चार शब्द प्रेमाचे

 © प्रांजली लेले



हर्षलला ऑफिसच्या कामामुळे घरी यायला आज खूपच उशीर झाला होता. Year ending असल्याने सध्या ऑफिसमध्ये कामाचा व्याप खूपच होता.

त्यात बॉस ने अजून जास्तीचे काम दिल्याने त्याची चिडचिड होत होती. त्या गडबडीत आज आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचयं हे तो पूर्णपणे विसरला होता..

तो घरी आल्या आल्या वर्षाची तक्रार सुरू झाली..काय हे हर्षल, आज पण उशीर, आपलं ठरलं होत ना बाहेर जायचं आणि उशीर होणार म्हणून फोन तर करायचास , तो पण नाही केलास.. माझा कॉल नाही घेता आला तर  निदान एक मेसेज टाकायचा होता..आरव किती वाट बघत होता तुझी बाहेर जायला..पिलू वाट बघून झोपला देखील..

 तिची ती  भूणभूण ऐकून हर्षल  जाम चिडला.."एक तर आत्ताच आलोय ऑफिस मधून..आणि आल्याआल्या तुझी कटकट चालू झाली..तुझ्यासारख दिवसभर घरी राहणाऱ्या लोकांना नाही कळणार ऑफिस चे टेन्शन काय असते ते..इथे मी राबराब राबतो आणि तुला काही कशाची  पडली नाही..उठसूठ बाहेरच जायचं असतं तुला..

 त्याचे ते शब्द तिच्या एकदम जिव्हारी लागले अन् तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. न बोलताच ती तडक बेडरूममध्ये गेली. 

हर्षल पण कपडे बदलून तसाच न जेवता झोपी गेला.

 त्याला अजिबात झोप लागत नव्हती.

ती पाठमोरी झोपली होती. ती रडते आहे हे त्याला कळत होते पण त्याला देखील तिचा रागच आला होता..तो ही काही न बोलताच तसाच पडून होता..

खरतर त्याला आत्ता लक्षात आले होते की, वर्षा आज त्याने  आणलेला सुंदर गुलाबी रंगाचा ड्रेस घालून तयार होती. केस छान खांद्यावर मोकळे सोडले होते..

मुळातच देखणी असलेल्या वर्षावर तो रंग कितीं खुलून दिसत होता..आणि त्याला खुश करण्यासाठी ती हमखास तो ड्रेस घालायची.

आज ती नवा ड्रेस ही न बदलता तशीच झोपी गेली होती.

तो स्वतः शीच विचार करू लागला..आज आपण सगळ्या  रंगाचा बेरंग केला..पण मग सगळी चूक काय माझीच नाही.. हीचं रोजच काही ना काही असतं..कधी कुठे जायच तर कधी कुठे...काही नाही तर कधी आरव ची तक्रार करत असते तर कधी कसली.. ऑफिस मधून घरी आल्यावर मला फक्त शांती हवी असते..निवांतपण असा मिळतच नाही.. असे विचारचक्र सुरू असता केव्हातरी त्याचा डोळा लागला.

सकाळी उठायला जरा उशीर झाला आणि वर्षा ने ही उठवले नाही.

तिला विचारलं तर तिने हु की चू नाही म्हंटले.. त्याला लगेच ऑफिस ला पळायचं होत..तो पण मग तयार होऊन चहा, नाश्ता न करताच तसाच निघाला.

 हर्षल ऑफिसला आला तोच मुळी खराब मूड मध्ये..विनोदजवळ येत त्याने त्याला म्हटले, चल यार, चहा पिऊन येऊ कॅन्टीन मधून.. डोक खुप ठणकतय माझ..झोपच झाली नाही काल नीट..ते ऐकून विनोद  डोळे मिचकावत हसला.

तसा हर्षल जाम चिडला..अरे इथे माझं डोक फुटायची वेळ आली आहे अन् तुला हसू येतंय..

त्याचा तो मूड बघुन मात्र विनोद ने त्याला काय झाले ते विचारले, तसा हर्षल म्हणाला, काही नाही रे, काल जरा जास्तच वादावादी झाली  रात्री वर्षाशी..मग नंतर झोप पण नीट लागली नाही..तिने पण चिडून अबोला धरलाय माझ्याशी त्यामुळे आज सकाळी पण घरी tense वातावरण होते.. मी पण चिडून तिने दिलेला चहा न पिताच ऑफिसला आलो.

 वैतागून तो पुढे म्हणाला, अरे  हल्ली आमच्यात लहान सहान गोष्टीवरून सारखे वाद होतात. घरात कसली शांतीच नसते..

विनोद शांतपणे त्याला म्हणाला, आज रात्री या घरी जेवायला.. उद्या तसाही शनिवार आहे त्यामुळे घाई नसणार..निवांत गप्पा मारुया..म्हणजे तुमचा दोघांचाही मूड बदलेल..मी सांगतो सीमाला ती वर्षाला फोन करेल..

 विनोद हर्षलचा अगदी जवळचा मित्र आणि ऑफिस कलिग देखील..त्यामुळें त्यांच्या नेहमीच मनमोकळ्या गप्पा व्हायच्या..दोघांच्याही फॅमिली बरेचदा एकत्र फिरायला जात.

 संध्याकाळी हर्षल फॅमिली सकट विनोद कडे गेला. 

तिथे त्यांची छान मैफिल रंगली…दोघांच्या ऑफिसच्या खूप गप्पा झाल्या.. ते आल्या आल्या सीमानी सगळ्यांसाठी गरमगरम चहा आणि पकोडे आणले..हर्षलने पकोड्यांची तारीफ करताच तुमच्या मित्राने बनवले आहे अशी प्रांजळ कबुली तिने दिली.

 

विनोद म्हणाला, मॅडम तुमच्या इतके टेस्टी आम्हाला नाही ह जमत..तुझ्या हातची चव काही औरच.. 

ते ऐकून सीमा जरा लाजलीच आणि म्हणाली, विनोदला कुणी येणार म्हंटले की फार उत्साह येतो..माझ्या बरोबरीने तो सगळ्या कामात मदत करतो..

तसा हसून विनोद म्हणाला, अहो मॅडम, तुम्ही दिवसभर घरी आमच्यासाठी राबता.. मग एखाद दिवस तुझी जरा मदत केली तर काय बिघडलं..

 नंतर डिनरच्या वेळी देखील विनोद अधून मधून तिच्या मदतीला जात होता.."अरे वर्षा आहे माझ्या मदतीला..आज तू गप्पा मार मनसोक्त तुझ्या फ्रेन्डशी.." हर्षल विनोदचे वागणे न्याहाळत होता..आणि नकळत स्वतः शी तुलना करत होता.. 

लहान सहान गोष्टीतून या दोघांमधले प्रेम स्पष्ट जाणवत होते. किती मदत करतो तो आपल्या बायकोला..आणि मी..मला मात्र फक्त माझ्यासाठी वेळ हवा असतो..निवांत टीव्ही वर बातम्या बघाव्या यातचं मला सुख वाटत.

वर्षाच्या मनाचा मी कधी विचारच नाही करत.

 त्याच्या मनात आले, वर्षाला कितीदा तरी  माझ्याशी गप्पा मारायच्या असतात, मला काही काही सांगायचं असतं..आज कुणी कुणी घरी फोन केलेला तर कधी तिच्या मैत्रिणी बद्दल ..आपण मात्र फक्त ह ह करत असतो..तिच्या गोष्टीत मुळीच रस नसतो आपल्याला..मग ती देखील फार काही न बोलता गप्प बसते.

 तिने कधी नवीन डिश बनवली तरी तिने विचारल्याशिवाय आपण कधीच तिची आपणहून तारीफ करत नाही..

ती घरी असते म्हणून घराची सगळी जबाबदारी फक्त तिचीच असा आपला समज किती चुकीचा आहे हे त्याला विनोदच्या वागण्यातून आज पहिल्यांदाच जाणवले..आणि कळले की  खरंच किती गृहीत धरतो आपण बायकोला..

 हर्षलला आठवले की, लग्नानंतर एक वर्ष एकमेकांच्या प्रेमात किती आकंठ बुडालेले होतो.

तिने केलेल्या प्रत्येक नवीन गोष्टीचे आपण कौतुक करत असे..ते प्रेमाचे चार शब्द ऐकून किती खुश व्हायची ती..आणि त्याला एकदम आपली चूक जाणवली...अरे ! ते प्रेमाचे चार शब्दच तर तिच्या मनाची कवाडं उघडण्याची  गुरुकिल्ली होती आणि तीच आपण हरवली.

 पण आता अजून नाही...आता मी ती जपून ठेवणार..एकेमकावरील प्रेम, आदर आणि विश्वासानेच नवरा बायकोच्या नात्याची  विण अधिक घट्ट होते. 

आजही मी तिच्यावर जिवापाड प्रेम करतो पण ते फक्त व्यक्त करत नाही..आणि खरतर अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून ते सहज व्यक्त करता येत..हे मात्र विनोदला बघून आज कळले..

तेवढ्यात विनोदने त्याच्या पाठीवर थाप मारत त्याला तंद्रीतून बाहेर काढले..भरपूर गप्पा मारून जरा फ्रेश मूड मध्ये ते रात्री उशिरा घरी आले..

आरव तर गाडीतच झोपी गेला होता..त्याला हळूच बेडवर ठेऊन वर्षा वळली तशी हर्षल ने तिला आपल्या जवळ ओढले..आणि म्हणाला, राणीसाहेब, आम्हाला प्लीज माफ करा..मी चुकलो..तुझी काहीही चूक नसताना तुला  काल खूप बोललो..यापुढे तुझे मन दुखावले जाणार नाही याची पूर्ण जबाबदारी माझी..त्याच्या त्या प्रेमाच्या चार शब्दांनी तिचे मन विरघळले आणि गोड हसू तिच्या ओठी फुलले.

 

© प्रांजली लेले

कुठलंही नातं जपायला त्याला प्रेमाचे कोंदण घालायला हवे..तरच ते टिकतं. तुमचे काय मत आहे यावर?

धन्यवाद.

 सदर कथा लेखिका प्रांजली लेले यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..


धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...



अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने