हरवलेलं स्वयंपाक घर

© वर्षा पाचारणे.



बदल हा निसर्गाचा नियमच आहे. काळाबरोबर बदलता बदलता हातातून अनेक गोष्टी निसटून कधी गेल्या, हे समजलंच नाही. म्हणजे आधुनिकता कितीही चांगली वाटली तरी 'जुनं ते सोनं' या म्हणीची आजही अनेक गोष्टीत प्रचिती येते.

मीरा आणि मोहनची अगदी कॉलेजपासूनची मैत्री. दोघंही शिक्षणाच्या निमित्ताने शहरात आलेले. शिक्षण पूर्ण करून दोघांना आपापल्या आवडीच्या क्षेत्रात काम मिळालं होतं. 

इतके दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. आता जरा स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लव स्टोरी लग्नापर्यंत सुखरूप पार पडली होती. 

स्वैराचार म्हणजे जणू जीवनशैली बनलेल्या मीरा आणि मोहनला पैश्याची उधळपट्टी करण्याची सवयच लागली होती.

मीरा आणि मोहन चांगल्या पदावर कार्यरत असल्याने घरी पैसा, प्रतिष्ठा, सोयीसुविधा अश्या कशाचीही म्हणून कमतरता नव्हती. शिवाय त्यांचं एकुलतं एक अपत्य असल्याने, त्याच्या भविष्याची तरतूद त्यांनी आतापासून करून ठेवली होती. 

शनिवार आणि रविवारी दोन दिवसांची सुट्टी ते नेहमीच बाहेर घालवत असत. इतर दिवशी मुलगा पाळणाघरात रहात असे. आपण आठवडाभर मुलाला वेळ देऊ शकत नाही, म्हणून दोघंही त्याला सुट्टीच्या दिवशी तो मागेल ते सारं घेऊन देत. प्रेमापेक्षा पैशाचं पारडं जड होतं. 

आठवडाभर कामावरून रोज उशीर होतो म्हणून हॉटेलचे पदार्थ घेऊन यायचे आणि सुट्टीच्या दिवशी बाहेर जाऊन एन्जॉय करायचं म्हणून. 

स्वयंपाकघर म्हणजे जणू शोभेची वस्तू बनल्याप्रमाणे झालं होतं. मुलाला भाजी ,चपाती, वरण ,भात असं जेवण ताटात कधी दिसलंच नव्हतं. सतत बाहेरचे पिझ्झा बर्गर, तेलकट पदार्थ खाऊन अगदी लहान वयात त्याला स्थूलता आली होती. शाळेत धावताना देखील त्याला धाप लागल्यासारखं व्हायचं.

मोहनला काही कामानिमित्त त्याच्या आईबाबांच्या गावाजवळच जावे लागणार होत. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने आर्यला पण मजा करता येईल, या विचाराने त्याने सुट्टी गावी आईबाबंबरोबर घालवण्याचा विचार केला. 

कॉलेजचे शिक्षण चालू झाल्यापासून गावी ढुंकूनही न पाहिलेला 'मोहन' ,आज जवळपास १० वर्षांनी गावी चालला होता. 

एरव्ही आईने फोनवर अगदी कितीही काकुळतीने सांगितलं तरी प्रत्येक वेळी तो काहीतरी कारण देऊन टाळत आला होता. आज मात्र स्वतःहून आईला फोन करून १५ दिवसांसाठी येत असल्याचं कळवलं. 

आर्यदेखील जन्मल्यापासून पहिल्यांदाच आज्जी आजोबांना भेटणार होता. कारण इतक्या वर्षात मीरा आणि मोहन ना कधी स्वतः गावी गेले होते आणि ना कधी आई बाबा त्यांच्याकडे आलेले त्यांना आवडले होते. त्यामुळेच आज्जी आजोबांची ,'शहरापेक्षा आपला गावच बरा' ही भावना अजून दृढ झाली होती.

रात्रीचा प्रवास करुन पहाटे मीरा, मोहन आणि आर्य गावी पोहोचले. आर्यने गाडीत रात्रभर छान झोप काढली होती. गाडी जशी थांबली तसे त्याने किलकिल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिले. 

नुकताच होत असलेला सूर्योदय, कोंबड्यांचा आवाज, गाईंच्या गळ्यातील घंटांचा आवाज, हे सारं म्हणजे त्याच्या स्वप्नासारखं होतं. दारात येताच आज्जीने तिघांवरूनही भाकर तुकडा ओवाळून टाकला. आणि आर्यला जवळ घेत म्हणाली," कित्ती मोठ्ठं झालं माझं बाळ! नंतर तिने बंबातलं गरम पाणी दिलं आंघोळीसाठी. तिघांच्या अंघोळी होईपर्यंत चुलीवर चहा ठेवला. 

तोपर्यंत आजोबा गोठ्यातील कामं करून नुकतेच आले होते. त्यांनी आर्यला जवळ घेऊन त्याच्या तोंडावरून हात फिरवला. पण आर्य धावत त्याच्या मम्मा कडे गेला आणि म्हणाला," मम्मा खूप घाणेरडा वास येतोय यांच्या अंगाला".. ते ऐकून आजोबा हसले आणि म्हणाले," अरे गड्या, हा शेणाचा वास हाय. गोठ्यातल्या माणसाच्या अंगाला हा असलाच वास यायचा.

मीरा आर्यला आज्जी आजोबंपासून थोडं लांबच ठेवत होती. शहरी वातावरणात वाढलेल्या आर्यला हे सगळं वातावरण अगदी वेगळंच वाटत होतं. त्याने आजपर्यंत कुत्र्याची पिल्लं फक्तं लांबून बघितली होती. ....ती ही मित्रांच्या घरी पेट अॅनिमल म्हणून. पण गावाला सर्रास रस्त्यावरून फिरणारे कुत्रे, मांजरी बघून त्याला भीती वाटायची. 

आजपर्यंत दूध फक्त पिशवी मध्ये मिळते एवढंच माहीत असलेला आर्य गोठ्याच्या बाहेर उभं राहून गायीचं दूध काढताना बघत होता. 

आता आता तो थोडा आज्जी आजोबांबरोबर रुळायला लागला होता. दिवाळी आल्याने आज्जीने पहाटे उठून लावकर साफसफाई आणि मांडणीची भांडी घासायला काढली होती. आर्य उठून येईपर्यंत तिने पितळाची , तांब्याची भांडी अगदी लख्ख केली होती. 

आर्य उठून आला आणि बघतच राहिला....म्हणाला, " आज्जी तुझी भांडी पण खूप वेगळी आहेत गं...मी आज पहिल्यांदाच अशी सोन्याची भांडी बघतोय.....आज्जी हसली आणि म्हणाली," अरे पोरा, सोन्याची नाय ती पितळाची हायेत. अशी घासून पुसून लख्ख केली की घरात लक्ष्मी वास करती." 

तिचं बोलणं आर्यला कळलं नसलं तरीही त्याला खूप भारी वाटत होतं...नंतर आज्जी घरात गेली आणि त्याला ग्लास भरून दूध आणि खारीक खोबऱ्याचा लाडू घेऊन आली. 

तो लाडू आर्यने झटक्यात फस्त केला आणि म्हणाला," आज्जी, अगं असला लाडू मम्माने आणला नाही कधी माझ्यासाठी....तू दुकानाचं नाव सांगून ठेव, मग मी जाताना पप्पांना घ्यायला सांगेन."

आज्जी म्हणाली, "बाळा, हे विकत नाय आणलेत,तू येणार म्हणून करून ठेवलेत मी, तुला जेवढे न्यायचे तेवढे घेऊन जा... असं म्हणून आज्जीच्या डोळ्यात पाणी आलं.... असे नातवाचे लाड करण्यासाठी ती कितीतरी वर्ष आसुसली होती. 

तिच्या डोळ्यांत पाणी बघून आर्य म्हणाला," आज्जी, काय गं झालं...." आज्जी हसली अन् म्हणाली," काय नाय बाबा, डोळ्यात कचरा गेला."

दुपारी आज्जीने छान लोणी कढवायला ठेवलं होतं. घरभर सुवास दरवळत होता. आता आता थोडे गावाकडचे मित्र जमवून आर्य अंगणात खेळत होता. तुपाच्या वासाने घरात धावत पळत येऊन आज्जीला म्हणाला ," अग आज्जी आमच्या शेजारच्या आज्जीच्या घरातून अगदी असाच वास येतो....पण कळत नाही कश्याचा....काय करतेस तू?" 

आज्जीने त्याला,' तूप करते' असं सांगितलं. त्यावर आर्य म्हणाला," तूप कश्याला करायचं? ते टीव्हीवर दाखवतात की तुपाची बॉटल..ती आणायची...माझी मम्मा तर ते पण आणत नाही कारण ती रोज ऑफिस वरून येतानाच जेवण पार्सल आणते." 

आज्जी काहीच बोलली नाही.... तूप केल्यानंतर राहिलेल्या बेरीत साखर घालून तिने आर्यला खायला दिलं....त्याची चव अप्रतिम होती. दुपारच्या जेवणात पिठलं आणि भाकरी केली होती. पण आर्य भाकरी खाणार नाही या विचाराने आज्जीने त्याच्यासाठी चपाती केली. 

सगळे जेवायला बसल्यावर आर्यने बघितलं की सगळ्यांच्या ताटात भाकरी आणि आपल्या ताटात चपाती....तो आज्जीला म्हणाला," आज्जी तू माझे लाड नाही करत, मला बाकीच्यांसारखी भाकरी नाही दिली.... आज्जी म्हणाली," अरे , मला वाटलं, तुला भाकरी नाय आवडायची."

त्यावर आर्य म्हणाला," अगं, आमच्या घराच्या जवळ एक रेस्टॉरंट आहे. तिथे महाराष्ट्रीयन जेवण मिळतं. पप्पांना जेव्हा रोज ते पिझा, रोटी, पनीर असं खाऊन कंटाळा येतो तेव्हा ते आम्हाला तिथे नेतात आणि मग पिठलं भाकरी मटकीची उसळ असं घेतात. सोबत ताक पण....पण मम्माला नाही येत ती भाकरी करता."

 आता मात्र सूनबाई खाली मान घालून जेवू लागल्या. आज्जीने जेवणानंतर सगळ्यांना ताक दिलं....ते पिऊन आर्य म्हणाला, "आज्जी, हे ताक त्या रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा झकास आहे"...... ते सगळे क्षण त्याच्या मनाच्या कप्प्यात नकळत साठवले जात होते. .....

मग ते आज्जीच्या ठेवणीतलं चिनी मातीच्या बरणीतलं लोणचं असो किंवा तो कढीपत्ता आणि हिंगाच्या फोडणीचा वास असो, बिना वॉशिंग मशिनचे हाताने धुतलेले पांढरे शुभ्र कपडे असो किंवा आज्जीच्या हाताचा मऊ मुलायम स्पर्श असो..... सारं काही त्याच्या कायम सोबत राहणार होतं.....आठवणीत.

संध्याकाळी आज्जीने देवापुढे दिवा लावला तुळशीत उदबत्ती लावून शुभंकरोती म्हणलं. ते सगळं आर्यला खूप आवडू लागलं होतं. दिवसभरात मग त्याने आज्जीच्या मागे लागून शुभंकरोती म्हणायला शिकलं. 

आज्जीची दिवसभर काम चालत, त्यात दिवाळी आल्याने ती लवकर उठून चकली, लाडू, करंजी असं सारं करत होती. आर्य रोज झोपेतून जागा झाला, की आधी पदार्थांच्या वासाने स्वयंपाकघरात डोकावून पाहत होता. आज दुपारी आज्जीने अनारसे करायला घेतले. 

मीरा म्हणाली," द्या मी करते...असे म्हणून तिने अनारसे करायला सुरुवात केली पण तिच्या हाताला ते पिठ चिकटून बसत होतं..ते काही तिला जमेना..तिची ही गंमत आज्जी आणि आर्य दोघेही बघत होते...शेवटी आर्य म्हणाला," मम्मा तू राहू दे ,तुला नाही जमायचं... मग आज्जीने अगदी सहज रीतीने अनारसे केले. आर्यला आता गावातला जगणं किती वेगळं असतं ते जाणवत होतं.

दारात दिवाळीला लागलेल्या पणत्या, दाराचं तोरण खूप सुरेख दिसत होतं. आजपर्यंत मेणाच्या पणत्या आणि रांगोळीच्या जागी चिकटलेले स्टिकर बघत आलेला आर्य आज आज्जीने रेखाटलेल्या रांगोळीकडे बघतच राहिला. 

लक्ष्मीपूजनला खास पुरणपोळीचा बेत बघून आर्य पटकन म्हणाला," अशीच पोळी परवा पॅकेट मधून आणली होती पप्पांनी.... एक पोळी तीस रुपये...." म्हणजे आज्जी आज तू किती रुपयांच्या पोळ्या केल्या बघ".... आता मात्र मिरा आणि मोहनचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

अश्या एक ना अनेक कितीतरी नवीन गोष्टी आर्यने पहिल्यांदाच पाहिल्या होत्या..स्विमिंग पूल ऐवजी विहिरीत, नदीत पोहणारी मुलं, दिवसभर शेतात राबणारी माणसं, संध्याकाळ झाली की न चुकता घरी येणाऱ्या गायी म्हशी......, मोबाईल, व्हिडिओ गेम मध्ये डोकं न घालून बसता छप्पी पाणी, लगोरी, मामाच पत्र हरवलं असे कितीतरी खेळ खेळण्यात रमुन गेलेली मुलं, दिवसभर कामात गुंतलेली असूनही कसलीच तक्रार न करणारी आज्जी, म्हातारे झालेले असूनही गोठ्यात कष्ट करणारे आजोबा....... अश्या खूप गोष्टी.

आजपर्यंत फक्त मॉल्स, थिएटर मध्ये सुट्टी घालवलेल्या आर्यला गावातील ही सुट्टी संपून आता परतीच्या विचाराने रडू येत होते. आज्जीच्या गोधडीत शिरून आज तो मुळूमुळू रडत होता. 

आज्जी आजोबा, मिरा मोहन सगळे त्याला समजावत होते. पण लहान पोर ते....खूप हळवं झालं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गायी म्हशी परतताना बघून आज्जीला त्याने विचारलं," आज्जी, या गाई रस्ता चुकत नसतील का ग? त्यावर आज्जी म्हणाली," लेकरा, एक वेळ माणसं साथ सोडतील, पण मुकं जनावर कधीच साथ सोडणार नाय... ते फिरून त्याच्या धन्याकडं येतंच."

आज्जीच्या डोळ्यात पाणी बघून आर्य म्हणाला," आता काय झालं?" 

आज्जी म्हणाली," काय नाय डोळ्यात कचरा गेला".. तो पर्यंत मोहनचे डोळेपण पाणावले होते. 

आर्यने त्याला देखील विचारलं," पप्पा आज्जीच्या डोळ्यात सारखा कचरा कसा जातो?.... आणि हे काय तुमच्या पण डोळ्यात पाणी..... अरे बापरे म्हणजे आता तुमच्या पण डोळ्यात कचरा गेला वाटतं"... मोहन ने त्याला घट्ट मिठी मारली आणि फक्त ,' हो' म्हणाला..

आज आर्य पुन्हा त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. इतके दिवसात जे जे आर्यला आवडलं होतं, ते सारं आज्जीने पिशवीत भरून त्याला दिलं. 

सोबत एक तीनं शिवलेली गोधडी पण दिली होती. आर्यने पिशवी उघडुन पाहिलं तर त्यात, खारीक खोबऱ्याचे लाडू, अनारसे, त्याला आवडलेली शेंगदाण्याची चटणी, आणि तुपाचा डबा होता. ते बघून आर्यला मात्र रडू आवरता आला नाही. 

आज्जीच्या कुशीत शिरून तो ढसाढसा रडला आणि म्हणाला, अग, किती करतेस तू...आणि एवढं करून थकत कशी नाहीस...शहरात हेच पदार्थ लोकं विकतात आणि तू अगदी सहज देऊन टाकले. 

त्यावर आजोबा म्हणाले," पोरा , आज पर्यंत तुझ्या आज्जीने खूप काही केलं....पण पैश्यासाठी नाय.....माणुसकी पोटी...प्रेमाला पैश्यांनी तोलता नसल येत तिला...पण लई श्रीमंत हाय ती....मनानी, माणुसकीची नाती जपलीत तीनी.

गावात पहिल्यांदा आलेला आर्य सुरवातीला आजोबांच्या कपड्याला येणाऱ्या वासाने जरा लांबच राहायचा पण आज जाताना त्याने आजोबांना कडकडून मिठी मारली. "मला इथून नाही जायचं" म्हणून जवळपास हंबरडा फोडला...पण जावं लागणार होतं..

गाडीत बसताना सतत मागे वळून पाहताना आज्जी आजोबा गाडीच्या धुळीने दिसेनासे झाले .... आज पुन्हा एकदा आज्जी हरवली असं त्याला वाटलं... पण सोबत घेतलेल्या आज्जीच्या सुती लुगड्यात तो स्वतः ल गुरफटून बसला होता.....पुन्हा परत गावी येण्याच्या आशेने.

समाप्त

आजकाल वेळ नसल्याने अनेकदा सणासुदीला देखील गोडधोड पदार्थ विकत आणले जातात. पण माझी आज्जी कायम म्हणायची की,' आपण जिथं राहतो त्या वास्तूला पदार्थांचा वास मिळायला हवा'... आज सगळं विकत मिळत असलं तरी घरात दरवळलेला पदार्थांचा सुवास आणि स्वतः प्रेमानं केलेल्या पदार्थांची जोडी काही औरच.....

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने