कुछ तो लोग कहेंगे

© पल्लवी घोडके-अष्टेकर




दिव्या १४-१५ वर्षांची चुणचुणीत सुंदर मुलगी.अभ्यासात हुशार व आईवडिलांची लाडकी त्यामुळे लाडात वाढलेली परीच. दिव्याच्या आईला टापटीप राहण्याची भारी आवड होती. 

छान-छान नवीन फॅशनचे कपडे तिने नेहमीच दिव्या लहान असतांना तिच्यासाठी निवडले. दिव्या लहान असतांना,गुटगुटीत होती,तिला कुठलेही कपडे खूप छान दिसत. 

तिच्या वडिलांचा मोठा बिझनेस होता, त्यामुळे घरात बरेच नोकर-चाकर होते.लोकांची ये-जा दिवसभर घरात असे. तिच्या वडिलांचा समाजातील वेगवेगळ्या थरातील लोकांशी संपर्क येत असत.त्यात अनेक उच्चभ्रू,मध्यमवर्गीय,तर कधी गरीब नोकर-चाकर यांचाही समावेश होता.

दिव्या लहान होती तोवर सगळं ठीक होतं,पण जसजशी ती मोठी होऊ लागली तसतशी तिच्या कपड्यांवर बंधने येऊ लागली.तिने काय घालावं,कसं वागावं,कसं बोलावं अगदी सगळ्याच बाबतीत बंधने.

नाजूक वयातील दिव्याला ही बंधने कशासाठी? हे देखील कळत नव्हते. 

पण आई तिला नेहमी समजावून सांगत,"आपल्या घरी खूप माणसे येतात,कुणाची नजर कशी असते ते काही आपल्याला माहित असतं का? लोक आपल्या समोर एक बोलतात व बाहेर गेले की दुसरंच बोलतात म्हणून आपणच सावध राहायला हवं."

"अगं…..पण ते लोक आपले नातेवाईक आहेत का? आपल्याला काय करायचे ते काय बोलतात याच्याशी?" 

दिव्याच्या निरागस प्रश्नावर आई हसत,"कळेल तुला थोडी आणखी मोठी झाली की." एवढेच बोलून विषय टाळत.

खरंतर दिव्याचा प्रश्न नेहमीच आईला विचार करायला लावत.आपण नेहमी काय लोकांचा विचार करायचा ? लोक करतात का आपला विचार?आणि त्यांनी तरी का करावा मी म्हणते? 

 माझ्या मुलीने कुठले कपडे घालावे हे देखील लोकांनी ठरवावे मग काय उपयोग शिक्षणाचा आणि पैशाचा? पण हे सगळं ती मनातच बडबडत असे.

तसं पाहता व्यक्ती कितीही उच्च शिक्षित असो,सुंदर किंवा श्रीमंत असो तो इतरांचा विचार करतच असतो.अगदी पिक्चर मधल्या नट्या देखील लोकांना आवडेल असेच कपडे घालतात.

त्यांनी घातलेले कपडे लोकांना आवडतात आणि तसेच कपडे आपण घातले की पुरुषांपेक्षा बायकाच जास्त नाकं मुरडतात.

बहुतेकदा ती बाई आपलीच आत्या,मावशी,काकू असते. पण कितीही ठरवलं "तरी लोक काय म्हणतील?" हा प्रश्न कपडे व दागिने घेतांना अगदी प्रत्येकाच्या मनात येतोच.

दिव्याचे वडीलही त्याला अपवाद नव्हते,त्यांचं त्यांच्या मुलीवर प्रेम असलं तिच्या सालस वागण्याचं त्यांना कौतुक वाटत असलं तरी "लोक काय म्हणतील?" हा विचार त्यांच्याही मनात येतच होता.

अशातच दिव्याचा वाढदिवस जवळ आला.

लाडकी लेक १५ वर्षांची होणार होती. वाढदिवसाच्या निमित्ताने आई आणि दिव्या मॉलमध्ये शॉपिंगला गेल्या. 

त्यातल्या त्यात दिव्याने आपल्याला शोभून दिसतील, फार विचित्र वाटणार नाही,लोकांच्या घाणेरडा नजरा आपल्यावर पडणार नाही ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून कपडे खरेदी केले.

सोबत आई होतीच,पदोपदी "लोक काय म्हणतील?"हा विचार डोक्यात ठेवून कपड्यांची निवड करायला.

वाढदिवसाच्या दिवशी दिव्या सुंदर 'कोल्ड शोल्डर' टॉप व जीन्स घालून केक कापायला आली.त्यावेळी घरातलीच मंडळी उपस्थित होती. 

आजी-बाबा,काका-काकू व इतर घरातील नोकर मंडळी‌.दिव्याच्या वडिलांना कामानिमित्त काही लोक भेटायला आले होते आणि तेही तेथे हजर होते‌.

दिव्याला पाहताच वडिलांनी नजरेनेच आईला बाजूला बोलावून,"जरा बरे कपडे घाला तिला."म्हणून सांगितले. 

"अहो.. छानच आहेत की ते!" -आई.

"काय ते उघडे खांदे,नीट कपडे घालून आन तिला." - बाबा. 

दिव्याला काय कळायचे ते कळाले.ती रागातच वर तिच्या खोलीत गेली व साधा टी-शर्ट घालून खाली आली.

तेही इतर सगळे लोक जमले होते म्हणून. पण मनात राग होताच.

तिने खाली येताच हातातील पिशवी ड्रायव्हर काकांच्या हातात दिली व तुमच्या मुलीला द्या म्हणून न हसताच केक कट केला. 

अर्थातच नंतर आई-बाबांनी आपल्या लाडक्या लेकीची समजूत काढली.

थोड्या दिवसांनी ड्रायव्हर काकांच्या मुलीचा वाढदिवस होता. 

खूप आग्रह केला म्हणून दिव्या व आई वाढदिवसाला गेले.

त्यांच्या मुलीने दिव्याने त्या दिवशी रागाने दिलेला टॉप घातला होता. तो तिला खूप सुंदर दिसत होता व तिच्या मैत्रिणी तिचे फार कौतुकही करत होत्या. 

ते पाहून दिव्याची आई बोलली, "छान दिसतोय टॉप!" त्यावर ड्रायव्हर काकांची बायको बोलली, "दिव्या ताईंनी दिला म्हणून तिला घालता आला नाहीतर आमची कुठे एवढी ऐॆपत छान-छान कपडे घालायची?"

"रामूला (ड्रायव्हर काका) आवडतं हिने असे कपडे घातलेले तेवढे बरंय!" ( "लोक काय म्हणतील?"असा प्रश्न यांना बरा पडत नाही हा विचार मनात आणून आई बोलली.)

"अहो कसलं काय, ते पण बोलतातच की, पण मी आहे ना खमकी, मी बी सांगितलं दिव्या ताईंनी दिले कपडे खास वाढदिवसाला, मग बसले गप.

लोक काय, म्हणतील त्यांनी दिले,पण तुम्हाला शोभतात काय? पण मी काय म्हणते,उद्या लग्न होऊन लेक नवऱ्याच्या घरी गेल्यावर घालायला देतील व्हय तिला कोणी असे कपडे? 

मग म्हणू द्या काय म्हणायचं लोकांना ते,लोक काय अशेपण बोलतात आणि तशेपण बोलतातच." रामूची बायको बोलली.

दिव्याने तिच्या मोबाईल मध्ये बर्थडे गर्ल बरोबर एक सेल्फी घेतली व घरी आल्यावर बाबांना दाखवली. 

बाबांनाही काय समजायचं ते समजले. एका आडानी बाईने लेकीच्या सुखासमोर "लोक काय म्हणतील?" याची पर्वा केली नाही.मग आता दिव्याची आई गप्प थोडीच बसणार होती?

पण मी काय म्हणते,"लोक काय म्हणतील?" याची पर्वा न करता आपण मात्र आपल्याला शोभेल,छान दिसेल, उगाच अंगप्रदर्शन होणार नाही, असे कपडे घालायला काय हरकत आहे? 

शेवटी काय, "कुछ तो लोग कहेंगे….. लोगों का काम है कहना….." मग त्यांचं काम त्यांना करू द्या आणि तुम्ही तुमचं काम करा.


काय? पटतंय का?

© पल्लवी घोडके-अष्टेकर.

सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने