वारी एक अद्भूत अनुभव भाग २

 वारी एक अद्भूत अनुभव भाग २

© नेहा बोरकर 




या सगळ्यात काही वेळा अन्नाची नासाडी देखील होते. बरेच जण ट्रकचा आडोसा करून स्वंयपाक रस्त्यावर करायचे. एखादी रसभाजी उकळत ठेवतात, पोळ्या   'मोठ्या' म्हणजे हा शब्द लाजेल एवढ्या मोठ्या. असं रोज करत ते चालायचे. जेवायला बसले आहेत आणि पाऊस आला तर त्यांना त्याचं काही न वाटता तसेच थोडं वाटलं तर आडोसा घेऊन खायचे. बरेच ठिकाणी जेवणाची सोय असते. अशा वारक-यांकडे सामान जास्त  नसायचेच, वाटेत उभ्या असलेल्या टॅंकर मधून पाणी प्यायचे ,मिळालं जेवायला तर जेवायचं नाहीतर पुढे चालत रहायचं. असा पेपर आम्ही साधा वाचायचेही कष्ट घेतले नव्हते. बरड म्हणून गाव आहे, तिथे मुक्काम होता, तिथल्या शाळेचे थोडेच वर्ग होते त्यामुळे जागा कमी होती. हाजिर तो वजिर या न्यायाने जागा, ते गाव चोरी साठी प्रसिद्ध आहे. म्हणजे हमखास त्या गावी वारीत चोरी होतेच. आम्ही वर्गात होतो, काही जणी त्यांच्या चालीने वेळाने पोहोचल्या. जे दरवर्षी या दिंडीतून जातात त्या बायकांनी सांगितले कि तुम्ही तुमचं सामान आत वर्गात ठेवा,बाहेर झोपलात तरी चालेल. पण काही कारणाने म्हणा किंवा काय त्यांनी सामान त्यांच्या जवळच ठेवलं. मध्यरात्री दोन वाजता मोठ्याने कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला, आम्ही जागे झालो तर बाहेर झोपलेल्या एका बाईची बॅग घेऊन एक जण पळून चालला होता, त्याच्या मागे ती बाई,तिला धरायला तिच्या बरोबरीच्या बायका, भयंकर असा आरडाओरडा चालू झाला. जिची बॅग गेली ती बाई मोठ्याने रडत ओरडत परत आली. पुढे अर्धा तास उलटसुलट चर्चा, पैसे असलेली पर्स तिने गळ्यातून तिरकी अशी घातली होती,त्यामुळे पैसे वाचले, असं कळलं.मग ती का धावली ते कळलं नाही ? पुढचे सगळे दिवस ती अंगावर असलेल्या एकाच साडीत होती,हे आठवतंय. यावरून अजून एक आठवलं म्हणजे  आम्हीपण घरून मौल्यवान काही घेऊन गेलो नव्हतो, फक्त एक मोबाईल तो पण साधा होता.दिवसभर बंद करूनच ठेवायचो. कारण चार्जिंग संपलं तर फोन चार्जिंग करायची सारखी सोय नव्हती. मुक्कामाच्या ठिकाणी शाळेत लाईट असले, पाॅईंट  असला तरी इतर जण ही तिथे असायचे आपला नंबर कधी लागणार म्हणून. दोन दिवसांत एकच फोन करायचो ,ज्याला करायचो तो मग आमच्या जवळच्यांना खुशाली कळवायचे. काही ठिकाणी कॉईनबॉक्स फोन मिळाला तर मात्र करून घ्यायचो. आमच्या बरोबर मुलगा चालत असल्याने एकदा मला ओरडाही मिळाला, एक बाई म्हणाली, ' काय गं, लेकराला चालवतेस ? बालकृष्णाला कोणी चालवतो होयं गं?', पण खरंच आम्ही एकदाही त्याला उचलून घेऊन चाललो नाही, हे तेवढंच खरं. त्याचं पुण्यबळ जास्त होतं असं मला वाटतं.... ऊनपावसाचा खेळ सतत चालू असतो. देशमुख दिंडी तील पुरूष स्वतः स्वयंपाक करायचे ,आणि वाढायचे  पण . चालणा-यापैकी काही जण वाढायला जायचे. अहो जायचे ते बघून मुलगाही मागे लागायचा, मग ह्यांच्या हातात ते भांडं, वाढणारा तो... मीठ, चटणी कधी पाणी .तो एकटाच लहान होता, चालायला मात्र कंटाळला नाही, आम्ही घरी फोन केला कि घरचे त्याच्या बद्दलच विचारायचे. वाटेतल्या  फिरत्या खेळणीवाल्याकडून काहीबाही खेळणी घ्यायचो ती पण मुक्कामी पोहोचल्यावर खेळायला. एकदा आत्याबरोबर तो चालत होता (माझी नणंद जी आमच्यासोबत होती) पाणी प्यायला थांबलो ,त्यात जरा मागे पुढे झालो तर ते दोघेही अचानक दिसेनासे झाले.... बरं सगळे एकाच दिशेने चालतात, त्यामुळे त्या दोघांना मागे येता येतच नव्हते... धाबे दणाणणे, तोंडचे पाणी पळणे, या अर्थाचे वाक्प्रचार  सगळंच एकत्रित अनुभवले. माऊलींचे नाव घेत पुढे गेलो ,ते दोघेही एका कडेला थांबले होते. चालताना एक जाणीव मात्र सतत जागृत असते... ती म्हणजे आपण माऊलींसोबत चालतोय....ते आहेत आपल्याबरोबर...खरेखुरे अगदी.... फार छान भावना असते ती. "ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम" याच्या जयघोषात आपली पावलं  अंतर पार करत असतात.... कधी गिरक्या घेत, कधी नाचत, कधी धावत  .... भजनं म्हणत.... रात्री उशिरापर्यंत ते पहाटे जाग आल्यावर कधीही दूरवरुन एक मंद असा जयघोष ऐकू येत असतो, तो विसरता येत नाही आणि विसरायची इच्छाही नाही... अविस्मरणीय, अद्भूत आणि शब्दातीत अनुभव आहे तो.  सदाशिवनगरला पहिलं  गोल रिंगण असतं.. रिंगण बघायचं असेल तर दिंडीतून जाऊनच बघता येते ,कारण आजूबाजूच्या गावातील अधिक पायी चालणारे अशी कितीतरी लाख माणसं तिथे जमतात. मुलगा लहान असल्याने आम्ही ते रिंगण बघायला गेलो नाही. पुढे गेलो कि तोंडलं - बोंडलं ही दोन गावं लागतात. या दोन गावांच्या मध्ये नदी आहे. त्यावर्षी नदीला पाणी होतं, रिंगणात  माऊलीवर खुप धुळ उडते,म्हणून या दोन गावामधील नदीच्या पाण्यात खेळायला आणतात. छोट्या पालखीतून पुढच्या वेशीपर्यंत नेतात, तेव्हा गावाच्या वेशीवरुन फुलांचा वर्षाव करतात. तिथेच सोपानदेवांची पालखी माऊलींच्या पालखीला येऊन मिळते. एवढ्या दिवसांत दिंडीतील इतर काही जण ओळखीचे झाले होते...त्यातल्याच एकांनी मुलाला तिथल्या पाण्यात नेऊन आणले, कृष्ण बरोबर चालतोय या भावनेतून.  बरेच वेळा पाऊस असल्याने पाय कायम चिखलाने माखलेले असायचे. मुलगा सारखा चिखल चिखल करायचा, आम्ही जिथे पाणी मिळेल तिथे धुवायचो, पण एकदा मी त्याला म्हटलं, चाल आता एवढं काही नाही,टॅंकरच पाणी लोक पितात, कसं कोण जाणे शेजारी चालणा-या एका आज्जीने ते ऐकलं,म्हणाली, 'ए पोरा, ये इकडे ,मी धुवून देते,' आम्ही नको म्हणे पर्यंत त्यांनी त्याचे पाय स्वच्छ करून दिले.अगं, पोरी ,असुदे माझ्या नातवाचे नसते का धुतले? तेवढं करून त्या आजी सहज बाजूला झाल्या. आता मात्र पंढरपूरचे वेध लागतात, एक टप्पा काही म्हणजे काही केल्या संपत नव्हता. मधला जवळपास एक तास मुसळधार पाऊस पडत होता एवढा कि आम्ही चालूच शकलो नाही. रस्ताच्याकडेला असलेल्या खाऊ विक्रेत्यांच्या ताडपत्रीखाली जमेल तसं कोरडं रहायच्या प्रयत्नात, एकमेकांना हाका मारून आहात ना हे बघत ऊभे होतो.  चालायला सुरुवात केली तेव्हा शरीरधर्म वाटे वर सांभाळायची जरा लाज वाटायची,आडोसा तरी किती ठिकाणी असणार, पण मग हळूहळू ते अंगवळणी पाडून घेतलं कारण दुसरा पर्यायच नव्हता. ऊन,भिजलेले कपडे, थंडीवारा यातून आजारपण पण अनुभवले. माझ्या नणंदेला ताप भरला होता, माझं डोकं एक दिवस इतकं प्रचंड दुखले, कि सांगू शकत नाही. जवळची औषधे घेतली, दुपारची वेळ होती म्हणून थोडं थांबायचं बघत होतो तर एका घरात येतील त्या वारक-यांना बसायची,आडवं पडायचं असेल तर तसं म्हणून परवानगी होती. आम्ही तिथेच बसलो ,प्रत्येक वेळी दुस-याला पैशानेच मदत,करता येते असं नाही, मनाचा मोठेपणाही पुरेसा असतो. वारीत सतत एक मोबाईल ॲब्यूलन्स फिरत असते.डॉक्टर ,औषधपाण्याची सोय असते. एरव्ही आजारपणात आपण विश्रांती घेऊन पुढची कामं करतो ,पण वारीत ते शक्य होत नाही. चाल मंदावते, विसावा लांबतो पण आपण पुढच्या मुक्कामी पोहोचतोच. कारण आपलं ध्येय पांडुरंग असतो. दैनंदिन जीवनात सुद्धा पांडुरंग हे अंतिम ध्येय ठेवलं तर मानापमान, यशापयश, रागलोभ यासारख्या अनेक आजारपणातून आपण नक्कीच बाहेर पडू शकतो, नाही का? वाखरीच्या आधी भंडीशेगाव येते, तिथून कळस दिसतो अशा भावनेने सगळे वारकरी मोठ्या आनंदाने धावत सुटतात. आम्हीही धावलो.अगदी माऊलींची पालखीसुद्धा धावत पार करतात. फुगड्या घातल्या, माऊलींचा गजर करत मोठा जल्लोष केला. तिथेच पुढे तुकाराम महाराजांची पालखी  माऊलींच्या पालखीला येऊन मिळते. इतर अन्य संतांच्या पालख्याही येऊन मिळतात. वाखरीतच परत एक प्रचंड मोठे रिंगण होते. तिथेही आमचे धाडस कमी पडले. ते रिंगण बघायला गेलो नाही. रिंगणाच्या बाहेरच इतकी गर्दी होती कि रिंगणापर्यंत पोहोचणं अवघड असते. पण जीवाची पर्वा न करता वारकरी मोठ्या आनंदाने धावत सुटतात आणि रिंगणात सहभागी होतात. रिंगण हा एक मोठा सोहळाच असतो. वाखरी नंतर पंढरपूर... अशा वेळी आपल्याला आपल्याच मनातील मिश्र भावनांचा सामना करावा लागतो. पांडुरंगाचे दर्शन, वारी संपत आल्याची हुरहुर, घरची आठवण सगळं दाटून येते. वखारीची वेस ओलांडताना 'पंढरपूर' असा मैलाचा दगड दिसतो, आपसुक तिथेच आपल्याकडून नमस्कार केला जातो. आता चालणा-यांची गर्दी पांगते. आम्ही चालत असताना एका बाईने माझ्या मुलाला नमस्कार केला आणि म्हणाली छोटा विठोबाच चालतोय कि तुमच्यासंग...त्याच्या चेह-यावरून हात फिरवून बोटं मोडली दृष्ट काढल्यासारखी. नवमीला आम्ही पंढरपूरात दाखल झालो. आतामात्र देऊळ यायला खूपच वेळ लागतोय असं वाटायला लागतं. शेगावहून श्रीगजानन महाराजांच्या पालखीचेही आगमन नवमीला होतं. देवळाजवळ पोहोचलो तर आत जाण्यासाठी प्रचंड मोठी रांग होती. इथे परत एकदा सहनशक्ती लटकी पडते. आम्ही मुखदर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. इतर वारकरी लागेल तितका वेळ थांबून पांडुरंगाच्या गाभा-यापर्यंत जातातच. असो पण मुखदर्शन घेताना मात्र कधी डोळे पाणावतात, अश्रू कोणालाही न जुमानता डोळ्यांतून वाहू लागतात हे सांगताही येत नाही. खरं तर 'तो', आपल्या बरोबरच चालत असतो ,पावसात भिजल्यावर तिथेच चहा घेऊन उभा असतो, शेजारुन चालणारे गृहस्थ अत्यंत उच्चशिक्षित आहेत हे कळतं तेव्हा आपल्या अहंकाराला हलकेच सुई टोचणारा, आजारपणात बळ देणारा, पायातील शक्ती टिकवून ठेवणारा, म्हणाल त्या रूपात तो आपल्याला भरभरून दर्शन देतच असतो, अगदी बाहेरच्या रांगेतसुद्धा तोच उभा असतो... रूढार्थाने दर्शनानंतर वारी तिथे संपते. आम्ही नवमीलाच तिथून परत फिरलो. इतके दिवस सततच्या वारा पाऊस ऊन्हाने मुळचा रंग जाऊन आहे त्यापेक्षा अधिक गडद रंग आपला होतो, विठोबा त्याच्यासारखं आपल्याला करू बघतो, पण विठोबाचा निर्मळ  रंग आपल्याला आपल्या अंतरंगात कायम ठेवता आला तर किती छान  होईल ना...  यावर्षी वारी नव्हती, त्यामुळे हा लेखनाचा प्रपंच केला...

समाप्त..

सदर स्वानुभवाचे वर्णन करणारा लेख लेखिका नेहा बोरकर यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...


अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने