© अस्मिता देशपांडे
संध्या, आकाश, आदित्य या तिघांची मैत्री अख्ख्या कॉलेजला ठाऊक होती.
संध्या ही सावळीशी, तजेलदार डोळ्यांची, हुशार तरुणी .आदित्य हा बडया घरचा हसमुख, उमदा तरुण आणि आकाश मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेला हसऱ्या डोळ्यांचा स्वप्नाळू तरुण!!!
तिघांची मैत्री अगदीच छान होती.. लहानपणापासून एकाच शाळेत आणि पुढे एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेल्या या तिघांत भरपूर गप्पा रंगायच्या..
कॉलेजच्या अगदी शेवटच्या वर्षी आदित्यला संध्याबद्दल मैत्रीच्या पलिकडे काहीतरी वाटले...आणि आदित्यने संध्याला मागणीच घातली थेट अगदी रीतसर...
आपली मैत्री अशी लग्नाच्या नात्यात बांधली जाईल असे संध्याला वाटलेच नव्हते.. मनी ना ध्यानी पण हे ऐकून तिच्याही मनात गोड शिरशीरी दाटून आली...
दोघांचे रीतिभातीप्रमाणे लग्न झाले...
सगळं काही आलबेल चालू होतं... संध्या आणि आदित्यचा संसार एकदम छान सूरु झाला..
आदित्यने घरच्याच म्हणजे वडीलांनी उभ्या केलेल्या पण आता त्यांच्या पश्चात काकांच्या ताब्यात असलेल्या व्यवसायात लक्ष घालून तो अधिक वाढवला.
संध्या एक कुशल गृहिणी म्हणून संसारात रमली आणि आकाश बुद्धिमत्तेच्या जोरावर स्कॉलरशिप मिळवून पुढचे शिक्षण घेण्यासाठी परदेशी रवाना झाला..
तिघांची आयुष्ये सुरळीत चालू होती... पुढे येणाऱ्या वादळाची कुणाला कल्पना असते...??
आदित्य आणि संध्याच्या संसारवेलीवर कन्यारत्न उमलले...आराध्या तिचे नाव...
आराध्या हळूहळू मोठी होत होती.. तिचा पाचवा वाढदिवस.. त्या निमित्ताने तिघे महाबळेश्वरला गेले ट्रिपला.. आणि तो भयंकर दिवस उजाडला..
कार घाटात असताना समोरून वेगात येणाऱ्या ट्रकने जबरदस्त धक्का दिला आणि त्यात तिघेही जब्बर जखमी झाले...
कुणीतरी कळवले म्हणून त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत मिळाली पण आदित्य या धक्क्यातून वाचलाच नाही... संध्याचे आयुष्य या झंझावाती वादळाने उन्मळून पडले...
हॉस्पिटलमध्ये १५ दिवस राहून दोघींच्या जखमा तर भरल्या पण मनावरची ती जखम.... कधीच न भरून निघणारी...
घरी आलेल्या संध्याला सगळं काही ओकंबोकं वाटत होतं...
मलाही कां नाही आलं मरण असं तिच्या मनाला कितीदातरी वाटून गेलं... पण छोटया आराध्यासाठी ती डोळ्यातले पाणी सतत लपवत राहायची..
वृद्ध सासूबाईकडे बघून तर तिला अजूनच पोटात तुटायचं.... ह्या वयात त्यांचे तर दुःख न सरणारे....
संध्याने आतापर्यंत कधीच व्यवसायात लक्ष घातले नव्हतं.. पण आता तिलाच कंबर कसावी लागणार होती...
वर्षभरात ती सावरली या दुःखातुन... आणि कंपनीतल्या कारभारात लक्ष देऊ लागली....
पण तिच्या लक्षात आले की वर्षभरात कंपनीमध्ये खुप काही उलथापालथ झाली आहे.
ज्यांच्यावर जिवापेक्षा जास्त विश्वास ठेवला तेच लोक दगा देत होते.. काका आणि त्यांची मुले मिळून आदित्य आणि त्याच्या कुटुंबाला बेदखल करण्याचे मनसुबे रचत होते.
कंपनीच्या आर्थिक कारभारात खूप flaws दिसत होते तिला पण कोणाला विचारावे अशी विश्वासू व्यक्ती नव्हती दिसत...
तिच्या भावाने सांगितलं अगं आकाश आला आहे इथं परदेशातून... त्याची काही मदत मिळते कां बघ...
मग तिला आठवला आकाश... आपला कॉलेजचा मित्र...तिघांची मैत्री...!!
पण संसारात ती एवढी रमली होती की सगळ्या मित्र मैत्रिणींना विसरलीच होती...आणि त्यात आकाश तर परदेशी निघून गेल्याचे कळले, त्याने लग्न केल्याचे समजले.. आणि नंतर काही कॉन्टॅक्ट नव्हता एकमेकांचा...
तिने भावाकडून आकाशचा नंबर घेतला...आणि फोन केला... आकाश म्हणाला...भारतात आल्याबरोबरच मला ही वाईट बातमी समजली होती.
तुला येऊन भेटावेसे वाटले.. पण इतका काळ मध्ये निघून गेला... तू ओळख देशील की नाही या विचाराने आलो नाही...
मग संध्याने सरळच मुद्द्याला हात घातला... आणि कंपनीची परिस्थिती सांगितली...आकाशने तिला या वादळातुन नक्कीच बाहेर काढण्याचे आश्वासन दिले...
आणि मग संध्याने मागच्या सर्व काळ्या आठवणी पुसून पुढे जाण्याचा निर्धार केला आराध्याच्या उज्वल भविष्यासाठी...
संध्याने पण मॅनेजमेन्टची पदवी घेतली होती पण अनुभव नव्हता गाठीशी दररोज आकाशशी चर्चा करत करत आणि स्वतःसुद्धा कंपनीतल्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला आणि वर्षभरात सगळी सूत्रे पुन्हा आपल्या ताब्यात घेतली...आणि दगा देऊ पाहणाऱ्या लोकांना चांगलाच वचक बसवला.
नव्याने आत्मविश्वास आलेली संध्या आता आता तेजाने निखरून निघाली होती... आदित्यच्या जाण्याची पोकळी मात्र तिला सतत रीती करून जात असे...
या सगळ्या गोष्टी घडत असताना आकाश आणि संध्या मध्ये मैत्रीचे घट्ट बंध पुन्हा निर्माण झाले.
वाईट परिस्थितीमध्ये संध्याला आधार देऊन, आत्मविश्वास निर्माण करून वादळातली हरवलेली तिची वाट शोधून देणारा आकाश संध्याला आधारस्तंभ वाटत होता...
पण आकाशच्या आयुष्यात येऊन गेलेल्या वादळाची तिला कुठे कल्पना होती????
तुझ्या फॅमिलीबद्दल सांग ना... तू काहीच नाही सांगितले आतापर्यंत असं संध्याने म्हटलं तेव्हा मात्र आकाश अगतिक झाला आणि त्याने सांगितली त्याच्या आयुष्यात आलेल्या वादळची कहाणी.
परदेशात जाऊन आलेल्या आणि भरपूर मोठे पॅकेजची नोकरी असणाऱ्या आकाशसाठी खूप चांगली स्थळं चालून आली होती.. त्यातील एक मुलगी मेघा त्याने पसंत केली.
रितिरिवाजप्रमाणे लग्न झाले आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री मेघाने सांगितलं... माझे एका मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबतच राहणार... माझ्या अंगाला स्पर्श करण्याचा विचार सुद्धा करू नकोस म्हणून.
तिला दोन वर्ष वेळ हवा होता फक्त.. तिच्या प्रियकरसेटल होईपर्यंतचा आणि त्यासाठी घरच्यांची तोंडे बंद करण्यासाठी तिने आलेल्या स्थळाला होकार दिला होता.
अतिशय सुनियोजीत पद्धतीने तिने आकाशच्या आयुष्याची वाताहत केली होती...परदेशात ती दोनेक वर्ष सोबत राहिली पण एका अनोळखी व्यक्तीप्रमाणे आणि कुणालाही दाखवता येणार नाही असा छळ करत राहिली..
परदेशातच असलेल्या आपल्या प्रियकराला राजरोसपणे भेटतही राहिली.
आकाश आपल्या आईवडील आणि इभ्रतीचा विचार करून शांत बसला... त्याला कदाचित कुठंतरी आशाही होती... कदाचित मेघाचा विचार बदलेल आणि ती थांबेल.. पण त्याची ही आशा फोल ठरली... आणि दोन वर्षात ती वेगळी झाली आकाशपासून... ते ही त्याच्याकडून भरपूर पोटगी उकळून आणि त्याच्यावर नपूंसक असण्याचा शिक्का लावून!!!
आकाशच्या आयुष्यात मेघा नावाच्या या वादळाने उलथापालथ करून टाकली होती.
त्यानंतर आई वडिलांनी पुनर्विवाह कर म्हणून खूप सुचवून पाहिले पण आयुष्याचा एवढा कटू अनुभव घेतलेल्या आकाशने त्याना निक्षुन नाही म्हणून सांगितले...आणि मग त्यानंतर काही वर्षे परदेशात राहून त्याने भारतात येण्याचा निर्णय घेतला..
आज हे सगळं प्रथमच संध्याजवळ बोलत होता...अगदी मनातलं... जे कुणाजवळ त्याला सांगता आलं नव्हतं.
इतकी वर्षे मनात साठवलेलं तो संध्यासमोर रितं करत होतं... संध्या नि:शब्द होऊन ऐकत होती... गेली दीडेक वर्ष ते दोघे सोबत होती पण आकाशने कधीच काहीच सांगितलं नव्हतं या विषयी...
आपल्या समोर शांत दिसणाऱ्या, आधार देणाऱ्या, परिस्थिती सावरण्याऱ्या आकाशने एवढा कठीण काळ कसा काढला असेल.. या विचाराने तिचे मन हेलावले.
तोच आकाशने तिला विचारले तू भेटल्यावर मात्र पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगावेसे वाटू लागले आहे मला....मला आराध्याचा बाबा आणि तुझा नवरा होण्याची संधी देशील??
पुन्हा एक वादळ नव्याने संध्याच्या आयुष्यात येऊ पाहत होते.... सासूबाई मान्य करतील का... आराध्या केवळ आठ वर्षाची.. ती मान्य करेल का आकाशला बाबा म्हणून.
घरी गेल्यावर तिने सासूबाईसमोर आकाशने ठेवलेला प्रस्ताव सांगितला.
त्या खरंच खूष झाल्या.. म्हणाल्या.. अगं मी पाहतेय गेल्या वर्षभरात त्याने केलेली मदत, तुझ्यासाठीची वाटणारी कळकळ, तुला दिलेला आधार, आपली कंपनी लोकांच्या घशात जाऊ नये यासाठी केलेली धडपड आणि मुख्य म्हणजे तुला दिलेला आत्मविश्वास
आणि तुला माझ्या आणि आराध्यासकट स्वीकारण्याची तयारी सुद्धा... मला आवडेल तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात बघायला... आराध्याला वडिलांचे सुख मिळालेले पाहायला!!
संध्या मनोमन सुखावली...आणि तिने आपला निर्णय आकाशला कळवला...
दोघांच्याही आयुष्यात आलेली वादळे सरून समोर सुंदर पायवाट दिसत होती एकमेकांच्या सोबतच्या सहजीवनाची...!!!
© अस्मिता देशपांडे
