यायला मिळावे म्हणून धडपडत असतो आणि बाईसाहेबांना मात्र लांब राहावस वाटतय" सौरभ गमतीत म्हणाला.

पण आरती चांगलीच गोंधळली." अरे असं काही नाही रे. मला कशाला बरं वाटेल? मलाही तू सतत माझ्या बरोबर असावस असच वाटतं. 

पण कधी कधी लोकांना आपलं चांगलं बघवत नाही. आपल्या प्रेमाला, अनुरुपतेला, सुखाला दृष्ट लागते काही लोकांची. 

आजच बघ सकाळी माझ्या ऑफिसमधली ती सुलभा होती बसमधे. तिला बसमधे चढतांना पाहिलं आणि लगेच मागे फिरले. माझ्या असं लक्षात आलय की ती जेव्हा जेव्हा आपल्याला जाता येतांना भेटते किंवा बघते तेव्हा तेव्हा आपली भांडणं होतात. 

गेल्या सहा महिन्यांपूर्वी ती इथेच गांधी नगरला रहायला आली आणि तिने तुला पाहिलं माझ्या बरोबर. ऑफिसमधेही ती सगळ्यांना सांगत असते मी किती लकी आहे. मला कसा माझ्यावर प्रेम करणारा, हॅंडसम आणि केअरिंग नवरा मिळाला आहे वगैरे वगैरे."

सौरभला आरतीचे लोकांची नजर लागणे आणि त्यामुळे भांडणे होणे हे विचार ऐकून एकदम हसायलाच यायला लागले.

" अग ए बाई मी हॅंडसम , डॅशिंग , केअरिंग तर आहेच ग. ती सुलभाच काय तर तुझ्या ऑफिसमधले कुणीही हे मान्य करेल. आणि आपला जोडा आहेच तसा एकदम साजेसा. लक्ष्मी नारायणा सारखा. कोणी तसे म्हंटले तर चांगलच आहे की. प्रॉब्लेम काय आहे त्यात? "

" तुला कळत नाहीये मी काय म्हणतेय ते सौरभ. तुच आठव गेल्या सहा महिन्यांत आपली अगदी क्षुल्लक कारणांमुळे सुरु झालेली भांडणं किती विकोपाला जातायत ते. 

मी असं मार्क केलय प्रत्येक भांडणाच्या वेळी कॉमन फॅक्टर ती सुलभाच आहे. 

ती वेळ टळली की नंतर आपल्याला शहाणपणा सुचतो. पण तेव्हा शब्दाने शब्द वाढतोच. मागाहून पश्चाताप होतो. चूका सुधारतो आपण.

तरीही मनावर ओरखडा तर उठतोच ना? त्रास तर होतोच ना दोघांना? म्हणून आज टाळलेच तिला" आरती उसळून म्हणाली.

सौरभला वाटले आज परत एकदा वाजलं तरी चालेल पण आज आरतीचा हा वेडेपणाचा विचार मुळापासून उखडून काढायचाच. 

त्याच्याकरता आपल्या सुशिक्षित, हुशार, कर्तुत्ववान आणि समंजस बायकोचे हे दृष्ट लागणे आणि दुसऱ्यांच्या केवळ विचार करण्याने आपल्यात भांडणे होतात असे वाटणे चिंताजनक होते.

तो म्हणाला " तू जे म्हणतेस त्याचा परत एकदा नीट विचार कर आरती. त्या सुलभाच्या वाटण्यावर तुझी माझी भांडणे किंवा आपले सुख अवलंबुन आहे का? 

अगं आपल्या आयुष्याला आपल्याच विचारांनी घडवत असतो आपण. एकतर तुझे माझे वाईट व्हावे असे कोणी का चिंतेल आणि कोणी दुसऱ्याने कितीही असा विचार केला तरी खरच तसे घडणार आहे का? 

ती आईही तशीच आता तू पण? 

ताईच्या बाळांतपणात तर आईने कहर केला होता. जरा बाळ रडायला लागले की लगेच त्याची दृष्ट काढायची ती. रोज संध्याकाळी तेच. मला आणि ताईला अजिबात पटायचे नाही ते. पण आईचे समाधान आणि त्याचा फारसा कुणाला त्रास नव्हता म्हणून आम्ही दुर्लक्ष केले आईकडे. 

पण आज तूही तेच करते आहेस. आपण टॅक्सीने गेलो सकाळी म्हणून नाही म्हणत मी. पण जरा विचार कर ती जर उद्या तुझ्या कामाला किंवा ऑफिसमधल्या प्रगतीला तुझी सो कॉल्ड नजर लावायला लागली तर तू काय करणार?

तिच्यापासून ऑफिसमध्ये कशी लपणार? की बदली करुन घेणार? अगं अशी नजर नाही लागत ग कधी. हा पण ह्या असल्या विचारांनी विनाकारण अस्वस्थता आणि काही वाईट तर होणार नाही ना अशी सततची भीती मनात घर करते. आणि त्या भीतीपोटी आपणच केलेला विचार सत्यात उतरु शकतो. 

जसे की ही भेटली आता भांडण तर नाही ना होणार? या स्वतःच्याच भांडणाच्या विचारामुळे मात्र खरच भांडण होऊ शकते. 

जी व्यक्ती आपल्याला अतिशय प्रिय असते तिच्या बाबत अथवा आपल्या स्वतःबाबत काही वाईट घडेल का अशी सतत भीती मनात असते आणि तीच भीती आपल्या विचारांना कंट्रोल करते. 

आपल्या ह्या भीतीमुळे, चुकांमुळे घडणाऱ्या घटना घडतात आणि आपण आपल्या चुकांची जबाबदारी न घेता त्यासाठी इतरांना कारणीभुत ठरवतो. आपण तर नाही ना कोणाचे काही वाईट चिंतत? मग झाले तर. आपलही कोण काय दृष्ट लावुन बिघडवणार?

तेव्हा माझे आई काढून टाक हे सगळे मनातून लगेच. कारण तुझा जर अशा दृष्ट वगैरे गोष्टींवरचा विश्वास वाढत गेला तर तुच तुझ्या आनंदाला ग्रहण लावशील. 

खरी मनापासून दिलेली एखादी compliment किंवा तुझे केले गेलेले कौतुक तुझ्यापर्यंत पोचणारच नाही. तू तुला मिळालेले यशही इतरांशी शेअर करायला बिचकशील."

हे सगळे ऐकून आरती विचारात पडली. " बरोबर आहे तुझे. योगायोगाने झाले असेल सगळे. मुद्दाम कोणी करत असेल असे नाही. तरीही नकळत का होइना पण आपल्याला पाहिल्यावर हे किती सुखी कपल आहे किंवा ह्यांच कसं सगळं छान चाललं आहे असे वाटतच असेल तिला. ताईच्या लहान बाळाकडे जर कोणी डोळे भरुन पाहात असेल तर त्या भावनांचा बाळाला त्रास होऊ नये म्हणून आईंना बळाची दृष्ट काढावीशी वाटत असेल." आरतीचे विचारचक्र फिरत होते.

" अगं जेव्हा आपण बाहेर चार लोकांमधे वावरणार तेव्हा अशा संमिश्र भावना तर असणारच की. 

आज तुझा सुंदर ड्रेस आणि त्यात अजुनच खुलणारं तुझे रुप बघुन किती तरी जणींना आपणही हिच्यासारखं का नाही असे वाटले असेलच. 

तू नाही का परवाच तुला खुप आवडली म्हणून तुझ्या मैत्रीणी सारखी सेम टु सेम साडी आणलीस. आपण सामान्य माणसं आहोत कोणी साधुसंत नाही. तेव्हा आपल्याही नकळत आपण कधी तुलना, हेवा करतोच ना. ते तर होणारच. 

त्यामुळेच आपण आपल्या मनाला स्ट्रॉंग करुन इतरांकडून कळत नकळत येणाऱ्या vibes पासून सुरक्षित ठेवायच आणि कोणीतरी बस मधे आहे म्हणून ती बस तर अजिबात सोडायची नाही. " सौरभ हसत हसत म्हणाला.

" Ok ok. पटलं पटलं. सौरभ बाबा की जय !
आता नाही असा विचार करणार. खरच किती लकी आहे मी. 

टॉल, हॅंडसम, केअरिंग आणि मुख्य म्हणजे चांगल्या विचारांचा नवरा आहे माझा ! 

अगदी दृष्ट लागण्यासारखा ........

 नाही नाही फक्त म्हणायची पध्दत म्हणून म्हंटले... dont worry " आरती हसत म्हणाली आणि सौरभला बिलगली.

समाप्त

©️ धनश्री दाबके

📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 टिप्पण्या

  1. छानच! पण मलाही कधी कधी असं वाटतं की एखादी व्यक्ती भेटली आपल्याला त्रास होतो, कधी तब्येत बिघडते तर कधी मूड बदलतो... तशी मी काही अंधश्रद्ध नाही.... पण असं जाणवतं हे खरं

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो.. असेल.. कधीतरी समोरच्याच्या निगेटिव्ह एनर्जीमुळे तसं वाटत असावं.. thank you Vaishali tai..

      हटवा
थोडे नवीन जरा जुने