शाळकरी वयातलं रॅगिंग

© वर्षा पाचारणे



मुलगी म्हणजे प्रत्येक आईवडिलांचा अभिमान असतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे आईबाबा तिला जपत असतात. आपल्या या लाडक्या लेकीला सगळी सुखं देण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करतात. 

जशी मुलगी मोठी व्हायला लागते, आई वडील तिच्या सुरक्षेच्या कारणावरून अधिक चिंतीत होतात.. कारणं आजही काही चूक नसूनही मुलींचं आयुष्य उध्वस्त करणारे समाजकंटक दर दिवसाला तयार होत असतात आणि त्यांच्या कुप्रव्रृत्तीमुळे विनाकारण मुलींचा बळी जाताना दिसतो. 

आजची गोष्ट अशीच आईबाबा आणि त्यांच्या लाडक्या लेकीची.

ऐश्वर्या .... मुंबईतील एका मध्यवर्गीय कुटुंबातील मुलगी. दिसायला अतिशय देखणी. गोरे गुलाबी गाल, काळेभोर डोळे, खांद्यापर्यंत रुळणारे केस, लाल गुलाबी ओठ आणि सुदृढ बांधा,..... तिला लहानपणापासून फॅशनेबल कपडे घालून फिरायला फार आवडायचे. 

अतिशय बोलकी असलेली ऐश्वर्या कुणाचंही लक्ष वेधून घेत असे. आई बाबांना जशी ती सहावीत गेली तशी तिची फारच काळजी वाटू लागली.

ऐश्वर्या शाळेत घडलेली प्रत्येक गोष्ट आईला सांगायची. आई म्हणजे तिची अगदी जवळची व्यक्ती. 

आज ऐश्वर्या जरा शांत होती. आईला तिचं बदललेलं वागणं जाणवलं. पण तरी तिने तसं ऐश्वर्याला बोलून दाखवलं नाही. कारण तिला विश्वास होता की ऐशू तिला सांगेल. रात्री ऐश्वर्या अगदी थोडंच जेवून झोपी गेली. 

पण झोपताना तिची काहीतरी चुळबुळ चालू होती, हे मात्र आईच्या नजरेतून सुटले नाही. ऐश्वर्या रोज शाळेतून आल्यावर डबा लगेच घासायला स्वयंपाकघरात नेऊन ठेवायची, पण आज चुकून विसरली होती. 

आईने बॅग उघडली आणि डब्याच्या बाजूला नेमका तिला गुलाबी रंगाचा कागद दिसला. तिने तो कागद नीट उघडून पाहिला तर अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. रागाने डोळे लालबुंद झाले. हात थरथरू लागले. तो कागद म्हणजे प्रेमपत्र होते.

बाबा शतपावली करून नुकतेच घरात आले. ऐश्वर्याला लवकर झोपलेली पाहून तिच्या डोक्यावर थोपटून म्हणाले,"आज थकलं होतं वाटतं माझं बाळ". 

त्यांचं बोलणं ऐकून आधीच संतापलेली आई बाबांच्या जवळपास अंगावर खेकसलीच. "कायम तिला पाठीशी घालून आज बघा तिने आपल्याच पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केला", असे म्हणून आई रडू लागली. 

आता मात्र बाबांना काहीच कळेना. आईने हातातला कागद बाबांना वाचायला दिला. 

अगदी फिल्मी स्टाईलने प्रेमपत्र लिहिलं होतं. ते वाचून बाबांना धक्काच बसला. जी मुलगी आपला विश्वास, अभिमान आहे ती जणू आपलं नाव धुळीत मिळवते असं वाटून गेलं.

दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या शाळेत गेली पण आई बाबांचं विचारचक्र मात्र चालू होतं. लाडाची आपली लेक आत्ताशी फक्त सहावीत आहे अन् तिच्या दप्तरात प्रेमपत्र.

राहून राहून हाच विचार त्यांच्या मनात घोळत होता. ऐश्वर्या दुपारी घरी आली आज खूप खुश होती ती. आता तिची प्रत्येक कृती आई संशयाच्या नजरेने पहात होती. 

आईने वचार केला," काल प्रेमपत्र सापडले तेव्हा हिचा मुड ठीक नव्हता अन् आज मॅडम खुशीत! नक्कीच तो जो कुणी मुलगा असेल तो हिला प्रपोज करून मोकळा झाला असेल. ऐश्वर्या शाळेतल्या गंमती आईला सांगत तर होती, पण आई मात्र शून्यात नजर लावून बसली होती.

आठवडा असाच गेला. आपल्याशी आई मोकळेपणाने बोलत नाही हे ऐश्वर्याला जाणवत होते. पण कसे विचारायचे की,'काय झाले'? म्हणून ती शांत होती. 

शेवटी न राहवून तिने आईला विचारले," आई माझं काही चुकलं का? तू गेला आठवडाभर माझ्याशी नीट बोलत नाही". आईचे डोळे पाणावले. 

आईने ऐश्वर्याला कुशीत घेतलं. प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली ,"बाळा, चुकलो तर आम्ही. ....तुझ्यावर चांगले संस्कार करायला. म्हणून तर तू आई बाबांच्या नकळत काही गोष्टी करू लागली. अशा काही गोष्टी ज्या तू आमच्यापासून लपवून ठेवू लागली....."

अन् असं बोलून आईने तिच्या डोक्यावरचा हात पटकन बाजूला घेतला. आता ऐश्वर्या रडू लागली .... अन् म्हणाली ,"आई माझी फार घुसमट होते, तू अशी माझ्याशी बोलत नसलीस की... एकतर मागच्या आठवड्यात माझ्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली. ज्यामुळे मुलगी असल्याने पावलापावलावर वाईट नजरा, घाणेरडी बोलणी ऐकावी लागतात असं वाटू लागलंय.

आता मात्र आई घाबरली. तिने ऐश्वर्याला घट्ट मिठी मारली,"काय झालं बेटा ? मला सांग गं..... काही लपवू नकोस. मी खंबीरपणे तुझ्यासोबत आहे.

ऐश्वर्या बोलू लागली. म्हणाली," आई, आम्ही पाचवीत होतो, तेव्हा आम्हा मुलींना मासिक पाळीबद्दल माहिती दिली होती शाळेत. त्यावेळी सगळ्या मुलांना बाईंनी मैदानावर खेळायला पाठविले होते. एकतर 'मासिक पाळी' म्हणजे काय? हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना होता. माहिती ऐकून तर आम्हाला काही समजण्यापेक्षा जास्त भीतीच वाटली... वाटलं, 'का उगाच मुलींना हे मासिक पाळी वगैरे'?

...त्यापेक्षा आम्ही लहानच ठीक आहोत. त्याच्या दोन दिवसांनीच आमच्या वर्गातल्या नेत्राला पाळी आली. नेत्रा खूप घाबरली. तिच्या युनिफॉर्मवर डाग पडला होता. 

बाईंनी तिला हळूच बाहेर बोलवून sanitary napkin दिलं. आणि त्या दिवशी नेत्राला लवकर घरी जाऊ दिलं. त्यानंतर चार दिवस नेत्रा शाळेत आली नाही.

आजकाल मुलींबरोबर मुलांनाही या गोष्टी फार आधीच माहीत असतात... कशा कोण जाणे?. 

पण त्यादिवशीचा तो नेत्राच्या युनिफॉर्मवरचा डाग म्हणजे मुलांच्या चर्चेचा विषय बनला. 

नेत्रा त्यानंतर दर महिन्याला चार दिवस गैरहजर असते, हे सगळ्यांच्या लक्षात आलं. मुलं वाईट, घाणेरड्या कमेंट करायची. ती दिसली की लाल डबा, लाल डबा म्हणून फिदीफिदी हसायची. 

आजकाल तर मुलींच्या washroom मध्ये घाणेरडी चित्र काढली होती. मुलींनी शाळेत कम्प्लेंट केली. पण अजूनही कुठल्याही गोष्टीवर लगाम लागला नाही.

मागच्या आठवड्यात नेत्राच्या बॅगेत कुणीतरी गुलाबी रंगाची चिठ्ठी टाकली. तेव्हा आम्ही बाईंना ऑफिसमध्ये वह्या द्यायला गेलो होतो. 

आल्यावर नेत्राने ती चिठ्ठी पाहिली आणि तिनेच कुणालातरी लिहिली असेल असं म्हणून तिला सगळे चिडवतील या विचाराने मला फाडून टाकायला दिली. तितक्यात बाई वर्गात आल्या. 

मी ती चिठ्ठी तशीच बाईंकडे दिली आणि खरं काय घडलं ते सांगितलं. बाईंनी सगळ्यांना खूप दम दिला. 'पुन्हा कुणी असले प्रकार केले तर पालकांना बोलवेन' अशी धमकी दिली.

ती चिठ्ठी तशीच माझ्या बॅगेत राहिली. त्या दिवशी मी खरं तर लवकर झोपले नव्हते फक्त डोळे मिटून पडले होते. मला माहित होतं की तू डबा काढण्यासाठी बॅग उघडली की चिठ्ठी तुला सापडेल आणि मग दिवसभर जी माझी घुसमट होत होती ती तुझ्या कुशीत शिरून संपेल. 

पण तू चिठ्ठी वाचली आणि कणभरही माझ्यावर विश्वास न ठेवता मला चुकीचं ठरवलं. मला तो विषय कशाप्रकारे तुझ्यासमोर मांडावा हे समजत नव्हतं म्हणून मी दिवसभर शांत होते. 

दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपॉल मॅडमने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघून ज्या मुलांनी washroom मध्ये घाणेरडी चित्र काढली होती. जी मुलं नेत्राला सतत टोचून बोलत होती त्यांच्या पालकांना बोलावून घेतलं. 

म्हणून मी त्या दिवशी खूप खुश होते. मी तुला रात्री बसून सारं काही सांगणार होते पण संध्याकाळी मी बाहेरून खेळून आल्यावर बाबांचं आणि तुझं बोलणं माझ्या कानावर पडलं.

म्हणजे मी ते मुद्दाम ऐकलं नाही, पण ऐकू आलं... तू बाबांना म्हणत होतीस, "आज नक्की त्या कोणत्या मुलाने हिला प्रपोज केलं असेल आणि आपला विश्वासघात करून ही आपल्याला मान खाली घालायला लावेल.

"खूप वाईट वाटलं ग आई! माझी आई कायम माझ्यासोबत असेल असं मला वाटायचं पण एका त्या 'कागदाच्या तुकड्यानी' तू इतकी लांब जाशील असं नव्हतं वाटलं." त्यानंतर तू माझी बॅग, माझ्या युनिफॉर्मचे खिसे, मी जिथे पुस्तकं वह्या ठेवते ते कपाट, एवढेच काय तर माझ्या पुस्तकांमध्ये मी काही लपवलं आहे का असं तू माझ्या नकळत तपासत होतीस.

मागच्या महिन्यात मलाही पाळी आली. तेव्हा किती मायेनं सारं समजावलं होतं तू. माझ्या बॅगेत एक sanitari नॅपकिन असणं किती गरजेचं आहे, हे समजावलं होतं. 

आणि या मागच्याच आठवड्यात नेत्राला चिडवणाऱ्या एका मुलाने उगाच माझ्याशी वाद घालत त्याचा पेन माझ्या बॅगमध्ये आहे असा कांगावा केला. आणि जवळपास बॅगची झडती घ्यावी तस सगळं तपासल. आणि सगळ्या मुलांसमोर तो बॅगेतला sanitary napkin खाली पडला. 

सगळी मुलं तेव्हापासून सतत मी दिसले की ,"त्या पाकिटात दडलंय काय? असं कुजबुजत हसतात. खूप लाज वाटते गं. आम्ही मुली मधल्या सुट्टीत washroom मध्ये जातो तेव्हा आमच्या मागे जोरात गाणी म्हणतात.... सतत दाग अच्छे है l असं बोलतात.

नेत्राला तर त्यादिवशी अचानक शाळेत चक्कर आली, तर मागच्या मुलांमधील कुणी तरी लगेच बोललं,"दर महिन्याला ही चार दिवस गैरहजर असते आता काय नऊ महिने का? असं म्हणून पुन्हा तेच घाणेरडं फिदीफिदी हसणं. 

आत्ता सहावीत असताना मला इतक्या घाणेरड्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं..... पुढे मी कसं सहन करेल हे सगळं? ऐश्वर्या आता जणू हतबल झाली होती.

बाहेरच्या लोकांनी कितीही त्रास दिला तरी आपली माणसं आपल्यासोबत आहेत या एका विश्वासावर जगाशी लढण्याची ताकद मिळते.... आज माझ्या वर्गातल्या कितीतरी मुलींची प्रेमप्रकरण चालू आहेत. 

पण हे प्रेम नाही तर आकर्षण असतं असं तू कितीतरी वेळा सांगितलस मला. माझं ध्येय फक्त शिकणं आहे.
मागे एकदा वर्तमानपत्रात ragging बद्दल वाचले होते. 

पण आम्ही तर शाळेत आहोत ना आई, मग छान बालपण, शालेय जीवन अनुभवण्यासाठी इतका त्रास सहन करावा लागतो का?

ऐश्वर्या रडून रडून थकली होती. आईबरोबर बोलणारी ऐश्वर्या, बाबा तिथे असते तर कदाचित मोकळेपणाने बोलली नसती म्हणून बाबा बाहेर हॉलमध्ये बसले होते. ऐश्वर्याचं‌ बोलणं ऐकून ते गहिवरले होते. 

आज आई बाबांनी मनोमन जाणल होतं की परिस्थिती जाणून न घेता चुकीचा समज करून घेतल्यानं किती मोठं संकट येऊ शकतं. आणि म्हणूनच तिच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभ रहायचं वचन त्यांनी दिलं. 

दुसऱ्याच दिवशी आई शाळेतील शिक्षकांना भेटली आणि घडलेले प्रकार समजावले. सहावी सातवीची मुलं आपल्या मागे इतकी विचित्र वागतात या विचाराने शिक्षकही निःशब्द झाले. पण त्या दिवसानंतर त्यांनी कुणीही वाईट वागताना बोलताना दिसलं तर कडक अंमलबजावणी सुरू केल्याने सगळेच आता शिस्तीने वागत होते.

प्रत्येक वेळी डोळ्याला दिसतं तेवढंच सत्य नसतं.... कदाचित त्याहीपलीकडे दुसरी बाजू असू शकते.
एक सुजाण पालकत्व निभावताना ऐश्वर्याच्या आई बाबांना जसे अनुभव आले तसे अनेकांना येतात, पण आपल्या मुलांचे केवळ आई बाबा न रहाता त्यांचे जवळचे मित्र बनण्याचा प्रयत्न करावा. केवळ अपेक्षांचं ओझं न लादता त्यांच्याही काही समस्या असतात हे जाणून घेणं तितकच गरजेचं आहे.

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने