अशा वळणावर

© सौ.मीनाक्षी वैद्य




स्त्री च्या आयुष्यात एक वळणं असं येतच की त्या वळणाला ती चुकवू शकत नाही आणि आनंदानी त्यावर चालूही शकत नाही. सुधा अशाच वळणावर उभी आहे. ती आता पोक्त झालीय पण मन मात्र सोळावं लागल्या सारखं ऊधाणलय. आयुष्यात सगळं काही आहे तरी कुठेतरी, कशाची तरी न्यूनता जाणवते. काय असेल हे?

आपल्या मनात काय चालु आहे? सुधाला उमजत नव्हतं. 

परवा शालु म्हणाली की "बायकांना पाळी जाण्याची वेळ आली की असे त्रास होतात. त्या पिरीयड मध्ये असं होतं." होत असेल. पण सुधाला तसा काहीच शारीरिक त्रास होत नव्हता वेगळंच काहीतरी वाटत होतं. 

जे तीला सांगता येत नव्हतं. आयुष्याची चौकट पूर्ण असूनही आणखी एक भूतकाळातला कोन का जोडावासा वाटतोय! हे तिला उमगत नव्हतं. 

का त्याला भेटायची ओढ आहे? तो काय माझा प्रियकर आहे? नाही. मग जेवतांना अन्नात खडा लागावा तसं घरातील सगळ्यांबरोबर असूनही मला त्याचीच आठवण का येते?

मन का हूरहुरतं? आयुष्यातल्या दुस-या टप्प्यात माझी अशी रस्सीखेच का होतेय ? या नवीन पिढीचे किती छान असतं. जे पटेल, जसं पटेल तसंच वागतात. कोणाची फिकीर करत नाही. 

म्हणणारे त्यांना उथळ, बेजबाबदार म्हणतात.पण ही पिढी आपल्या स्वातंत्र्याबद्दल,आपल्या विचारांबद्दल ठाम असते. कोणाशी बोलायचं कोणाशी नाही हे ते ठरवतात. कोणाला आठवणीच्या पुस्तकात ठेवायचं हे ठरवतात. मी का नाही ठरवायचं?

माझ्या किशोरवयीन काळातील एक सुंदर आठवण आहे 'तो'... एक मोरपीस आहे 'तो'. ते गालावरून हळूच फिरवल्यावर अंगभर शिरशिरी येते. 

ती शिरशिरी आवडते मला. मग...मी त्या मोरपिसाला; स्पर्शही करायचा नाही? का? मी एक स्त्री आहे म्हणून. स्त्रीलाच का सगळे नियम असतात?

गणित आणि शास्त्र विषयात नियमाला अपवाद असतात पण स्त्रीच्या आयुष्यातील नियमाला कधीच कुठलाच अपवाद नसतो, सूट नसते. का? स्त्रीनी असंच वागायचं, असंच बोलायचं, असंच उभं राहायचं हे कोणी ठरवलं?

ईश्र्वरानी..?.नाही. देव स्वत: देवतांना मान देतात ते कसे स्त्रीला कुंपणात बांधतील? ही सगळी करामत मनुष्यानीच केलेली आहे. मी तोडू शकेन हे कुंपण? 

मी वयाच्या ऊतरत्या वळणावर उभी आहे. सांभाळून चालावं लागणार आहे. पाय घसरू नाही म्हणून माझ्या मनाला शांतता देणार मोरपीस सोडू. त्याचं अस्तीत्व विसरू? शक्य होईल? असं सगळ्यांचं स्त्रीयांच्या बाबतीत घडत असेल का. 

माझ्यासारखं मोरपीस सगळ्यांजवळ असेल का? असेल तर त्या बोलून दाखवतात की माझ्यासारख्या घुसमटतात. आता फार विचार नाही करणार. करून त्रासच होतो.

आजपर्यंत सगळ्यांचं सगळं केलं. तेव्हा हे मोरपीस कधीही आठवलं नाही. आता सगळ्यांच्या इच्छा, अपेक्षांची झोळी भरलीय. आता मी ते मोरपीस घेतलं तर काय हरकत आहे! 

घेऊ का मग....?विचारातच सुधाचं मन गुंतलं. हल्ली तिचं स्वतःतच रमून जाणं घरातल्या सगळ्यांनाच जाणवत होतं पण त्यामागचं कारण कोणाला कळत नव्हतं. मुलांनी विचारलं तर हसून तिनं विषय टाळला.

नव-याने विचारलं तेव्हाही काही न बोलता ती हसून खोली बाहेर गेली. तिचं तिच्यातच असणं थोडंसं सासूला कळत होतं पण त्याही सूज्ञपणे तिला काही न विचारता तिला निरखत असतं. 

सुधा तासन् तास आराम खुर्चीवर डोळे मिटून बसायची. खुर्चीला हळुवार झोका द्यायची.त्या झोक्याबरोबर तिचं मनही उंच-उंच झोके घ्यायचं. त्या झोक्यात तिच्याशिवाय दुसरं कोणी नसायचं. ती आणि ते मोरपीस.

तिच्या भूतकाळातील आठवणीत तिचं मन गुंतून जायचं एकदा सासूने तिला आवडतो तसा चहा करून तिच्या हातात दिला. तीनेही अगदी यांत्रीकपणे तो घेतला. ती अजूनही तंद्रीत होती. 

सासूबाई बराच वेळ तिच्याजवळ उभ्या होत्या. त्यांना वाटलं की ही सांगेल चहा कसा झालाय. पण सासुबाइंनी आपल्याला चहा आणून दिलाय हे तर तिच्या लक्षातही आलं नाही. सुधा अजूनही आपल्याच तंद्रीत होती. सासूबाईंना वाटलं की काहीतरी करायला हवं.

ही तिची स्तब्धता सोडवायला हवी.तिला बोलकं करायला हवं. इतक्या वर्षांनी असं काय घडलं की कोसळणा-या धबधब्याला अचानक खीळ बसावी? 

सासूबाई नोकरी करत होत्या त्यामुळे सुधाच्या वयातही त्या कामात मग्न असायच्या. तिला जाणवते तशी पोकळी त्यांना जाणवली नव्हती. 

नोकरी न करणा-या बायकांना या वयातील ही पोकळी खायला उठते हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यात भर म्हणून पाळी जातानाचे होणारे त्रास. हा सगळा गुंता बाईच्याच वाट्याला येतो.

त्या गुंत्याचा होणारा त्रासही बाईलाच सहन करावा लागतो. नवरा कुठे येतो. हळुवारपणे विचारायला? सासूबाईंना सुधाची मन: स्थिती कळत होती.

सुधाला या तंद्रीतून बाहेर काढलचं पाहिजे,काहीतरी तोडगा शोधलाच पाहिजे असं ठरवून त्या सुधाला तिच्या तंद्रीतून बाहेर न काढता हळूच पावलं न वाजवता आत गेल्या.

सुधा सगळी जबाबदारी पूर्वीसारखीच सांभाळत होती. कधीही मुलांना नाश्ता केल्याशिवाय, डबा घेतल्याशिवाय जावं लागलं नाही. सुदेशचे कपडे वेळेवारी धुवून इस्त्री होऊन येत होते. त्याला कधी विनाइस्त्रीचे कपडे घालून ऑफीसला जावं लागलं नाही. सासुबाई भजनाला जाण्याआधी त्यांना चहा मिळतच असे. इतकं सगळं व्यवस्थीत होत होतं.पण ते यांत्रिकपणे होतं होतं.


हे सगळं करताना पुर्वीची सुधा कोणाला सापडत नव्हती. मग काय तिचं बिनसलं होतं? कळत नव्हतं.

पुर्वीसारखी धबधबा होऊन ती आजकाल बोलत नसे. या चौघांच्या आयुष्यात काय चाललंय हे देखील विचारत नसे. पूर्वी प्रत्येक गोष्ट तिला माहिती करून घ्यायची असायची. आता काहीच तसं होत नाही 

मुलं आणि नवरा यावर फार विचार करत नसत कारण ती तिघंही स्वत:च्या आयुष्यात मग्न होती. पण सासूबाईंना मात्र यावर तोडगा शोधलाच पाहिजे असं जाणीवपूर्वक वाटू लागलं होतं.

पूर्वीच्या सुधाला परत आणलच पाहिजे असं त्यांना मनापासून वाटायला लागलं होतं. गृहलक्ष्मीचा मनमोकळा सहवास या घराच्या चार भिंतींना मिळायलाच हवा त्यासाठी तिचं हे स्वत:तच रमणं आणि तिचं मौन मोडायला हवं.

