डोहाळे


©कांचन सातपुते हिरण्या




“मंदाकाकू, थोड्यावेळाने पाठवाल का हो स्मिताला कामं आवरली की ? गोड शिरा केलाय आणि कांदाभजी. तिला आवडतं ना खूप ." गौरी घाईत सांगून गेली.

स्मितानं हळूच सोफ्यात बसलेल्या सासूबाईंकडे पाहिलं. 

सासूबाईंनी गौरीची पाठ वळताच स्मिताला सुनावलं, “एवढीच इच्छा झाली असेल खायची तर घरात करून खायचं ना , लोकांच्या दारात जायची काही गरज नाहीय . तिला कसं कळतं गं तूला काय हवंय ते ? तसंही तिला बघितलं की डोक्यात सणक जाते माझ्या ."

फरशी पुसणारी स्मिता डोळ्यातलं पाणी पुसत आत गेली. तिला सहावा महिना चालू होता. डोहाळे पुरवणं दूरच राहिलं, पण साधा आराम करायलाही वेळ मिळू देत नव्हत्या सासूबाई , सारखा कामांचा सपाटा चालूच .

स्मिताच्या मनात सारखं यायचं, 'सासू म्हणून नाही पण निदान माणुसकी म्हणून तरी नीट वागू शकणारच नाहीत का या माझ्याशी कधी ?'

आधीपासून घरात त्या म्हणतील तोच कायदा त्यामूळं सासरे आणि सारंग काही बोलायला गेले तर त्यांनाही तोंड उघडायची सोय नव्हती , एकदम कुलूपबंद .

" कामं करत राहिलीस तर डिलीव्हरीच्या वेळी त्रास होणार नाही तिला , तिच्या चांगल्यासाठीच सांगते ," असं बोलून त्या दोघांनाही गप्प करायच्या.

सारंगचं लग्न ठरताना मंदाकाकूंच्या खाष्ट स्वभावामुळं , सांगून आलेल्या स्थळांकडून काही निरोपच यायचा नाही. 

ओळखीपाळखीच्यांमध्ये, नातेवाईक सगळ्यांना एकच प्रश्न पडायचा , “या बाईच्या घरात जी मुलगी येईल त्या बिचारीचं काही खरं नाही?"

आणि तसंच झालं. स्मिताचं स्थळ ज्या नातेवाईकांनी आणलं त्यांनी स्मिताच्या घरच्यांना, “सारंगसारखं स्थळ तुम्हांला शोधून सापडणार नाही" म्हणून पाहण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी मुलामुलीची पसंती झाल्याने लगेचच घाईत कुंकू लावण्याचा कार्यक्रम करायला लावला.

पण “ माझा एकुलता एक मुलगा आहे, मला त्याच्या लग्नात सगळी हौसमौज करून हवी आहे " म्हणून मंदाकाकूंनी दागदागिने, मानपान, जेवणखाण हे सगळं घेऊन अक्षरशः व्याह्यांना नाकीनऊ आणले.

एवढं करूनही स्मिताशी एक शब्द गोडीगुलाबीने बोलतील तर शपथ! 

सारंगने आणि त्याच्या बाबांनी कधी त्यांना सांगायचा प्रयत्न केलाच तर, रडून आकांडतांडव करून त्याच रिकाम्या! 

त्यांच्या नादी कोण लागणार म्हणून ते दोघं गप्प.

स्मिताची बालमैत्रीण गौरी योगायोगाने लग्नानंतर तिची शेजारीणच झाली. तिला खूप कळवळून यायचं स्मिताची ही अवस्था पाहून. कुठं हिंडणं, फिरणं नाही, सतत काम करायचं अन बोलणी सहन करायची.

एक दिवस गौरीने कसंबसं, स्मिता माझ्यासोबत मंदिरात येतेस का गं ? काकू आजच्या दिवस पाठवता का ? "असं विचारून स्मिताला बाहेर नेलं. 

सारंग आणि स्मिता बऱ्याच दिवसांत कुठं गेले नव्हते .त्यामूळं स्मिताला खूप मोकळं वाटलं .ती नको नको म्हणत होती पण गौरीनं तिला बळेच पाणीपुरी, वडापाव काय हवं ते खा , " म्हणून खाऊ घातलं.

" मी म्हणते म्हणून तरी खा , बाळाची लाळ गळते गं  आत्ता आवडीचा खाऊ मिळाला नाही तर ."
 
" गौरी मला तूझा खूप आधार वाटतो गं .आईंच्या भीतीनं सारंग काहीच करू शकत नाहीत .बाबांचही काही चालत नाही .गौरी ,आईला कधी काही सांगू नकोस .त्यांना खूप काळजी वाटेल हे सगळं ऐकून ."
स्मिता खूप रडली.


“ काळजी करू नकोस गं स्मिता , तुझे सासरे, सारंग, मी, आम्ही आहोत तुझ्यासोबत . तुला आईकडे कधी पाठवणारेत त्या, पहिलं बाळंतपण माहेरी होतं ते तरी आहे ना माहित त्या बाईला ? कोणत्या जमान्यात वावरते गं ? एखाद्या दिवशी मीच कम्लेंट करेन तूझ्या सासूची सूनेला जाच करते . " गौरी तावातावाने बोलत होती.

"प्लीज असं काही करू नकोस . कधीतरी बदलतील गं त्या .हे असं काही केलं तर सगळ्यांनाच त्रास शिवाय बदनामी होईल चार लोकांत .अगं त्यांनी सांगितलंय नववा महिना संपत आला की बोलावून घे तुझ्या वडिलांना. तिकडं लवकर जाऊन तरी काय करणारेस "

मग अधूनमधून गौरीच स्मिताला कधी भाजी आणायचं निमित्त करून , कधी मंदिरात जायचंय सांगून संध्याकाळची बाहेर नेऊन तिला काय खावंसं वाटतं ते देऊ लागली, स्मिताचे डोहाळे तिची बालमैत्रीण अगदी मनापासून पुरवत होती. सारंग आणि त्याच्या बाबांना याची कल्पना तिनं आधी दिली होती.

पण एक दिवस तिच्या सासूबाईंना सुगावा लागलाच ! सगळीच माणसं सारखी नसतात ना .

कोणीतरी ओळखीतल्यांनीच, “ तुमची सून पाणीपुरी खाताना दिसली काल खाऊगल्लीत , "असं सांगितलं अन् त्यांचं डोकंच फिरलं!

त्या दिवसापासून त्यांनी तिला सकाळचं जेवण संध्याकाळी आणि रात्रीचं शिळं जेवण सकाळी द्यायला सुरुवात केली. 

बाहेर फिरणं तर बंदच केलं. तिला नववा महिना लागला, गौरी अधूनमधून स्मिताच्या माहेरी फोन करून सांगायची, “ काकू तिला माहेरपणासाठी न्या, ही बाई तिचे डोहाळे पुरवणं तर लांबच राहिलं पण त्रास देण्यात जराही कसर सोडत नाहीये ..

शेवटी तिचे आईवडील येऊन तिला बाळंतपणासाठी घेऊन गेले. 

मनानं, शरीरानं अशक्त झालेल्या स्मिताला मुलगा झाला, बाळही वजनाने कमीच होतं. सव्वा महिना होत नाही तोच बाळ बाळंतिणीला सासूबाई घेऊन आल्या .

स्मिता पाठोपाठ तिचीची जिवलग सखी गौरीही गोंडस बाळाची आई झाली . स्मितानेही तिला जमेल तशी गौरीची काळजी घेतली .

दिवस पुढे जात होते. काळानुसार बदल होतात पण स्मिताच्या सासूबाई शेवटपर्यंत तशाच राहिल्या. 

सलील , स्मिता सारंगचा मुलगा, पंधरा वर्षांचा होता तेव्हा ह्रदयविकाराचा गंभीर झटका आल्यानं त्या गेल्या, पुढच्याच वर्षी सासरेही पाय घसरून पडले अन् त्या दुखण्यामुळे खचलेले तेही स्वर्गवासी झाले .

सलील इंजिनिअर होऊन नोकरीला लागला .गौरीचा मुलगा राजस उच्चशिक्षणासाठी परदेशी गेला .
स्मिता सारंगने सलीलसाठी वधूसंशोधन सुरू केलं . 

त्याला सोनालीचं स्थळ आलं. 

सुशिक्षित, सुस्वरूप , योगप्रशिक्षक असलेली सोनाली दूधात साखर मिसळावी तशी सासरच्या माणसांत मिसळली. सासूच्या भूमिकेत आलेली स्मिता, सोनालीचं खूप कोडकौतुक करते .

पण कधीकधी मध्येच शांत, अलिप्त असल्यासारखी दिसते स्मिता . 

शेजारची गौरी आता सोनालीची गौरी मावशी झालीये. तिच्याकडून स्मिताने सहन केलेल्या भूतकाळाबद्दल सोनालीला जसं कळालं, तिनं ठरवलं काहीही झालं तरी या माऊलीला कधीही दुखवायचं नाही .
"आई ,मी आलेच ."

क्लिनिकमधे जाऊन आलेली सोनाली गौरीमावशीला घेऊन आली हाताला धरून .

" तुम्ही दोघी आजी होणार आहात " तिनं जसं सांगितलं तसा स्मिताने तिचा हात हातात घेतला, “ माझ्या लेकीचे सगळे डोहाळे आता मी पुरवणार . " तिच्या डोळ्यांतले अश्रू सोनालीच्या हातावर ओघळले. 

गौरीनं सोनालीच्या डोक्यावरून हात फिरवला, “ सोनाली, या तुझ्या सासूने जे गमावलंय ते तिच्या मनात साचलं गं खोलवर कुठंतरी , पण तू मात्र खूप भाग्यवान आहेस , माझ्या स्मितासारखी सासू कमावलीस"...

कधीकधी माणसं अशी का वागतात हा प्रश्न पडतो त्याला बऱ्याचदा उत्तर नसतं.

खरं तर मनुष्यजन्म अतिशय सुंदर ! माणसानं माणसाशी माणसासारखं वागायचं ठरवलं तर तो किती सुंदर होईल , नाही का.

समाप्त

प्रिय वाचकांनो,
ही कथा वास्तव आणि कल्पनेचा मेळ आहे पण यातून कोणाला दुखवण्याचा कोणताही हेतू नाही.

©कांचन सातपुते हिरण्या

सदर कथा लेखिका कांचन सातपुते 'हिरण्या' यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने