अगबाई आजीबाई

© धनश्री दाबके




आज कधी नव्हे ते सुमीत आणि मेधा संध्याकाळी ऑफिसमधून एकत्र घरी आले. दोघांचेही चेहेरे आनंदाने अगदी फुलून गेले होते.

ते आले तेव्हा आरती तिच्या मैत्रीणींबरोबर त्यांच्या कॉम्प्लेक्सच्या गार्डनमधे खालीच बसली होती. 

त्यांना पाहून आरती आश्चर्याने म्हणाली “ अगबाई आज जोडी एकत्र आलीये आणि तीही इतक्या लवकर. म्हणजे काहीतरी खास दिसतंय. चला ग बयांनो, मी पळते आता घरी. 

दोघांनाही आल्याआल्या चहा लागतो. दिवसभर थकून जातात बिचारी पोरं. घरी आल्यावर आयता चहा हातात मिळाला की खुश होतात. मग मी आणि अशोक चक्कर मारायला बाहेर जायला मोकळे. 

तेवढाच जरा दोघांना त्यांचा त्यांचा वेळ मिळावा म्हणून. तसं नविनच लग्न आहे त्यांच. दिवसभराचा दुरावाही खूप वाटतो हल्ली त्यांना. त्यामुळे त्यांना शक्य तितका एकांत द्यायचा प्रयत्न असतो आमच्या दोघांचा. चलो बाय. भेटू उद्या.” असं म्हणून आरती घरी जायला निघाली.

ती घरी आली तर दोघंही तिची वाटच बघत होते.

“आई, बरं झालं ग लगेच आलीस. तुझीच वाट बघत होतो. आत्ताच बाबांना म्हंटलं की आईला फोन करतो म्हणून पण ते म्हणाले की अरे तुम्हाला पाहून ती येतच असेल वरती.” सुमीत आरतीने घरात पाऊल टाकल्या टाकल्या म्हणाला.

“ अरे हो हो. किती घाई तुला. आणि आज काय स्पेशल आहे की काय काही? दोघं एकत्र आलात. तेही इतक्या लवकर?’

आरतीने असं विचारताच सुमीतने हसून मेधाकडे पाहिले. त्याच्याशी नजर मिळताच मेधा अगदी गोड हसली. त्यांच्यातल्या नजरेतल्या भाषेची आरतीला अगदी गम्मत वाटली.

“ आई, सांगतो. तू आधी बस इथे, बाबा तुम्हीही बसा इथे आईजवळ. मेधा तो पेढ्यांचा बॉक्स आण ना”

मग मेधा पेढ्यांचा बॉक्स घेऊन आली आणि तो आरतीच्या हातात देत , “आईबाबा तुम्हाला आता आजी आजोबा म्हणून प्रमोट करतोय आम्ही” असं म्हणून दोघही नमस्कारासाठी वाकले.

दोघांनी दिलेल्या या बातमीने आरती आणि अशोक अगदी आनंदून गेले. आपला लाडका लेक कित्ती मोठा झाला या विचाराने दोघांचे डोळे पाणावले.

आता घरात परत बाळाचे बोबडे बोल ऐकू येणार या आनंदाने मुळातच लहान मुलांची खूप आवड असलेल्या अशोकला तर आभाळ ठेंगणे वाटू लागले. 

“ अरे वा वा वा. काय सांगतोयस काय” म्हणत त्याने सुमीतला घट्ट मिठी मारली.

आरती देवासमोर पेढे ठेवून नमस्कार करायला गेली.

मागच्याच वर्षी म्हणजे आरतीच्या जेमतेम ४८ व्या वाढदिवसाच्या दिवशी सुमीतचे लग्न झाले होते.

'वाटत नाही ग आरती तुला एवढा मोठा मुलगा असेल' असं म्हणणारे आता 'ही तुझी सून वाटतच नाही ग' म्हणायला लागले होते. आणि त्याला कारणही तसेच होते.

नियमित योगा, प्राणायाम आणि हेल्दी फूडचा आग्रह धरणारी आरती स्वभावानेही खूप गोड होती. 

तिची मेन्टेन केलेली फिगर आणि तितकाच आनंदी व उत्साही स्वभाव. ह्या दोन्हीमुळे आरतीचे खरे वय समोरच्याला समजूनच यायचे नाही.

FY ला असल्यापासूनच आरतीने छोट्या मोठ्या नोकऱ्या करायला सुरुवात केली होती. त्यामुळे ग्रॅज्युएट झाल्यावर तिला लगेचच चांगली नोकरी लागली आणि वर्षभरातच तिच्या आयुष्यात नवरोबांचे म्हणजे अशोकचे आगमन झाले.

आई बाबांनी आपले लग्न जरा जास्तच लवकर केले असं वाटत असतांनाच सुमीतच्या येण्याची चाहूल देखील लागली आणि मग तर आरतीचे आयुष्य फुल स्पीडमधे धावायला लागले.

बघता बघता सुमीत मोठा झाला आणि कॉलेजलाही जायला लागला.

सुमीतच्या लग्नाचा विचारही आरती आणि अशोकच्या ध्यानीमनी नसतांना सुमीतने त्याचे शाळेपासूनची मैत्रीण असलेल्या मेधावर प्रेम आहे हे जाहीर केले.

एकमेकांना अनुरुप असलेल्या सुमीत आणि मेधाचा जोडा नाकारण्यासारखा नव्हताच. त्यामुळे दोन्हीकडून होकार मिळाला आणि डीग्री घेऊन नोकरी लागताच दोघांचे शुभमंगल होऊन आरती पन्नाशीच्या आधीच सासूबाईही झाली.

तशा आरतीच्या एक दोन मैत्रीणींना जावई आले होते पण सून आणणारी आरती गृपमधली यंगेस्ट सासू होती. आता तर यंगेस्ट आजी होणार होती.

खरंतर आरतीवर सुमीत नंतर इतक्या वर्षांत कधी परत लहान बाळाला सांभाळायची वेळच आली नव्हती कधी. त्यामुळे आजीकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे तिला दडपणच आले होते जरा.

आजी म्हंटले की कशी बाळाला अंगाई म्हणत झोपवणारी , बडबडगीतांनी खेळवणारी, छान छान गोष्टी सांगणारी, स्त्रोत्र आणि श्लोक शिकवणारी, अभंग वगैरे म्हणू शकणारी, लाडू, वड्या करणारी एक प्रेमळ व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते.

आरती प्रेमळ तर होती पण लहान मुलांची गाणी, गोष्टी, अभंग ह्या सगळ्यात तिला अजिबात गती नव्हती. तिला आजकालची ढिन्चॅक गाणी मात्र आवडायची.

कधी कधी सुमीत म्हणायचाही आई ही गाणी तर मीही नाही ऐकत ग. तसंच फार देव देव करण्याचाही स्वभाव नव्हता तिचा आणि फारशी स्त्रोत्र वगैरेही पाठ नव्हती.

स्वैपाक उत्तम करायची. अगदी पंजाबी, चायनीज, इटालियन फूडही चांगले जमायचे. पण लाडू, वड्या हे आजी स्पेशल असलेले पदार्थ मात्र खूप प्रयत्न करूनही जमायचे नाहीत.

त्यामुळे ह्या आजीच्या रोल मधे आपण कुठल्याच ॲंगलने फिट बसत नाही असं आरतीला हल्ली सारखं वाटायचं.

सुमीतचं लग्न झाल्यावर हे तर होणारच होतं पण तरीही इतक्या लवकर ह्या मुलांनी मला आज्जी बनवावं? अजून असं कितीसं वय आहे रे माझं.

कधी कधी मनात सतत रेंगाळणार्‍या ह्या विचारांमुळे आरती स्वप्नात स्वतःला सगळ्यांना ' मुझे आज्जी मत कहो ना' असं सांगाताना पाहायची आणि जाग आल्यावर स्वतःवरच हसायची.

शेवटी मेधाचे दिवस भरत आले आणि आरतीची आजी होण्याची घटिका समीप आली.

योग्य वेळ येताच मेधाची डिलिव्हरी सुखरूप पार पडली. तिने एका गोड मुलीला जन्म दिला. लगेचच आरती आणि अशोक दवाखान्यात नातीला पाहायला पोचले.

त्या इवल्याश्या, गोडुल्या परीला पाहून आरतीचे डोळे भरुन आले आणि दडपण बिडपण क्षणात दूर झाले.

आपल्या अंशांचा अंश हातात घेतल्यावर नातवडांना दुधावरची साय का म्हणत असावे ते आरतीला जाणवले.

मेधाला आणि त्या छोट्या सोनुलीला भेटून घरी आली तरी आरतीला तिचे गोबरे गोबरे मऊ गाल, नाजूक ओठ आणि बंद केलेल्या छोट्या मुठीच सारख्या आठवत होत्या.

त्या गोड, नाजूक जीवाला सोडून लांब राहूच नये असं वाटत होतं. कधी एकदा मेधा आईकडून बाळांतपण आटोपून घरी येतेय असं झालं होतं.

रात्री झोपतांना आरती अशोकला म्हणाली " उद्या ना मी माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना वाटण्यासाठी बर्फी तर नेणार आहेच पण बर्फीबरोबरच VRS साठीचा अर्जही देऊन टाकते. बास झालं आता माझं हे वर्षानुवर्षांचं नोकरीच्या मागे धावणं. आता पूर्ण वेळ आपल्या नातीसाठी द्यायचाय मला.

सुमीतला नाही पाहाता आलं पण ह्या सोनुलीला मोठं होतांना बघायचंय. तिच्या बाळलीला इतर कुठल्याही व्यापाशिवाय एंजॉय करायच्यात."

अशोकने काही म्हणायचा प्रश्नच नव्हता कारण त्याचीही अवस्था अशीच काहीशी झालेली होती. त्यामुळे त्यानी लगेच हसून दुजोरा दिला. 

आणि " आज्जी मत कहो ना" म्हणणारी आरती आजीबाईंच्या रोलमधे घुसत नातीच्या स्वागतासाठी सज्ज झाली.

समाप्त

©  धनश्री दाबके

📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने