व्होडका_रम_आणि_बरंच_काही....

© नेहा बोरकर देशपांडे 



 "एक्यूज मी, तन्मया राजे?" 


"येस, मीच, आपण?" 

"ग्रेट, मी केतन भावे... वैजू मावशीच्या रेफरन्सने आपण भेटत आहोत राईट?" 

"हो, येस प्लीज बसा ना "... 

"जर मी चुकत नसेन  तर 'तन्मया राजे' म्हणजे,  ' मणिकांचन सोसायटी', डी विंग, दुसरा मजला? " 

"अरे बापरे!, एवढी माहिती?", 
"मी इतकी फेमस आहे, हे माहिती नव्हतं मला.".. 

"वैजू मावशीने माहिती सांगितली तेव्हा लक्षात आलं नाही ,पण आत्ता तुम्हाला बघितल्यावर मात्र एकदम क्लिक झालं, एवढंच काय ते. 

मी ही त्याच सोसायटीत रहायला होतो. ए विंग मध्ये, नंतर जागा बदलली आई गेल्यानंतर."

"ओह.. वैजू मावशीच्याच खातर मी इथे आलेय,ती म्हणाली होती मला की  केतन आणि तू  एकत्र एका सोसायटीत रहायला होतात ते, तन्मया  म्हणाली.

"बरं , असू दे, तू काही मागवलं आहेस का?, साॅरी  तूम्ही? 

"नाही अजून,  पण सांगते आता... 

"हो प्लीज", 

"मला एक व्होडका,  स्मॉल ॲन्ड रिपीट "

"Are you sure?"  केतनने आश्चर्य चकित होऊन विचारलं.

काहीही न बोलता तिच्या नजरेतील कडवटपणा बाकीच्या कडवट गोष्टी सहज झेलू शकतील असा होता. 

"ऑर्डर सर?", 

"येस, एक व्होडका स्मॉल  ॲन्ड  एक OLD MONK"

'काय करता तुम्ही?', तन्मयाने विचारलं. 

"माझे स्वतःचे CA चे क्लासेस  आहेत, आणि तुम्ही काय करता?" केतनने विचारलं 

"'दयाळ हॉस्पिटलला मी अटॅच्य आहे आणि  स्वताची प्रॅक्टिस आहे ,  मी फिजिओथेरपिस्ट आहे."

मधला वेळ कोणी काहीच न बोलता गेला.
 
तेवढ्यात ड्रिंक्स आली ...  उगाचच  आधार वाटला... 

"खरं सांगायचं तर मला आत्ताच काही परत लग्न करण्यात रस नाहीये.. माझं माझं खरंच छान चालू आहे... पण एखाद्या कातरवेळी , आभाळ गच्च भरून आल्यावर, एकटेपण अंगावर येतं हे ही तितकंच खरं आहे... आणि आता चाळीशी नंतर मी स्वतःच स्वःताशी खोटं बोलायचं नाही असं ठरवलंय... म्हणूनच मी आज इथे आहे" ,  तन्मया एकदम बोलून गेली.

"अरे वा, हा मुद्दा मलाही अगदीच मान्य आहे. चांगल्या नोट वर आपली गप्पांना सुरुवात झालीये तर  आणि परत लग्नासाठी  भेटलोय हे थोडं बाजूला ठेवून  बोलूयात , चालेल ना? ", केतन म्हणाला.

"माझी दहावी झाली आणि आई एका अपघातात गेली. मी आणि बाबा च होतो एकमेकांसाठी.  स्वयंपाकापासून सगळ्याच गोष्टी आम्ही दोघे एकत्र शिकलो , सावरलो . 

मी पहिल्याच प्रयत्नात CA झालो आणि  आमच्या क्लासच्या सरांनी मला त्याच क्लासमध्ये शिकवायला येशील का ते विचारलं. 

लगेच हातात दुसरं काही नव्हतंच त्यामुळे मी ही त्यांना हो म्हटलं , माझं काम सुरू झालं.  हळूहळू माझाही शिकवण्यात जम बसला पुढच्या तीन चार वर्षांत मी माझे स्वतःचे क्लास सुरू केले. सुदैवाने चांगले सुरू आहेत अजूनपर्यंत, केतनने सांगायला सुरवात केली.

"अरे वा, ज्ञानदानाच्या  कामाचा आनंद खरंच वेगळा असतो" तन्मया म्हणाली. 

"नाही म्हटलं तरी मी थोडा सेटल झालोय म्हटल्यावर  बाबांनी माझ्या लग्नाचा विषय काढला.

खरं तर मी नाहीच म्हणालो त्यांना पण  आम्ही दोघेही घरातल्या त्या विचित्र पोकळीला कंटाळून गेलो होतो..  इतकी वर्ष सगळं करून सुद्धा नैवेद्याच्या ताटात तुळस ठेवायला विसरायचो, सणावारी दारात तोरण लावलं तरी खालचा उंबरा रंगीत रांगोळीची वाट बघायचा, 
"ते काही नाही आज सुट्टी घ्यायचीच दोघांनी ", या हक्काच्या बोलण्याची वाट बघत होतो. म्हणूनच मीही जास्त आढेवेढे न घेता लग्नाला तयार झालो. 

बाबांच्या मित्रांच्या ओळखीतून पूर्वाचं स्थळ सांगून आलं . 

ती एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होती. 

तिच्या काम करण्यास आमची हरकत नव्हतीच कधी . बाकीची माहिती घेतली, दिली, ओळखीतून स्थळ आलंय म्हटल्यावर दोन्ही कुटुंब आनंदून जाऊन आमचं लग्न झालं. 

स्वयंपाकाच्या मावशी होत्याच घरी , फक्त आम्ही काही सांगायच्या ऐवजी ती जबाबदारी पुर्वाला दिली , इतकी वर्ष सांगतोच आहे तर.  

त्याचाच गैरफायदा घेतला तिने, संध्याकाळी पूर्ण स्वयंपाक सांगायचीच नाही, उगीच भेळ, चायनीज, हॉटेलचे पदार्थ ऑर्डर करायची . 

सुरवातीला आम्हीही ते एन्जॉय केलं,  पण नेहमीच झाल्यानंतर मात्र कंटाळून गेलो. तिला सांगितलं तर, चिडचिड करायची, मग बाबाच ते आधीसारखं ठरवू लागले, 
हिचं ऑफिसचं काम उशिरापर्यंत सुरू झालं होतं, नवीन प्रोजेक्ट आहे म्हणाली.

आम्ही देखील ठिक आहे म्हटलं...  कामासोबतच तिच्या लेट नाईट पार्ट्या सुरू झाल्या... शनिवार रविवार आऊटिंग , विचारलं की प्रोजेक्टचं नाव सांगून निघून जायची . 

वर्ष दिड वर्ष हेच चालू होतं, आणि एक दिवस अमेरिकेचा व्हिसा आणि प्रमोशन लेटर घेऊनच घरी आली.

पुढच्या तीन दिवसात ती नऊ महिन्याचे काम आहे हे सांगून सगळी तयारी करून ती गेली ती परत आलीच नाही .

पाच वर्षापूर्वी आली तेव्हाच म्युच्युअल डिव्होर्स आम्ही घेतला. 

बाबांना फार त्रास झाला या सगळ्यांत, एकुलत्या लेकाच्या संसाराचा खेळखंडोबा ते झेलू शकले नाहीत. तिच्या आईवडीलांनी देखिल हात वर केले. माझंही काहीसं तसंच झालं होतं, पण कदाचित वयामुळे किंवा पूर्वाचं  माझ्यात कधीही न गुंतणं , हे लक्षात घेऊन मी त्यामानाने लवकर यातून बाहेर आलो." 

"तर असं सगळं आहे , बघा तन्मया मॅडम"... केतन फोल हसत म्हणाला. 

"ओह्ह.... , एक उसासा टाकला तन्मयाने" ,

"अरे, आपलं जेवण सांगायचंच राहीलं नाही का?" केतन म्हणाला.

"एक ट्रिपल शेजवान राईस, आणि  व्हेज प्लॅटर चालेल का?", तन्मयाने हलकेच विचारले . 

"हो चालेल ना.... आज बरेच दिवसांनी काहीही विचार न करता जेवण समोर येईल, केतनच्या बोलण्यात अगतिकता जाणवली.

"खरं सांगू का? हे व्होडका वगैरे नाही हो आवडत मला... पण मी जशी आहे तशी त्याला आवडले नाही ना... त्यामुळे मी या cool & happening अशा जगाला वाटणा-या गोष्टी जगासमोर करू लागले.  

मी कधीही ड्रिंक्स घेत नाही हे ऐकल्यावर  लोकांचे चेहरे अनाकलनीय व्हायचे, का ते माहिती नाही,  तन्मया बोलू लागली. 

एका सेमिनारला आमची ओळख झाली.  तो डॉक्टर होता, त्याच्या आईवडिलांचे हॉस्पिटल  होते, तिथे मला त्याने जॉब ऑफर केला. 

तिथेच आमचं प्रेम जमलं . दिसायला तो अतिशय हॅन्डसम होता, रहाणीमान देखिल तसंच अगदी साजेसं. 

हॉस्पिटल मध्ये येणा-या लेडीज पेशंट त्याने तपासावं म्हणून कितीही वेळ वाट बघायला तयार असायच्या, हा मात्र माझ्यावर फिदा होता. 

वेळ मिळाला की माझ्या डिपार्टमेंट आलाच म्हणून समजा. त्यावेळेस त्याचं असं मला खूप आवडायचं , तो म्हणेल ते आणि तसंच मी करत होते, मोहिनीच म्हणा ना.

आपल्यावर इतकं कोणी जिवापाड प्रेम करतेयं ही भावनाच इतकी छान ,तरल होती ना की मी अगदी सातवे आसमान पर वगैरे होते, पण तेव्हापासूनच मला बदलू पहात होता , मला ते तेव्हा कळलं नाही.

घरून लग्नाला विरोध वगैरे झालाच नाही.  मला सगळ्याची आवड ,हौस होती, रांगोळी, साग्रसंगीत स्वयंपाक, देवाधर्माचे निगुतीने करणं, सत्यनारायण,  हळदीकुंकू . सासूबाई पण डॉक्टर असल्याने त्याही तशा बिझी  असायच्या .

खरं तर त्या सगळ्यांना पैशाचं वेड होतं म्हटलं तरी चालेल.

माझी फिजिओची  सकाळीची नऊ ते एक ड्युटी झाली की मी घरी यायचे. संध्याकाळ मी मला आणि त्याला वेळ देण्यास रिकामी ठेवली होती.  

तो ही यायचा , त्याला सेक्सची क्रेझ होती असं म्हणता येईल.  सुरवातीला मीही नवीन नवीन ते सगळे सहन केलं,  एकत्र असलो की तो सुरूच व्हायचा . 

मला वाटायचं, छान फिरून येऊ, नाटक बघायला जावू, शनिवार रविवार एखादी ट्रिप करून येवू. आम्ही जायचो पण काहीही कारण काढून तो घरी यायचा.... नाहीतर मग माझे पिरियड असतील तेव्हा घेऊन जायचा. 

नवीन लग्न , हनिमून या सगळ्यांत मला 'त्या' गोष्टीचा उबग यायला लागला होता.  

मी संध्याकाळी होम व्हिजिट घ्यायला सुरुवात केली. तर याचं वेगळंच सुरू झालं, त्याने संशय घ्यायला सुरुवात केली , कुठे जातेस, कोण पेशंट आहे? पुरूष पेशंट घ्यायचे नाहीत, किती वाजता येणार? 

तो त्याच्या ओपीडीत असला तरी कोणाला तरी माझा ट्रॅक ठेवायला सांगायचा.
 
तो  इतका हुशार होता , या सगळ्याचा त्याच्या स्वतःच्या प्रॅक्टिस वर कधीही परिणाम होऊ दिला नाही. 

पझेसिव्हनेस च्या खाली हे सगळे तो झाकायचा प्रयत्न करायचा पण मग त्याची भरपाई म्हणून परत "तेच" सुरू करायचा. 

पार्टीत घेऊन जायचा, नको म्हणत असताना ड्रिंक्स घ्यायला लावायचा, तोकडे कपडे ,ते विचित्र वातावरण मला कधीही आवडलं नाही. 

विरोध केला की हॉस्पिटलच्या, स्वःच्या रेप्युटेशन साठी असं सगळे करावे लागते, असं म्हणायचा. 

या सगळ्यांत मला दिवस गेले, मला खरंच आनंद झाला, वाटलं आता हे नक्कीच थांबेल सगळे. 

पंधरा एक दिवस 'चांगले' गेले, पण नंतर तो माझ्यावर असा काही तुटून पडला की त्यातचं माझं मिसकॅरेज झालं, त्यानंतर मात्र मी तिथून  निघून गेले  कायमची . 

एक डॉक्टर असून त्याला माणून म्हणून  मायनस मध्ये सुद्धा मार्क त्याला देऊ शकत नाही, तन्मयाने अत्यंत कोरडेपणाने तिचे बोलणे संपवले. 

आलेल्या जेवणाकडे दोघेही नुसते बघत होते. वेटरने येऊन विचारलं तेव्हा नो थॅन्क्स म्हणत जेवण आटोपून घेतलं . 

केतन म्हणाला, "अशा प्रकारची माणसं जगात का असतात हेच मला कळत नाही", 

"कदाचित कसं असू नये हे इतरांना कळण्यासाठी ,  नाही का? तन्मया म्हणाली. 
मनापासून हसला केतन. 

आजच्या रात्रीत  आपला भूतकाळ उगाळून झाला , पण आपण लग्न करायचे का नाही हे ठरवायला परत एकदा मला तुम्हाला भेटायला आवडेल,  तुम्हाला? केतनने विचारलं. 

"वैजू मावशीला मेसेज करूया कि आज भेटलो आणि परत भेटणार आहोत असा चालेल ना", केतन म्हणाला. 

"हो चालेल , पण निसर्गात आवडेल, अशा कृत्रिम प्रकाशात मला माणसंही तशीच भासतात,  या मानवनिर्मित महानगरातून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात नव्याने स्वतःला जाणून घेऊया. 

दोघांनी एकमेकांना आश्वासक शेकहँड करून नव्याने जगाकडे बघायचे ठरवले. 

© नेहा बोरकर देशपांडे 

सदर कथा लेखिका नेहा बोरकर देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..


धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...



अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने