कहाणी भिकीची


© वर्षा पाचारणे



आज भिकीच्या अंगात सणकून ताप भरला होता... एका जुन्या पुलाखाली बाडबिस्तरा घेऊन गेल्या महिन्याभरापासून भिकी, तिचा नवरा आणि दोन पोरं, एवढं कुटुंब रहात होतं. ना पोटाला खायला पोटभर भाकर, ना अंग झाकायला पायभर कपडे, अशी अवस्था.... त्यात आज पावसानं जोर धरला होता.... आधीच अंगात ताप, आन त्यात दोन दिवसापासून खायला काहीच न मिळाल्याने तिला असह्य कणकण जाणवत होती. रात्रभर झोपेत तिची अस्पष्ट बडबड सुरु होती...

पहाटे अचानक एका दारुड्या भिकाऱ्याने भिकिच्या सामानातला चेंबलेला रिकामा हंडा पळवला.... पाणी भरण्यासाठी ते एकमेव साधन शिल्लक असल्याने भिकि कणकण असून देखील त्याच्या मागे धावली.... "ए, मेल्या, आरं कुत्र्या, म्हाग फिर"... म्हणत तिने खाली पडलेला दगड जोरात त्या भिकाऱ्याच्या दिशेने भिरकावला... बबन्या पण तितक्यात जोरात धावत येतोय हे पाहून भिकारी तो हंडा तिथेच फेकून पळून गेला... बबन्याने हंडा उचलून आणला... भिकी मात्र जागच्या जागी मटकन बसली.... तिला आधार देत बबन्याने कसेबसे पुन्हा पुलाखाली आणले.... "म्या तुज्यासाठी चाय आनतू", म्हणत त्याने गोधडी तिच्या अंगावर टाकावी म्हणून उचलली... आधीच ठिगळं निघून लक्तरं झालेल्या त्या गोधडीचा रात्रीच्या पावसानं भिजून कुजट वास येत होता...

बबन्या कोपऱ्यावरच्या टपरीवरून चाय घेऊन आला .... सोबत एक कडक पाव आणला... 'तेवढाच खाऊन तिच्या अंगात थोडी तरी ताकत येईन', म्हणून खिशातल्या शेवटच्या दोन रुपयांना कुरवाळत त्यानं तो पाव आणला... भिकीला पाव देत तो म्हणाला ," भिके, येवढं पाव आन चाय खा... म्हंजी बर वाटल"... तितक्यात लहाना दगडू उठला आणि भीकीच्या हातातला पाव हिसकावत म्हणाला "बरं झालं बा, लय भूक लागली व्हती.. जाग आली तवा तुज्या हातात ह्यो पाव दिसला... आणि मग त्याने भकाभका तो पाव कोरडाच तोंडात कोंबला आणि माय ला म्हणाला," माय, ती चाय तू पी...म्हणत परत जमिनीवर आडवा झाला...

'पोरं बी आपलीच, आन बायकु बी आपलीच... परिस्थितीच बेकार हाय तर दोष द्यायचा तरी कुणाला?'..... असा विचार करत बबन्या भिकीला म्हणाला ,"तू काय आज खेळाला येऊ नगं... आज म्या आन पोरं सारं निस्तरतो... तू वाईस घडीभर हितं पडून ऱ्हा... पण भिकीचं मन थोडंच शांत बसणार होतं... ती कशीबशी साडी नीटनेटकी करून पुन्हा हातात रोजची खेळाची चिनपाटं घेऊन निघाली... अंगात मरगळ होतीच, पण धंदा पण करणं तेवढंच गरजेचं होतं... शेवटी त्या खेळाच्या कलेशिवाय दुसरं काय होतं त्यांच्याकडे? ना हक्काचं घर, ना डोक्यावर छप्पर, ना स्वतःचं म्हणावं असं कुठलं गाव... भटकी जमात ती... पोटाची खळगी भरण्यासाठी लेकरांना नकळत्या वयातच त्यांच्या पारंपारिक खेळाचं शिक्षण देतात... शाळेत जाऊन शिकायचं म्हटलं, तर एका गावात किती दिवस मुक्काम आहे हे त्यांचे त्यांना तरी कुठे ठाऊक असतं...


आठवडी बाजारात आज चांगलीच गर्दी झाली होती. पावसाने थोडी उघडीप घेतली होती. रस्त्याच्या एका कडेला जिथे लोकांचं लक्ष बरोबर खेळाकडे जाईल, अशा ठिकाणी भिकीनं चिनपाटं वाजवायला सुरुवात केली. 

हातातल्या काड्याकुड्यांनी ती त्या चिनपाटांवर बडव बडव बडवत होती... येता जाता एक दोघंजण जरा थांबून खेळ बघत होते.. दगडू आणि शिती येणाऱ्या-जाणाऱ्या पुढे हात पसरून पैसे मागत होते.... लोक दुर्लक्ष करत निघून जात होते. मग दगडू आणि शिती दोरीवरून लोकांना चालून दाखवत होते. त्या दोरीवरून चालताना तोल सांभाळणं किती जिकिरीचं असतं, हे पाहताना लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते... एका चेंबलेल्या ॲल्युमिनियमच्या ताटलीत लोक एखाद-दोन रुपये टाकून जात होते.

बाजारात गर्दी जास्त असल्यामुळे बऱ्यापैकी आज पैसा जमा होऊ लागला होता. थोड्या आणखी कसरती दाखवल्या, तर आजच्या दिवसभरात चांगली कमाई होईल, या आशेने बबन्याने स्वतः एका काठीवर उभे राहात, खांद्यावर दगडूला बसवले... पण बबन्याला ती काठीवरची कसरत करण्याचा प्रकार नीट जमत नसल्याने, शेवटी भिकी त्याला म्हणाली ,"धनी, तुम्ही असं करा, तुम्ही हितं हे चिनपाट बडवा... मी त्या काठीवर चढतोया"... "अगं, पण तुला अंगात ताप हाये नवं... मग पडली बिडली चक्कर येऊन तर केवढ्याला पडल"... त्याने असं म्हणताच भिकी म्हणाली ,"न्हाई जी, येवढी कसरत करतो आणि मग जाऊया की घरला"...

भिकी स्वतःचा तोल सावरत, त्या एका काठीवर उभी रहात तिने खांद्यावर दगडूला बसवलं आणि एका हाताने शितिला पकडलं. आता बऱ्यापैकी गर्दी जमा झाली होती. तसा बबन्या पण जोशात येत मोठमोठ्याने ओरडू लागला ,"आओ खेले देखो... खेल देखो... मेरा बच्चा लोग अभी कसरत दिखायेगा... मेरा बच्चा लोग अभी कसरत दिखायेगा"...... आभाळात परत आता थोडीफार काळ्या ढगांची गर्दी दाटू लागली होती... एवढा खेळ करून घरी आज निदान पोटाला पोटभर जेवण मिळणार, या खुशीत ते कुटुंब मोठ्या उत्साहानं खेळ करू लागलं .पावसाच्या रिमझिम सरी बरसत होत्या. लोक छत्री घेऊन त्यांचा खेळ उत्साहाने बघत होते. कोणी जमेल तसे पाच दहा रुपये टाकत होते. खुळखुळणाऱ्या नाण्यांपेक्षा आज कितीतरी दिवसांनी त्या ताटलीत नोटांचा भार वाढू लागला होता...

आता पावसाने चांगलाच जोर धरला आणि एका क्षणात भिकी दगडू आणि शितीला घेऊन सरकन् त्या काठीवरून खाली पडली. शितीच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. तर दगडू निपचित डोळे मिटून पडला होता.... घडला प्रकार लोक कॅमेऱ्यात कैद करून पाहत होते, परंतु या सुशिक्षित म्हणवणाऱ्या निर्बुद्ध समाजात एकालाही त्यादिवशी भिकी अन् बबन्याच्या लेकरांची दया आली नाही. भिकी हंबरून हंबरून रडत होती. "माझ्या लेकरांना दवाखान्यात घेऊन चला".... "ताई माझ्या पोराला काय झालं वो असं".... म्हणत ती धाय मोकलून रडत होती. बघता बघता गर्दी पांगली. संध्याकाळची वेळ होती. आधीच मुसळधार पाऊस, त्यात लेकराच्या डोक्यातून वाहणारी रक्ताची धार... दोन्ही न थांबणार होतं... त्यातच बबन्या येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षाला हात करत "माझ्या पोरांना दवाखान्यात न्यायचं", म्हणून रस्त्यात आडवा येत होता, परंतु कुठलाच रिक्षावाला त्यादिवशी त्याला न जुमानता सरळ निघून जात होता...


शेवटी भिकीनी आपल्या पदराचा तुकडा टारssकन फाडला आन शितीच्या डोक्याला बांधला... बबन्यानी दगडूला कडेवर उचलून घेतलं आणि भिकीला म्हणाला "तुला जमल का ग शितीला उचलायला... आपण कसंबी करून इस्पितळ गाठू... आन लेकरांना डागदरला दाखवू"... समोर लेकरं अशी निपचित पडलेली असताना कुठली आई शांत बसेल. भिकीने पण पटकन शितीला उचललं आणि दोघं पण रस्त्याने जमलं त्या वेगाने धावू लागले... समोरून गाड्या येताएत, आपल्या जीवाचे काहीतरी होऊ शकतं, याचं भानही त्यांना राहिलं नव्हतं. ते सुसाट वेगाने रस्त्याच्या आजूबाजूला कुठे दवाखाना दिसतोय का? हे शोधत धावत होते...


लेकरांना दवाखान्यात भरती केलं गेलं... डोंबाऱ्याचा खेळ करणारे हे लोक कलावंत... त्यांच्याकडे कुठला आलाय पैसा? पण डॉक्टरांनी मात्र त्यादिवशी माणुसकी दाखवली. एकंही पैसा न घेता त्यांनी दगडू आणि शितीला उपचार दिले.. दुसर्‍या दिवशी दोन्ही लेकरं शुद्धीवर आली... बबन्या आणि भिकी दवाखान्याच्या एका कोपऱ्यात कालपासून सुन्न अवस्थेत बसून होते... दवाखान्यातल्या नर्सने किती तरी वेळा येऊन त्यांना खाणं देण्याचा प्रयत्न केला... परंतु 'जिथं जगणंच थांबु पाहत होतं, तिथं खाण्यापिण्याची कसली आलीय इच्छा'... दवाखान्यातील गणपती बाप्पा पुढे हात जोडत दोघंही अश्रू ढाळत लेकरांच्या बरं होण्याची वाट पाहत होते...

"तुम्ही तुमच्या मुलांना हवं तर सरकारी शाळेत घाला, आश्रम शाळेत ठेवा... पण हे असले जीवघेणे खेळ करायला लावू नका. आज त्यांच्या जीवावर बेतलं होतं... देवाच्या कृपेने आज तुमची दोन्ही मुलं वाचली आहेत, पण भविष्यात प्रत्येक वेळी नशीब साथ देईल असं नाही"... असं डॉक्टरीणबाई बबन्याला सांगत होत्या... पण हाताला काहीच काम नसताना ह्या असल्या जीवघेण्या कसरती करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय तरी कुठला होता.

लेकरं बरी झाली. दवाखान्यातून बाहेर पडताना बबन्याने डॉक्टर आणि डॉक्टरिणबाईंना साक्षात दंडवत घालून त्यांच्या पायांवर अश्रूंचा अभिषेक केला. "आज तुम्ही नसता, तर मी माझ्या लेकरांना कवाच मुकलो असतो"... म्हणत तो शर्टाच्या बाहीने तोंड पुसत होता... "देव म्हंजी काय, हे आज म्या तुमच्यात पाहिलं"... दवाखान्यातून बाहेर पडताना मात्र भिकी आणि बबन्याने स्वतःच्या मनाशी एक खूणगाठ बांधली,' आपल्या या दरिद्री जगण्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जे काही कष्ट पडतील, ते आपण उपसू... पण यापुढे लेकरांना काही बी करून या असल्या कसरती करू द्यायच्या नाय'...

बबन्या अन भिकी लेकरांना घेऊन परत पुलाखाली निघाले होते. पण आज लांबून बघताना नेहमीच्या परिसरात प्रचंड गर्दी दिसत होती. 'काय झालं असेल?' या विचाराने ते आणखी पुढे गेले.... नशिबात घर तर नव्हतंच, पण ज्या पुलाखाली ते रहायचे तो पूलही दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे पडला होता... तिथे त्या पुलाचा कोसळलेला भाग उचलण्याचं काम सुरू होतं... त्या उद्वस्त फुलाकडे बघताना आज मात्र अश्रू आटले होते. त्या पुलाखाली तिचा तोडका-मोडका संसारही गाडला गेला होता.... 

दारुड्या भिकाऱ्याच्या हातातून कसाबसा मिळवलेला तो त्या दिवशीचा 'चेंबलेला हंडा', आज त्या पुलाखाली दगडा दुगडांच्या राड्यात जमीनदोस्त झाला होता. जमेची बाजू एकच होती की, 'जरी संसार गाडला गेला असला, तरी जीव वाचला होता'...... एका दरिद्री जोडप्याच्या जगण्याची पुन्हा एकदा नियतीने खिल्ली उडवली होती. एक पुन्हा नवा प्रवास करणं नशिबात होतं. एक पुन्हा नवी जागा शोधावी लागणार होती. आणि पुन्हा एका नव्या गावात असेच कसरतीचे खेळ करत तीच ईतभर पोटाची खळगी भरावी लागणार होती.या साऱ्यातून कधी सुटका होईल हे अनुत्तरीत होतं...परंतु त्या गावातील दगडू आणि शितीच्या जीवावर बेतलेलं संकट मात्र तिच्या मनाच्या गाभाऱ्यात आयुष्यभरासाठी कोरलं गेलं होतं... आज डोक्यात ढिगभर विचार अन् पाठीवर फाटकं गाठोडे घेऊन पुन्हा नव्या रस्त्याला ते बिऱ्हाड चालू लागलं...


त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघताना वाटलं 'आपल्यासारखे सुशिक्षित म्हणवणारे लोक मात्र जणू निर्जीव असल्यासारखे वागत असतात'... इन मिन दोन चार रुपयांसाठी ते स्वतःचा जीव धोक्यात घालत जी लोककला सादर करतात तशाच रोप क्लाइंबिंग, ॲडव्हेंचरस गेम्सच्या नावाखाली आपण आपल्या मुलांना हजारो रुपये खर्च करत समर कॅम्पला पाठवतो... परंतु ज्यावेळी तेच लोककलावंत त्यांची अशी दर्जेदार कला, रस्त्यावर सादर करत असतात, तेव्हा मात्र आपल्यासारखे बघे केवळ मोबाईलमध्ये शूटिंग करण्यात दंग झालेले असतात... कदाचित माणुसकीला काळीमा फासणारी आपल्यासारखी कितीतरी मंडळी आजूबाजूला भेटतील, परंतु क्वचितप्रसंगी या भिकी आणि बबन्याच्या दारिद्र्याची थोडीशी दखल घेत आपल्या खिशाला हात घालावा, अन् कधीतरी त्यांच्या लेकरांसाठी आपल्यातला दाता जागवावा...


© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने