जे पेराल तेच उगवेल

© अनुराधा पुष्कर




शालिनी ताईचं घर अगदी भरलेलं होतं .त्यांचा मुलगा राहुल आणि त्याची बायको सीमा, शालिनी ताईंच्या सासूबाई आणि त्यांची नणंद अलका असे गुण्यागोविंदाने राहत होते. घरात राशी आणि राघव अशी दोन नातवंडही होती.

राहुलच्या बाबांनी एका कंपनीत नोकरी करून राहुलला वाढवले होते व आपल्या बहिणीचं म्हणजेच अलकाचं लग्नही एका चांगल्या घरात करून दिलं होतं. पण जेव्हा दोन वर्षांपूर्वी अलकाच्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यात जेव्हा ते ह्या जगातून गेले तेव्हापासून अलका बाई ह्याच घरात राहत होत्या.

अलका बाईना काही मुलबाळ नव्हतं त्यामुळे त्यांच्या सासूबाई त्यांना सतत घालून पाडून बोलत असत आणि त्यांच्या घरी त्यांच्या जावेचा मान थोडा अधिकच होता कारण त्यांना मुलगा होता. एकूणच काय तर अलका बाई ना फक्त नवऱ्याची साथ होती पण आता तीही राहिली नव्हती.

त्यांची ही अवस्था पाहून शालिनी ताईंनी त्यांना आपल्या घरी राहायला या म्हणून सांगितलं.

"शेवटी हेही घर तुमचचं आहे .तुमच्या आई आणि भावाचं आहे. तुम्ही आमच्या सोबत इथेच राहा" असं म्हणून त्यांनीच अलका बाईंना आधार दिला होता.

तसं पाहिलं तर शालिनी बाईंच्या घरची परिस्थिती खूप छान नव्हती पण खाऊन पिऊन सुखी अस सगळं होतं. लहानपणापासूनच राहुल वर योग्य ते संस्कार त्या दोघांनी केले होते. घरात कधी काय कमी आहे किंवा काय दुःख आहे, ह्याची कुणकुण कधीही बाहेरच्यांना लागू दिली नाही अस एकंदरीतच  सुखी कुटुंब होत .

राहुलचं लग्न सीमाशी झालं होत .सीमा मध्यमवर्गीय कुटुंबातील होती त्यामुळे तिला जाणीव होती. तिला माहित होत कि संसाराचा गाडा ओढताना कुठे आणि कसं जमवून घ्यायचं .

सीमा ह्या घरात लग्न होऊन आली तेव्हा तिलाही त्यांनी एवढच सांगितलं कि ,"आपला परिवार एकत्र राहील आणि प्रेमाने राहील एवढच तू बघ ..सुख दुःखात  आपलीच माणसे कामाला येतात ..प्रेमाने माणसं जोडत घे ...आणि हसतमुख राहा ..कधी काही लागलं ,काही नाही पटलं तर नक्की सांग ..नव्या विचारांना आणि गोष्टीना नेहमीच आपल्या घरात स्थान आहे ..हे घर आता तुझंही आहे ..तेव्हा ह्याची काळजी घे ... लक्षात ठेव आपण जे पेरतो तेच उगवतं ....!"-  

राहुल आणि सीमा खुश होते ..सीमा सुद्धा नोकरी करत होती ..वर्षभरातच घरात नवा पाहूणा आला, राघव .

राहुल आणि सीमाचा मुलगा ,शालिनीताईंचा नातू ..त्याच्या  येण्याने घर आनंदाने न्हाहून गेलं.

राघवसाठी काही महिने सीमा घरीच असायची पण मग नंतर पुन्हा तिने नोकरीवर जायला सुरवात केली ...सीमा बऱ्यापैकी सगळं आवरून जायची पण जे काही थोडंफार काम राहत असे ते शालिनीताई नंतर बघून घेत असत ..

अलका बाईंचाही हातभार कामाला लागत असे .शालिनी बाईंना एक माहित होत कि आपली सून आणि मुलगा ह्या घरासाठीच राबत आहेत..त्यामुळे त्याही समंजसपणे सगळ्या जबाबदार्या पार पाडत असत.

शालिनी ताई मृदू स्वभावाच्या होत्या. कधी मुलगा आणि सून ह्यांच्या मध्ये भेदभाव करत नसत. त्यांच्या घरात कधी वाद होताना कोणी पहिले नाही ..एकदा तर समोरच्याकाकूंनी विचारले सुद्धा ,"काय हो तुमची सून सगळं करते का घरचं ?नाही म्हणजे ती नोकरी करते ना.आज कालच्या पोरी बाहेर जाऊन नोकरी करतात आणि घरात मात्र एक काम करत नाहीत ,त्या पवार  बाईंकडे तर रोजच कुरबुर सुरु असते सासू सुनांची ..."-काकू.

"अहो काकू ,कसं आहे ना ही आजची पिढी आहे ..आपण दोन पावलं पुढं आलो तर तेहि आपल्यसाठी दोन पावलं मागे येतात ...आणि आज जसं मी तिच्याशी वागेल तसेच ती उद्या माझ्याशी आणि राघवच्या बायकोशी वागेल ,,नाही का ..हि साखळी अशीच चालू राहील ....आपण जसे करतो तसेच तर भरतो.

माझा मुलगा जसा बाहेर जाऊन कमावतो तसच तीही काम करते मग आम्ही दोघे मिळून काम वाटून घेतो म्हणजे तिलाही तिच्या पद्धतीने करता येतं आणि मलाही .. आपण तिला सन्मानाने वागवलं तर तीही आपला आदर करेल नाही का ..?"-शालिनी ताई ..

शालिनीताई हे एक असं व्यक्तिमत्व होतं कि ज्या आपल्या गोड बोलण्याने आणि मृदू वागण्याने सगळ्यांची मन जिंकून घेत असत.

त्यातच संक्राती निमित्त ह्यावर्षी हळदीकुंकू कसं करायचं त्यासाठी सोसाटीतील बायकांची मीटिंग ठरली ..सगळ्या संक्रांतीचा सण कसा साजरा करायचा हे ठरवायला आल्या होत्या .... एक एक जण बोलू लागली ,काही म्हणाल्या कि ह्यावर्षी असे सण साजरे करू नये  ,काही म्हणाल्या कि काळजी घेऊन जे करायचे ते करा ,पवार बाई म्हणाल्या "अहो काळजी तर घेऊच कि आपण आणि हळदी कुंकू तर झालच पाहिजे सवाष्ण बाईचा मानच आहे तो .."

"हो न आपण आहोत तरी किती जणी ..पटकन उरकून टाकू ...."-चव्हाण बाई 

"मला विचाराल तर ह्यावर्षी आपण नवी सुरवात करू , फक्त सवाष्ण नाही तर सगळ्या बायकांना बोलावू ,नवे वर्ष सुरु झाले आहे .नव्याने सण साजरा करू "-सीमा

"अगं काय बोलतेस ? कसे शक्य आहे ते ?'-चव्हाण बाई  

" का नाही काकू ? संक्रांत हा तिळगुळ देण्याघेण्याचा सण ,गोड बोलण्याचा सण ,सगळ्यांचं तोंड गोड करण्याचा सण मग ह्यामध्ये आपण विधवा बायकांना का सोडावं ?.

त्यांचं मन आनंदित होईल आणि त्याही आपल्यातल्या एक आहे असे त्यानं वाटेल असं आपण का करू नये ? जेव्हा आपण त्यांच्यासमोर त्यांना सोडून एखादा सण साजरा करतो तेव्हा त्यांनाही वाटत असेल ना कि आज आपला पती जिवंत असता तर ..विधवा होणं कोणाच्याहि हातात नसतं ,कोणी हि जाणूनबुजून हि गोष्ट स्वीकारत नाही. आपण त्या व्यक्तीला त्या दुःखातून बाहेर काढण्याऐवजी त्याला ह्या गोष्टीची सतत जाणीव करून देतो कि ती बाई आता विधवा आहे. पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी मानल्या जायच्या पण आता नाही , त्या बाईला आधाराची गरज आहे प्रेमाची गरज आहे आणि आपण असा समाज निर्माण करायला हवा जिथे त्या मोकळेपणाने श्वास घेऊ शकतील .."-सीमा

"बाई ,बाई,बाई अग कित्ती बोलते ... ..अहो शालिनी बाई तुम्ही खूपच मोकळीक दिली हो ..बघा  कशी बोलते ?काही समजवा तिला ..."-पवार  बाई 

"ती बरोबरच बोलते आहे ..मला एक सांगा कि हळद जर खायला चालते ,जंतुनाशक म्हणून जखमेवर लावायला चालते तर ती कपाळाला लावायला का नाही चालणार ? कुंकू हे   शूरतेचं प्रतिक आहे,मांगल्याचे प्रतिक आहे ,शुभ गोष्टींसाठी आहे तर मग जेव्हा एक बाई एकटीने मुलांचा सांभाळ करते ,खंबीर पणे उभी राहते तेव्हा तिला कुंकू लावण्याचा अधिकार का नसावा?

विधवा बाईने हळदीकुंकू लावू नये या मागे कोणतेही शास्त्रीय कारण नाहीय, जे काही आहे ते मानसिक आणि सामाजिक आहे ....तिच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये म्हणून तिने गजरा माळू नये,काजल लावू नये ..असं असेलही पूर्वीच्या काळी पण आज तेच कुंकू तिला बऱ्याच घाणेरड्या नजरेतून वाचवते सुद्धा. ती व्यक्ती गेल्यावर त्याचं आडनाव तर आपण लावतोच न, ते काही आपण सोडत नाही. मग आज आपण जर हे बी पेरलं तरच ते उगवेल.

समाज आपल्या मुळे बनतो ....आपण जर आपल्या मुलांसमोर हे केले तरच ते उद्या आपल्यासाठी हि उभे राहतील ....आपण जर हे सुरु केलं तर उद्या परिस्थिती बदलेल ... आपले सणवार हे सगळं दुःख विसरून आनंदित होण्यासाठी ,मन प्रफुल्लित करण्यासाठी आहेत ....सणांमधे आपण सगळे एकत्र येतो आणि सुख दुःख वाटून घेतो ...त्यामुळेच तर जगण्याला अर्थ आहे.

कोणतीही  बाई स्वतःहून विधवापण ओढून घेत नाही..आपण तिला पुन्हा उभं राहण्यासाठी एक चांगला आणि समजदार समाज उभा करायला हवा नाही का ..?"-शालिनी ताई बोलतच होत्या आणि सगळ्या ऐकत होत्या.

खरंच मैत्रिणींनो ,बरेचदा अशे उत्स्फूर्त विचार आपण ऐकतो ,आपल्याला ते पटतात ,पण आपण ते स्वीकारून त्यावर काम करत नाही ....आपण नेहमी चांगली फळ खातो पण ते फळ लावण्यापासू तर ते वाढवण्यापर्यंत ची काळजी आपण घेत नाही ....आपल्या येणाऱ्या पिढीसाठी जर आपल्याला एक बदललेला समाज हवा असेल तर त्याची पेरणी आज करावी लागेल कारण आपण आज जे पेराल तेच उद्या उगवेल .....!

© अनुराधा पुष्कर

सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...



अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने