असे पाहूणे येती

© सौ.वैशाली प्रदीप जोशी



"अतिथी देवो भव " अशी म्हण आहे आपल्याकडे आणि ती सार्थदेखील आहे.

मला तर कुणाकडे पाहुणे म्हणून जायचं किंवा पाहुण्यांना आपल्याकडे बोलवायला जाम आवडतं...

"अतिथी हा देव असतो" हे जरी खरं असलं तरी कुणाकडे पाहुणे म्हणून जाताना काही प्रोटोकॉल अवश्य पाळायला हवेत जेणेकरून यजमानांना पाहुणचार करण्यात आनंद मिळेल आणि पाहूणे त्रासदायक होणार नाहीत.

आजकाल जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहेत त्यामुळे एकमेकांशी संपर्क साधणं अवघड राहिलेलं नाही... आपल्या येण्याची सूचना कार्यक्रम ठरल्यावेळीच यजमानांना देणं गरजेचं आहे. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपल्या येण्याची आगाऊ सूचना असेल तर यजमानांना व्यवस्था करणे सोपे होते.

येण्याची सूचना देताना साधारण किती जण येणार आणि किती दिवसांसाठी येणार ह्याची एक सामान्य सूचना देणे अगत्याचे आहे... तसेच यजमानांना काही अडचण तर नाही ना याचाही अंदाज घ्यायला हवा.

तसंच कुणाकडे पाहुणे म्हणून जाताना त्यांच्या मुलांच्या परीक्षा, घरच्या स्त्रीची तब्येत, आणि ते देऊ शकत असलेला वेळ ह्याचा विचार प्राधान्यानं करायला हवा.

आता हेच पहा ना...

वंदनाकडे तिची नणंद मंगलताई राहायला आलीये आठ दिवसांसाठी. वास्तविक वंदनाची तब्येत बरी नाहीये काही दिवसांपासून आणि अशक्तपणा आहेच अंगात. त्यात कामवाली बाई रजेवर.

पण नणंदबाई त्या...माहेरपणाला येणारेत....त्यांना नाही कसं म्हणणार ...तरीही वंदनानं नवऱ्याकरवी आपल्या आजारपणाची कल्पना देऊन ठेवलेली तिला.

पण तरीही येण्याचा निर्णय घेतलाच ताईनं आणि ठरवल्याप्रमाणे आलीदेखील..

भावाकडे आल्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगलताईनं वंदनाला बोलावून घरातल्या सगळ्या धूळभरल्या जागा दाखवल्या अन् अस्ताव्यस्त पसरलेले कपाटही. वर घर कसं स्वच्छ ठेवावं ह्याच्या टिप्सदेखील दिल्या.

वंदनाला मेल्याहून मेल्यासारखं झालं.. आजारपणामुळे घराकडे अक्षम्य दुर्लक्ष होतच होतं तिचं... पण स्वतःची तब्येत आणि कुटुंबाला तीन वेळा जेऊ घालणे ही प्रायोरिटी समजून बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवलेल्या तिनं.

एरवी नणंदबाई येणार म्हटलं की निगुतीने आणि व्यवस्थीशीर स्वागत करणारी वंदना खजील झालीच. वास्तविक ह्या परिस्थितीत पाहुण्यांना अटेंड करायचीही मानसिकता नव्हतीच तिची. पण नणंदबाईंचा हा अनुभव वंदनाला दुखावून गेला.

जर अगदी छोटा मुक्काम असेल किंवा तिथे जाणं अत्यावश्यक असेल तर ह्या गोष्टी बघण्याची तेव्हढी गरज नाही परंतु सहज म्हणून जात असू किंवा जाण्याची वेळ अड्जस्ट करता येण्यासारखी असेल तर ह्या गोष्टी विचारात घ्यायलाच हव्या..

जेथे घरातील नवरा-बायको प्रामुख्याने घरातील स्त्री कामानिमित्त बाहेर जाते तिथे जाताना शक्यतो तिच्या सुट्टीचा दिवस निवडला तर फारच उत्तम. 

सुट्टीच्या दिवशी घरातील मंडळी पाहुण्यांना उत्तम रीतीने अटेंड करू शकतात.

पण बरेचदा घरातल्या स्त्रीचा convinience न पाहता घरी पाहूणे येऊन धडकतात अश्यावेळी नोकरदार गृहिणीची फार धावपळ होते.

पाहुणेमंडळींनी घरच्या स्त्रीला जेवण वाढणे, मागचे आवरणे ह्यामध्ये मदत करणे अपेक्षित असते... मग ती जाऊ असो, भावजय असो, बहीण किंवा नणंद.... सगळ्यांनी मिळून कामे उरकली तर सगळ्यांना मिळून गप्पा करता येतात.

पाहुणे मंडळींपैकी कुणाला उपवास असेल, एखादं पथ्य असेल किंवा काही ऍलर्जी असेल तर तशी कल्पना घरच्या गृहिणीला द्यायला हवी.

सासरचे नातेवाईक आले तरी त्यांनी सुनेला त्यांच्यात सहभागी करून घेणं तितकंच आवश्यक आहे नाहीतर बऱ्याच ठिकाणी भाऊ-बहीण-आई ह्यांचे गप्पांचे फड रंगतात आणि सून फक्त स्वैपाक करणे आणि चहा देणे ह्यातच गुंतून पडते. 

मग असे सासरचे पाहूणे सुनेला नकोसे होतात.

तसंच आलेल्या पाहुण्यांनी यजमानांच्या कुटुंबियांची आस्थेनं चौकशी जरूर करावी.. घरातल्या स्त्रीच्या माहेरच्या मंडळींची तसेच घरातील ज्येष्ठ मंडळींची आपुलकीने विचारपूस करावी. त्यामुळे पाहुण्यांबद्दल जिव्हाळा वाढतो.

पाहूणेमंडळींनी आपलं सामान जसं की टॉवेल, स्कार्फ,घरात वापरायचे कपडे आपले आपण आणावेत आणि आपले आपण वापरावेत.

म्हणजे पुरुषांनी पायजामा, बर्मुडा, लुंगी आणि स्त्रियांनी पेटीकोट, लेगिन्स... म्हणजे मागण्याची वेळ येणार नाही आणि यजमान मंडळींना द्यावे की नको असा पेच पडणार नाही..

तसंही हे कपडे आणि वस्तू इतरांच्या वापरूच नयेत. ते आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य आहे.

घरी जास्त लोक असतील तर बरेचदा स्वैपाकाचा अंदाज बिघडतो... आणि अन्न उरतं... दुसरे दिवशी शिळ्या अन्नाची विल्हेवाट लावणं जिकिरीचं वाटतं कारण एव्हढ्या मेहनतीनं बनवलेलं अन्न टाकवत नाही. 

अश्यावेळी पाहुणेमंडळींनी (त्यातल्या त्यात सुदृढ आणि तरुण मंडळींनी ) घरच्या लोकांसोबत उरलेलं अन्न खाण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. ह्यामुळे अन्न उरलंच तर ते संपवण्याची जबाबदारी फक्त घरच्यांवर येणार नाही.

आमच्या सुषमाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत तिचे दोन्ही भाऊ-वहिनी आणि भाचेकंपनी राहायला आलेत... सुषमानं कुणालाही काम करायला नको म्हणून दोन्ही वेळच्या स्वैपाकाला बाई सांगितलीय.

स्वैपाकीण बाईंनी सकाळी अकरा वाजताच सगळा स्वैपाक करून ठेवलाय ...साडे अकरा वाजता धाकट्या भावाच्या डोक्यात कल्पना आलीये तो चटकन बाहेर गेला अन् सगळयांसाठी बटर चिकनचं पार्सल घेऊन आला.

सुषमानं डोक्यावर हात मारून घेतला कारण आता नॉनव्हेज म्हटल्यावर घरच्या वांग्याच्या भाजीला कोणीही वाली नाही.. 

तिनं म्हटलंदेखील की "भाजी विकत आणणार हे सांगितलं असतं तर घरी नसती बनवली... आता वाया जाईल.." तर "कित्ती बोअरिंग गं तू आत्या" म्हणत भाच्यांनी नाक मुरडलं. सगळं आनंदानं करणाऱ्या सुषमाचा मूडच गेला.


प्रत्येक घरातील देवघर आणि देवपूजा ह्याबाबतीतल्या पद्धती वेगळ्या असतात त्याचा आदर करावा. माझं मत ह्याबाबतीत जरा कठोर वाटेल पण देवघर आणि देवपूजा हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि अतिशय खाजगी प्रश्न आहे असं मला वाटतं. 

त्यामुळे आलेल्या पाहुणेमंडळींनी त्या घरच्या देव आणि देवपूजा ह्यात शक्यतो लुडबूड करूच नये. काहीजण यजमानांची संमती न घेताच घरातील देवपूजेचा ताबा घेतात ते चुकीचे आहे असं मला वाटतं.

बरेचदा पाहुणे म्हणून गेलेल्या स्त्रियांची व्रत-वैकल्य असतात आणि पूजेचा-नैवेद्याचा सगळा घाट यजमानांच्या घरी घातल्या जातो. शक्यतो फार मोठ्या किंवा जास्त तयारी लागणाऱ्या पूजा असतील आणि पूजा न करून चालतच नसेल तर त्याकाळात कुणाकडे जाऊच नये..

सुनंदाकडे तिची आत्येसासू पाहुणे म्हणून आलीये.. वास्तविक तेव्हा सुनंदा MBA च्या परीक्षेची तयारी करत होती अन् परीक्षा अगदी तोंडावर आलेली.

पण आलेल्या पाहुण्यांना नाही म्हणताच आलं नाही सुनंदाच्या घरच्यांना... आणि एकट्याच तर आहेत आत्या, मी सांभाळून घेईन म्हणून सासूबाईंनी तयारी दाखवली..

पण नेमकंच तेव्हा आत्याबाईंचं कुठलं तरी व्रत आलेलं. मग आत्याबाईच्या व्रतपूजेची तयारी , फुलं-पत्री-दुर्वा तोडणं, सोवळ्यात नैवेद्य बनवणं, त्यांना स्कुटीवर बसवून मंदिरात दर्शनाला नेणं सगळं सुनंदालाच करावं लागलं... 

ह्यात तिच्या अभ्यासाचं बरंच नुकसान झालं... बरं बोलून दाखवलं तर "ह्या वयात घर सांभाळावं, अभ्यासाची कसली थेरं!" अशी मुक्ताफळं सुनंदालाच ऐकायला लागली.

खरंतर अश्या प्रसंगी मानसपूजेचा पर्याय उत्तम आणि शास्त्रसिद्ध आहे... शक्यतो आपल्या व्रतवैकल्यांमुळे यजमानांची गैरसोय होणार नाही ह्याची दक्षता घेणे महत्वाचे आहेच ना !

आपण जिथे पाहुणे म्हणून जाणार असू तिथे यजमानांनी आपल्या आदरातिथ्यासाठी नक्कीच काही नियोजन केलेले असते. पाहूणे मंडळींनी त्याचा मनमुराद आनंद घ्यावा... पण काही पाहुणे मंडळींना त्यात बदल करून वेगवेगळ्या फर्माईशी करण्याची वाईट खोड असते.

म्हणजे पाहूणेमंडळींना बगीच्यात नेणे आणि भेळ-आईस्क्रीम खाणे असा बेत ठरवला असेल तर पाहुणेमंडळींपैकी कुणीतरी सिनेमाचा हट्ट करतो अन् पाहुणचाराला श्रीखंडाचा बेत असेल तर एखादा पाहुणा बासुंदी करा म्हणून आग्रह धरतो ! 

ह्यामुळे कार्यक्रम आखणाऱ्या यजमानांचा विरस होऊ शकतो आणि वेळेवर दुसरी व्यवस्था करताना गैरसोय आणि आर्थिक नुकसानही...


मला वाटतं की आपल्या आवडीचे/स्टाईलचे पदार्थ आपण आपल्या घरी नेहमीच खातो तेव्हा पाहुण्यांनी यजमानांच्या आतिथ्याचा मान ठेवून त्यांच्या नियोजित कार्यक्रमात सहभागी व्हावे.

मंजिरी तिच्या नवरा-मुलांसह नणंदेकडे भाऊबीजेला गेली. नणंदेकडे तिचे सासूसासरे, दीर-नणंदा आणि त्यांची मुलं सगळीच आलेली. सगळ्यांसाठी नाश्त्याला गरम चकल्यांचा बेत होता.पण मंजिरीनं मात्र तिच्या नवऱ्यासाठी चकली बोअर झाली म्हणून उपमा करायलाच लावला.

एखाद्याला पथ्य असेल, त्रास होत असेल, ऍलर्जी असेल तर वेगळं काही बनवून देणं हा भाग निराळा.

आजकाल प्रत्येक घरी एक-दोन मुलं असतात आणि साहजिक त्यांचे सगळे लाड पुरवल्या जातात. पण कुठेही पाहुणे म्हणून गेल्यावर किंवा आपल्या घरी पाहुणे आल्यावर पंक्तीप्रपंच होऊ नये असं मला वाटतं.

पाहुणे म्हटलं की देणं-घेणं आलंच... आणि देणं घेणं हे बऱ्याच रुसव्याफुगव्याचं मूळ आहे. येणारे पाहुणे भाडं खर्च करून आलेले असतात तर यजमानांनादेखील पाहुण्यांच्या आतिथ्यासाठी काही खर्च लागतोच.. 

अश्यावेळी फार देण्याघेण्याची अपेक्षा दोघांनीही ठेवू नये... फक्त आपसातल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून थोडया प्रमाणात देणं घेणं चालू शकतं.

मी स्वतः आलेल्या पाहुण्यांना छोटी भेटवस्तू हमखास देते आणि पाहुणी माहेरवाशीण असेल तर आवर्जून ओटीदेखील भरतेच... 

मग त्या आत्येसासू असो, नणंद असो की पुतणी... माहेरवाशीणीची ओटी भरल्यानं पुण्य मिळतं की काय ते माहित नाही पण मनाला समाधान मात्र नक्कीच मिळतं आणि माहेरवाशिणीला तिचं माहेर कायम असल्याची खात्री!

भेटवस्तू देताना एक गोष्ट आवर्जून करावी ते म्हणजे आपण कुणाकडे बरेच दिवस राहणार असू तर त्यांच्याकडे असणाऱ्या मदतनीसांना काही छोटी भेटवस्तू देता आली तर नक्कीच द्यावी.

कारण आपले आतिथ्य उत्तम होण्यासाठी त्यांनीही मेहनत घेतलेली असते.. यजमान त्यांच्या मदतनीसांना जास्तीच्या कामाचे पैसे देत असतातच पण आपल्याकडून एखादी छोटीशी भेट त्यांचा उत्साह वाढवू शकते.

पाहूणे म्हणून कुणाकडे जाणे किंवा आपल्याकडे पाहुणे येणे हा अतिशय आनंदाचा प्रसंग असतो. त्यामुळे आपसातील प्रेमबंध घट्ट होतात.

आपण कुणाकडे पाहूणे म्हणून जाणं ही एक सुखद स्मृती रहावी असं वाटत असेल तर एव्हढी काळजी तर घ्यायलाच हवी ना!


तुम्हांला काय वाटतं?

©सौ.वैशाली प्रदीप जोशी

सदर लेख लेखिका सौ.वैशाली प्रदीप जोशी यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने