वारी एक अद्भूत अनुभव भाग १
© नेहा बोरकर
२००३ साली मी मुंबईत शिकायला होते,आईबाबा सातारला. एक दिवस आईचा फोन आला, मी चार दिवस घरी नाहीये, बाबा आहेत...'कुठे जाणार आहेस तू?', मी आईला विचारले....अगं,सातारा ते गोंदवले चालत जाणार आहे, अमूक अमूक लोकं, अशी व्यवस्था आहे,वगैरे सगळं सांगितले तीने.... मी म्हटलं, आई बरी आहेस ना तू? असं कोण चालत जातं? तुला त्रास होईल,बाबा कसे हो म्हणाले ? एक ना दोन.... मी अक्षरशः वेड्यात काढलं आईला..... काय माहिती नाही पण आई ठाम होती तिच्या निर्णयावर... चार दिवसांनी सगळं छान झालं ,फार काही त्रास झाला नाही...असा फोन आला. पुढे माझी परिक्षा झाल्यावर मी सातारला आले. आई सातारा- गोंदवले, सातारा- सज्जनगड, गोंदवले- पंढरपूर अशी दरवर्षीच कुठे तरी पायी जातचं होती.... आता मात्र मी तिच्या या कृतीबद्दल आदर बाळगून होते आणि एकदा आपण पण चालत जाऊन बघुया, इथपत माझ्या मनाची तयारी होत होती.
मध्यंतरीच्या काळात माझं लग्न झालं,मुलगा झाला. काळ पुढे जात होता.... सुदैव असं कि माझ्या सास-यांनी पण अशी पायी वारी केली होती... त्यामुळे घरात वारीच्या काळात पायी जाण्याविषयी चर्चा व्हायची.
२०१३ साली आई ज्यांच्यासोबत चालत जायची ,त्यांच्या पैकी एक काका काकू यावर्षी आळंदी ते पंढरपूर अशी पूर्ण वारी करणार आहेत असं कळलं.
कसं काय माहीत नाही, माझ्या मनाने एकदम उचल खाल्ली कि या वर्षी मी या वारीला जाणार.....
मी चौकशी करून आले... आणि घरात अचानक सांगूनच टाकलं कि मी जाणार वारीला..... आता घरातल्यांनी मला वेड्यात काढलं.... मला सासूबाई नाहीयेत, अहोंना ऑफिस, मुलगा सात वर्षाचा, सासरे ... असं सगळं असताना मी कशी पूर्ण वारी करणार?
अहो तर म्हणाले, एकटीने जायचं नाहीस, मी सुट्टी घेईन, त्यावर्षी आपण जाऊ, यावर्षी सुट्टी मिळणार नाही (त्यांच वर्षी मे महिन्यात माझ्या मुलाची मुंज झाली होती, तेव्हा सुट्या झाल्या होत्या, आणि लगेच जून मध्ये सुट्टी मिळणं अवघड होतं)
मला सगळं कळतं होतं, पण काही केल्या वळत मात्र नव्हतं. मला घरात बसल्या जागी रडायला यायचं,जायला मिळणार नाही याचं. गंमत म्हणजे, घरातलं हे सगळं बोलणं ऐकून माझ्या मुलाने जाहीर करून टाकलं होतं, काही झालं तरी मी वारीला येणार म्हणजे येणारच.....
अहो सुध्दा विरोधात नव्हते, त्यांची पण पायी वारी इच्छा होतीच.... पण व्यवहारीक दृष्ट्या ते कसं करायचं यावर विचार करत होते.... उठलो आणि निघालो एवढं पण सोपं नव्हतं ते.....
माझ्या हट्टापायी त्यांनी सुट्टीची चौकशी केली, मी मुलाच्या शाळेत भेटून त्याच्या बाईंना सांगून आले.
मुलगा दुसरीत होता,सात वर्षाचा, तो कितपत चालेल याची खात्री नव्हती. म्हणून मग अहोंनी पर्याय काढला कि ज्या दिवशी असं वाटेल कि मुलाला त्रास होतोय,त्यादिवशी परत फिरायचं आणि महत्त्वाचे म्हणजे अहो त्यावर्षीची वार्षिक रजा मागितली आणि ती मंजूर होऊन मिळालीपण.... फक्त वारी आळंदी वरून निघून वाल्हे पर्यंत पोहचणार होती.....तिथून वारी सुरू करायचे ठरले....
मी लगेच हो म्हटलं, थोडी तर थोडी पायी वारी तर होईल ....
"देशमुख दिंडी", मधून ते काका काकू जाणार होते. तिथे जाऊन पत्रक घेऊन घरी आले, तयारी सुरू केली... त्या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे सगळे पुरूष पांढरा झब्बा, बंडी,आणि पायजमा ,जेवताना सोवळे, आणि बायका 'सतत', चोवीस तास साडीत .....
यक्ष प्रश्न हा होता की, रोज नेसायच्या साड्याच माझ्याकडे नव्हत्या.... सगळ्या चांगल्या साड्या, रोज ड्रेस घालत असल्याने. मग काय, त्यातल्या त्यात जून्या साड्या शोधल्या आणि काही नवीन आणल्या. तरी सुद्धा आतापर्यंत मी चोवीस तास सलग काही साडीत राहीले नव्हते..... पण या गोष्टीसाठी माघार घेणे मला पटणारे नव्हते,आणि नाहीच घेतली मी..... फक्त चोवीस तास साडी नव्हती, तर संपूर्ण वारीच साडीत करायची होती. अहो आणि मुलगा यांना पण पांढरे कपडे आणले. सोवळं पण लागणार होते, पण मुंजीतील होते. अहोंनी डॉक्टरांकडे जाऊन, जरूरीपुरती औषधे आणली. मी बरोबर खाऊ घ्यायच्या मागे लागले...
पण मग कळलं, खूप काही घेऊ नका.... कारण सामान ट्रक मध्ये जातं. चालताना जास्त जड सामान घेऊन चालू शकत नाही..... मग फक्त मुलाला लगेच देता येईल इतकंच घेतलं........
तो छोटा मुलगा देवळात कसा छत्री घेऊन जातो... पाऊस येईल म्हणून....
तसं का माहिती नाही पण आम्ही आमच्या तिघांचे सगळे दिवस पुरतील एवढे कपडे मात्र घेतले होते.
परत कधी ही यावं लागेल, हे माहिती असूनही.
तयारीच्या काळात वारी निघाली होती.....पुढे पुढे जात होती..... आम्ही निघायच्या तयारीत...... आमच्या बरोबर माझी नणंद पण होती.... वाल्हे मुक्कामी पोचायचे होते संध्याकाळपर्यंत.... अहो त्या दिवशी अर्धवेळ ऑफिस करून आले. नणंदेचे मिस्टर आम्हाला गाडीने सोडायला येणार होते.....मी घरातून निघाल्यापासूनच साडीत होते....
वाल्हे गावात पालखीचा मुक्काम असतो..... विसावा म्हणजे दुपारच्या विश्रांतीसाठी थोडा वेळ पालखी थांबते. आम्ही तिथे त्या काका काकूंना भेटलो. देशमुख दिंडीत हजेरी लावली की आता आम्ही तुमच्या सोबत आहोत.... तेथील दोन देवळांत व्यवस्था होती.. पुरुष आणि स्त्रीयां....पालखी
मुक्कामाच्या गावात आणि बाकी ठिकाणी दिंडीतर्फे रहायची व जेवणाची सोय असते, नाश्ता त्यांच्याकडून नसतो. ती काकू म्हणाली, 'उद्या सकाळी चालायला सुरुवात करताना उन्हासाठीचा जो रुमाल आपण बांधतो, तो घ्यायचा त्याची एक गाठ जो कोणी त्याच्या बरोबर चालेल त्याच्या हातात आणि दुसरी गाठ त्याच्या हाताला', आम्ही म्हटलं, चालणार कसं,नको तसं... पण तीने ऐकूनच घेतलं नाही...तसा रुमाल बांधूनच चालयचं, म्हणाली... खूप गर्दी असते रस्त्यावर ,कधी तो हरवेल कळणार नाही.... हे ऐकल्यावर आम्ही तयार झालो.... ती सुरवातीपासून चालत असल्याने तिचा अनुभव होता....
दुस-या दिवशी तिथल्या सोयीनुसार जे काय आवरायचं ते आवरून मंदारापासून गावाबाहेरच्या मुख्य रस्त्यावर आलो...तसं रस्त्याला नमस्कार करून "माऊली", असं बोलून चालायला सुरुवात केली.... पुढच्या काही मिनिटांतच पुढे मागे असंख्य जनसमुदायाचा आम्ही एक भाग झालो....
पहाटे सहाची वेळ.... पायाखालचा रस्ता खरोखरच दिसत नाही..... पुढचा मागचा कोणताही रस्ता दिसत नाही..... दिसतो फक्त अथांग जनसमुदायच...... तो जनसमुदाय फक्त "माऊली" या नावानेच ओळखला जातो.... 'चला माऊली, चाला माऊली, बाजूला माऊली, म्होरं सरका माऊली, खाऊन घ्या माऊली, असे छोटे मोठे असंख्य माऊली आपल्या सोबत चालत बोलत असतात. खरं तर त्या शब्दांनीच
स्फुरण चढून आपण चालत असतो.
देशमुख दिंडी ही माऊलींच्या पालखीच्या पुढे चौथ्या क्रमांकावर होती. दिंडींचे नंबर ठरलेले असतात. शक्यतो त्याच क्रमातून चालणे अपेक्षित असते...पण प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही. त्याच कारण म्हणजे शंभरच्या वर दिंड्या पालखीच्या मागे पुढे चालत असतात. प्रत्येक दिंडीची स्वतःची उपासना असते. त्या ठराविक वेळी ते करतात... तेव्हा पालखी थांबते.... पालखीच्या
पुढील दिंड्या उपासना झाली की आरतीच्या वेळेला पालखीच्या दिशेने वळून ती म्हणतात. तेव्हा इतर दिंड्याही थांबतात... मग बरेच वेळा पुढील चाल कमी जास्त होते.... त्यामुळे बरेच जण आपापल्या चालीने चालतात.आम्हीही तेच केलं होतं. अपवाद फक्त तरडगावला उभे रिंगण होतं त्यावेळी आम्ही दिंडीसोबत चाललो.... लोणंदहून निघताना पालखीच्या बरोबरीने चालत गेलो. मध्ये हरिपाठ म्हटला, आरतीला माऊलींकडे तोंड करून उभे राहीलो.... तिथल्या पुढच्या रस्त्यावर पालखीपुढील दिंड्या एका बाजूला थांबतात. माऊलींचा अश्व जो आळंदीपासून बरोबर असतो तो उभ्या रिंगणात समोरुन धावत येतो... पालखीला प्रदक्षिणा घालतो... नमस्कारासाठी वाकतो .... असं म्हणतात कि माऊलीनी परवानगी दिली तो परत फिरतो..... अत्यंत प्रेक्षणीय सोहळा आम्ही बघितला.....
रस्ताच्या दुतर्फा प्रचंड जनसमुदाय आणि माऊलींचा प्रत्येकाच्या मनात चालणारा जयघोष..... तो अश्व परत गेला कि त्या मार्गाची धुळ आपल्या कपाळी लावायला गर्दी होते.
तो एक विलक्षण अनुभव मिळाला. उभे रिंगण तरडगावला होतं. तरडगावला मुक्काम एका तिथल्या प्राथमिक शाळेत होता. ज्या गावात शाळा उपलब्ध व्हायच्या तिथे दिंडीतर्फे तिथे रहायची सोय असते. बेंच बाहेर काढून ठेवलेले असतात... तिथे जिथे कुठे जागा मिळेल तिथे आपलं बरोबर घेतलेले "इरलं", घ्यायचं आणि आपली पथारी पसरायची. खरं तर पाय पूर्ण पसरायला पण जागा नसते. खाली पायाजवळ आपलीच ट्रकमधील वळकटी ठेवलेली असते. जेमतेम कुशीवर झोपता येईल तेवढीच जागा ....
त्या त्या वर्गातील दिवा रात्रभर चालूच असतो. ओडोमॉसची ट्यूब अंगाला फासायची आणि झोपेची आराधना करायची ... पहाटे अडीच तीन पासून बायका बाहेर टॅंकरवर आंघोळ करायला, कपडे धुवायला गर्दी करायच्या. थंडी, पाऊस याला न जुमानता. आम्ही रोजचे कपडे बदलून हातपाय धुवून चालायचो.गंमत म्हणजे तिथेही बायका कचाकचा भांडायच्या. परत वर्गात येऊन स्वतः बरोबर घेऊन आलेल्या देवांची पूजा करायच्या, स्तोत्र म्हणायच्या,अगदी उदबत्तीपण लावायच्या. एकदा तर एक काकू डोक्यावर कापड ठेवून समोर पार निरांजन लावून बसल्या होत्या. काही गोष्टी अजूनही डोळ्यांसमोरून जात नाहीत...
आम्ही चालताना मुलाला आणि स्वतःला रुमाल बांधूनच चालायचो. वारीत एका बाजूला सतत ट्रक, टेम्पो हळूहळू चालत असतात. अचानक आम्ही चालत असताना एका टेम्पो का ट्रक मधील माणसं आमच्याकडे बघून बोलायला लागले...पेपरला फोटो आलेले लोक ,फोटो आलेले लोक....आम्हाला काही कळेचना ... विसाव्याच्या ठिकाणी आल्यावर कळले की वर्तमानपत्रात फोटो आलाय....
खाली दिलेला फोटो "तोच" आहे
फलटणला एक दिवस जास्त मुक्काम होता. मुक्काम कमी जास्त तिथीनुसार होतात. त्या दिवशी पाऊस सुरू होता. दुस-या दिवशी पहाटे निघालो तेव्हा खूप पाऊस होता. इरलं डोक्यावर ठेवून, साडी वर खोचून,मुलाचा हात धरून, तो रुमाल हे सगळं धरून चालायचं होतं.... गावातल्या छोट्या रस्त्यावर तिथल्याच अंगभुत चिखलाचे वर्चस्व होते. म्हणजे पाय पूर्णपणे रुतलेलेच होते. एकमेकांना धरून चालूया, म्हणजे पडणार नाही असं वाटून चालू लागलो..पण लक्षात आलं की पडलो तर सगळेच पडू. खाली बघायचं का पुढे याचा विचार करायला पण जमत नव्हते कारण संततधार पाऊस, एका पावलानंतर दुसरे ... एवढंच. आजूबाजूची लोकं कशाचीही पर्वा न करता चालत होती. आता परीक्षेची काठिण्य पातळी वाढू लागली होती.... थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी चहा बिस्किटे घेतली. खरं तर रोज नाश्ता असा वाटेतच करावा लागतो. दिंडी तर्फे फक्त जेवण आणि दोन वेळा चहा असतो. पहाटे चालायला सुरुवात करत असल्याने सकाळी सात साडेलाच भुक लागायची. पहिले काही दिवस जवळचे पदार्थ खात होतो, नंतर ते पण संपले, तिथं तात्पुरती उभारलेल्या टप-यांवर खायला भिती वाटायची. चहा कॉफी गरम असते म्हणून घ्यायचो. आमच्या बरोबर चालणा-या दिंडीतील बाकिच्याकडून कळले की "जयभवानी",नावाचा टेम्पो असेल तिथं खायला घेतलं तरी चालेल, पालखी मुक्कामी थांबली की जयभवानी वाला पुढे निघायचा, कोणीतरी सांगितले की हा दरवर्षी वारीत जवळपास कितीतरी लाखात व्यवसाय करतो. ती छोटी मुले गंध बुक्का लावणारी असतात तीच एक लाख रुपये कमवतात म्हणे. तर मी सांगत होते ते नाश्ता.. रोज तेलकट खाणं तर शक्यच नव्हते मग आम्ही अगदी सकाळी सात वाजता भेळभत्ता खायचो. एखादा लाडू असला तर तो, आमच्या बरोबरीच्या काकूने बेसनाचे लाडू घेतले होते, पण आधीच्या दिवसात खूप ऊन असल्याने त्याचे डब्यातच गोड पिठलं झालं होतं. वाटेत मग राजगिरा चिक्की, भेळभत्ता असे कोरडे पदार्थ मिळायचे ते खायचो. जेवण दोन्ही वेळेला चांगलं असायचं. पण जे कुठल्या दिंडीतून चालत नाहीत, किंवा त्यांच्या दिंडीत ही सोय नसते त्यांच्यासाठी त्या त्या गावात सोय तिथले गावातले लोक करतात. आपण चालताना अचानक मागून एखादा जथ्था 'धरबारी धरबारी' करत धावायला लागतो. आपल्याला कळतंच नाही,ते काय म्हणतात आणि कुठे काय झालं म्हणून धावतात. "रांग पकडा", असा त्याचा अर्थ..धर म्हणजे पकड, बारी म्हणजे रांग .
क्रमशः.......
© नेहा बोरकर
सदर स्वानुभवाचे वर्णन करणारा लेख लेखिका नेहा बोरकर यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

