वाडा (भाग १)

© उज्वला सबनवीस



उंबरठ्यावर ठेवलेलं माप ओलांडुन क्षमाने त्या भल्या थोरल्या वाड्यात पाउल टाकले. खरं म्हणजे तो एवढा मोठा वाडा बघुन तिचा जीव दडपुन गेला होता . घाबरल्या सारखे होत होते . पण बाजुला उभ्या असलेल्या उंचपु-या नव-या कडे बघुन तिला धीर आला .

आता आपल्याला गृहप्रवेशाचा उखाणा घ्यावा लागेल, असे लाजरे विचारही तिच्या मनात आले , पण कोणी काही म्हणायच्या आतच तिच्या पदराला हिसका बसला , रघुनाथ तिचा नवरा , तरातरा चालायलाही लागला .गाठ मारलेली असल्या मुळे तिलाही त्याच्या पावलावर पावले टाकत चालावेच लागले.

तिची भिरभिर नजर सगळी कडे फिरत होती . सगळे गंभीर चेह-याने वावरत होते . एवढं मोठं घर , तिला काय करावं सुचत नव्हतं . नवी नवरी , कोणी आपल्याला कामही करु देणार नाही. असं तिला वाटत होतं , तेवढ्यात ,

" बदला नवीन कपडे , आता सासरे ,आणि मोठ्या मंडळींची पाने घ्या .चला सगळे जेवायला , वेळ दवडू नका उगाच ". तिच्यावर कोणीतरी खेकसलं . 

ती आक्रसुन गेली . अजुन कोणाचे कोण आहे , हे नातेही तिला कळत नव्हते . खेकसणा-या बाईकडे तिने बघितले .

या बाईंना या आधी, अन लग्नातही बघितल्याचे तिला आठवत नव्हते .

गोरापान रंग , कपाळावर मोठ्ठं गोल कुंकु ,घारे डोळे टोपपदरी साडी ,डोक्यावर पदर , अन चेह-यावर करारी भाव . कोण आहेत या ,तिला प्रश्न पडला .

कोणाला विचारणार , त्या आवाजाने सगळेच दचकुन भराभर उठले .ती एकटीच बसुन राह्यली .

तिला तिच्या खोलीत तिची छोटी नणंद सगुणा घेउन गेली. तिने कपडे बदलले अन बाहेर आली.

सासरे अन बरेच लोक जेवायला बसले होते. अन त्या करारी बाई सगळी कडे लक्ष ठेवत होत्या .तिच्या कडे त्यांनी आपल्या घा-या डोळ्यांनी पाहिलं . ती बुजुन गेली . कोण असाव्यात या बाई .तिला अतिशय उत्सुकता वाटत होती.

तिने सगुणाला गाठलं , अन हलक्या आवाजात विचारलच त्या बाईं बद्दल . सगुणाला काय उत्तर द्यावं हे सुचत नव्हतं . ती उठली अन भाजी घेउन वाढायला निघून गेली .

तिला हे सगळच नवीन होतं .तिच्या माहेरी , हसत खेळत जेवणं व्हायची .चार खोल्यांचं घर ,पण आनंदी वातावरण होतं , त्या तिघी बहिणी एक भाउ असं भरलेलं घर होतं .गरीबी होती ,पण समाधान होतं . इथलं सगळं गंभीर वातावरण बघुन ती निराश झाली.

तिची नजर रघुनाथला शोधत होती. नवा नवरदेव कूठेच दिसत नव्हता , कोणी त्याची आठवणही काढत नव्हतं. तिला एकंदरीतच सगळं विचीत्र वाटायला लागलं.

तिची आणि रघुनाथची पण फारशी ओळख झाली नव्हती . एवढा वेळच मिळाला नव्हता. सगळच घाईघाईने झालं.

ती पतपेढीत टेंपररी नोकरी करत होती. तिथेच रघुनाथच्या वडिलांनी हिला पाह्यलं .त्यांनी चौकशी केली अन आपल्या मुलासाठी मागणीच घातली. हिचे वडिल गरीबीत संसार ओढत होते .एका पाठोपाठ तिन मुली लग्नाच्या , मुलगा शिक्षणाचा .एवढं मोठं जमीनदाराचं स्थळ सांगुन आलं म्हटल्यावर सगळेच हरखले.

एक दिवस रघुनाथ आणि त्याची धाकटी बहिण सगुणा दोघं क्षमाला बघायला आले. रघुनाथ देखणा होताच . क्षमाही सुंदरच होती .जोडीला जोड होती. पसंती झाली .‌

आम्हाला घाई आहे , लग्न लवकर करावं लागेल .हे रघुनाथच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं . नकार देण्याचा काही प्रश्नच नव्हता . सगळेच त्या आनंदाच्या झोक्यावर झुलायला लागले .पंधरा दिवसात लग्न झालेही.

क्षमाला एवढं श्रीमंत स्थळ मिळालं म्हणुन सगळेच खुश होते .अन क्षमाही आनंदाने माप ओलांडुन या जमीनदारांच्या वाड्यात आली .

"सगुणा ताट घेउन जा " करारी बाई ओरडल्या .

सगुणाने ताट वाढलं .अन ती निघाली .ही कुठे निघाली आता , याचं क्षमाला आश्चर्य वाटलं.

या वाड्याचं गुढ वाढतच चाललं होतं . ती उत्सुकतेने बघायला लागली सगुणाकडे .

"ताट कधी बघितलं नाही का " .क्षमाच्या कानावर शब्द आले .ती दचकली .करारी बाई तिच्या अगदी समोर उभ्या होत्या .ती घाबरुन मागे सरकली.

क्षमा कशीबशी जेवली. ती सारखी रघुनाथची वाट बघत होती. तो कुठे गेला हे कळायला मार्ग नव्हता . 

सगुणाही कुठल्या तरी खोलीत होती. तिला आता रडायला यायला लागलं .

तेवढ्यात सासरे आले आत. त्यांनी प्रेमाने तिला आवाज दिला.

"रडु नको बाळ .होईल सगळ्याची सवय तुला .जा झोप .माझा रघुनाथ खुप चांगला आहे.थोडा वेळ दे त्याला ."सास-यांच्या या शब्दाने तिला धीर आला.ती आपल्या खोलीत झोपायला गेली .संपुर्ण रात्र रघुनाथ आलाच नाही.

सकाळी ती उठली , सैपाक खोलीत रघुनाथ खुर्चीत बसलेला होता . तिला आनंद झाला. ज्याच्या सोबतीने ती इथे आली .त्याला बघितल्यावर ती खुश झाली .

"रघुनाथ , सुनबाईंना आपला वाडा दाखव ". सासरे ताण कमी करण्यासाठी बोलले.

रघुनाथ न बोलता उठला ,त्याने क्षमाकडे नुसतच बघितलं .क्षमाला त्याच्या डोळ्यात प्रचंड वेदना दिसली .अशीच वेदना तिला सगुणाच्या चेह-यावरही जाणवली. ती अस्वस्थ झाली .काय असेल याच्या मनात दु:ख.

रघुनाथ न बोलता चालायला लागला . क्षमाही त्याच्या मागे निघाली.

"बापरे केवढा मोठा आहे वाडा , बघायला दिवस लागेल का ". ती गमतीत बोलली.

रघुनाथने तिच्या कडे फक्त पाहिलं. क्षमा निमुटपणे त्याच्या मागे निघाली.

एकेक खोली मागे जात होती . रघुनाथ आता मधुन एक दोन वाक्य बोलत होता .क्षमा होतीच तशी बोलकी. समोरच्याला बोलायला लावणारी. ती त्याच्या तेवढ्या दोन वाक्यानेही खुश झाली.

शेवटी एक कोप-यातली खोली राह्यली . त्या खोलीला मोठ्ठं कुलुप होतं बाहेरुन. क्षमा त्या खोलीकडे नवलाने बघत राह्यली .

"या खोलीला कुलुप का बरं , बघायची कशी " ती पुटपुटली . रघुनाथ आक्रसुन गेला .

"रिकामी आहे ही खोली , त्यात काय बघायचं '.तो घाईघाईत बोलला .

अन भरकन पुढे निघाला .त्याच्या आवाजात खुप वेदना होती. तीही निघाली.

"मला बाहेर यायचं " असे जोरजोरात आवाज खोलीतुन आले .क्षमा गरकन मागे वळली .आतुन काहीतरी आपटण्याचेही आवाज यायला लागले.

क्षमा थबकली .रघुनाथ तिला घाई करायला लागला .

"कोण आहे खोलीत " .क्षमाने घाबरुन विचारले .पण रघुनाथ भराभर पुढे गेला होता . ती सारखी खोलीकडे बघत बघत पुढे गेली .

कोण असावं खोलीत .तिला उत्सुकता वाटायला लागली .अन भितीही . कोणाला डांबलय .विचार करुन तिला गरगरल्या सारखं झालं .

किती गुढ लपवले आहेत या वाड्याने .

खरच किती गुढ लपवले असतील या वाड्याने . क्षमा रात्रभर तळमळत होती. या कुशी वरुन त्या कुशीवर होत होती. रात्र सरता सरत नव्हती . रघुनाथ आजही खोलीत फिरकला नव्हता . कुठे जात असेल हा रात्रभर . तिला अस्वस्थतता आली .

सकाळी ऊठुन नेहमी प्रमाणे , रघुनाथ हजर .ती चक्राउन गेली . याला कोणीच कसा जाब विचारत नाही . सासरे पेपरात डोकं खुपसुन बसलेले . करारी बाई , ओट्या जवळ होत्या . यांनाच विचारावं ,रघुनाथ कुठे जातो रात्रभर ते . ती धीर धरुन ओट्या जवळ गेली .

" आई ," , तिने जरा मोठ्यानेच आवाज दिला . कळायलाच हवं सगळ्यांना की मी रघुनाथ बद्दल विचारतेय.

तिच्या आवाजाने सगळे चपापले . सासरे एकदम खुर्ची वरुन उठलेच , सगुणा थरथर कापत तिच्या कडे बघत होती. अन रघुनाथ ,भरकन उठुन निघुन गेला .

तिला कळेचना एवढं काय आपण केलं . आवाजच तर दिला , आईंना .

करारी बाई गरकन मागे वळल्या .आपली घारी नजर तिच्यावर रोखुन रागात बोलल्या .

" कोण आई , कोणाची आई ," अन कुत्सित हसत त्या चहा गाळायला लागल्या .

क्षमाचं आता डोकं गरगरायला लागलं . कोणाला विचारु मी , काय चाललय या घरात . कोणीच कोणाशी धड बोलत नाही .

" सगुणा चहा दे " रघुनाथ पुन्हा सैपाक खोलीत आला .

" सुनबाईंच्या हातावरची मेंदी सुकली नाही वाटते अजुन .लाव की बायकोला कामाला " . करारी बाई बोलल्या .

" तुम्हाला काय करायचय , मी कोणालाही काम सांगेन , अन किती वेळा सांगितलय , माझ्या मधे पडु नका , कळत नाही का बोललेलं ." रघुनाथ एकदम धाउन गेला त्यांच्यावर .

सासरे धावत खोलीत आले , त्याला शांत केलं . सगुणा त्याला घेउन बाहेर गेली .क्षमा थक्क होउन हे सगळं नाट्य बघत होती.

करारी बाई जोरजोरात ओरडायला लागल्या ", माझा अपमान करतो का , मी काय करेन याची आहे न कल्पना मग , तरी जीभ चालवतो ."त्या आणखीही काही बोलल्या असत्या . सास-यांनी त्यांना कसंबसं थांबवलं .

क्षमाचं डोकं आता शिणुन गेलं . कोण कोणाचं कोण आहे या जाळ्यात ती अडकत चालली होती . यातुन तिला मोकळा श्वास घ्यायचा होता .

कोणत्याही परिस्थित या सगळ्या गोष्टींचा उलगडा करावाच लागेल .

आज क्षमा, सकाळ पासुन उत्साहात होती .आज तिला माहेरी जायचे होते, मांडवपरतणी साठी . ती तयार होउन बाहेर आली .रघुनाथ तयारच होता . तो जरा खुशीत दिसत होता . क्षमाला मोह झाला , विचारु का याला सगळ्या रहस्यां बद्दल .

पण तिने मनाला आवर घातला . नको अजुन मुड जायचा त्याचा . आज आईबाबांना सगळं सांगुन मन मोकळं करायचं , हे मात्र तिने मनात घोकलं.

तिच्या माहेरी , रघुनाथ एकदम मोकळा ढाकळा वागत होता . बहिणींची चेष्टा करत होता . आईबाबांशी अगदी आपुलकीने बोलत होता . क्षमाचा आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . हाच का तो उदास रघुनाथ.

आईबाबा अन सगळेच खुशीत होते .तिला आपलं रडगाणं त्यांना सांगावसच नाही वाटलं . पण ती रघुनाथच्या या रुपाला फसणार नव्हती . आज रात्री आपण शोध घ्यायचाच की हा रोज रात्री कुठे जातो . तिला आता माहेरी चैन पडेना कधी रात्र होते , अन कधी आपण रघुनाथचा पाठलाग करतो असं तिला झालं.

रात्री जेवणं झाले. आज क्षमा रहस्यभेद करायला तयारच होती. रघुनाथ थोडावेळ खोलीत आला .

क्षमा त्याला बोलण्यात गुंतवत होती. पण थोड्याच वेळात तो अस्वस्थ झाला . त्याचे बोलण्यात लक्ष लागेना .सारखा घड्याळाकडे बघत होता . 

क्षमा सतर्क झाली. आजची रात्र तिच्यासाठी महत्वपुर्ण होती.

तिने झोपण्याचं सोंग घेतलं . पण ती रघुनाथच्या हालचालींचा मागोवा घेत होती . हा बाहेर जर कुठे जात असेल तर आपण कसा पाठलाग करणार याचा . तिला घाम फुटला . हे करतो , ते बरोबर करतोय न आपण .तिच्या मनात द्वंद्व सुरु होतं. 

पण नवरा कुठे जातो , काय करतो हे जाणण्याचा बायकोला अधिकार आहेच .या निष्कर्षावर ती आली , तेंव्हा तिला बरं वाटलं.

रघुनाथने एक उडती नजर तिच्यावर टाकली . ती झोपली आहे याची त्याला खात्री पटली . तो खोली बाहेर पडला . क्षमा तयारच होती .ती लगेच उठुन बसली . बाहेर आली.

रघुनाथ लांब लांब पावलं टाकत भराभर चालत होता . त्यांच्या खोलीतुन बाहेर पडल्यावर , लांबच लांब ओसरी होती. आणि मग डावीकडे वळलं की वर जायचा जिना , अन उजवीकडे अजुन चारपाच खोल्या . आणखी पुढे गेलं तर बाहेरचं दार होतं. क्षमाला आता वाडा पाठ झाला होता .

सगळीकडे नीरव शांतता होती . ती हळुवार चालत होती. थोडा जरी रघुनाथला आवाज आला असता तर सगळच बिघडणार होतं.

ती आता अंधाराला सरावली होती. रघुनाथ दिसत होता चालतांना . तो कुठे वळतो ,. याकडे ती डोळ्यात तेल घालुन बघत होती . दुरवर कुत्रे भुंकण्याचा आवाज येत होता . क्षमाला धडधड होत होतं .

रघुनाथ उजवीकडे वळला .तिकडे चारपाच खोल्या होत्या . क्षमाने आता वेग वाढवला , ती पोचायच्या आत रघुनाथ दिसेनासा व्हायचा नाहीतर .तिची उत्सुकता शिगेला पोचली होती . 

साईडला मोठं कपाट होतं . त्याच्या आड ती उभी राह्यली .आता रघुनाथ तिला स्पष्ट दिसत होता . मधेच सास-यांचा खोकलण्याचा आवाज आला . 

देवा , आता हे बाहेर नको यायला .माझ्या सगळ्या करण्यावर पाणी फिरेल. पण पुन्हा शांतता झाली . ती रघुनाथकडे बघतच होती.

एका खोलीपुढे रघुनाथ थबकला . त्याने खिशातुन किल्ली काढली . त्या खोलीचं कुलुप उघडलं .आणि तो त्या खोलीत गुडुप झाला . दार बंद झालं . 

आता पुढे काय करावं , क्षमाला कळेना , कोण असेल खोलीत , ती दबक्या पावलांनी पुढे चालायला लागली .

रघुनाथ खोलीत गुडुप झाला . आज क्षमाला माघार घ्यायचीच नव्हती . कसही करुन तिला या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच होता.

ती दारा जवळ आली , अन दाराला कान लावला , काही ऐकु येतय का याचा तिने अंदाज घेतला .पण आत शांतता होती .

तिने दाराला हलकेच हात लाउन पाह्यला ,तर दार उघडच होतं. तिला आनंद झाला .तिला अपेक्षाच नव्हती ,की दार उघडं असेल . तिला वाटलं आपल्याला रघुनाथला विनवावं लागेल दार उघड म्हणुन .पण दार उघडच असल्यामुळे तिचं काम सोपं झालं.

तिने धडधडत आत पाउल टाकलं . खुप मोठ्ठी खोली होती ती . भिंतीवर सुंदर बाईचं एक तैलचित्र होतं. चित्रकाराने मोठ्या मेहनतीने ते बनवलेलं दिसत होतं . 

ती भराभर नजर फिरवत होती . कलात्मक रित्या खोली सजवली होती. खोली सजवणारी रसिक दिसतेय , याची क्षमाच्या मनाने नोंद घेतली . ती धीटाईने थोडीशी अजुन पुढे सरकली .

समोर एक मोठा पलंग होता . पण त्यावर कोणीच नव्हतं .तिला आश्चर्य वाटलं .आत्ताच तर रघुनाथ तिच्या समोर आत शिरला मग गेला कुठे . ती आणखीन पुढे सरकली .अन समोरचे दृश्य बघुन जागीच स्तब्ध झाली.

पलंगाच्या शेजारी एक थोड्या वयस्क बाई बसल्या होत्या , रघुनाथ त्यांना ताटलीतलं भरवत होता .बाई मन लाउन जेवत होत्या .त्या दोघांनाही हिची चाहुल लागली नव्हती .

बाई अतिशय सुरेख होत्या . तिने लगेच त्या तैलचित्रा कडे नजर टाकली . हो याच आहेत या . आता चेहरा थोडा सुकला होता , पण मुळचे सौदर्य लपत नव्हते . रघुनाथ काहीतरी सांगत होता , त्या गालात हसतही होत्या .कोण आहेत या , अन ह्यांना इथे का डांबुन ठेवलय .

ती विचारायला पुढे सरकणारच होती .बाई एकदम ओरडायला लागल्या , मला सोड मला बाहेर जायचय. डोळे गरागरा फिरवत त्या ओरडत होत्या . रघुनाथला त्या आटपेनाश्या झाल्या .तो प्रेमाने त्यांना समजावत होता . त्या आता थयथय नाचायला लागल्या .

"सोडतोस की नाही मला , कुठे गेले सगळे , माझे लेकरं , कुठे आहेत ". असं काही बाही बडबडत राह्यल्या . रघुनाथने त्यांना घट्ट धरुन ठेवलं होतं . क्षमा आडोशाला उभी राहुन हा भयावह प्रकार बघत होती.

क्षमाला काय करावे सुचेना , कोण आहेत या बाई रघुनाथच्या .तो एवढा प्रेमाने त्यांना कसा काय समजावतो आहे .

क्षमा विचार करतच होती , की बाईंनी रघुनाथच्या हाताला झटका दिला अन धावायला लागल्या . रघुनाथही चपळाईने उठला . बाई धाडकन क्षमावर येउन आदळल्या . रघुनाथही मागेच होता . क्षमाने त्यांना सावरले.

रघुनाथ आश्चर्याने क्षमाकडे बघत राह्यला . त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच वेदना क्षमाला दिसली .

"कोण आहेत या , काय प्रकार आहे हा रघुनाथ" .क्षमाने काकुळतीने विचारलं.

रघुनाथ ओंजळीत आपला चेहरा लपवुन ओक्साबोक्शी रडायला लागला . क्षमा बाईंना घट्ट धरुन त्याच्या उत्तराची वाट बघायला लागली .

क्रमश:

काय आहे या वाड्यात दडलेले गुढ? कोण आहेत खोलीत कोंडल्या गेलेल्या ह्या वयस्क बाईं ??  रघुनाथ काय उत्तर देईल क्षमाला?? सत्य कळल्यावर क्षमा कसा प्रतिसाद देईल ??

या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा कथेच्या दुसर्‍या आणि अंतिम भागात.


© उज्वला सबनवीस

सदर कथा लेखिका उज्वला सबनवीस यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने