© वर्षा पाचारणे.
राया आणि भानु... अगदी साधं काट्याकुट्यात रानावनात वाढलेलं हे जोडपं... अगदी लहानपणापासून त्यांची मैत्री... एकाच आदिवासी पाड्यावर राहत असल्याने, एकत्र खेळणं, एकत्र जेवणं एकमेकांची सुखदुःख जवळून पाहणं, असं त्यांचे जीवन. आदिवासी पाड्यावर सोयीसविधांचा अभाव... पण तरीही कसलीच तक्रार नव्हती लोकांची.
रायाला फक्त आई होती.. तीही रानावनात जाऊन डोंगरपायथ्याशी मिळणाऱ्या भाज्या खुडून आणायची आणि रस्त्याच्या कडेला बसून विकायची.... तेवढेच काय ते उदरनिर्वाहाचे साधन. राया सात-आठ वर्षांचा असेल तेव्हा पाड्यावरती शहरातील एक मास्तरीणबाई सर्वेक्षणासाठी आल्या होत्या.
तिथल्या लोकांचे जीवन पाहून त्यांना खूप हळहळ वाटली. सततच्या येण्याने माणसांचे राहणीमान, त्यांच्या समस्या जाणून घेऊन मास्तरीणबाईंना आदिवासी पाड्यावरच्या माणसांबद्दल आपुलकी वाटू लागली.
त्यांनी रायाला थोडं व्यवहारापुरतं लिहायला, वाचायला शिकवलं. राया जवळच्याच एका गावातील छोट्याशा हॉटेलमध्ये भांडी घासायच्या कामाला जाऊ लागला. आता घरात थोडाफार पैशांचा आधार होत होता.
रायाच्या वडिलांनी भानुच्या आजोबांना, भानुला सून करुन घ्यायचे वचन दिले होते. रायाचे वडील वारले पण त्याच्या आईने नवऱ्याने दिलेले वचन तंतोतंत पाळले. जसा राया मोठा झाला, तसे तिने राया आणि भानुचे लग्न लावले.

एकाच पाड्यावर असल्याने, भानू कधीही तिच्या माय अन बा कडं जाऊ शकत होती. आता तिने पण राया जिथे जातो, त्याच गावात एका घरी भांडी-धुण्याची कामं करायला सुरुवात केली होती. लग्नाला दोन चार महिने होत नाही तोच भानू गरोदर असल्याची बातमी समजली.
पण आदिवासी पाड्यावर जगताना लहानपणापासूनच शरीराचे आणि जिभेचे चोचले पुरवणे कधी शक्यच नव्हते. त्यामुळे त्या जगण्याची, त्या वातावरणाची लहानपणापासून सवय असल्याने भानू अगदी मिळेल ती भाजी भाकरी आनंदाने खायची अन् कष्ट करायची.
आठवा महिना लागेपर्यंत भानू दुसऱ्या गावात जाऊन भांडी धुण्याचे काम करत होती. पण नंतर शरीराला जडत्व येऊ लागल्याने तिने नवव्या महिन्यात काम सोडून दिले.
भानूला जुळी मुलं झाली. तिने मुलीचं नाव 'तानी' आणि मुलाचे नाव 'झेलू' ठेवलं. मुलं दोन महिन्यांची झाल्यावर, तिने पुन्हा कामाला सुरुवात केली. दरम्यान सासुबाईंची तब्येत बिघडली आणि वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.

घरावर असलेल्या मायेचा आधार हरपल्यासारखं भानूला अन् रायाला वाटलं. हातावर पोट असल्याने कष्ट करणं गरजेचं होतं. भानू दोन्ही मुलांना घेऊन कामाला जाऊ लागली, पण त्यामुळे लवकरच मालकीणबाईंनी तिला हुसकावून लावले.
शेवटी ती एका बांधकामावर काम करू लागली. मुलांना झोळीत टाकून तिचे काम सुरू असायचे. जरी काम सुरू असेल, तरी मध्ये मध्ये झोळी जवळ जाऊन ती त्यांना दूध पाजून जायची.
कदाचित आई-बाबांचे कष्ट मुलांनी जणू जन्मतः जाणले असतील कदाचित म्हणून ती लेकरं निवांत झोळीत दिवसभर पडून राहायची.... कसला खुळखुळा नाही, कसली अंगाई नाही, की कसला मजबूत पाळणा नाही, पण त्या झोळीत त्यांच्या 'माय'ची उब त्यांना मिळायची.
पावसाळा तोंडावर आला होता. घराचे छप्पर मजबूत नसल्याने राया अन भानुला काळजी वाटू लागली होती. अचानक जर छप्पर कोसळले, तर ही तान्ही लेकरं घेऊन कुठे जायचं? हा प्रश्न त्यांना पडला होता.
पावसाळा तोंडावर आला होता. घराचे छप्पर मजबूत नसल्याने राया अन भानुला काळजी वाटू लागली होती. अचानक जर छप्पर कोसळले, तर ही तान्ही लेकरं घेऊन कुठे जायचं? हा प्रश्न त्यांना पडला होता.
भानूने पावसाळा संपेपर्यंत काम सोडायचं ठरवलं. दिवसभर ती लेकरांना सांभाळत रायाची वाट बघत रहायची. कधी रायाला कमी पैसे मिळाले, तर दोघंही असेल ती मीठ भाकरी खाऊन झोपायचे. कधीकधी अगदीच हॉटेल मालकाने कटकट केली तर जास्त वेळ काम करूनही रायाच्या हातात एक दमडीही नसायची.
आज राया लवकर कामावर गेला होता. आज लवकर जाऊन लवकर घरी परत येईल, असा त्याचा विचार होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
आज राया लवकर कामावर गेला होता. आज लवकर जाऊन लवकर घरी परत येईल, असा त्याचा विचार होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी झाकोळून गेलं... पावसाच्या सरी बरसू लागल्या.. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली... काही केल्या पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता.
घरात भानुला भीती वाटू लागली. आतुरतेने ती त्याची वाट पाहू लागली. तिची एक नजर वरती गळक्या छपराकडे अन् एक नजर उघड्या दाराकडे अशी अवस्था झाली होती. एवढ्या पावसातही लेकरं निवांत झोपली होती.
आता पावसाचा जोर वाढला होता.. राया कधी येतोय, या चिंतेने भानू व्याकूळ झाली. तितक्यात शेजारचा बाल्या पाड्यावर ओरडत ओरडत आला आणि म्हणाला," गावच्या ओढ्याला पूर आलाय, लय पाणी भरलंय, कुणीबी घरातनं भाईर पडू नका"... त्याचं बोलणं ऐकून भानुच्या अंगातलं अवसानच गळालं. तिचा जीव टांगणीला लागला होता. रायाच्या आठवणीने तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या.
तितक्यात झेलू रडत रडत उठला. त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करत, भानू पुन्हा रायाच्या वाटेकडे डोळे लावून बसली.. पण काही केल्या झेलूचे रडणे थांबेना... शेवटी तिने डोक्यावर इरली घेतली अन् एका काखेत झेलूला अन् दुसऱ्या काखेत तानीला पकडलं...

एवढ्या मुसळधार पावसात कुठे शोधणार होती ती तिच्या रायाला?... पण मन घरात थांबत नव्हतं... रायाच्या काळजीने तिने दोन्ही लेकरं कडेवर घेऊन चालायला सुरुवात केली. मुसळधार पावसाबरोबर वाऱ्याचा वेग पण वाढला होता..
डोक्यावरची इरली कधीच उडून गेली होती पण भानूला त्याचे भान नव्हते. तिचे डोळे तिच्या रायाला पाहण्यासाठी आसुसले होते. आज जर राया घरच्या काळजीने ओढ्याच्या वाटेने आला तर काय होईल? या विचाराने तिच्या मनात काहूर माजले होते.
चिखल गाळ तुडवत तुडवत, वाऱ्याचा आणि पावसाचा वेग न जुमानता, भानू कशीबशी गावच्या वेशी जवळ आली. ओढा तुडुंब भरून वाहत होता.
चिखल गाळ तुडवत तुडवत, वाऱ्याचा आणि पावसाचा वेग न जुमानता, भानू कशीबशी गावच्या वेशी जवळ आली. ओढा तुडुंब भरून वाहत होता.
संध्याकाळचा पाचचा सुमार, मुसळधार पावसामुळे हातभरच्या अंतरावर असलेले अंधुक दिसत होते. कशीबशी ती लेकरांना घेऊन ओढ्यापाशी आली. दूरवर नजर पोहोचेपर्यंत तिने पाहिले ओढ्याच्या पल्याड तिला तिचा राया दिसला.
पावसाचा जोर आणखी वाढला. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. लांबूनच रायाची ओळख पटल्याने भानू तिकडून ओरडून सांगत होती," रायाsss, रायाssss, आहे तिथेच थांबssss, पुढं येऊ नको... वढ्याला पाणी वाढलंय"... पण तिचे शब्द रायापर्यंत पोहोचतच नव्हते.
रायाची नजर भिजणाऱ्या आपल्या भानू आणि तान्ह्या लेकरांकडे गेली. इतका वेळ कसाबसा तग धरून राहिलेला राया त्या चिंब पावसात भिजता भिजता अश्रूंना मोकळी वाट करून देत होता.
रायाही भानूला ओरडून सांगत होता," भानूss,हाइस तिथंच थांबss पुढं येऊ नको, पाड्यावर परत जाsss, पाऊस थांबला की मी घरी येतोsss"..... पण आताही तीच परिस्थिती होती. रायाचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचण्यापासून मुसळधार पाऊस अडवत होता.

तिला 'येऊ नको' सांगण्यासाठी राया पुढे येताना दिसला तशी तीही घाबरली, अन् दोन पावलं पुढं पाण्यात उभी राहिली. आधीच बराच वेळ कशीतरी कमरेवर पकडून ठेवलेली लेकरं पावसामुळे रडारड करत होती. त्यात जशी भानू पुढं सरकली तसे तिचे दोन्ही पाय चिखलात रुतले.
काही केल्या ती बाहेर येऊ शकत नव्हती. पाण्याच्या लोटाबरोबर ती ओढली जाऊ लागली.
डोळ्यांना अश्रुधारा अन् मनात लेकरांबद्दलचा मातृत्वाचा झरा ओसंडून वाहत होता... एवढ्या पाण्यात कडेवर पकडून धरलेली तानी आता पाण्याच्या लोटाबरोबर कमरेवरून खाली सरकू लागली, पण अचानक एका क्षणात ती एका मोठ्या लाटेसोबत ओढ्याच्या प्रवाहात विलीन झाली.
डोळ्यासमोर आपली चिमुरडी तान्ही लेक पाण्यात वाहून जाताना बघून भानू एखादी गाय वासरासाठी हंबरावी, तशी जीवाच्या आकांताने आक्रोश करत होती... बघता बघता पाणी गळ्याशी आले.
भानू अन् झेलू, ही माय लेकरं ओढ्याच्या पाण्याच्या भोवर्यात गिरक्या घेत घेत दूर निघून गेली.
आपल्या कुंकवाच्या धन्याला, लेकरांच्या 'बा' ला सुखरूप बघण्यासाठी जी जीवाची झटापट चालू होती, ती एका क्षणात संपली. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूने सगळं दृश्य पाहून राया छातीवर मारून घेत आक्रोश करत होता.
आपल्या कुंकवाच्या धन्याला, लेकरांच्या 'बा' ला सुखरूप बघण्यासाठी जी जीवाची झटापट चालू होती, ती एका क्षणात संपली. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूने सगळं दृश्य पाहून राया छातीवर मारून घेत आक्रोश करत होता.
"जिला घरी जा सांगितले होते, ती आपल्या काळजीनी शोधायला आली अन एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं"... 'ज्यांच्यासाठी जगणं सुरू होतं, ती लेकरं, बायको रायाच्या डोळ्यासमोर पाण्यात वाहून गेली.
राया रडत रडत जवळंच असलेल्या नारळाच्या झाडाखाली बसला... हुंदके अनावर होत होते.
अंधारात सगळं संपून गेलं होतं... घर म्हणावं, अशा घरी आता कोणीही असणार नव्हतं.... भानू अन् लेकरांच्या आठवणीनं रायाचं मन स्वतःला कोसत होतं.
"समोर असूनही आपण आपल्या लेकरांना वाचवू शकलो नाही, तर या असल्या जिंदगीचा काय उपयोग?" म्हणत तो स्वतःच्या तोंडात मारून घेत होता..
इतक्यात एक लखकन वीज चमकली. इतका वेळ काळाकुट्ट अंधार पसरल्याने हातभर अंतरावर असलेल्या न दिसणाऱ्या त्या परिसरात लखकन प्रकाश पडला... काड्कन आवाज झाला अन् नारळाच्या झाडासकट रायाला भेदत विज जमिनीत शिरली.
जागी फक्त कोळसा उरला अन तोही मुसळधार पावसामध्ये त्याच ओढ्याच्या प्रवाहात वाहून गेला... एक कुटुंब बघता बघता त्या पावसाने उद्ध्वस्त झालं होतं.
मुसळधार पाऊस असला की आपल्यासाखे लोक उबदार, मजबूत घरांमध्ये निवांत, बिनधास्तपणे आपल्या परिवारासोबत असतो... पण कितीतरी अशीही लोक आहेत ज्यांना पडक्या, गळक्या छताखाली जीव मुठीत घेऊन रहावं लागतं...
मुसळधार पाऊस असला की आपल्यासाखे लोक उबदार, मजबूत घरांमध्ये निवांत, बिनधास्तपणे आपल्या परिवारासोबत असतो... पण कितीतरी अशीही लोक आहेत ज्यांना पडक्या, गळक्या छताखाली जीव मुठीत घेऊन रहावं लागतं...
त्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, गावांमध्ये पाणी शिरली की घरातलं सामानंच काय, पण जीव वाचवणं पण मुश्किल होतं... त्यात त्यांची लेकरं, जनावरं, सारं काही वाहून जातं अन् उरतं ते फक्त अडचणींचा सामना करत पुन्हा मोडलेल्या संसाराची जुळवणुक करत आयुष्य जगण्याची धडपड... राया अन् त्याचं कुटुंब पावसाने उद्ध्वस्त झालं, पण कदाचित त्यांच्यातील प्रेम इतकं जास्त होतं, की राया एकटं आयुष्य जगू शकला नसता, या विचाराने कदाचित नशिबानेच त्यालाही आपल्या कवेत घेतलं असावं...
© वर्षा पाचारणे.
सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.