त्या दिवशी सुधा नेहमीप्रमाणे; सासूबाईंसाठी चहा करीत होती. त्यांची भजनाला जायची वेळ झाली होती. शुन्य नजरेनी अगदी यंत्रवत तिच्या हालचाली चालू होत्या. 

सासूबाई तिच्या बाजूला ऊभ्या होत्या पण तिचं लक्षच नव्हतं. गॅसवर चहा ऊतू जाण्याच्या बेतात होता सासूबाईंनी गॅस बंद केला. तरीही ती निर्वीकार नजरेनी त्या चहाकडे बघत होती.

त्यांनी तिला हलवून विचारलं,"अगं लक्ष कुठंय तुझं?" "

अं....”सुधानी दचकून सासूकडे बघीतल. त्यांना तिचा इतका निर्विकार चेहरा बघवेना. तिच्या डोळ्यात डोळे घालुन त्यांनी विचारलं

"काय टोचतय ग तुझ्या मनाला.सांग न मला. .इतकी वर्ष झाली तुझ्या लग्नाला मी अजून परकी आहे का तुझ्यासाठी? तुझ्या संसारात तुला काही उणीव वाटते आहे का?" "

"नाही हो आई असं का म्हणता?"सुधानी रडवेल्या आवाजात विचारलं.

"मग कुठे हरवलेली असतेस आजकाल? पूर्वीसारखी बडबडत नाहीस. तुझं हसणं आजकाल उंबराचं फुल झालय. कशाचा विचार करतेस? मला सांगून बघ. मला काही तोडगा काढता आला तर बघू. पण तू अशी स्वत:तच हरवल्यासारखी वागू नकोस."

"मलाच कळत नाही आई मला काय झालंय."

तिच्या डोळ्यात पाणी आलं. सासूबाईंनी ते आपल्या हातांनी हळूवारपणे पुसलं आणि म्हणाल्या.

" ही अवस्था प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येते. सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. अशी गप्प गप्प नको राहूस. तुला असं बघीतल की मला मनातून रडू येत.सावर स्वतःला."

सुधा काही न बोलता सासूच्या मिठीत शिरली. तिच्या मनात कोंडून ठेवलेली अस्वस्थता डोळ्यातून अश्रूंच्या रुपानी बाहेर पडू लागली. सासू तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवत होती. सुधानीही डोळ्यातून वाहणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला नाही. सासूने ही तिला आपल्या मिठीतून बाजूला केलं नाही.

त्या दोघींची ही भेट दोघींमधलं सासू सुनेचं अंतर संपवणारी ठरली. कितीतरी वेळ दोघी तश्याच उभ्या होत्या. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी होतं पण ते चिंतेचं नव्हतं तर चिंता दूर झाली म्हणून आनंदानी पाणी होतं. त्यांना सुधा हळूहळू सापडू लागली होती.

सासूबाई हळूच त्या सुधाच्या कानाशी बोलल्या,

"सुधा आज माझी काळजी मिटली. माझं कोमेजत चाललेलं फूल पुन्हा टरारून आलं. आज आपण हा आनंद सेलिब्रेट करू. चल पाणीपुरी खायला जाऊ.तुला खूप आवडते न?"

सासूच ऐकताच सुधा त्यांच्यापासून दूर होत म्हणाली.

"अहो आई तुमचा भजन वर्ग आहे आत्ता"

"असू दे.एक दिवस नाही गेली भजन क्लासला तर काही बिघडत नाही. पण आजचा क्षण आपण दोघींनी जपून ठेऊ. कोणी मध्ये नको. ना माझा मुलगा ना तुझी मुलं. चल लवकर तयार हो." सुधाला सासूचे नवीन रुप बघून हसू आलं तशी सासूबाई पण हसू लागल्या.

आज त्यांच्या घरात आनंदाला उधाण आलं होतं सुधाला सासूचे हे रूप हवंहवंसं वाटलं. ती पटकन तयारीला लागली. तिला न समजणारी पोकळी सासुबाईंनी ओळखली होती. 

तिनं स्वत:लाच प्रश्न केला की, “कितीजणांच्या सासूबाई आपल्या सुनेची ही अवस्था ओळखत असतील...मी किती भाग्यवान मला अशी सासू मिळाली जी आपली जिवलग मैत्रीणच झाली. आता काहीही त्यांच्यापासून लपवायचं नाही. त्याच मला मार्ग दाखवू शकतात.”

विचारात गुंतलेली सुधा नेहमीपेक्षा लवकर तयार झाली. आधी काहीच करायची इच्छा नसल्याने तिला बाहेर जायचे कपडे सुद्धा शोधायाला त्रास वाटायचा. आज मात्र सासुबाईंच्या बोलण्यानी जादू झाली होती. सुधा झटकन तयार झाली.

ती आणि तिची जिवलग मैत्रीण फक्त दोघीच या सुंदर क्षणांना बांधून ठेवणार होत्या. 

सुधा तयार होऊन बाहेर आली तर ती सासूकडे आश्चर्यानी बघू लागली. कारण आज त्यांनी साडी न नेसता सुधाला आवडतो तसा आणि तिनी त्यांच्यासाठी आणलेला पंजाबी ड्रेस घातला होता.

दोघीही एका वेगळ्याच आनंदात घराबाहेर पडल्या. तो आनंद त्या दोघींच्या चालण्यातुनही दिसत होता. दोघी एकमेकींचा हात धरून चालत होत्या. हा मैत्रीचा हात आता दोघींनाही सोडायचा नव्हता.

सगळे घरी यायच्या आत त्यांना घरी परतायचं होतं सुधा साधीच तयार झाली होती पण चेह-यावर मात्र खूप छान हसू होतं. ते हसू बघून सासूबाई मनातून आनंदल्या.

त्या दोघी नेहमीच्या पाणीपुरी वाल्याकडे गेल्या. मनसोक्त हसत बोलत दोघी पाणीपुरीचा यथेच्छ समाचार घेत होत्या. दोघीही आपल्या ख-या वयापेक्षा वीस वर्षांनी लहान झाल्या होत्या.

दोघींनाही आपल्या गतजीवनातील फुलपंखी दिवस आठवू लागले. त्या दिवसातील गमती-जमती त्या एकमेकींना सांगू लागल्या आणि मनमुराद हसू लागल्या. आज त्यांना इतर लोकांचं, जगाचं भान नव्हतं. आज त्या दोघी आपल्या कोषातून निघालेलं फुलपाखरू होत्या. त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही.

त्यांच्या हसण्याच्या आवाजांनी तिथूनच आपल्या घरी जाणा-या सुधाच्या नवा-यांनी सुदेशनी ऐकला आणि तो त्या दोघींना हसता-खिदळतांना बघून चकीत झाला. तो त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला तरी त्या दोघींना कळलं नाही. 

तो मात्र खूष झाला कारण खूप दिवसांनी त्यानी बायकोला आणि आईला असं आनंदाने हसतांना बघितलं होतं.

सुधाच्या गप्प राहण्यामुळे घरात एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. तो त्याला आणि मुलांना कोणालाच सहन होत नव्हता. पण ती ओरडत नव्हती किंवा चिडत नव्हती. 

आपली रोजची सगळी कामं शांतपणे करत होती. त्यामुळे कोणालाही तिच्या निरुत्साही असण्याचं कारण काळात नव्हतं. आज खूप दिवसांनी त्यानी सुधाच्या चेह-यावर आनंद बघीताला होता. तो मनातच खूप खूष झाला. 

जवळ जाउनही त्या दोघींना कळलं नाही म्हणूनच त्यांना हाक न मारता तो हळूच त्यांना चाहूल न लागू देता घरी परतला.

सुधा आणि सासूबाई काॅलेज कन्या झाल्या होत्या. त्यांच्या हसण्या खिदळण्यानी आजूबाजूचे लोक त्या दोघींकडे बघू लागले.दोघींच्या वयातील अंतर कळत होतं म्हणून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं.

"अहो आई मी बारावीत होते ना तेव्हा मी खूपच बावळट होते." सुधा म्हणाली तश्या सासूबाई लगेच म्हणाल्या

" अजूनही कुठे शहाणी झालीस?" सुधाने हे ऐकल्याबरोबर त्यांच्याकडे खोट्या खोट्या रागानी बघीतलं.तश्या सासूबाई हसू लागल्या. नंतर सुधा पण हसायला लागली.

" सुधे तू काय सांगत होतीस?" हसू आवरत सासूबाईंनी विचारलं.

"अहो एक मुलगा माझ्या मागे लागला होता अकरावीपासून.हे माझ्या कधीच लक्षात आलं नाही.माझ्या मैत्रीणीने निलूनी सांगीतलं. मग मी जाम घाबरले.

अहो आमच्या घरी हे कळलं असतं तर आप्पांनी वेतानीच फोडलं असतं दुस-या दिवशी पासून मी त्याच्याकडे बघायचे पण नाही.आधी हसायचे तरी नंतर तेही बंद केलं. बिचा-याचा चेहरा मलूल व्हायचा."

खाली बघत सुधा बोलत होती.सासूबाई तिचं बारकाईने निरीक्षण करत होत्या.

" नंतर काय झालं?" सासूबाईंनी विचारलं.

" नंतर? नंतर काही नाही.एकदोनदा त्याने रस्त्यात थांबवलं पण मी नाही थांबले.नंतर निलू मला म्हणाली त्याला खूप वाईट वाटलं. तो बारावीची परीक्षा झाल्यानंतर निघून गेला."

सुधाचा आवाज थोडा गहिवरला होता.

"त्याची आठवण येते का तुला अजून? म्हणून तू अशी गप्प असतेस का?" सासूबाईंनी विचारताच सुधा गडबडली.

" नाही हो असं काही नाही.पण…" सुधा एकदम गप्प झाली.

सासूबाईंनी पुन्हा विचारलं" सुधा गप्प का झालीस?"

" आई तो मला बघायचा तेव्हा त्यांच्या डोळ्यात खूप प्रेम दिसायचं. हे मला आधी नाही दिसलं. निलूनी सांगीतल्यावर दिसलं आणि मी खूप घाबरले." सुधा पुन्हा गप्प झाली.

" सुधा खरं खरं सांग.नक्की काय झालंय." सुनांचा चेहरा आपल्याकडे वळवत सासूबाईंनी सांगीतलं.

" महिन्याभरापूर्वी निलूनी सांगीतलं की निलूला अचानक तो बाजारात भेटला. खूप आलीशान गाडीतून उतरला. निलूला त्याने हाक मारली. दोघही बराच वेळ बोलले. 

निलूने त्याला म्हटलं बायको गाडीतच बसली आहे का? ओळख करून दे की माझ्याशी? लग्नं कधी झालं विचारलं.तर तो म्हणाला मी लग्न नाही केलं.मला लग्न सुधाशीच करायचं होतं.असतं एकेकाचं नशीब. सुधा कशी आहे? तिचं झालं का लग्नं? हे ऐकल्यापासून मला अपराधी वाटतंय."

यावर सासूबाई तिचा हात थोपटत म्हणाल्या," ते वय तसंच असतं. पण आता तू ज्या वयाच्या उंबरठ्यावर आहेस तिथे तुला त्याच्याशी खूप जवळ जाता येणार नाही. तुला कितीही वाटलं त्याच्याशी बोलावं पण असं नाही करता येणार.ऊगीचच तुझ्या आणि सुदेशमध्ये दरी निर्माण होईल.‌ जी भविष्याच्या दृष्टीनं योग्य नाही.त्याची आठवण तू फक्त तुझ्या मनात जप.कधी बोलावंसं वाटलं तर माझ्याशी बोलं.आपण आता मैत्रीणी आहोत नं"

सुधा आनंदून हो म्हणाली. दोघी पुन्हा हातात हात गुंफून घरी निघाल्या.

घरी दोघींची मुलं आलेली होती.दोघी घरात शिरताच सुधा एका वेगळ्याच आनंदात आपल्या खोलीत गेली.

सुदेशनी लगेच आईला विचारलं" अगं काय जादू केली तू? किती महिन्यांनंतर सुधाला पाणी पुरी गातांना आणि हसताना बघीतलं." सासूबाईंनी सुदेश कडे फक्त हसून बघीतलं आणि त्याही आपल्या खोलीत निघून गेल्या. 

सुदेश उत्तर न मिळाल्याने विचारात पडला. मुलांना मात्र सुदेश सारखे प्रश्न पडले नाहीत. त्यांना त्यांची आई पुर्वी सारखी झाली याचाच आनंद झाला होता.

सुधा ज्या वळणावर उभी होती ते वळण संंभ्रमीत करणारच होतं.पण सासूबाईंच्या मदतीनं ती यातुन बाहेर पडली.


© सौ.मीनाक्षी वैद्य.


सदर कथा लेखिका सौ.मीनाक्षी वैद्य यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने