मोदक

© धनश्री दाबके


आज काही केल्या अमृताला झोप लागत नव्हती. खरंतर अमृता आज हरतालिकेचा कडक उपास, दिवसभराचं ऑफिस आणि संध्याकाळचा मुंबई ते पेण टू व्हीलरचा प्रवास या सगळ्याने खूप थकली होती. पण इतकं थकूनही तिला झोप येत नव्हती. सारखी ती इकडुन तिकडे कूस बदलत होती. तिच्या हालचालीने शेजारीच झोपलेल्या निनादला जाग आली. 

"बायको, अगं कधी झोपणार आहेस? नाही ना लगत झोप ? तरी तुला सांगत होतो इतका कडक उपास करु नकोस म्हणून.. एवढा  प्रेमळ आणि हॅंडसम नवरा मिळाला असतांना कशाला हवाय तो उपास?  पण नाही. आता भूक लागली असेल .. जा खा काहीतरी.. .संपली आता हरतालिका.. बारा वाजून गेले बघ..." निनाद मोबाईल मधे वेळ बघत म्हणाला. 

"भूक नाही लागलीये रे... मी उद्या बाप्पा बसल्यावरच जेवणार. सवय आहे मला या उपासाची. लहानपणापासूनच.. झोप उपासामुळे नाही उडालीये" अमृताने सांगितले.

"उपासाने नाहीतर तर मग कशामुळे उडालीये? अजूनही मी तुझ्या स्वप्नात येऊन तुला त्रास देतो की काय ? अगं आता लग्न झालयं आपलं" 

"तू नाही रे.. पण हल्ली लग्न झाल्यापासून ना पुरणपोळी, मोदक, करंज्या असे अवघड अवघड पदार्थ स्वप्नात येतात माझ्या."

"काय ? म्हणजे? आयला.. dont tell me की  तुला चार  महिन्यांतच हे सगळं खावसं वाटायला लागलंय.  बाप रे... ए बाई .. आता माझी झोप उडणारे.. ." 

"नाही रे... उगाच भलतीकडे जाऊ नकोस.. हे सगळं खातांना नाहीतर करतांना बघते मी स्वतःला स्वप्नात.. आणि स्वप्नातही हे पदार्थ बिघडतात  माझे. कोणा सुगरणींना इतका वेळ होता कोण जाणे ज्यांनी हे कठीण कठीण पदार्थ शोधून काढलेत. अरे आहेत तुमच्या कोकणात तांदूळ आणि नारळ जास्त म्हणून काय त्याचे हे इतके कठीण मोदक करायचे? सोपं काहीतरी करायचं ना? आमचे बघ कसे आपले साधे सोपे तळणीचे मोदक असतात..नाहीतर तुमचे हे उकडीचे..माझी तर  उकड काढण्यापासूनच बोंब..त्यात घरात एवढी गॅंग.." अमृताने मनातली भडास बाहेर काढायला सुरवात केली..

"अगं पण आई तर म्हणत होत्या की तुला कामाची सवय आहे. तुमच्याकडे तर उभ्या गौरी असतात ना.. पुरणपोळीच्या पंगती उठतात..लाडू, करंज्या, सोळा भाज्या, सोळा चटण्या, कोशिंबीरी आणि अजून काय काय लागतं म्हणे तुमच्या गौरींना.. मग? आता लग्न झाल्यावर काय झालं तुला? सवय गेली की काय कामाची?" निनाद तिला अजूनच चिडवत होता.

"अरे हो.. सवय आहेच पण ती इतर कामांची म्हणजे साफसफाई. बाप्पांची आरास, पूजेची तयारी, पंगतीत वाढणं वगैरे.. घरात आई, काकू, दोन मोठ्या चुलत बहीणी आणि सगळ्यांत लहान मी.. मग माझ्यावर स्वैपाकाची वेळ कशाला येतीये? त्यात इथे घरात आजी, तुझे आई बाबा, दोन काका, दोन काकू आणि सगळे मिळून तुम्ही सहा चुलत भावंडं..म्हणजे तेरा माणसं.. आणि काय प्रथा तर म्हणे नवीन सुनेने पहिल्या गणपतीत तिच्या हातचे मोदक नेवैद्याला करायचे.. ही अशी कुठली प्रथा असते होय? नविन सून म्हणायचं आणि तिने जुन्या अनुभवी सासवांप्रमाणेच सगळं करावं अशी अपेक्षा ठेवायची.. "

मोदकांमुळे अमृताची होणारी घालमेल बघून निनादला हसू आवरत नव्हतं.. एकदा त्याला वाटलंही की इतकं टेंशन घेतीये ही तर सांगून टाकावं आत्ताच सगळं पण मग त्याला भावंडांच्या गॅंगला दिलेलं वचन आठवलं आणि मग तो तिला अजूनच चिडवत राहिला..

" अगं हो हो.. आणि by the way आपण तेरा नाही ग चौदा जणं आहोत उद्या जेवायला.. आता तूही आहेस ना आमच्यात? आपटेंच्या तिसऱ्या पीढीतली सगळ्यात मोठी सून ना तू? मग? मोदक तर तुला आलेच पाहिजेत.. तू असं कर .. नाहीतरी तुला झोप येत नाहीये तर परत परत  यूट्यूबवर मोदक कसे करतात ते बघत राहा म्हणजे सकाळपर्यंत कळेल तुला आणि जमतील उद्या मोदक.. मी आपला झोपतो.. " असं म्हणून निनादने तोंड वळवून झोपायचं नाटक केलं. मनातून बिचाऱ्याला अमृताला आलेल्या टेंशनमुळे खूप अपराधी वाटत होतं.. पण त्याचा नाईलाज होता..

" हो हो.. तू झोप हो.. तुझ्यामुळेच माझ्या आयुष्यात हे उकडीचे मोदक आलेत.. पण तुला काय त्याचं? तू झोप.. आणि असे यूट्यूबवर व्हीडीओ पाहून मोदक जमत असते तर मग अजून काय हवं होतं? मग सुगरणींना कोणी विचारलं तरी असतं का? anyways मी बघून घेईन माझी झोप आणि मोदक.. good night" असं रागानं म्हणून अमृताही निनादकडे पाठ वळवून झोपायचा प्रयत्न करू लागली..

अमृता जोशी आणि निनाद आपटे. दोघांची भेट ते काम करत असलेल्या मुंबईतल्या मल्टीनॅशनल कंपनीत झाली. जवळ जवळ तीन साडेतीन वर्षांपासून दोघं एकाच बिल्डींगमधे पण वेगवेगळ्या सेक्शनमध्ये काम करत होते. 

काही कॉमन मीटींग्ज आणि इनिशियेटिव्ह मुळे दोघांची ओळख झाली आणि बघता बघता ही ओळख एका छान मैत्रीत बदलली. दोघांच्याही घरी मोठी फॅमिली, नातेवाईकांचा गोतावळा त्यामुळे दोघांनाही सतत आजूबाजूला माणसं लागायची. 

निनाद मुळचा पेणचा. त्याचं बालपण पेणलाच गेलं.. मग कॉलेजसाठे पुण्याला हॉस्टेलला राहिला आणि आता नोकरीसाठी मुंबईत कंपनीच्या कॉलनीत राहात होता. पण प्रत्येक वीकेंडला तो पेणला पळायचा. 

आपट्यांची जॉईंट फॅमिली. निनादचे बाबा सगळ्यात मोठे.. त्यांच्या पाठचे दोन भाऊ. वडील चार वर्षांपूर्वी गेल्याने आता त्यांची आई नंदा आपटे म्हणजे निनादची नंदा आजी, पत्नी, दोन भाऊ,  भावजया आणि तीन भावांची मिळून सहा मुलं असे सगळे एकत्र राहात होते. 

मुलं त्यांच्या शिक्षण, नोकऱ्यांच्या निमित्ताने बाहेर असायची पण जेव्हा शक्य होईल तेव्हा आणि प्रत्येक सणावाराला आवर्जून एकत्र जमायची. या सगळ्यांना प्रेमाने एकत्र बांधून ठेवायचं कसब नंदा आजीमधे होतं जे त्यांनी पुढच्या दोन पीढ्यांकडेही अगदी सहजगत्या सरकवलं होतं. 

निनादचं त्याची सख्खी बहीण नेहा आणि त्याच्या चुलत भावंडांशी असलेलं घट्ट नातं त्याच्या बोलण्यातून सतत उलगडायचं.. नंदा आजी म्हणजे तर निनादचा जीव की प्राण .. आजीचाही मोठा नातू म्हणून निनाद विशेष लाडका.. या आजी नातवाचं गुळपीठ काहीतरी वेगळंच होतं. निनादच्या प्रत्येक गोष्टीवर, निर्णयावर आजीच्या प्रेमाचा पगडा जाणवायचा अमृताला.

अमृताकडेही तिचे बाबा आणि काका मनाने एकमेकांच्या खूप जवळ होते. तुमच्याकडे कशा ग तुझी आई आणि काकू इतक्या प्रेमाने रहातात असं सगळ्या मैत्रीणी अमृताला विचारायच्या. आणि लहानपणापासूनच दोघींना इतक्या गुण्यागोविंदाने नांदतांना पाहात आलेल्या अमृताला मात्र या मैत्रीणी असं का विचारतात ते कळायचंच नाही. 

दोघांच्याही फॅमिली व्हॅल्यूज सारख्या असल्याने निनाद आणि अमृता एकमेकांशी घरातलं सगळं मोकळेपणाने शेअर करायचे.. हळूहळू दोघं एकमेकांच्या जवळ येत गेले आणि प्रेमात पडले. 

लग्नाची कमिटमेंट करायची तर ती एकमेकांशीच असं दोघांचही ठरलं आणि निनाद अमृताला घेऊन पेणला आला. आजीला आणि घरच्यांना भेटवायला. गोरी, हसरी आणि चुणचुणीत अमृता सगळ्यांनाच आवडली. 

तिचं आणि निनादचं चांगलच जमलेलं ट्यूनिंग नंदा आजींच्या अनुभवी नजरेने बरोब्बर हेरलं आणि ही मुलगी आपल्या निनादचं जीवन उजळेल असा विश्वासही वाटला. अमृताच्या घरीही सगळ्यांना निनाद जावई म्हणून पटला आणि दोघांचे शुभमंगल पार पडलं. 

सुरवातीला काही दिवस पेणला राहून नविन जोडपे मुंबईला आले आणि कामावर रुजू झाले. पण लग्नापासूनच्या या चार महिन्यांत दोघांचे बरेचदा पेणला येणं झालं आणि अमृता हळूहळू घरातल्यांना ओळखू लागली. 

नेहा आणि नंदा आजी या दोघींशी तिचं चांगलंच जमू लागलं. या सगळ्या भावंडांची धमाल, एकमेकांच्या खोड्या काढणं आणि चिडवाचिडवी मधे अमृताही रमू लागली.

गेल्याच महिन्यात अमृताची पहिली मंगळागौर पेणला जोरदार साजरी झाली होती. आपटे आणि जोश्यांकडचा सगळा गोतावळा जमला होता. निनादची आई आणि दोन्ही काकू मिळून नंदा आजींच्या सुचनांनुसार सगळं पार पाडत होत्या. 

रात्रीची जागरणं, गप्पा, पत्त्यांचे डाव, बायकांची मेंदी, साड्या, दागिने,  नटणं सगळ्याला उत आला होता. वा!  सण साजरा व्हावा तर असा असं अमृताला वाटून गेलं आणि तेव्हापासूनच ती पुढल्या महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवाची वाट बघायला लागली. 

पहिले दोन दिवस इथे राहून मग अमृता माहेरवाशीण म्हणून गौरीजेवणाला आईकडे जाणार होती. मंगळागौरीच्या वेळीच सगळा प्लॅन ठरला होता. 

गणपतीसाठी जरीच्या साड्या व सगळ्यांच्या एकाच रंगाच्या ड्रेसच्या थीमचे प्लॅनिंगही झालं आणि निनाद व अमृता मुंबईला रवाना झाले. 

मंगळागौर आटोपली आणि नेहाच्या डोक्यात प्लॅन शिजायला लागला. तिला एव्हाना अमृताच्या स्वैपाकातल्या गतीचा अंदाज आला होता. त्यामुळे यावेळचा बकरा अमृतालाच करायचं असं तिने ठरवलं. 

तिने सगळ्या भावडांना गोळा केलं आणि नेहाची फिरकी घेण्याचा तिचा प्लॅन सांगितला. सगळ्यांनी शिक्कामोर्तब केल्यावर गणपतीच्या चार दिवस आधी निनादलाही त्यात सामिल करुन घेतलं आणि काहीही झालं तरी तिला सांगायचं नाही असं वचनही घेतलं त्याच्याकडून. 

निनादने अमृताला काही सांगणार नाही असं कबूल केल्यावरच नेहाने अमृताला फोन केला. नेहा म्हणाली " अगं त्यावेळी आपण सगळं ठरवलं पण आपट्यांकडची एक पद्धत तुला सांगायचीच राहिली. 

आमच्याकडे ना गणपतीत अशी प्रथा असते की घरात  नविन सून आली की पहिल्या वर्षी तिनेच एकटीने बाप्पाच्या नेवैद्याचे आणि सगळ्यांसाठीचे मोदक करायचे. उकडीचे मोदक बर का? तुला येतंच असतील ना? तुमच्याकडेही असतो ना गणपती त्यामुळे तुला सवय असेलच." 

त्यावेळी अमृताला वाटलं नेहा गम्मत करत असावी. कारण खरंच असं काही असतं तर निनादच्या आईने किंवा आजीने आपल्याला आत्तापर्यंत हे नक्कीच सांगितलं असतं. त्यामुळे अमृतानेही हो ला हो केलं आणि नेहाला फार सिरिअसली घेतलं नाही. 

पण दुसऱ्या दिवशी तिने नंदा आजींना फोन मात्र केला नेहाने सांगितलेल्या प्रथेची शहानिशा करायला. 

पण आजी सुद्धा या सगळ्या खेळात माहीर होत्या. अमृताने असं काही असतं का म्हणून विचारताच त्यांना काहीतरी शिजतंय याची कल्पना आली. आणि त्यांनी अगं हो.. निनाद बोलला नाही का काही? विसरला असेल बहुतेक म्हणून गुगली टाकली. 

परत तुला येतात ना मोदक करता असंही विचारलं.. तेव्हा मात्र अमृताला टेंशन आलं आणि तिने आजी मला नाही जमत मोदक.. पण मी शिकेन ह्यावेळी असं सांगून टाकलं. 

तिची ही शिकायची तयारी आजींना भावली. हीने शिकायची तयारी दाखवली म्हणजे ही आपल्या कंपूत फिट्ट बसणार ह्याची खात्री झाली त्यांना. 

इकडे अमृताची मात्र झोप उडाली.. अरे काय प्रकार आहे हा? तिने लगेच आईला फोन लावला. 

पण नेहाबाईंनी आपलं काम चोख केलं असल्याने अमृताची आईही नेहाच्या गृपमधे जाऊन बसली आणि 'अगं आपल्याकडे कुठे असतात उकडीचे मोदक? मलाही नाही बाई जमत चांगले .जरा आधी तरी सांगायचस ना.. प्रॅक्टिस केली असती.. आता काय गणपती आले परवावर. माझीही धावपळ सुरु आहे तयारीची. चल ठेवते मी. ' म्हणून आईही पसार झाली. 

मग अमृताने निनादला विचारलं तर त्यानेही हो हो.. सॉरी सॉरी आई मला म्हणाली होती पण मीच विसरलो.. 

ह्यावर मात्र काय बोलावं तेच अमृताला कळेना.. भयंकर राग आला तिला निनादचा.. पण आता मोदकांवर फोकस करायची गरज होती. 

मग ऑफिस मधल्या जवळच्या मैत्रीणींना विचारून झालं पण सगळ्यांचीच बोंब होती. शेवटी जे व्ह्यायचं ते होऊन जाऊ दे असा विचार करून अमृता पेणला आली. 

विचार करकरून बराच वेळाने तिला झोप लागली पण मोदक एवढे तिच्या डोक्यावर बसले होते की गजर व्हायच्या आधीच अमृता उठून बसली. 

शेजारी निवांत घोरणाऱ्या निनादकडे पाहून तिला वाटलं लग्न तर ह्याचही झालय ना पण लग्नामुळे ह्याच्या आयुष्यात कसलाच बदल नाही की कसली काळजी नाही.. हे सगळं मुलींच्याच वाट्याला का? पण जाऊ दे.. आता हा असा निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा सरळ उठून आवरून घ्यावं आणि स्वैपाकघरात जावं.

अमृताने मग तिचं सगळं आवरलं आणि ती खाली स्वैपाकघरात आली. बघते तर नंदा आजी आणि निनादची काकू भल्या पहाटेच  तयारीला लागल्या होत्या. 

अमृताला पाहून म्हणाल्या "अगं इतक्या लवकर उठलीस? झोपायचं ना जरा. मग आहेच दिवसभर कामांचा रगाडा."

काकूही म्हणाल्या " तेच की. जा जाऊन झोप थोडावेळ अजून."

अमृता म्हणाली " नाही नको.. तशीही मला झोप लागलीच नव्हती.. आज नेवैद्याचे मोदक करायचेत ना मला... पण मला येत नाहीत हो करता.. आजी, मी ही प्रथा पुढच्या वेळी पाळली तर चालेल का?" काकूंना तर अमृता काय म्हणतेय तेच कळेना... त्या गोंधळून तिला काही विचारणार इतक्यात आजींनी त्यांना खूण केली. 

मग अमृताच पुढे म्हणाली " नाही म्हणजे मोदक चांगले नसतील तर बाप्पालाही ते आवडणार नाहीत आणि तुम्हाला सगळ्यांनाही. " 

तिचं बोलणं ऐकून आजी म्हणाल्या " अगं वेडा बाई, सगळ्या सृष्टीचा विघ्नहर्ता असलेला बाप्पा तो.. त्याला हा असा खायचा पदार्थ आवडत असेल होय.. 

मुळात तो निर्गुण, निराकार आहे.. पण आपण त्याचे सगुण रूप उभे करतो आणि पुजतो.. मुळात तो दुसरा कोणी नाहीच.. तो तर आपल्यातच आहे.. तो विघ्न दूर करतो म्हणजे काय तर तो येऊन संकटं पळवून लावत नाही तर तो आपल्या इच्छा शक्तीला जागवतो आणि आपल्याला विघ्नांवर मात करायची बुद्धी देतो. बुद्धीचा देव आहे ना तो.. मग? 

आपण उकडीचे,तळणीचे, माव्याचे, अगदी चॉकलेटचे मोदक जरी केले ना तरी त्याला आवडतीलंच ते..पण तरीही आपल्या पूर्वजांनी ही शास्त्र का निर्माण केली की ह्या सणाला हाच अन् त्या सणाला तोच नेवैद्य? तर त्यामागे अनेक विचार आहेत. 

जिथे जे पिकतं आणि जेव्हा जे पचतं त्यानुसार आपण सगळं करत असतो. 

आता या उकडीच्या मोदकांचच बघ.. त्याची उकड कशी हवी.. मऊ आणि लुसलुशीत.. त्यात जर गाठी राहिल्या तर त्याची पारी एकसंध राहते का? तसंच आपल्या मनात जर एकमेकांविषयी अढी राहिल्या तर आपल्यातल्या नात्यांचे विविध पदर खुलतील का? 

उकडीच्या पारीला चिमटे बसल्याशिवाय मोदकाला कळ्या पडत नाहीत. तसंच कधीतरी एकत्र कुटूंबात राहून होणारी  परवडही सोसावीच लागते. पण त्यामुळेच घरादारावर समाधानाचं आवरण पसरतं.  

सारणातलं गुळ खोबरं एकजीव झाल्यानेच मोदक गोड लागतो. त्याप्रमाणे  कुटूंबातील सदस्य जर  समजुतदारपणाच्या भावनेने एकत्र राहात असतील तर घरात सुखाचा गोडवा पसरतोच. आणि हे सगळे विचार आपल्यात रूजावेत यासाठीच हा सगळा पदार्थांचा खटाटोप असतो.

हे मोदक जीभेला जसे गोड लागतात तसे ते मनावरही संस्कार  करतात ग.. बाकी प्रथा वगैरे सगळ्या निमित्तमात्र आहेत..त्यांचा मूळ उद्देश माणसाला घडवणे हाच असतो... 

आणि आता राहिली आपट्यांकडची ही प्रथा तर मुळात तशी काही पद्धत नाहीचे.. ही  सगळी नेहाच्या डोक्यातल्या किड्यांची वळवळ आहे.. त्यामुळे जाऊन झोप थोडावेळ निवांत.. आज संध्याकाळी आपल्याकडे खूप लोकं येतात दर्शानाला तेव्हा थकलेली आणि मलूल दिसशील  मग." 

हे सगळे ऐकून अमृता एकदम भारावली. " किती सुंदर विचार आहेत हे तुमचे. आता मला कळलं निनाद का एवढा आजी आजी करत असतो.. तुम्ही याआधीच का नाही भेटलात मला? इतकं छान सांगितल्यावर आता तर मला हे मोदक शिकायलाच हवेत.. मी नक्की शिकणार आज तुमच्या सगळ्यांकडून... आणि नेहाला तर मी आता बघून घेइनच माझ्या पद्धतीने. पण आत्ता नाही.. नंतर.. आत्ता फक्त मिशन मोदक.."

अमृताने असं म्हणताच दोघी हसायला लागल्या. 

मग सगळ्या सासूबाईं कडे बघत बघत अमृतानेही आज तिचा पहिला मोदक वळला ज्यावर खूप छान कळ्यासुद्धा पडल्या. सगळ्यांनी आणि विशेषतः निनादने भरभरून केलेल्या तिच्या मोदकाच्या कौतुकाने अमृताचा आपट्यांकडचा पहिला गणेशोत्सव खूप आनंदात आणि समाधानात पार पडला. 

समाप्त 

© धनश्री दाबके

📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.






2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने