गंजलेले कुलुप



©वर्षा पाचारणे



आज त्या खोलीत पुन्हा बंद दाराआड रडण्याचा आवाज येत होता. तो आवाज ऐकून जीवाची रोज कालवाकालव व्हायची. खूपदा वाटायचं की तोडून टाकावं ते कुलुप आणि करावं मुक्त त्या जीवाला, पण ते शक्य नव्हतं कारण.....

सुनिता नुकतंच श्रीधरनगरला तिच्या नवऱ्याच्या नोकरीच्या बदलीमुळे राहायला आली होती. पाच-सहा दिवसापुरतं त्यांना ऑफिसच्या क्वार्टर्समध्ये राहायला मिळणार होतं, पण त्यानंतर स्वतःची सोय करणं गरजेचं होतं. 

खूप शोधूनही कुठेच भाडेतत्त्वावर फ्लॅट मिळत नव्हता, पण अचानक एक दिवस एका जुन्या बंगल्याबाहेर, 'दोन खोल्या भाडेतत्वावर देण्यास आहेत', असा फलक दिसला.. तो फलक पाहून खूप आनंद झाला. 

लगेच आत जाऊन सुनीताने चौकशी करावी या विचाराने, दारावर टकटक केलं. बराच वेळ होऊनही कोणीच बाहेर आलं नाही, म्हणून ती पुन्हा मागे फिरणार, तोच आतून एक भारदस्त दरारेबाज आवाज आला," कोण हवंय तुम्हाला? कशाला दार बडवताय?"... त्या मनुष्याच्या अशा कुचकट बोलण्याने सुनिता फारच दचकली. 

"काही नाही, बाहेर फलक वाचला, दोन खोल्या भाडेतत्वावर देण्यास आहेत", म्हणून चौकशी करायला आली आहे.

"ठीक आहे, पण आधीच सांगून ठेवतो, जरी हे गाव असलं, तरीही फार पूर्वीचा वाडा आहे हा आमचा, त्यामुळे राहायचे असल्यास दहा हजार भाडे आणि वीस हजार रुपये डिपॉझिट भरावे लागेल... तेही एक रकमी, मंजूर असेल तर थांबा नाहीतर निघा"... मालकाच्या अशा बोलण्याने सुनीताने ,'विचार करून सांगते', असं म्हणून तिथून पळ काढला.

तिने घरी येऊन नवऱ्याला सांगितले. शिरीष आनंदाने तयार झाला," अगं, या गावात एकतर घर भाड्याने मिळणं खूप मुश्कील काम झालंय.. त्यात एखाद्या जुन्या बंगल्यात राहणं म्हणजे फारच छान की! आपण आजच जाऊन त्यांना एक महिन्याचं भाडं आणि डिपॉझिट देऊन येऊया".

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर शिरीष आणि सुनीता बंगल्याच्या मालकाला पैसे देण्यासाठी गेटवर पोहोचले. मालक गेटच्या आतमध्ये झाडांना पाणी घालत होते. 

सुनिताला त्यांनी लांबूनच ओळखले. एक विचित्र हास्य करत ते तिला म्हणाले,"काय मग, आज तरी ठरलं की नाही ?" तशी सुनिता घाबरत 'हो' म्हणाली. शिरीष पुढे येऊन बोलू लागला," आम्हाला मंजूर आहे. मी आजच एक महिन्याचे भाडे आणि डिपॉझिट भरतो. पुढच्या दोन-तीन दिवसात आम्ही आमचे सामान घेऊन येऊ"

"ठीक आहे" म्हणत मालकाने त्यांना दमवजा ताकीदच दिली की, 'भाडेकरु आहात, तर भाडेकरूप्रमाणेच राहायचं. घरचे सदस्य होण्याचा प्रयत्न करायचा नाही... आमच्या खाजगी समस्यांमध्ये नाक खुपसायचा प्रयत्न करायचा नाही.. तसं आढळल्यास डिपॉझिट जप्त करून घरातून बाहेर हुसकण्यात येईल'... त्याचं असं तिरसट बोलणं खरंतर शिरीषला खूप लागलं होतं, पण 'गरजवंताला अक्कल नसते', म्हणत त्याने मालकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

पुढच्या दोन दिवसात शिरीष आणि सुनीता सामान घेऊन वाड्यात राहायला आले. 

शिरीष कामावर गेल्यावर सुनिता दिवसभर एकटीच घरात असे. मालकही त्याच्या कामानिमित्त कधीमधी बाहेर जात असे... मालक, त्याची बायको आणि एक मतिमंद मुलगा, एवढेच काय ते घरातील सदस्य.

शिरीष कामावर गेला की सुनिता कधी भाजी आणण्यासाठी, कधी काही इतर कामं असतील तर बाहेर पडायची. एक दिवस तिचे लक्ष वाड्याच्या कोपऱ्यातील खोलीकडे गेले. 

त्या खोलीतून भेसूर असा रडण्याचा आवाज येत होता. तिला ते रडणं ऐकून अंगावर काटा आला. 

तिने घाबरतच स्वतःच्या खोलीचे दार उघडले आणि धाडकन दार बंद करून घेतले. थोड्यावेळ तिला काहीच सुचत नव्हते. 'या बंगल्यात राहायला येऊन काहीच चूक तर केली नाही ना', असं तिला वाटत होतं.

'त्या बंद दाराआड, नक्की कोण असेल?' याची उत्सुकता वाढत चालली होती. लक्ष त्या 'निळ्या रंगाच्या गंजलेल्या' कुलुपाकडे जात होते. 

एक दिवस मालक घरात नसताना तिने त्या बंद दारावर थाप दिली आणि विचारले," कोण आहे आतमध्ये?"... सुनिताचा आवाज ऐकून आतून बांगड्यांचा आवाज आला.

 एका अतिशय जीर्ण झालेल्या देहातून, अस्पष्ट असा आवाज आला," कोण आहेस मुली? 'मला वाचव'.... त्या आवाजातून बाहेर पडण्याची उत्कट इच्छा आणि इतकी वर्ष बंद दाराआडच्या जीवनयातना स्पष्ट जाणवत होत्या.

 सुनीताने आश्वासक शब्दात आतील स्त्रीला विचारले," कोण आहात तुम्ही? आणि असं दाराच्या आतमध्ये बंद का आहात?"

 त्यावर आतील बाईने आवाज दिला आणि म्हणाल्या," या बंगल्याच्या मालकाची सख्खी बहिण आहे मी'... रक्ताचा भाऊच आपल्याला आयुष्यभरासाठी बंदीवासात टाकेल' असं आयुष्यात वाटलं नव्हतं.

माझं जगणंही याच खोलीत आणि मरणंही याच खोलीत येणार आता.... आयुष्याचा शेवट या अशा अंधारकोठडीत एका कोपऱ्यात पडून राहण्यात आहे, हे मी स्वीकारलं आहे'..... त्या थरथरत्या आवाजाला आता अश्रूंची जोड मिळाली होती.

त्यांचे दुःख ऐकून सुनिताचे डोळे पाझरू लागले.

मालकाला या बाबतीत जाब विचारण्यासारखी परिस्थिती अजिबातच नव्हती. मग तिने शेजारीपाजारी चौकशी करायचे ठरवले. 

दुसऱ्या दिवशी ती शेजारच्या काटे मावशींकडे गेली. 

तिने इकडच्या तिकडच्या गप्पा मारून नंतर मालकांच्या घरच्या सदस्यांविषयी चौकशी करायला सुरुवात केली. 

तिच्या एकाही प्रश्नावर समाधानकारक उत्तर न देता काटे मावशी स्वतःचे काम करत राहिल्या.. शेवटी तिने मुद्द्याला हात घालत प्रश्न विचारला, "मावशी, या मालकांच्या बंगल्यातून मला सतत कोणत्यातरी स्त्रीचा रडण्याचा आवाज येतो... कोण असावी ती बाई?" 

काटे मावशी म्हणाल्या,' असले प्रश्न तू विचारू नये आणि मी उत्तरं देऊ नये... यापेक्षा तू तुझं काम कर आणि मला माझं करू दे'..... दुसऱ्याच्या नसत्या भानगडीत नाक खुपसायची आपल्याला काही हौस नाही'.

चार-पाच दिवसांनी मालकांची बायको पहिल्यांदाच सुनिताबरोबर स्वतःहून हसली. इतके दिवस त्यांच्या घरात राहायला येऊन सुद्धा, त्यांनी एकही शब्दांनी भाडेकरू बरोबर कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवला नव्हता.

 त्यांच्याशी बोलावे की नाही? या विचारात असतानाच त्यांनी सुनीताला आज चहा घेण्यासाठी बोलावले. सुनिता 'नको, नको' म्हणत असतानाही त्यांनी खूप आग्रह केला. 

आज मालक नसल्याने, त्या घरातील दरारायुक्त वातावरण थोडं हलकं झालं होतं. 

सुनीताने तिच्या नवऱ्याच्या बदलीच्या नोकरीमुळे, ती किती ठिकाणी फिरून आली आहे, हे सांगत असताना मालकीणबाईंच्या चेहर्‍यावरची उत्सुकता वाढत होती. 

इतके वर्ष लग्नाला होऊनही तिने श्रीधरनगरच्या बाहेर आजपर्यंत पाऊलही ठेवले नव्हते. त्यात मालकांसारखा खाष्ट नवरा मिळाल्यामुळे, तिचे जीवन कुठल्याही शिक्षेपेक्षा कमी नव्हते.

हळूहळू सुनिता आणि मालकीणबाईमध्ये थोडी मैत्री होऊ लागली. आता तरी आपल्याला 'त्या' बंद दाराआडचं गुपित समजेल, या आशेने सुनीता आडून आडून मालकीण बाईंना काही प्रश्न विचारायची.

पण त्याही तिच्या प्रश्नांना कायम टाळत असत.. त्या बंद दाराआडचं सत्य तिला शांततेने झोपू देत नव्हतं...

 'एखाद्या स्त्रीला असं आयुष्यभरासाठी कोंडून मालकाला नक्की काय साध्य करायचं असेल' या विचाराने तिच्या जीवाची घालमेल वाढत होती.

मालक गावावरून परत यायच्या आत, कसेही करून, तिला ते कुलूप उघडून पाहायचं होतं. 

तिने मालकीणबाईशी थोडी चर्चा करून, विश्वास संपादन केला... इतके दिवस घाबरत असणारी मालकीणबाई आज थोडी विश्वासाने सुनीताच्या प्रश्नांना थोडीफार का होईना, पण उत्तरे देत होती.

शेवटी सुनिताने प्रश्न विचारला," राधाबाई, खूप दिवस झाले विचारेन म्हणते, 'त्या' दारा आड नक्की कोण आहे? सतत येणाऱ्या रडण्याचा आवाज आणि ती आर्तता जीवाला जाळून टाकते आहे.... कृपा करा, पण मला सांगा त्या 'गंजलेल्या निळ्या कुलपाआड', नक्की कुठलं भयानक सत्य दडलं आहे.

मालकीणबाईंच्या अश्रुंना आज बांध फुटला... त्या म्हणाल्या,' त्या बंद दाराआड माझ्या नवऱ्याची मोठी बहीण आहे... आमच्या घरात जो मुलगा आहे, तोही त्यांचाच आहे'... असे म्हणून ती घाबरून नजर खाली करून रडू लागली.

 सुनिताला प्रश्न पडला की,' मालकांनी स्वतःच्या बहिणीला असे कोंडवाड्यात का टाकले असेल?' तिने पुन्हा खोदुन खोदुन प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

त्यावर मालकीणबाई म्हणाली,' जेव्हा माझ्या नणंदबाई लग्न होऊन सासरी गेल्या, तेव्हा त्यांचे यजमान अतिशय श्रीमंत होते... पण ते अपंग होते... त्यात एकुलते एक असल्याने लग्नानंतर सारा कारभार नणंदबाईंकडे आला... वर्षभरात त्यांना मूल तर झालं, पण ते मतिमंद निघालं... त्यानंतर सहा महिन्यातच त्यांच्या यजमानांचे निधन झालं. सासरी एकटीनं त्या मुलाला सांभाळण्यापेक्षा नणंदबाईंनी माहेरी भावाकडे येण्याचे ठरवले... तिला माहेरी असं आलेलं पाहून खरंतर मालकांचं तेव्हाच डोकं हल़़लं होतं.... पण त्यांच्या मनात लगेच संपत्ती लुबाडण्याचा विचार आल्याने, त्यांनी बहिणीला कसबसं राहण्याची परवानगी दिली.

महिनाभराने त्यांनी नंणंदबाईं समोर 'आपण किती गरिबीत दिवस काढत आहोत' याचा पाढा वाचला.

 भावाची परिस्थिती पाहून बहिणीचा जीव व्याकुळ झाला...' तुला कधीही पैशांची गरज लागली, तर माझ्याकडे मागत जा', असं त्यांनी मालकांना सांगितलं.... त्यानंतर दर महिन्याला 'आमचे हे' नंणंदबाईंकडून काहीना काही कारणासाठी पैसे उकळत राहिले.

जसजसा त्यांचा मुलगा मोठा व्हायला लागला, तसं मालकांच्या डोक्यात संपत्तीविषयीचे प्रश्न अधिक वाढू लागले. 'जर हा मोठा होऊन बहिणीने सगळी संपत्ती तिच्या मुलाच्या नावावर केली, तर आपण तिला आयुष्यभर सांभाळण्यात काय अर्थ आहे' असं वाटून त्यांनी तिच्यासमोर एक अट घातली. 

'तू तुझी संपत्ती माझ्या नावावर कर, तरच इथे रहा, नाहीतर पुन्हा तुझ्या सासरी निघून जा.... कारण असं तुझ्याकडे हात पसरणं म्हणजे कुत्र्याचं जगणं झालंय... तुझ्या तुकड्यांवर जगायला मला आवडत नाही, त्यापेक्षा तू तुझी संपत्ती माझ्या नावावर कर आणि इथे बिनधास्तपणे आयुष्यभर सुखाने रहा'.... असं मालकांनी सांगताच बहिणीने भावाच्या मनातील हेतू ओळखला आणि तिने पुन्हा सासरी जाण्याचा निर्णय घेतला.

आपली बहीण असा काही निर्णय घेईल, हे मालकाला स्वप्नातंही वाटलं नव्हतं.

तिने बॅग भरलेल्या पाहून, त्यांना खूप राग आला... 'ती परत गेली, तर मिळणारी सगळी संपत्ती अशी एका झटक्यात निघून जाईल', या विचाराने त्याने तिला एका खोलीत ढकललं आणि बाहेरून कुलूप लावून घेतलं.

 'आपला रक्ताचा भाऊ असा वैरी निघेल', असं तिला स्वप्नातंही वाटलं नसेल. त्याच खोलीत त्यांनी छोटसं शौचालय आणि एक मोरी बांधून घेऊन तिला कायमची त्या खोलीत बंदिस्त केली. एका खिडकीतून फक्त मी तिच्या जेवणाचं ताट सरकवते, त्यावरच ती आजपर्यंत कशीबशी जिवंत आहे'.

हे एवढे भयानक सत्य ऐकून सुनिता मनातून फारच घाबरली.. तिने विचार केला ,'सख्खा भाऊ आपल्या बहिणीशी असा कसा वागू शकतो?'

 तिने मालकीणबाईंना विचारलं," मग मालकांनी इतके वर्षात दमदाटी करून संपत्तीच्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या कशा नसतील घेतल्या?".... त्यावर मालकीणबाई म्हणाली," कारण नणंदबाईंना माहिती आहे, की ज्या दिवशी त्या कागदपत्रांवर सह्या करतील, त्यादिवशी मालक त्यांना मारून टाकायलाही कमी करणार नाहीत... म्हणून त्यांनी आजपर्यंत सह्या केल्या नाहीत.

शिवाय त्यांचे यजमान जेव्हा मृत्यूशय्येवर होते, तेव्हा त्यांनी सगळी प्रॉपर्टी मुलाच्या नावे करून ठेवली होती.... तो १८ वर्षांचा होईपर्यंत त्यावर त्याच्या आईचाच अधिकार राहील आणि त्यानंतर ती संपत्ती त्याच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे" त्यासाठी मालक इतकी वर्ष वाट पाहून आहे.

एकदा ती संपत्ती मालकाच्या नावावर झाली, की मग त्यांना या बंदिस्त बहिणीची काही एक गरज भासणार नाही".... हे भयानक सत्य ऐकून सुनीताने पोलिस कंप्लेंट करायचे ठरवले.

पण शिरीषने घाबरून या साऱ्या प्रकाराला नकार दिला.... तरीही एका स्त्रीवर होणारा अन्याय सुनीताला मान्य नव्हता. 

तिने त्याच्याही नकळत, पोलिसांत तक्रार नोंदवली... मालक गावी गेलेले असतानाच, पोलीसांनी घरी येऊन नणंदबाईंची सुटका केली.

इतके वर्ष अंधारकोठडीला जग मानणाऱ्या त्या अस्तित्वाला बाहेरच्या उजेडाशी नजरानजर होताना, डोळे आता क्षीण झाले होते... इतक्या वर्षांनी पाहिलेला उजेड, ते डोळे सहन करू शकत नव्हते.

 थरथरत्या हातांनी सुनिताच्या तोंडावर हात फिरवत, तिने पुन्हा एकदा अश्रूंचा वर्षाव केला... तीन चार वर्षाचा असलेला आपला मतिमंद मुलगा, आता जवळपास पंधरा सोळा वर्षाचा झालेला पाहून, त्या आईचं मातृत्व उफाळून येत होतं... तिने त्या लेकराला गच्च मिठी मारत पटापट मुके घेतले... त्या मुक्या लेकराला इतक्या वर्षात पहिल्यांदाच आज आई भेटली होती. ते हृदयस्पर्शी दृश्य सुनीता आणि मालकीणबाई आपल्या मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवत होत्या.

मालकीणबाईंनी सुनीताची साथ देत तिच्या नणंदेला आज न्याय मिळवून दिला होता.

लवकरच मालकाला त्याच्या क्रूर कृत्याबद्दल अटक झाली... पुढे त्याला शिक्षाही झाली असेल... पण त्या स्त्रीने विनाकारण भोगलेल्या यातनांचं काय?...

सख्ख्या भावावर विश्वास ठेवून माहेरी सुरक्षितपणे राहता यावं, आपल्या मुलाला मायेन वाढताना बघावं, ही एक आशा घेऊन ती माहेरी आली होती.... पण सासरी जो मान आणि सुरक्षितता तिला मिळाली असती, ती माहेरी आल्यामुळे तिने गमावली होती.

संपत्ती आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी भावाचं प्रेम आटलं होतं.... एक असुरी, वैरी भावना त्याच्या मनात घर करून राहिल्याने, त्याने सख्ख्या बहिणीला असह्य्य वेदना दिल्या होत्या.

आज तेच 'निळं गंजलेलं' कुलूप गळून पडलं होतं... जणू त्यानेही त्याचा वनवास संपवला होता... त्या निळा कुलुपाकडे पाहून आज सुनिताला तो रंग भेसूर भयानक वाटू लागला होता...


©वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने