स्क्रीप्ट

© धनश्री दाबके


शिल्पा आणि पराग मेहेंदळे, मराठी नाट्य जगतातलं एक यशस्वी जोडपं. एकमेकांना पूरक अशा दोघांच्या कला. पराग एक उत्तम लेखक दिग्दर्शक तर शिल्पा तितकीच उत्तम आणि कसलेली अभिनेत्री. 

परागच्या शब्दांची जादू शिल्पा तिच्या अप्रतिम अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोचवायची त्यामुळे या जोडीची नाटकं प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घ्यायचे. प्रयोग लावला की काही वेळातच हाऊसफुल्ल होऊन जायचा.

कुठल्याशा नाट्य स्पर्धेत परागने शिल्पाला पहिल्यांदा पहिले आणि तिची प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकणाऱ्या जीवंत अभिनयाची क्षमता हेरुन त्याने तिला त्याच्यासाठी काम करशील का म्हणून विचारले. 

एकत्र काम करता करता दोघं प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले. शिल्पाला डोळ्यासमोर ठेवून पराग एक से एक सुंदर नाटकं रचत गेला आणि शिल्पाही त्याच्या तिच्यावरच्या विश्वासाला जागत तिच्या उत्तम अभिनयाने परागच्या नायिका जगत गेली. 

काही वर्षांत दोघं कमालीच्या उंचीवर येऊन पोचले. हळूहळू शिल्पा इतर दिग्दर्शकांकडेही काम करु लागली आणि परागही इतर नायिकां बरोबर काम करु लागला.

दोघं एकाच क्षेत्रात असल्याने एकमेकांना खूप समजून घ्यायचे. सतत त्यांचे स्क्रीप्ट वाचन, तालमी आणि दौरे सुरु असायचे. ऑन स्क्रीन इतकीच दोघांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीही तितकीच स्ट्रॉंग होती. बिझी शेड्युल मधून जसा जमेल तसा एकमेकांसाठी वेळ काढायचे.

आजही शिल्पा जवळजवळ आठवड्याभराने घरी आली होती. आधीचे चार दिवस नागपूर आणि जवळपासच्या गावांत प्रयोग होते आणि नंतरचे दोन दिवस शिल्पा शेगावला तिच्या काकांकडे गेली होती. 

तिच्या काकांच्या घरातच एक दत्तमंदिर होते. वर्षानुवर्षे तिथे दरवर्षी मोठ्याप्रमाणात दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जायचा. सगळे नातेवाईक, मित्रमंडळी इतर वेळी नाही जमले तरी दत्तजयंतीला मात्र आवर्जून दर्शनाला यायचे. 

शिल्पाही लहानपणी आईबाबां बरोबर न चुकता प्रत्येक वर्षी काकांकडे जायचीं. पण जस जशी शिल्पा मोठी झाली तस तसे तिचे जाणे कमी होत गेले. आणि आता नाटकांच्या दौऱ्यांत तर तिल्या गेल्या अनेक वर्षात दत्ताजयंतीसाठी जायला जमलेच नव्हते. 

दरवर्षी काकूचा फोन यायचा आणि पुढच्या वर्षी नक्की म्हणून शिल्पा फोन ठेवायची. 

पण ह्या वर्षी मात्र काकूने फारच आग्रह धरला. 'अगं आता येऊन जाच. आम्ही थकलोय ग आता. कोण जाणे पुढच्या वर्षी असू की नाही ये म्हणायला.' काकूने असं इतकं निर्वाणीचं आमंत्रण केल्याने शिल्पाने ठरवलेच की काहीही झालं तरी यंदा जायचंच. 

लकीली त्या दरम्यान नाटकाचे प्रयोगही नागपूर जवळच लागले आणि शिल्पा अजूनच खुश झाली. ह्यावर्षी दत्तगुरुंच्या दर्शनाचा दांडगा योग दिसतोय या विचाराने घरुन निघाली.

पहिले दोन दिवसाचे प्रयोग झाले आणि रात्री परागचा फोन आला. 

तिची आणि प्रयोगाची चौकशी करुन पराग म्हणाला " शिल्पा एक स्क्रीप्ट लिहून तयार झालंय ग. मला तरी वाटतंय की सॉलिड जमलंय. कधी एकदा तुला ते ऐकवतोय असं झालंय. तुला आणि फक्त तुलाच डोळ्यासमोर ठेवून तर लिहिलंय. त्यामुळे तुझ्याशिवाय दुसरं कोणी त्याला न्याय देऊ शकणारच नाही. 

काल पूर्ण केलं लिहून आणि काय योगायोग आपले कुलकर्णी सर भेटले. ते एका चांगल्या कथानकाच्या शोधात आहे म्हणाले म्हणून त्यांना वाचायला दिले तर त्यांनी लगेच वाचून त्याला ॲप्रूव्हही करुन टाकले. 

ह्या रविवारी पुढचं ठरवायला जायचंय आपल्याला. नंतर त्यांना जमणार नाहीये तर तू तुझी शेगाव भेट कॅन्सल करुन येतेस का घरी लवकर?" 

खरंतर परागने लिहिलेले नवीन नाटक वाचायची उत्सुकता शिल्पाला होतीच पण तिला काका काकूंना बघायची, भेटायची तितकीच प्रबळ इच्छा होती. 

त्यामुळे शिल्पा म्हणाली "अरे फक्त दोनच दिवस थांब. मी ठरवलं आहे तर शेगावला जाऊनच येते. कुलकर्णी सर थांबतील की थोडं आणि नाहीच त्यांना जमलं तर तुझ्या स्क्रीप्टवर अजून कितीतरी प्रोड्यूसर्स उड्या मारत पैसे लावतील. एवढी काय घाई आहे तुला? "

पण तिच्या या बोलण्याने पराग रागावला. शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघांचं वाजलं. 

शिल्पा त्या रागातच शेगावला गेली. परागनेही दोन दिवसांत परत तिला फोन केला नाही आणि तिचा फोन घेतलाही नाही. 

आपल्या निर्णयाने पराग दुखावलाय या विचाराने शिल्पा अस्वस्थ झाली. 

दोन दिवस काकांकडे सगळ्या नातेवाईकांना कितीतरी वर्षांनी भेटली. दत्तजयंतीची पूजा नेहमीप्रमाणेच मोठ्या थाटात पार पडली. इतक्या वर्षांनी शिल्पा भेटल्याने काका काकू खुश झाले. शिल्पा खुशीत वाटली तरी तिचं काहीतरी बिनसलय हे काकूला कळलेच. 

निघतांना काकू म्हणाली " इतकी मोठी अभिनेत्री तू. पण मीही तुझीच काकू आहे बरं. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागचीही अस्वस्थता ओळखता येते मला. काय झालयं ते नाही विचारणार मी तुला. पण एक सांगते, तुमचं नाटकांचे ते स्क्रीप्ट का काहीतरी असतं ना तसं त्या वरच्याकडे आपल्या आयुष्याचं आपल्याला वाचता न येणारं स्क्रीप्ट असतं ग. सगळं त्यानुसारच घडत असतं. तेव्हा जास्त काळजी करु नकोस. आज तुझे इथे येणे निश्चित होते. त्यानुसार तू आलीस. स्वतःसाठी, आमच्यासाठी वेळ काढलास. दत्तगुरुंचे दर्शन घेतलेस. सर्व काही ठीक होईल. नको काळजी करु." काकूच्या बोलण्याने शिल्पा जरा शांत झाली आणि घरी यायला निघाली.

घरी पोचेपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले. 

आधीच लांबचा प्रवास, त्यात परागने एकदाही कुठे पोचलीस, कधी येतेयस ते विचारायलाही फोन केला नव्हता आणि आता घरी आली तर पराग घरातही नव्हता. 

त्यामुळे शिल्पा अजूनच उदास झाली. फ्रेश होऊन तिने स्वतःसाठी कॉफी करुन घेतली आणि निवांतपणे सोफ्यावर बसली. तेव्हा समोर तिला परागने मेसेज लिहून ठेवलेली चिठ्ठी दिसली. 

ज्यावर त्याने लिहिले होते " मी स्वप्ना आणि तिच्या मॅनेजर बरोबर मीटिंगसाठी जातोय. तिकडेच डिनरही असेल. स्वप्नाला नवीन स्क्रीप्ट वाचून दाखवायचं आहे. तिला आवडलं तर पुढचं ठरवण्यात लेट होऊ शकेल. तेव्हा वाट पाहू नकोस."

परागचा मेसेज वाचून शिल्पाला काकू आठवली. 

तुझ्याशिवाय दुसरं कोणीच या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही म्हणणारा पराग फक्त त्याच्या इगोसाठी स्वप्नाला ऑफर द्यायला गेला. म्हणजे तीही एक उत्तम अभिनेत्री आहे. पण परागने ते स्क्रीप्ट माझ्यासाठी लिहिलं होतं ना?  

म्हणजे इतकी वर्ष मी ज्या नायिका रंगवल्या त्या परागच्या स्क्रीप्टमुळे की त्या वरच्याच्या? कोणी कधी कुठे असावं ते तो ठरवतो आणि आपण उगीचच आपल्याशिवाय काही अपूर्ण राहील असा विचार करुन स्वतःला मोठं करुन ठेवतो. 

खरंच जगात आपल्यावाचून काहीच अडत नाही आणि कोणी म्हणजे अगदी कोणीच आपल्यासाठी थांबत नाही. बरं झालं मी माझा ठरलेला प्लॅन बदलला नाही. 

दोन दिवस का होईना ह्या चंदेरी दुनियेपासून दूर राहून स्वतःसाठी जगले. 

आता नेहमी असंच जगायचं हा विचार मनाशी पक्का करुन शिल्पा बसल्या बसल्याच सोफ्यावर मान टाकून झोपून गेली आणि परागने टेबलवर ठेवलेल्या स्क्रीप्टच्या कॉपीची पानं वाऱ्याने फडफडत राहिली.

©️ धनश्री दाबके

📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने