© वर्षा पाचारणे
शी शू ने भरलेल्या गोधडीला धुताना नेहा भूतकाळातील आठवणीत रमली होती.... तिला अंगात थोडी कणकण जाणवत होती.
माहेरचे म्हणावे असे कुणीही राहिले नव्हते.
घरभर खेळण्यांचा पसारा, कुठे राघवच्या कपड्यांचा ढीग, तर कधी त्याची विनाकारण चाललेली आदळ आपट बघून त्याच्यावर चिडावं का त्याला उराशी कवटाळून मातृत्व म्हणजे काय, ते हजारदा अनुभवावं, असं तिला वाटून गेलं आणि नकळत आठवणींचा पट डोळ्यासमोरून सरकत गेला.
घरच्यांच्या विरोधात जाऊन नेहा आणि निलेशचं लग्न झालं. नेहाच्या आई-वडिलांना तिच्यासाठी एकुलता एक शिकलेला मुलगा जावई म्हणून हवा होता. जावयाने घरजावई बनून राहावं, ही त्यांची पहिली अट होती. त्यामुळे नेहासाठी तश्याच मुलाच्या शोधात ते होते.
घरच्यांच्या विरोधात जाऊन नेहा आणि निलेशचं लग्न झालं. नेहाच्या आई-वडिलांना तिच्यासाठी एकुलता एक शिकलेला मुलगा जावई म्हणून हवा होता. जावयाने घरजावई बनून राहावं, ही त्यांची पहिली अट होती. त्यामुळे नेहासाठी तश्याच मुलाच्या शोधात ते होते.
परंतु नेहा मात्र कॉलेजमध्ये असताना निलेशच्या प्रेमात पडली आणि त्याचवेळी त्याला प्रपोज करून मोकळी झाली. खरंतर एखाद्या मुलाने प्रपोज केल्यानंतर, मुली होकार देण्यासाठी खूप वेळ लावतात परंतु इथे उलटच होतं.
नेहाने निलेशला प्रपोज केल्यानंतर निलेशचे काहीच उत्तर येईना.
शेवटी वैतागून नेहाने त्याला विचारले ,"निलेश, खरं सांग, तुला मी आवडत नसेल तर मी तुझ्या उगाचच मागे लागणार नाही"
त्यावर निलेश तिला म्हणाला "हे बघ, मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करेल, परंतु मी फक्त शिक्षणासाठी इथे शहरात राहतो. शिक्षण पूर्ण झालं की मी पुन्हा गावी जाऊन माझी शेती करणार आहे. एक डिग्री हातात असावी म्हणून मला शिक्षण घ्यायचं आहे आणि लहानपणापासून शिकण्याची जिद्द आहे म्हणूनच मी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी अग्रिकल्चर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. त्यामुळे तुझ्या माझ्याकडून जरी बर्याच अपेक्षा असल्या तरीही भविष्यात मी त्या पूर्ण करू शकणार नाही.
कारण जशी आपली मैत्री झाली तसं तुझ्या बोलण्यातून मला जाणवते की, तुझ्या घरच्यांना तुझ्यासाठी एकुलता एक, शिकलेला, शहरात राहणारा, चांगल्या नोकरीला असलेला मुलगा हवा आहे.
यामध्ये माझ्याकडे फक्त शिक्षण आहे परंतु घरजावई होण्याची अट मला कधीच मान्य नसेल. कारण आजवर माझ्यासाठी आईवडिलांनी खूप कष्ट सोसले आहेत आणि म्हणूनच मला शेती करू त्यातच नाव कमवायचं आहे"...
त्याच्या या बोलण्यावर नेहा हसली आणि म्हणाली ,"अरेच्चा! एवढंच ना"... "अरे मग मी येईल तुझ्याबरोबर गावी राहायला कायमची... पण तुझं माझ्यावर प्रेम तर आहे ना?"
त्यावर निलेश हसला आणि म्हणाला "अगं वेडे, तुझ्यासारख्या सुंदर, समजूतदार, शिकलेल्या मुलीबरोबर लग्न करायला कुठला वेडा नकार देईल"..
इकडे संध्याकाळी घरी आल्यावर नेहाने आपल्या प्रेमाचा बॉम्ब आई वडिलांसमोर फोडला.
इकडे संध्याकाळी घरी आल्यावर नेहाने आपल्या प्रेमाचा बॉम्ब आई वडिलांसमोर फोडला.
त्याबरोबर आई-वडील दोघेही काळजीत पडले. 'एक तर घरजावई झाला नाही तरी ठीक आहे, परंतु त्यांना शहरात राहणाराच मुलगा जावई म्हणून हवा होता. एकुलत्या एक लेकीला लांब जाऊ नये म्हणून त्यांच्या मनात विचारांची चलबिचल होत होती... आणि शेवटी पालक म्हणून त्यांनी तिच्यावर सिनेमातल्या सारखी बंधनं घालायला सुरुवात केली.
'नेहा तुला आमचं ऐकावंच लागेल', म्हणत निलेशला विसरून जाण्याची धमकी दिली. परंतु नेहादेखील हट्टाला पेटली.
तिने खाणं-पिणं सोडलं, एकटीच कुठेतरी तंद्री लावून बसलेली असायची. नेहा काही केल्या तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती.
शेवटी नेहाच्या आईने तिला निक्षून सांगितले," हे बघ, तुला निलेश किंवा आम्ही दोघं यापैकी एकंच काहीतरी निवडावं लागेल'... 'जर निलेशबरोबर लग्न करून सुखी होशील असं तुला वाटत असेल, तर तू आई-बाबांना कायमचे विसरून जायचे'.
नेहा हमसून हमसून रडली... पण तिला वाटलं, 'आई बाबा काय, आज रागावतील आणि उद्या पुन्हा आपल्या प्रेमापोटी आपल्याशी पूर्वीसारखे नातेसंबंध ठेवतील'. त्यामुळे तिने निलेशबरोबर लग्न करण्याचा पर्याय निवडला. तिने आणि निलेशने लग्नाबाबत निलेशच्या आई-वडिलांशी बोलणी केली.
शेतकरी असलेले निलेशचे आई बाबा नेहाच्या घरच्यांशी बोलून लग्न लावू पाहत होते.. परंतु आता मात्र तिच्या आई-वडिलांनी निलेश काय पण त्याच्याशी निगडीत कुठलीही गोष्ट ऐकूनच घ्यायची नाही, ही खूणगाठ बांधली होती आणि शेवटी एक दिवस अंगावरच्या कपड्यानिशी नेहा निलेश बरोबर पळून गेली.
गावभर बातमी पसरली. लोक नेहाच्या आई-बाबांना येता जाता टोमणे मारु लागले.
त्यामुळे आधीच रागाची आग पेटलेली असताना, लेक पळून गेल्याची नाचक्की सहन न झाल्याने नेहाचे आई-बाबा ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक झाले...
तिकडे नेहा आणि निलेशचा नवीन संसार सुरू झाला. नुकतीच डिग्री हातात आलेली असताना, आता निलेश शेतीच्या मार्गाकडे वळला होता.
तिकडे नेहा आणि निलेशचा नवीन संसार सुरू झाला. नुकतीच डिग्री हातात आलेली असताना, आता निलेश शेतीच्या मार्गाकडे वळला होता.
त्याचा दिवस शेतात काम करण्यात जायचा. सुरुवातीचे काही दिवस नवीन सुनेला घरातली प्रत्येक गोष्ट दाखवून देण्यासाठी निलेशची आई घरात थांबायची.
परंतु पूर्वीपासून दिवस दिवस शेतात काम करण्याची सवय असल्याने तिने नेहाला सांगितले "हे बघ, मला दिवसभर शेतात काम करायला लागतं.. तू आपली दिवसभर घरात काय वाटेल ते करत बस किंवा आमच्याबरोबर नुसती शेतात येऊन बसलीस तरी काही हरकत नाही". त्यावर नेहाला खूप छान वाटले.
'अगदी टीव्हीत दाखवतात तसे आपणही निलेशसाठी रोज छान पैकी भाजी भाकरी घेऊन जाऊ' म्हणून ती शेतात जाऊ लागली. पण काही दिवसातच तिला या गोष्टीचा कंटाळा येऊ लागला. सासूने दिलेले पैंजण, बांगड्या याचं आकर्षण तर संपलंच, परंतु त्या सगळ्या तिला संसारतल्या बेड्या वाटू लागल्या...
"सासू सासरे आणि निलेश तिघंही शेतात जाणार, मग मी दिवसभर घरातील काम करत बसून माझ्या शिक्षणाचं नुकसान का करून घेऊ?" असा विचार तिच्या मनात वारंवार येऊ लागला.
लग्नाला जेमतेम पाच महिने झालेले असताना नेहा प्रेग्नंट असल्याची बातमी कळाली.
लग्नाला जेमतेम पाच महिने झालेले असताना नेहा प्रेग्नंट असल्याची बातमी कळाली.
घरी खूप आनंद झाला. अशावेळी ही बातमी सगळ्यात पहिले आईला सांगावे म्हणून नेहाने आज लग्नानंतर पहिल्यांदाच आई बाबांना फोन केला.
परंतु दोघांचेही फोन नंबर उपलब्ध नाहीत म्हणून सांगण्यात आले... नेहाचा जीव कासावीस झाला.
नेहाची सासू तिचं सारं काही खूप हौसेने करत होती. एकुलत्या एक सून, त्यात तिला माहेरच्यांनीहि दूर लोटले म्हणून निलेशची आई अगदी पोटच्या लेकीप्रमाणे तिचे सारे लाड पुरवत होती.
आणि अशातच सारखा आई-वडिलांचा विचार, घरातली कामं आणि त्यावरून सतत चिडचिड करणारी नेहा या साऱ्याचा परिणाम तिच्या पोटातल्या बाळावर झाला.
नेहाचा बाळ म्हणजेच राघव तीन चार महिन्याचा झाला तरी त्याच्यात इतर बाळांप्रमाणे काही हालचाली किंवा प्रगती दिसत नव्हती. त्यामुळे एक दिवस डॉक्टरकडे नेल्यावर बाळाला व्यंग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
'अशा मुलाला वाढवताना आपल्या आयुष्याची फरफट होणार', हा विचार मनात थैमान घालत असतानाच एकीकडे नेहाचं मन आपल्या लेकरासाठी तुटत होतं.
'अशा मुलाला वाढवताना आपल्या आयुष्याची फरफट होणार', हा विचार मनात थैमान घालत असतानाच एकीकडे नेहाचं मन आपल्या लेकरासाठी तुटत होतं.
शेवटी आईचं काळीज ते!
आता ही संसाराची बेडी आणि आपलं मूल अगदी हिमतीने आणि जिद्दीने सावरून दाखवायची, हा विचार करून नेहाने मनाशी निश्चय केला.
राघव जसा जसा मोठा होऊ लागला तसं आपल्या मुलांला इतर मुलांबरोबर खेळता येत नाही, त्याला ऐकू येत नाही, त्याला बोलता येत नाही या गोष्टी बघून नेहाचा जीव कासावीस व्हायचा.
एक दिवस नेहा आणि निलेशचे अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. परंतु नेहाने मात्र निलेशला खूप काही ऐकवले.
राघवचं सारं काही करण्यात थकून गेलेली नेहा कदाचित तो राग आपल्यावर काढत असेल, म्हणून निलेश शांत बसून राहिला.
परंतु नेहा मात्र त्याला रागाने म्हणाली,"तुला असंच शांत बसायचं असेल, तर मीच कुठेतरी जाऊन जीव देते.... नाहीतरी तुझ्याबरोबर लग्न करून मला काय सुख मिळालंय आजवर?... मी तुझ्या प्रेमासाठी आई बाबा गमावले.... करियर सोडलं आणि आता या अश्या अपंग मुलाचा सांभाळ करत अख्खं आयुष्य उध्वस्त करून घेतलंय".
तिच्या प्रत्येक शब्दाने निलेशच्या काळजाला घर पडत होती.. पण आजही त्याने नेहमीसारखा संयमाचा रस्ता निवडला आणि त्याला त्याची चूक मान्य आहे असं नेहमीप्रमाणे नेहाने तर्क वितर्क लावला.
'आपले आई बाबा बरोबर सांगत होते, मीच चूक केली'... असे म्हणून नेहा तिच्या आणि निलेशच्या लग्नाला चुकीचं ठरवत होती.
'आपले आई बाबा बरोबर सांगत होते, मीच चूक केली'... असे म्हणून नेहा तिच्या आणि निलेशच्या लग्नाला चुकीचं ठरवत होती.
'मी मूर्खपणा केला आणि प्रेमात पडले, मी वेडी होते म्हणून तुझ्या नादी लागून येथे गावात अडकून पडले', म्हणत त्याला खूप सुनावत होती.
निलेशला मनातून अतिशय वाईट वाटलं... दुसऱ्या दिवशी नेमकाच राघव तापाने फणफणला... पण मग निलेशने घाईघाईने त्याला दवाखान्यात नेले. दिवसभर शेतातली कामं, त्यातून मधून घरी येऊन राघव बरा आहे की नाही? हे बघून जाणं, पुन्हा रात्रभर राघवने झोपेत लघवीने भिजवलेले कपडे बदलणे, हे सारं करण्यात निलेश आजारी पडला.
त्याला असं निपचित पडलेलं पाहून आता मात्र नेहा रडवेली झाली.
नेहा निलेश आणि राघव लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागली... "देवा मी चुकले... मी एवढी बडबड करूनही निलेशने आजवर मला एका शब्दाने बरे-वाईट सुनावले नाही.... त्याने भांडण वाढू नये यासाठी कायम प्रयत्न केले... परंतु मी मात्र त्याच्या शांतपणाचा फायदा घेत कायम त्यालाच दोष देत राहिले"... असं म्हणत नेहा ढसाढसा रडली.
तापाने फणफणलेला राघव आणि मलूल पडलेला निलेश यांच्या सुकलेल्या चेहऱ्याकडे पाहून नेहाच्या धीर सुटला. एका कोपऱ्यात हमसून हमसून रडत ती मनातल्या मनात विचार करत होती.. 'कालपर्यंत जी अवजड बेडी वाटत होती तीच आज मला हवीहवीशी आहे'.... 'इतरांच्या मुलांबरोबर तुलना करत माझ्या नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा मी एका विशेष मुलाची आई आहे, याचा मला अभिमान हवा'
'राघवला सामान्य मुलांप्रमाणे जगता यावे यासाठी आजपासून मी जिवाचं रान करेल, परंतु माझ्या मुलाला कधीही मी स्वतः कमी लेखणार नाही.. कारण जर घरच्यांनी साथ दिली नाही, तर बाहेरच्या जगात जिद्दीने, आत्मविश्वासाने वावरण्याची संधीच राघवला मिळणार नाही '.
त्या दिवसापासून राघवला डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेऊन विशेष मुलांच्या शाळेत ऍडमिशन घेतली. आपल्या मुलाप्रमाणे अनेक चिमुरडे तिथे चांगल्या पद्धतीने शिकत आहेत, स्वतःला सिद्ध करत आहेत, हे बघताना तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.
शाळेतील बाई आज राघवने बनवलेले एक ग्रीटिंग कार्ड नेहाच्या हातात देत म्हणाल्या ,'हे पहा, याच्या आतला मजकूर जरी मी लिहिला असला, तरी हे कार्ड त्याने स्वत:च्या हाताने तुमच्यासाठी बनवले आहे... आणि ते बनवताना त्याने हातवारे करत तुम्ही दिवसभर त्याच्यासाठी किती कष्ट घेता, हे सांगताना त्याने यावर अश्रूंचा वर्षाव केला आहे'.
बाईंचे बोलणे ऐकून आपल्या मुलात काही कमतरता नाही, तर त्याच्या त्या वेगळेपणाचा नेहाला गर्व वाटला.
लाखो करोडोंची संपत्ती असण्यापेक्षा आज तिच्याकडे तिच्या हक्काची लाख मोलाची माणसं होती.
आईच्या कष्टाची जाण असलेला तिचा पोटचा गोळा शब्दांत नाही तर हातवारे करत प्रेम व्यक्त करू पाहत होता.... लग्नाला, मातृत्वाला अवजड बेडी समजणारी नेहा त्याच बेडीसाठी आता आसुसली होती...
आज इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिला आपण किती सुखी समाधानी आयुष्य जगतोय याची जाणीव झाली..... तिला आज त्या कार्डमुळे खऱ्या अर्थाने सुखाची नवी व्याख्या उमगली होती...
© वर्षा पाचारणे.
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
