गहाण ठेवलेले मंगळसूत्र... की सौभाग्य?

© वर्षा पाचारणे 




सुरेखा तापाने फणफणली होती... बाहेर मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, बाजूला खाटेवर दोन वर्षापासून अंथरुणाला खिळलेली सासू आणि त्यातच नवरा म्हणण्या पुरताच अधिकार गाजवणारा भीमा नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत तर्रss होऊन पडला होता... चाळीतील दहा बाय दहाच्या खोलीत हा सगळा कुटुंबाचा पसारा सावरताना सुरेखाचा जीव मेटाकुटीला आला होता... दिवसभर चाललेल्या पावसामुळे दारात चिखल गाळ साचला होता.


पत्र्याच्या फटी मधून टपकणारे पाणी पडण्यासाठी कुठे बादली, कुठे हंडा लावून ठेवला होता... दारा बाहेरच्या पत्र्याच्या वळचणीला पन्हाळ बांधली होती.. जुनापुराणा प्लास्टिकचा मोठा ड्रम त्याखाली भरून तुडूंब वाहून चालला होता...

रात्री एक दिड वाजता पाऊस कमी झाला.. नेहमीप्रमाणे दारूची नशा उतरल्यावर 'आपल्याला म्हातारी आई आणि बायकोही आहे', याची जाणीव भिमाला झाली.

'रोज दहा वेळा आपल्याला बडबड करणारी सुरेखा आज इतकी शांत का पडून आहे', म्हणून त्याने तिच्या जवळ जाऊन पाहिले... तिच्या अंगाला हात लावताच चटका बसावा इतका ताप भरला होता...


"सुरेखा, अगं ताप आलाय तुला?... गोळी बिळी खाल्लीस का नाय"... असं म्हणत त्याने तिच्या अंगावर गोधडी टाकली... सुरेखा रागाने एक कटाक्ष टाकत त्याला म्हणाली...


"घरात अन्नाचा कण नाय अन् गोळीला पैसं कुठून आणू?.


म्हातारीला बी दिसभर खायला काय नव्हतं... मागच्या वेळेस लग्नात आबांनी दिलेल्या कुड्या मोडल्या तवा कुठं महिना निघाला... आता मोडायला बी काय ऱ्हायलं नाय"... एवढे बोलून ती कुशीवर वळली..

आपण नाकर्ते आहोत असं सतत बोलून दाखवण्यापेक्षा काहीतरी कष्ट करून दाखवण्याची इच्छा मात्र भीमाला कधीच होत नव्हती... परंतु आज आपल्यामुळे झालेली आई आणि बायकोची अवस्था त्याला बघवली नाही... सकाळी उठून त्याने घोटभर कोरा चहा केला... आई आणि बायकोला चहा देत भीमा म्हणाला..


"आज कुठल्याबी परिस्थितीत काम मिळवून चार पैसं कमवून घरी येईल तव्हाच तुमच्याशी बोलन"...

किमान आतातरी नवऱ्याला परिस्थितीची जाणीव झाली, ह्या विचाराने सुरेखा मनातल्या मनात सुखावली... घरात कोपर्‍यातल्या डब्यात ठेवलेल्या मूठभर रव्याची पेज करून तिने म्हातारीला खाऊ घातली... सावकाराच्या वाड्यावर जाऊन थोडंफार कर्ज मिळतं का पाहून यावं, या विचाराने घरातलं काम आटोपून ती बाहेर पडली.

 रस्त्याने तरातरा जाताना तिच्या मनात शंभर विचार घोळत होते... सावकार किती नीच माणूस आहे, हे माहीत असूनही परिस्थितीमुळे मात्र त्याच्यापुढे हात पसरणं हा एकमेव पर्याय तिला दिसत होता...

सावकार ओसरीवर पान खात बसला होता... "सावकार, जरा काम होतं", असं म्हणत सुरेखाने लांबूनच सावकारांना आवाज दिला.... जगन्नाथ सावकार सुरेखाला पाहून थोडा पुढे आला...

"तूsss, त्या भिमाची बायको ना?"... असं म्हणत जगन्नाथ सावकाराने सुरेखाला वरपासून खालपर्यंत न्याहाळले... त्याची ती विकृत नजर सुरेखाला काट्यांप्रमाणे टोचली...

"व्हय... जरा वाईस नड व्हती... घरात अन्नाचा कण नाय.. त्यात म्हातारी दोन वर्षापासून अंथरुणावर हाये.. नवऱ्याला नोकरीधंदा नाय... तुमच्या वळखीनी काय काम मिळालं तर बरं होईल... त्याला नाय तर मला.. दोघांपैकी एकाला कामावर ठेवून घ्या जी"... असं म्हणत सुरेखा सावकारा समोर काकुळतीने व्यथा मांडत होती...

"कामावर?.... अन् काय काम करणार तुझा नवरा?... त्यो बेवडा शुद्धीवर तरी असतोय व्हय... हा... पाहिजे तर तू कामाला येऊ शकते आमच्याकडे... मिशी पिळत पुन्हा तसाच विचित्र कटाक्ष टाकत आणि तोंडातल्या पानाची पिंक फेकत सावकार विचित्रपणे हसला.

बावरलेली सुरेखा आल्या पावली परत फिरली.

संध्याकाळचे साडेसात आठ वाजले होते... रोज दारूच्या नशेत झिंगत येणारा नवरा घरी यायची वेळ झाली होती... सुरेखा घरातले सामानाचे डबे उलथे पालथे करून कशात काही सामान आहे का, ते बघत होती.

मूठभर डाळ तांदूळ मिळताच, तिने मग खिचडी करून म्हातारीला खाऊ घातली... निर्लज्ज लेकापेक्षा जीव लावणाऱ्या सुनेसाठी म्हातारीचा जीव मात्र तीळ तीळ तुटत होता... तितक्यात भीमा घरी आला.

हातात थोडंफार किराणा सामान आणि भाजीची पिशवी घेऊन तो घरात शिरला... त्याच्या हातातलं सामान पाहून सुरेखा पटकन पुढे आली...

हे कुठून आणलं... पैसे मिळाले काय कसले... म्हणजे तुम्हाला कोणी काम दिलं का.. असे एकावर एक प्रश्न विचारत ती हरखून गेली होती... फाटक्या आयुष्याला मिळालेलं हे थोडसं ठिगळ होतं...

"अगं थांब, सांगतो सगळं.. मी दिवसभर कामासाठी वणवण फिरलो... रोज माझ्या सोबत असणारा दारुड्या सुभ्या मला परत एकदा बाटलीची आशा दाखवत होता. पण काल रात्रीची आपल्या कुटुंबाची अवस्था मात्र मला हल्लख करून गेली.

पुरुषासारखा पुरूष असून दारूच्या नशेत दिवसभर पडून आजवर मी आयुष्याची राखरांगोळी करुन घेतली... काम शोधता शोधता शेवटी एका किराणा मालाच्या दुकानात त्यांचा रोजचा हमाला नव्हता म्हणून मी पोती उचलायचं काम केलं. तेव्हा मालकाने मला पैसे आणि थोडं सामान देऊ केलं.

 पण त्याच्याकडे नेहमीसाठी काम नाही.. पण मी येत असताना वाटेत मला सावकार भेटला... उद्यापासून त्यांनी मला कामावर बोलवलं हाय"..

"सावकार?... अन कसलं काम देतो म्हणला तो?".... सकाळची सावकाराची घाणेरडी नजर आठवून तेवढ्याच तुच्छतेने सुरेखाने भीमाला प्रश्न विचारला.

"अगं, त्याच्या गाडीवर ड्रायव्हरचं काम करायचं हाय.. तेवढंच चार पैसं पण मिळतील... फाटका संसार सावरता येईल... त्या म्हातारीची अवस्था मला बघवत नाय बघ"...

अंथरूणावर पडल्याजागी लेक आणि सुनेच्या गप्पा कानावर पडताच म्हातारीला देखील आपला लेक थोडातरी सुधारला, याचा मनात आनंद झाला. पडल्यापडल्याच तिचे हात नकळत देवासमोर जोडले गेले.

सकाळी लवकर उठून भीमा सावकाराच्या वाड्यावर पोहोचला.. महिनाभर व्यवस्थित काम केल्याने सावकाराने महिनाभराने भीमाला ठरल्याप्रमाणे पगार दिला.. पण महिन्याभराने भीमाने कामात हलगर्जीपणा केला असं म्हणत सावकाराने त्याचा निम्मा पगार कापला.

'पुन्हा मागचे दिवस येतात की काय?', अशी भीमाला भीती वाटू लागली.

दिवस रात्र तळमळत असलेला भीमा पाहून एक दिवस सुरेखा त्याला म्हणाली ,"सावकाराला कर्जाबद्दल विचारून बघा.. आपण तुमच्या पगारातून थोडं थोडं कर्ज फेडू... वाटलं तर मी चार घरची धुणी-भांडी करते... पण ही होरपळ थोडी का व्हइना कमी होईल"...


"अगं पण कर्ज घ्यायचं म्हणजे तारण म्हणून काहीतरी ठेवावं लागलच ना?... आता तर घरात सोन्याचा कण बी शिल्लक नाय.. कशाच्या जोरावर कर्ज मागु?"...


त्याचं बोलणं सुरू असताना विचारांच्या गोंधळात सतत गळ्यातल्या मंगळसूत्रावर सुरेखाची बोटं फिरत होती... अचानक तिचे लक्ष गळ्यातल्या मंगळसूत्राकडे जाताच तिने भीमाला सुचवलं


"हे बघा, मी गळ्यात काळी पोत घालीन.. पण हे मंगळसूत्र सावकाराकडं तारण ठेवा.. थोड्या दिवसांनी पैसा आला की परत सोडवून आणू आपण मंगळसूत्र"... अस म्हणत तिने गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि मांडणीतला पत्र्याच्या डब्यात पडलेली काळी पोत गळ्यात अडकवली...


इच्छा नसतानाही बायकोचं मंगळसूत्र घेऊन भीमा दुसऱ्या दिवशी सावकाराकडे पोहोचला... मंगळसूत्र गहाण ठेवून सावकार त्याला संध्याकाळी वीस हजार रुपये कर्ज देणार होता. 

सावकाराचं काम करून भीमा संध्याकाळी परत वाड्यावर पोहोचला... "सावकार, ते मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं त्याचे पैसेsss"... असं म्हणत भीमा घाबरत बोलताना अडखळला...


"अरे, सकाळी तर तुला पैसे दिले तेव्हाच तर तू ते मंगळसूत्र गहाण ठेवलंस ना", असं म्हणत सावकाराने पैसे द्यायला साफ नकार दिला...


"सावकार, अहो असं काय करताय?"... "तुम्हीच तर म्हणाले संध्याकाळी येऊन पैसे घेऊन जा"... भीमाने असं म्हणताच सावकाराच्या बाजूला असलेले दोन पहिलवान भीमा च्या अंगावर धावून आले... सावकारांनी नजरेने खुणावताच ते भीमाला घेऊन वाड्याच्या अडगळीतल्या खोलीत गेले.

त्याला जबरदस्त मारहाण करून त्यांनी त्याला बळजबरी दारू पाजली... आणि वाड्याबाहेर फरफटत आणून फेकले.

रात्र झाली तरी भीमा घरी आला नाही म्हणून म्हातारी आणि सुरेखा दोघी काळजीत होत्या... अंथरुणावर पडल्यापडल्या म्हातारी देवाचा धावा करत होती.

शेवटी कशीबशी धीर एकवटून सुरेखा वाड्यावर आली... उघडाबंब सावकार झोक्यावर निवांत बसला होता.

"सावकार, माझा नवरा अजून घरी आला नाही... इथून कधी गेला घरला"... दाराबाहेर उभे राहूनच सुरेखाने विचारलं... सावकाराने ऐकून न ऐकल्यासारखं करत दुसरीकडे पाहिलं.

घाबरत सुरेखा आतमध्ये आली.. तिने पुन्हा एकदा सावकाराशी बोलण्याचा प्रयत्न केला...

"सावकार, माझा नवरा सकाळी मंगळसूत्र गहाण ठेवून कर्ज मागायला आला होता ना",... असं म्हणत उत्तराच्या प्रतीक्षेत तिने सावकाराकडे खाली मान घालूनच पाहिले.

 सावकार मात्र तिच्याकडे वेगळ्याच हेतूने पाहू लागला आहे, या विचाराने ती मनातल्या मनात पुरती धास्तावली होती... सावकार तिच्या आणखी जवळ आला.

"अगं, मंगळसूत्र गहाण ठेवलंय... मग तात्पुरता तो तुझा नवरा आहे, हे विसर कीsss".. असं म्हणत तो नीच सावकार तिच्या खांद्यावर हात टाकणार तोच सुरेखा मागे सरकली...

सावकारही रागाने मागे सरकला... "ठीक आहे, तुला माझ्या मनासारखं वागायचं नाही... मग तुझा नवरा जीता हाय का मेला, ते तूच बघत आता".. असं म्हणून सावकार परत एकदा झोक्यावर निवांत जाऊन बसला...


"जीता हाय का मेला?"... "म्हंजे?"... "सावकार कुठं हाय त्यो आत्ता?"... असं म्हणत सुरेखा सावकाराच्या पायाशी येऊन त्याला विनवण्या करू लागली... सावकाराने तिला अलगद उठवून उभे केले.

"मी तुला मंगळसूत्र आणि तुझा नवरा दोन्ही देतो, पण आजची रात्र माझ्याबरोबरsssss" ... असं म्हणत त्याने भिमाने सकाळी दिलेले, खिशात ठेवलेले मंगळसूत्र बोटाने गरागरा फिरवले.

सुरेखाने ते मंगळसूत्र पटकन हातात घेत "सावकर, सांगा ना माझा नवरा कुठं हाय?"... असं म्हणत विनवणी केली.. सावकाराने ते मंगळसूत्र तिच्या कडून परत हिसकावत तिच्या पदराला हात घातला तशी ती चवताळली..

सुरेखा धावत वाड्याबाहेर आली... जीवाच्या आकांताने पायात अवसान नसतानाही ती घराच्या दिशेने धावू लागली... घराच्या जवळच दहा मिनिटांच्या अंतरावर तिला भीमा रस्त्यात जखमी अवस्थेत पडलेला दिसला.

तिने कसंबसं त्याला आधार देत उठवलं... त्याच्या सगळ्या अंगाला दारुचा वास येत होता... अंगाला ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या... सुरेखाला वाटलं ,'ज्याच्यासाठी आपण धावतपळत जिवाचं रान केलं, त्याने परत एकदा दारू ढोसून आपला विश्वास घात केला का काय?'....


सुरेखाने भीमाला घरी आणून स्वच्छ आंघोळ घातली... दिवसभराच्या साऱ्या जीवघेण्या प्रकाराने अर्धमेला झालेला भीमा आंघोळीमुळे शुद्धीवर आला... सुरेखापुढे हात जोडत तो स्वतःच्या तोंडात मारत, सतत स्वतःला दोष देत होता...


"सुरेखा, सावकाराने मंगळसूत्राच्या बदल्यात पैसे तर दिलेच नाय पण याबाबतीत मी कुठे काही बोललो तर तुझ्या इज्जतीची धमकी देऊन त्याने मला मारहाण केली... त्याच्या माणसांनी जबरदस्तीने दारू पाजत मला वाड्याबाहेर फरफटत फेकलं"... "कर्मदरिद्री असलेला मी, तुझं मंगळसूत्र पण वाचवू शकलो नाय"... असं म्हणत भीमा ढसा ढसा रडला..

फाटक्या दरिद्री परिस्थितीमुळे आज सौभाग्य अलंकार समजल्या जाणाऱ्या मंगळसूत्राला गहाण ठेवताना जितक्या वेदना झाल्या नव्हत्या, त्यापेक्षा अधिक वेदना आज आपलं हे सौभाग्य कोणीतरी गहाण ठेवून घेऊ पाहत होतं", यामुळे सुरेखाला होत होत्या.

सावकाराची नीच प्रवृत्ती गावभर प्रसिद्ध असली तरीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवायची कोणाची हिंमत नव्हती.

 'कदाचित अशा कितीतरी गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या बदल्यात त्याने आजवर कित्येक आया-बहिणींची ईज्जत वेशीवर टांगली असेल', या विचाराने सुरेखाच्या तळपायाची आग मस्तकात जात होती.

उद्यापासून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असं म्हणत आयुष्याचं तेच रडगाणं सुरू राहणार होतं.. फक्त फरक इतकाच होता, या पुढच्या आयुष्यात तिच्यासोबत तिचा हक्काचा भीमा कायम राहणार होता... गहाण ठेवलेल्या मंगळसूत्रापेक्षा पुन्हा कमावलेलं हे सौभाग्य तिला या दरिद्री जगण्यातही श्रीमंती अर्पण करत होतं...


© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने