मनःस्विनी

© सौ.मीनाक्षी वैद्य




"दोडाबेटा पॉईंटवरून उटीचे अप्रतिम लावण्य नजरेन आकंठ पीत असूनही माझ्या डोळ्यात स्वप्नाळू लहरी उमटल्या नाहीत. 

कोवळ्या उन्हाचा आणि काळ्या ढगांचा चाललेला पाठशिवणीचा खेळ बघून 'ओऽऽओ' असं लहान मुलांसारखं ओरडावसंही वाटलं नाही. 

उटीच्या ह्या गुलाबी थंडीत नव्या नव्हाळीची ओली हळद खरंतर धुंदफुंद होऊन गायला हवी होती. परंतु मनावर आलेल्या प्रचंड ताणामुळे मी माझ्या हिरव्याकंच बांगड्यांचाच किणकिणाट अजून कौतूकाने ऐकला नाही.

उटीचे हे निसर्ग सौंदर्य बघतांना माझ्या मनात एक प्रश्नसर्प वेटोळे करून बसलाय. 

तो म्हणजे हे निसर्गसौंदर्य बघितल्यावर आयुष्य सार्थकी लागलं असं म्हणणारा आणि निसर्गाच्या मूळच्याच भोळ्या सौंदर्याने वेडावून जाणारा माणूस स्वतःच्या आयुष्याचे अंगप्रत्यांग मात्र स्वार्थाने, लोभाने का बरबटून टाकतो याचंच आश्चर्य वाटतं.”

हे विधान मी सर्वसामान्य माणसांसाठी म्हटलंलं असलं तरी विशेषकरून माझ्या पतीविषयी म्हटले आहे. होय आज मी ह्या दोडाबेटा पॉईंटच्या साक्षीने तुम्हाला माझी कथा सांगणार आहे.

परवाच मी सौ. सुजाता शेखर भागवत या नावाने सासरचा उंबरठा ओलांडला. 

त्या आधी सप्तपदी पूर्ण करताना मी शेखरसारखा समंजस जीवनसाथी मिळाला म्हणून आनंदाच्या सागरात डुंबत होते. पण काल मात्र दुधात मीठाचा खडा पडला आणि काचेवरून वाफ पुसल्यावर जसं स्पष्ट दिसतं तसंच मुळात शेखर कसा आहे हे मला कळलं आणि आता असं वाटतय मी चुकले शेखरशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन.

आयुष्याचा सारीपाट खेळायचे ठरविल्यावर संसाराची सोंगटी विचारपूर्वक मांडायला होती. तेव्हा इतका हिशोबीपणा करायला हवा हे कळलंच नाही. 

मुळात शेखर इतका हिशोबी असेल असे मला वाटलंच नव्हतं. संसार हा व्यवहार नाही. दोन मनाचं मिलन म्हणजे संसार अशी माझी समजूत होती. आता या क्षणी होती असंच म्हणावं लागेल.

लग्नाआधी शेखरनं माझ्या वादळी व्यक्तिमत्त्वाचे खूप कौतुक केलं होत, पण ते केवळ इंप्रेशन मारण्यासाठी होते ते आत्ता कळतंय. "मला जीवनसाथी हवीय ती धाडसाशी मैत्री करणारी आणि ती तूच आहेस." हे शेखरचं वाक्य मला किती सुखावून गेलं होतं. 

हे बोलण निव्वळ वरवरचं आहे आणि त्याच्या घोडदौडीत एक शोभेची बाहुली म्हणून मी त्याला हवीय हे कुठे मला तेव्हा ठाऊक होतं.

माझं स्वतंत्र अस्तित्त्व आणि बालनंदनशी असलेला माझा संबंध त्याला नको होता. लग्नाआधी तर त्याला बालनंदनशी असलेलं माझं नात ठाऊक होतं मग तेव्हाच त्याने हे का स्पष्ट केलं नाही. 

कदाचित मी नकार देईन ही भीती वाटली असेल म्हणून स्पष्ट बोलला नसेल का?

एक जबाबदार नागरिक ह्या नात्याने मी ह्या समाजाचं देणं लागते हे मला कळतंय. म्हणूनच ह्या अफाट जगात आईबाप नसलेल्या मुलांना त्यांच्या पायावर उभं करण्याची माझी धडपड चालू आहे.

मी या मुलांची जिजाऊ व्हायचा प्रयत्न करतेय. माझा जीवनसाथी असणारा शेखर शहाजी होण्याचा प्रयत्न का करीत नाही. 

शहाजी राजे एवढ्या जुन्या काळातही किती आधुनिक होते याचे आश्चर्यच वाटतं. नव्या विचारांची चाहूल शहाजीराजांना लागली होती. म्हणूनच ते जिजाऊशी पैज लावू शकले. 

जिजाऊकडून त्यांनी शिवाजी राजांना घडवून घेतले. 

मला नेहमीच एक प्रश्न पडतो की जिजाऊचा आदर्श समोर ठेवून एक स्त्री जर जिजाऊची प्रतीकृती बनण्याचा प्रयत्न करते; तर मग, एक पुरूष शहाजी का होऊ शकत नाही?

आपल्या घराशेजारी बेवारस पडलेल्या कळ्यांची जपणूक करणारी सहृदय माळीण व्हायचा मी प्रयत्न करते आहे.हा माझा प्रयत्न लग्नाआधी शेखरला खूप आवडला होता.

आता का त्याला आक्षेप आहे?

मी अशी माळीण होण्याचा प्रयत्न करतेय. मीच ह्या इवल्या इवल्या बेवारस कळ्या वेचून आणल्या. त्यांना फुलविण्याची मी धडपड करत्येय. त्याचं आयुष्य सुंदर रंगांनी विणण्याची धडपड करतेय. 

ती धडपड मी अर्ध्यावरच सोडू? केवळ शेखर म्हणतो म्हणून? शेखरला हे पटत नाही म्हणून? तो शहाजी व्हायला तयार नाही म्हणून?

नाही मी असं होऊ देणार नाही. मला माझ्या मार्गानी एकटीनं प्रवास करायला लागला तरी हरकत नाही. मी माझ्या डोळ्यासमोर ह्या इवल्या कळ्यांचे आयुष्य कुस्करलं जातांना पाहू शकणार नाही. 

ज्यांचा जन्मच वाळवंटात झालाय त्यांना अखेरपर्यंत वाळवंटात कशी तडफडत ठेवू? 

“तुम्हाला चैतन्याचा झरा दाखवीन” असं मी या कळ्यांना कबूल केलंय. हे वचन मी केवळ या हिरव्या चुड्यासाठी विसरूं ? नाही असं होऊ शकणार नाही. 

हा हिरवा चुडा माझ्या मार्गात सुरेख स्वरात किणकिण करणारा नाही, स्वार्थाने आणि लोभाने बद्द झालेला आवाज आहे त्याचा.

मी सौंदर्याचा भोक्ता आहे असे म्हणणारा शेखर ह्या उटीचे सौंदर्य वर्णन करता करता थकत नाही. पण त्याला इवल्याशा कळ्यांच्या बाललीलात सौंदर्य मात्र दिसत नाही. किती मजेशीर सत्य आहे. 

ह्या अशा माणसाबरोबर निसर्गाचे सौदर्य बघण्यात वेळ घालविण्यापेक्षा माणसाच्या मुशीतून निघालेल्या कच्चा ओल्या जिवामध्ये सौंदर्य कोरण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 

शेखरला काय कल्पना बाललीलांच्या सहवासात निसर्गाचं सौंदर्य निरखण्यात किती स्वर्गीय आनंद मिळतो ते. या स्वर्गीय आनंदापासून मी स्वतःला वंचित ठेवणार नाही.

बालनंदनसाठी मला ह्या मंगळसूत्राशी फारकत घ्यावी लागली तरी हरकत नाही. आज नाही उद्या.. नाहीतर पुढे केव्हातरी माझ्या मनाची स्पंदन जाणणारा सवंगडी भेटेलच. 

भेटलाच... तर... त्यांनी दिलेला हिरवा चुडा मी आनंदानी भरीन, पण आता शेखरबरोबर चालणं नको वाटतं.

माणुसकीची ओळख ज्याला जन्मतःच नाही आहे. जो फक्त स्वतःभोवती आखलेल्या वर्तुळात जगू पाहतोय असा माणूस माझा शहाजी कसा होईल? 

शेखर काही प्रमाणात जर शहाजी व्हायला तयार झाला असता तर मीही त्याला अपेक्षीत त्या रूपात वावरले असते. पण येथे तडजोड नाही हुकुमशाही आहे. ती मी कधीच मान्य करणार नाही.

ओली हळद पुसण्याअगोदरच मी घरटं मोडून परतलेय म्हणून मला सगळे हसतील. हसू देत. माझ्या विवेकबुद्धीला जिजाऊ होणंच पटणार आहे. ते मी नाकारू शकत नाही. 

पण एक गोष्ट नक्की ती म्हणजे आत्ता मला शेखरच्या संसारातून त्रयस्थासारखं बाहेर पडायला हवं.

अशी त्रयस्थ होऊन बाहेर पडले तरच मला माझ्या स्वप्नातील बालनंदन हे गाव वसवता येईल फुलवता येईल.

हीच माझी कथा आहे. 

अर्थात यावर मला तुमचं मत नकोय. कारण माझा निर्णय पक्का आहे. मला जिजाऊ व्हायचय, शिवबाच्या जिजाऊसारखा खडतर प्रवास करायला लागला तरी माझी पूर्ण तयारी आहे.कारण माझं धेय्य तेच आहे.

जिजाबाईनी एक शिवबा घडविला. मला अनेक शिवबा घडवायचे आहेत. शिवबाच्या जिजाऊला एक समाधान होतं ते म्हणजे तिचा शहाजी शरीराने तिच्याजवळ नव्हता तरी मनाने तिच्याच सहवासात होता. मला मात्र असा शहाजी भेटला नाही हे माझे दुर्दैव,

माझ्या बालनंदनमधील मुले माझ्या कुशीतून जन्माला आली नाहीत तरी त्यांना "काऊ-चिऊ" चा घास भरविण्यापासून तो त्यांनी मला "माई" म्हणून हाक मारेपर्यंतचा जो प्रवास आहे. त्यातील खाचखळगे मी पचविले आहेत. असे हे प्रेमाचे बंध मला कसे तोडता येतील? माझ्या प्रेमाच्या शिदोरीतील खाऊ मला ह्या मुलांना वाटायचा आहे.

शेखरबरोबर गेले तर मी हा खाऊ या मुलांना कसा वाटू शकेन? शेखरची गाडी मला हव्या त्या वाटेनी जाणारच नाही आहे म्हणूनच ही ओल्या हळदीची रांगोळी आजच मिटवून मुलाच्या आयुष्यात रंग भरायला जायलाच हवं.

माझ्या स्वप्नाच्या गावची वाट दुघड आहे हे मला माहीती आहे. ती चालताना बरेच बिकट प्रश्न समोर उभे राहणार आहेत हेही मला माहिती आहे.

पण मीच स्वतःहून या गावची वाट चालायचं ठरवलय मग घ्यावे लागणारे कष्ट, वाट चालताना समोर येणारे प्रश्नं, लढत देताना होणारी दमछाक हे सगळं मी कसं टाळू शकते. हे सगळं मला आधीच अपेक्षित होतं.त्यामुळे या सगळ्यांना मी हसत हसत तोंड देईन.

पुरूषांनीच फक्त अशी जगावेगळी स्वप्नं बघायची असतात का? हा अधिकार फक्त त्यांनाच आहे का? स्त्रीला हा अधिकार का नाही? 

पुरूषानी असं स्वप्न बघीतलं तर त्याचं कौतुक होतं. त्याच्या या कार्यात बायकोनी सहभाग घ्यावा ही अपेक्षा कुटूंबाची असतेच तशीच समाजाची पण असते.

स्त्रीनी जर असा वसा घेतला तर तिला का नवरा आणि समाज साथ देत नाही? हा स्त्रीच्या इच्छेचा, कर्तृत्वाचा अपमान आहे. 

मी हा अपमान सहन करणार नाही. मी घेतलेला वसा पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहणार नाही. हा वसा ऊतून मातून टाकून देण्यासाठी नाही. शरीरातील रक्ताचा शेवटला थेंब असेपर्यंत मी हा वसा चालू ठेवणार.

हा माझा निश्चय आहे पण यात शेखरचं अस्तीत्व अडथळा म्हणून येत असेल तर मी हे बंधन मोडून मोकळी होईन. कारण मला एक सामान्य व्यक्ती म्हणून जगायचं नाही.हाती घेतलेलं व्रत पूर्णत्वाला न्यायचं आहे.

मला जिजाऊ व्हायचंय आणि मी होणारच

जीजाऊ व्हायला तलवार दाणपट्टा यायला हवा असं नाही. जिजाऊ ही एक दृष्टी आहे. एक सकारात्मक विचारातून आलेली दृष्टी. आयुष्याचं गमक समजलेली व्यक्ती ही जीजाऊ असते. 

आयुष्यात आपल्याला काय करायचंय आहे हे स्वतःला कळणं खूप महत्वाचं आहे. इतर लोक जे परंपरेनी करत आले आहेत तेच मीही करावं अशी अपेक्षा लोकांनी का ठेवावी? इतर लोक करतात तेच आपण करायचं यात वेगळेपणा काहीच नाही. 

जिजाऊ हे वेगळेपण ठसठशीत पणे दाखवणारी वृत्ती आहे.  मला असं जिजाऊ व्हायचंय.

"निश्चयाची तलवार उपसली,

बंध सारे क्षणिक तोडूनी गेली।

एकली प्रवासी नव्या मुलुखाची,

ध्यास बोलतो स्पंदने हृदयाची।


"मी जिजाऊ.. मी जिजाऊ.. मी जिजाऊ."।

शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या तोंडी हेच शब्द असतील.

© सौ.मीनाक्षी वैद्य.


सदर कथा लेखिका सौ.मीनाक्षी वैद्य यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने