संस्कारी असून निर्लज्ज ठरतानाचे दुःख

© वर्षा पाचारणे




पूर्वी सुनेला खूप सासुरवास सहन करावा लागायचा. त्यात मारहाण, अनेक कष्टाची कामं,असं खूप काही सहन करून तिचा जीव मेटाकुटीला यायचा. त्यात जर मुलं होत नसतील तर जो छळ सहन करावा लागायचा तो वेगळाच.... पण काळ जरी बदलला तरी अनेक सुनांच्या नशिबातुन हा सासुरवास मात्र काही केल्या गायब होत नाही.

अनघा अगदी चौकोनी कुटुंबात वाढलेली मुलगी. आई-वडील दोघेही सुशिक्षित, भाऊ चांगल्या ठिकाणी कामाला आणि अनघा देखील ग्रॅज्युएट मुलगी . अगदी जेवढ्यास तेवढं मोजकच बोलणारी पण मुद्देसूद असं बोलणं असायचं अनघाचं... कोणालाही उलटून बोलायचंच नाही हे तिच्यावर लहानपणापासूनच संस्कार झाले होते.


अनघाला बघायला पाहुणे आले आणि पाहताक्षणी अनघा त्या लोकांना पसंत पडली. आई, बाबा आणि भावाचा तर आनंद गगनात मावेनासा झाला. आपली लाडाची लेक परकी होणार, म्हणून एक हळवा कोपरा मात्र आठवणीने भरून ओसंडून वाहत होता. 

अनघा लग्न होऊन सासरी गेली. नवराही तिच्या इतकाच समजूतदार आणि शांत स्वभावाचा होता. पण सासुबाई मात्र काही ना काही कारणावरून महिन्याभरातच भांडण उकरून काढू लागल्या. 

खरं तर भांडणासारखं कारण नसलं तरीही त्याचा मोठा तमाशा करण्याची त्यांना सवय झाली होती.

अनघा त्यांच्या या स्वभावामुळे खूपच दबकून वागत होती. आपल्या हातून काहीही चूक होऊ नये, म्हणून ती सतत काळजी घेत होती. पण सासूबाईंना मात्र आपल्या लेकाच्या आयुष्यात त्याची हक्काची बायको आली, हे मात्र काही रुचत नव्हते. 

आवडीने लेकाचं लग्न करणं अगदी सोपं असतं, पण त्याच लेकाच्या बायकोला तितक्याच प्रेमाने हक्काचं स्थान देणं अनेक सासवांना मात्र, का कोण जाणे पण खूप अवघड जातं.

मग सासूबाईंनी हळूहळू अनघाच्या स्वयंपाकात चुका काढायला सुरुवात केली. कधी पोळी खाली रुमाल ठेवला नाही तर खालची घामेजलेली पोळी आता तूच खा म्हणून, त्या अशा काही अंगावर खेकसायच्या की अनघाची असली नसलेली भूक मरून जायची. 

अनघाला जेवणात भात अगदी हवाच असायचा. पण सासूबाईंनी मुद्दाम एक दिवस पाहुणे आलेले असताना त्यांच्यासमोर विषय काढला," ती मावळातील आहे ना, म्हणून तिला भात हवाच असतो... तिच्यासाठी म्हणून आम्हाला तांदूळ भरावा लागतो, नाहीतर आमच्याकडे भात विशेष खाणारं असं कोणी नव्हतं इतके दिवस.... माझ्या लेकाला तर चपाती, भाकरी आणि एखादं कालवण जरी दिलं, तरी तो आनंदाने खातो",.... असं म्हणल्यावर त्या दिवसापासून अनघाने बिचारीने नाराजीने भात खाणंच बंद केलं.

एखाद्या दिवशी आवडीची भाजी असेल, तेव्हा चपाती आपोआपच थोडी जास्त खाल्ली जाते.. पण सासुबाई मात्र सगळे जेवायला बसल्यावर अनघाला जेवणाचे पदार्थ आणि ताटं, पाणी आणायला सांगून स्वतः ताटं वाढायला घ्यायच्या. त्यात ताट वाढताना स्वतःचं, नवऱ्याचं आणि मुलाचं ताट वाढून मग राहिलेले जेवण अनघाकडे सरकवत "घे गं तुला पण ताट वाढून", असं म्हणायच्या. 

अनघाला प्रश्न पडायचा की 'सगळ्यांची ताटं वाढून मग माझंच ताट वाढायला यांना प्रॉब्लेम का असावा'... 'मी का कोणी परकी आहे, की वाळीत टाकले सारखी मला वागणूक देतात'... त्यातंही जेव्हा ती पोळीचा डबा उघडून बघायची, तेव्हा त्यात सगळ्यात खालची एकंच चपाती शिल्लक राहिलेली असायची. 

त्यामुळे कितीही भूक लागलेली असली तरी त्या एका चपातीवरच तिला समाधान मानावे लागे.., म्हणून तिने दुसऱ्या दिवशीपासून दोन चपात्या जास्तीच्या करायला सुरुवात केली. पण मग त्या दिवशीपासून सासुबाईंनी मुद्दाम स्वतः थोडं कमी जेवायला सुरुवात केली. त्यामुळे डब्यात आता जास्त चपात्या शिल्लक राहू लागल्या... त्यामुळे लगेच सासुबाईंनी अनघाला हुकुम सोडला,

" आपल्याकडे अन्न वाया गेलेले चालत नाही. एवढा पैसा खर्च करून ते काय कचऱ्याच्या डब्यात टाकायला आपण शिजवत नाही... त्यामुळे एकदम मोजून-मापून करत जा आणि राहीलंच तर दुसऱ्या दिवशी गरम करून खात जा"..

 "माझ्या आणि यांच्या तब्येतीमुळे आम्हा दोघांना काही शीळं चालायचं नाही आणि अमेय एवढ्या लांब ऑफिसला जातो, त्यामुळे त्यालाही असंच खायला घालून पाठवत जाऊ नकोस".... आता असं सांगितल्यावर ते सगळं अनघाच्या वाट्याला येणार होतं. 

मग कधी वाटीभर भात जरी शिल्लक राहिला तरी तो गरम करून फक्त अनघालाच खावा लागायचा. कधी रात्रीचे जेवण शिल्लक राहिले आणि ते अनघा दुसऱ्या दिवशी गरम करायला लागली, तर सासुबाई अंगावर खेकसून म्हणायच्या, "अगं, मोजून मापून करत जा... ते पदार्थ गरम करण्यासाठी पुन्हा गॅस किती वाया जातोय याचा काही हिशोब"..... त्यांच्या प्रत्येक बोलण्याने खरंतर अनघाच्या डोळ्यात पाणी यायचं, पण तिने ते कधीच डोळ्याबाहेर पडू दिले नाही. 

सतत तिला आईवडिलांवरून टोमणे मारत सासूबाईंना काय आनंद मिळायचा तो त्यांचा त्यांनाच माहीत.

एक दिवस असेच अनघाचे आई-बाबा तिला भेटण्यासाठी आले. पण त्यादिवशी सासुबाईंनी अनघाच्या आई-बाबांकडे ढुंकूनही न पाहता, फोनमध्ये स्वतःला गुरफटून घेतले होते. अनघाच्या आई-बाबांनी सासुबाईंबरोबर अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सासूबाईंनी दुसरीकडे बघत अजिबात लक्ष दिले नाही. 

शेवटी आज सासू-सुनेमध्ये काहीतरी बिनसले असेल, या विचाराने आई-बाबांच्या डोळ्यात पाणी आले. निघताना ते सासूबाईंना म्हणाले, "चला, आता येतो आम्ही".

तशा सासुबाई अनघाच्या आई-बाबांवर अंगावर धावत म्हणाल्या, "काही पुन्हा माझ्या दारात यायची गरज नाही. तुमच्या लेकीला तुम्ही काहीही चांगलं वळण लावलं नाही.... माणसाशी बोलायची पद्धत म्हणून नाही... स्वयंपाक शिकवला नाही... आमच्या मुलीला सगळं येतं म्हणत, फक्त माझ्या मुलाच्या गळ्यात मारली आहे"

आता मात्र अनघाच्या आई-बाबांना काहीच सुचेनासे झाले. लेकीचे आईबाप म्हटल्यावर आपल्याला कमती बाजू घ्यावी लागेल, या विचाराने बिचारे दोघेही सासूबाईंना म्हणाले," चुकली असेल कदाचित आमची पोर, पण तुम्ही आईच्या मायेने, मोठ्या मनाने तिला माफ करा आणि अनघाकडे बघत अनघाची आई म्हणाली, "अनु, बाळा तू समजदार आहेस ना... मग का चुकीचं वागते ? अगं सासू म्हणजे आईच असते... सासर न समजता हे आपलं दुसरं माहेरच आहे, असे समजून वागत जा... कुठलीही गोष्ट सासूबाईंना विचारून करत जा".

असं म्हणताच पुन्हा सासुबाई खवळल्या ,"एवढी जर समज द्यायची होती, तर ती लग्नाच्या आधीच द्यायची होती ना! यापुढे पुन्हा माझ्या दारात पाऊल ठेवू नका"... असं म्हणून जवळपास सासूबाईंनी अनघाच्या आई-वडिलांना घरातून हुसकावून लावले. 

अनघा आई-बाबांच्या पाठोपाठ धावली. आपली काहीही चूक नसताना सासूबाईंनी आपल्या आई बाबांना असं हाकलून लावलेलं पाहताना तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं.... ज्या आई-वडिलांनी मानाने आयुष्य जगलं होतं, त्यांचा आज आपल्या सासरी झालेला अपमान तिला सहन होत नव्हता.... 

परंतु ती म्हणजे अगदी समजूतदारपणाचा कळस होती.... तिने आईला समजावलं "आई, तू माझी काळजी करू नकोस... मी खंबीर आहे. "फक्त तू आणि बाबा नीट घरी जा. मी तुला नंतर फोन करेल".

बिचारे आई-बाबा.... लेकीच्या सासरी झालेला अपमान सहनही होत नव्हता आणि सांगताही येत नव्हता. दोघेही बसमध्ये प्रवास करताना पूर्ण प्रवासात अश्रू ढाळत होते. 

लेकीसाठी स्थळ बघताना आपली खूपच मोठी चूक झाली की काय? लोकांच्या फक्त दिसण्याला आपण भुललो की काय? त्यांचा स्वभाव ओळखण्यात आपण चुकलो की काय? असे असंख्य प्रश्न त्यांच्या डोक्यात थैमान घालत होते. 

आपल्या मुलीला सासरी मारहाण तर होत नसेल ना? तिचा छळ तर होत नसेल ना? या विचारांनी रात्र रात्र आई-बाबांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता.

इकडे सासुबाई मात्र सुनेचे चांगलेच हाल करण्यात मग्न झाल्या होत्या. पण शेवटी अनघाने ठरवलं,' हा छळ असाच सहन केला, तर आपल्याला आयुष्यभर फक्तं त्रासंच सोसावा लागणार आहे... म्हणून एक दिवस तिने सासूबाईंना प्रत्युत्तर दिलं.

असंच दोघीजणी बसलेल्या असताना सासूबाईंनी अनघा टीव्ही बघत असताना अचानक येऊन टीव्ही बंद केला आणि म्हणाल्या," वेळ मिळाला की टीव्ही बघायचा.... टिव्हीचा बिल काय तुझा बाप भरणार आहे?".... त्यावर मात्र आता अनघा गप्प बसणार नव्हती. 

तिने रागाने सासुबाईंकडे पाहीले आणि म्हणाली," तुम्हाला जे काही बोलायचं, ते मला बोलत जा.... एक तर तुम्ही माझी चूक नसतानाही उगाच भांडण उकरून काढता आणि त्यातही माझ्या आई-बाबांना दुषणं देत असता. त्यापेक्षा आधी स्वतःचं वागणं तपासून पहा"

तिचं बोलणं ऐकून सासूबाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संध्याकाळी जेव्हा अमेय घरी आला तेव्हा सासूबाईंनी एकाचे दोन करून सांगत अमेयला भडकावले. परंतु आपली बायको किती शांत आणि समजूतदार आहे, हे अमेयला माहीत असल्याने, त्याने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. 

त्यावर सासूबाईंनी अमेयला, 'आता तु ही बायकोच्या ताटाखालचे मांजर झाला आहेस, बायल्या सारखा वागतो', म्हणत खूप बडबड केली.... पण त्यावरही अमेय अगदी शांत राहिला.

 पण आपल्यामुळे उगाच नवऱ्याला झालेली बडबड अनघाला काही केल्या सहन होत नव्हती. ती बेडरूममध्ये बसून सारं काही ऐकत होती. तिचं डोकं भणभणायला लागलं होतं.

अमेय बेडरूममध्ये येताच ती म्हणाली," अमेय आपण दोघं थोड्या दिवसांसाठी का होईना, पण वेगळा संसार थाटला म्हणजे तुझ्या आईला आपली किंमत कळेल... कारण काहीही चूक नसताना त्या दिवस रात्र फक्तं आणि फक्तं आपमान करतात... बरं माझा अपमान मी कसाही सहन करेल, पण माझ्यामुळे तुला आणि माझ्या आई-बाबांना बोललेलं मला कुठल्याही परिस्थितीत चालणार नाही."

पण घरात वाद नको म्हणून अमेय आईची किंवा बायकोची कोणाचीही बाजू घेत नव्हता. अशातच कंटाळून शेवटी अनघा दोन दिवसांकरिता माहेरी गेली. पण सासूबाईंनी अनघाच्या आईला फोन करून ,'आता तुमची लेक तुमच्याकडेच ठेवा... परत आमच्या घरी पाठवायच्या भानगडीत पडू नका', म्हणून धमकी दिली. 

तिच्या आईच्या पायाखालची तर जमीनच सरकली. आपल्या मुलीकडून अशी काय चूक होती, तेव्हा तिला सासुबाई अशा घालून पाडून बोलत असतात, हे त्यांना कळत नव्हतं.

 अमेयचा जीव मात्र अनघासाठी तीळतीळ तुटत होता. त्याने अनघाच्या आई बाबांना फोन करून, "तुम्ही अनघाला घेऊन घरी या", असे सांगितले.

अनघा, आई-बाबा जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा सासूबाईंनी थोडा वेळ शांत बसून पुन्हा अनघाच्या चुकांचा पाढा वाचायला सुरुवात केली. तिच्यामुळे गॅसंच खूप वापरला जातो, तिला काम नसलं की ती टीव्ही पहात बसते, कपड्यांना साबण खूप वापरते, तिला कपडे स्वच्छंच धुता येत नाही, तिला भांडीच स्वच्छ घासता येत नाहीत', असं म्हणत नाही नाही तशा चुका सांगायला लागल्या. 

अनघा हे सारे निमूटपणे ऐकून घेत होती. त्यावर सासुबाई म्हणाल्या "आता तुमच्यासमोर अशी निमूटपणे ऐकून घेत आहे, याला निर्लज्जपणा म्हणायचा कि काय?"... 

अनघाने मनात विचार केला, 'आपली चूक नसतानाही आपण ऐकून घेतो, कारण ते आपले संस्कार असतात'.... पण त्यालाच समोरचा निर्लज्जपणा जर समजत असेल तर या सारखी मोठी शरमेची गोष्ट नाही.... आणि त्याच चुकलेल्या गोष्टीसाठी जर आपण आवाज उठवला, तर आपण उलटे बोलतो म्हणूनही आपल्याच नावाने बोंबा ठोकल्या जातात. म्हणजे नक्की वागायचे तरी कसे.

पण मग त्या दिवसापासून तिने एक युक्ती केली.

अनघाने सासुबाईंबरोबर जशास तसे वागायचे ठरवले. आता तिच्या अशा स्पष्ट वागण्याने सासूबाईंचा राग अनावर व्हायचा. 

'मला तुझ्या हातचं जेवायला नको', म्हणत या स्वतःपुरती भाजी भाकरी वेगळ्या करू लागल्या. आता एकाच स्वयंपाक घरात दोन दोनदा जेवण बनत होतं.. एक सासुबाई स्वतः आणि सासऱ्यांसाठी बनवायच्या आणि एक अनघा आणि अमेय या दोघांचं बनायचं... 

जेवताना सगळं जेवण समोर ठेवलं तरी सासुबाई आपल्यातलं जेवण लेकाला वाढायच्या, पण त्यांनी स्वतः अनघाने केलेले जेवण खाल्लं नाही आणि स्वतः केलेली भाजी तिच्या ताटात दिली नाही.... म्हणजे एकाच घरात राहून विभक्त कुटुंब पद्धती असल्यासारखं त्यांचं जगणं होतं.

या साऱ्या गोष्टी अमेयला कळत होत्या. त्याने थोड्याच दिवसात जवळच एक फ्लॅट घेतला. आता दोघेही सुखाने नांदतात, हे पाहून सासूबाईंनी मात्र अमेयबरोबर बोलणंच काय पण त्याच्याशी संबंधही तोडून टाकले. 

त्यामुळे अमेयचा जीव मात्र काही केल्या राजाराणीच्या संसारात रमेना. एकीची बाजु घ्यावी तर दुसरीला राग येतो अशी परिस्थिती झाली होती. या दोघींच्या भांडणात त्याचं मधल्यामध्ये सँडविच झालं होतं.

अनघाबरोबर असूनही त्याला आई-बाबांची खूप काळजी वाटायची. एकुलता एक असल्याने आई-बाबा आपलीच जबाबदारी आहेत, हे त्याला कळत होतं. पण सासूबाई काही केल्या माघार घ्यायला तयार नव्हत्या.

शेवटी अनेक दिवस तिथे जाऊन तो सासूबाईंची माफी मागत होता. खरं तर माफी मागण्याचं कारण काहीच नव्हतं.,. कारण 'मुलाने केवळ आपलेच ऐकावे', या सासुबाईंच्या विकृत हट्टापायी एक घर मोडलं होतं.

पण कधीकधी म्हणतात ना एकछत्री कारभार असला, की तिथे दुसऱ्याच्या मताला काडीची किंमत नसते, तशीच काहीशी परिस्थिती होती.

कालांतराने वयोमानानुसार सासूबाईंच्या स्वभावात तसूभर म्हणावी इतकी नरमाई आली... पण अजूनही जेव्हा जेव्हा अनघा आणि सासूबाई समोरासमोर एकत्र वावरतात, तेव्हा दोघींची तोंडे दोन दिशांना असतात. 

आपण जेव्हा मुलाचे लग्न करतो, तेव्हा मुलाच्या आयुष्यात त्याच्या हक्काची जोडीदार येणार असते, हे त्यांनी लक्षात ठेवावं. 

आज आपण सुनेला लेकीसारखा जीव लावला, तर उद्या ती खऱ्या अर्थाने आपली लेक होऊन म्हातारपणात आपल्याला जपणार आहे.... नाहीतर वृद्धाश्रमांची संख्या वाढण्यात केवळ तरुण पिढीला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. 

कारण मोठी माणसं कधी चुकतंच नाही किंवा ती मोठी आहेत म्हणून त्यांना द्यायचा म्हणून मान द्यायचा अशी परिस्थिती न राहता, मनापासून आदर असायला हवा... मोठ्यांनीही केवळ मोठेपणा न गाजवता, आपण घराचा आधारस्तंभ आहोत, या भावनेने सगळ्यांना सांभाळून घेत पुढे गेलं, तर आयुष्य सोनेरी व्हायला कुठलीच अडचण येणार नाही. 

चुका जशा सुनेकडून होतात तशा काही प्रसंगात सासूकडूनही होतात.... फक्त झालेली चूक किमान स्वतःच्या मनात तरी मान्य करून, भविष्यात त्या चुका न घडू देण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी.

या कथेतून कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही... परंतु एका सत्यकथेला काल्पनिकतेची जोड देत हा विषय तुमच्या समोर मांडण्याचा केवळ हा एक प्रयत्न....


© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने