©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे
"हॅलो आई ! कशी आहेस ?"
"मी बरी होती, पण आता मजेत असणार आहे."
"म्हणजे ग आई ?"
"अरे आपले घर सोडून असे वृद्धाश्रमात राहावे लागते , मजेत कशी असणार. म्हणून बरी आहे म्हणाले. पण आता मजेत असणार आहे?"
"म्हणजे ?"
"अरे मी घरी जाते ?"
विशू काय ??? असे काही बोलला की नंदाला वाटले तो जागेवर उडलाच असेल.
"काय ?????"
किती प्रश्न चिन्ह असावे त्याच्या चेहऱ्यावर, कल्पना न केलेलीच बरी.
पुन्हा विचारले ! "आई काय म्हणालीस ?"
"अरे मी घरी जाते म्हणाले"
"काय? घरी येतेस ???? एआई ! प्लीज असे काही करू नको. अग माझ्या लेकीचे बारावीचे वर्ष आहे आणि लेकाचे दहावीचे."
"हो माहित आहे मला. तुझा तीन बेडरूमचा फ्लॅट लहान पडतो. मुलांना अभ्यास करायला स्वतंत्र खोली हवी. त्यात ते अभ्यास करून कंटाळले की हॉल मध्ये त्यांच्या सोईने टीव्ही लावणार.
मला मेलीला जागाच नाही राहिली रे! विशू तुला आठवत का रे ? आपले दोन खोल्यांचे घर. स्वयंपाक घर, त्यात माझी खुडबुड, उरली पुढची खोली, तर सकाळी तो हॉल असायचा, दुपारी तुम्ही शाळेतून आले की अभ्यासाची खोली, आणि रात्री बेडरूम.
मला वाटते त्याच घरात तू आणि मुग्धा दोघे बहिण भाऊ अभ्यास करून शाळेत टॉपर होते. मग कॉलेजचा प्रवास. हुशार होती दोघे, आपले नंबर सोडले नाही. अभ्यासाचे ठिकाण सुध्दा तेच.
तिथेच आला गेला सुध्दा सामावून जायचा. इतके कसे संदर्भ बदलले रे अभ्यासाचे ? का मुलांच्या अपेक्षांचे ? का आईवडिलांचे ? जाऊ दे नकोच तो विषय. पण बरे झाले तू मला ईथे घेऊन आलास.
निदान मनासारखे जगता येते. घरात मुक्त वावर करायला सुध्दा बंदी होती. काय तर मुलगा दहावीत आहे? इथे सर्व मनासारखे!"
"आई ! म्हणूनच म्हणतो, मनासारखेच जग. नको येऊ घरी."
"अरे पण तुला इथे दर महिन्याला पैसे भरावे लागतात. त्याचे काय?"
मी काही नोकरी करत नव्हते. तुझे बाबा पण काही government job वर नव्हते. सगळा खर्च तुमच्या शिक्षणावर केला. शिल्लक काहीच नाही. थोडे फार होते, ते त्यांच्या आजारपणात गेले. कफल्लक झालो आम्ही. एवढे करून त्यांनी साथ सोडली हे अजून दुःखद. गोडी गुलाबीने तू आमचे राहते घर विकले, सगळा पैसा नवीन घरात टाकला. मला मात्र बेघर केले रे !"
"आई ! असे नको म्हणू ग! मुलांच्या सोईसाठी मी हे केले. आता आश्रमात दर महिन्याला मीच पैसे भरतो न !"
"म्हणूनच म्हणते ! केवढा तो खर्च ?"
"आई ! तु खर्चाचा विचार करू नको."
"अस कस नाही रे ! मी ठरवले आता तुझ्यावर खर्चाचा बोजा टाकायचा नाही. घरी जायचे!"
"पुन्हा तुझा तोच हट्ट ! राहिली न इतके दिवस मुलगा, सून, नातवंडे यांच्या सोबत. आता तिकडे राहा. तूच बोलते न , मनासारखे जगते! जगून घे !पैश्याची चिंता करू नको."
"मला वाटते मी घरी गेले तर माझा दोन वेळच्या जेवणाचा खर्च जास्तीत जास्त तीन हजार. खातेच असे कितीसे रे ?
एक रुपयाचे औषध लागत नाही. शिवाय मी पासष्टच्या वर पोहचली पण अजून तंदुरस्त आहे. जेवण बनवायला खूप आवडते तुला तर माहिती आहेच. तूर्तास बाई लावणार नाही. मीच करेन म्हणते."
"आई ! तु खर्चाची अजिबात चिंता करू नको. आता आराम करायचे दिवस आहे. कुठे ते जेवण बनवायचे , इथे बाई आहे ती करते सगळ. तू फक्त तिथे मजा कर."
"अरे हो मजाच तर करणार आहे. तु माझे बोलणे निट ऐकून घेतलेले दिसत नाही."
"म्हणजे ?"
"म्हणजे असे ! मी म्हणाले "मी घरी जाते आहे."
"समजले ग मला !"
"नाही ! तुला नाहीच समजले मी घरी येणार आहे असे म्हणाले नाही ! जाणार आहे म्हणाले !"
"आई ! हे जाणार, येणार काय आहे ?"
"सांगते , तुला आश्रमातील नाना माहीत असेल ना ! भेटला तू त्यांना एकदोन वेळा. ते गोरेसे, उंच !"
"त्यांना पाहून असे वाटते खूप श्रीमंत असावे. मला तर पाहताक्षणी भुरळच पडली होती. किती देखणे, आणि रुबाबदार दिसतात नाही !"
"देखणे, रुबाबदार माहित नाही. पण माणूस म्हणून खूप छान आहेत. "
"ओके! त्यांचे काय झाले?"
"सांगते ! आम्ही दोघे लग्न करणार आहोत."
"काय? वेडबीड लागल का तुम्हा दोघांना ?"
"नाही! वेळीच शहाणे झालो."
"आई ! हे काय नविन या वयात ?"
"अरे ! नानांना दोन मुलं, दोघेही उच्च शिक्षित. मोठ्या हुद्द्यावर. म्हातारे नाना माझ्या सारखेच घरी अडगळीत टाकल्या गेले. नाना मोठ्या हिमतीेचे,त्यांनी पोरांना सांगितले माझ्या घरात मी अडगळ होऊ शकत नाही. तुम्हाला मी नको असेल तर खुशाल माझ्या घरातून निघून जा.
एक लक्षात ठेवा, एकदा घरातून बाहेर पडले तर तुमचा माझा काहीही सबंध नसणार. पैश्याची धुंदी, मुलं नानांना सोडून गेले. नानांनी तेव्हा पासून मुलांशी सबंध तोडला. दोन वर्ष एकटे राहिले. खूप मोठं घर आहे, तिथे गरजू मुलांचे क्लासेस चालतात.
एक रुपया भाडे घेत नाही. म्हणतात मोठ्या हुद्यावर होतो. खूप पैसा कमवला. आता पेन्शन पण इतकी मिळते की मला संपत नाही. म्हणून समाजसेवा. किती थोर विचार! इथे लोकांना एक पैसा सुटत नाही.
त्या घराचा असा सदुपयोग करून बाकीच्या खोल्या नानांनी बंद ठेवल्या. एकटेपण विसरण्यासाठी आश्रमात आले. म्हणाले आता असेच करणार कधी घरी, कधी इथे. फक्त मजेत दिवस घालवायचे. स्वतःच्या आनंदासाठी जगायचे.
इथेच त्यांचे माझे सुर जुळले.तासनतास नाना आणि मी बोलत असतो. त्यांना कुटुंब , भरल घर खूप आवडायचे. पण मुलांनी निराश केले. माझी पण तीच गत.
त्या दिवशी नाना बोलता बोलता बोलून गेले. नंदा माझ्या बरोबर चलते माझ्या घरी. आपण तिकडे राहू.
माझ्या घरी, मग म्हणाले आपल्या घरी. बऱ्याच गप्पा झाल्या. मला सुध्दा नाना बोलले ते पटले.
म्हणूनच आम्ही आता लग्न करणार आहोत. जरा स्पष्ट बोलते. तुला वाटेल तुझे बाबा गेले त्यामुळे शारीरिक भूक भागवण्यासाठी असेल. तर तसे अजिबात नाही.
मी नानांना सांगितले माझा नवरा माझ्या शरीराला स्पर्श करणारा पहिला आणि शेवटचा पुरुष. नाना सुध्दा म्हणाले, खर सांगू मी माझ्या चारुला कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे लग्नानंतर आपल्यात नवरा बायको असे नाते फक्त जग लाजेसाठी असेल. आपण कायम मित्र मैत्रिणी सारखेच राहू.
आमची झोपायची खोली सुध्दा वेगळी असेल. फक्त त्याला आत कडी घातलेली नसेल. म्हणजे एकमेकांना जाग आली तर लक्ष असावे. नानांची चारू रात्री बाथरूमला गेली आणि तिथेच तिला अटॅक आला. जागेवरच सर्व संपले.म्हणून आता सावधगिरी बाळगायची."
"आई ! अग पण लोक काय म्हणतील ?"
" विशू तू लोकांची पर्वा कधी पासून करायला लागला. मला इथे या वृध्दाश्रम मध्ये ठेवले तेव्हा मी हेच म्हणाले होते. निशा तुझी बायको ती सुध्दा मला आश्रमात पाठवायला तयार नव्हती. पण तू ऐकायला तयार नव्हता.
मला तर म्हणाली होती, आई चला आपण दोघी राहू. राहूदे याला त्याचा मुलगा आणि मुलीला घेऊन. मी इतके नक्की कमवते की आपल्या दोघींचे पोट भरू शकते. तो विसरतो आई, आपण पण एका मुलाचे बाप आहोत.तुला सुध्दा समजावून सांगत होती.पण तू ऐकण्या पलिकडे होता.
रोज नित्य नेमाने तिचा फोन असतो. तुझा कधीतरी. परवाच तिला मी हे सर्व सांगितले. तिला सुध्दा माझा निर्णय आवडला. अर्थात मी तिला आधी तिचे मत विचारले. मैत्रिणी सारखे राहात होतो आम्ही दोघी."
"काय ?"
"हो ! तिला माझे म्हणणे पटले. आता निर्णय पक्का झाला . विशू मी लोकांना सांगत असायची माझा मुलगा खूप चांगला आहे, समझदार आहे. आणि तीन वर्षापूर्वी तू अचानक माझ्यावर बॉम्ब टाकला. आई तुला वृद्धाश्रमात ठेवतो.
मी म्हणाले, अरे विशू लोक काय म्हणतील ?
तु म्हणाला होता. आई सगळे आपल्या सोईन वागतात. लोकांचे कामच आहे कुजबुज करायचे , नाव ठेवायचे. ते त्यांचे काम करतात. आपण आपल्याला पटेल ते करावे. तू मला आश्रमात ठेवायला आला तेव्हा लोकांनी नाव ठेवले असेलच ना? तु पर्वा केली त्याची?
मिनल माझी जिवाभावाची मैत्रिण. तुझा निर्णय ऐकून तुला समजावत होती. विशू अरे असे काय करतो. बाबा गेल्यानंतर अवघ्या चार महिन्यात तू तिला आश्रमात पाठवतो. अरे माझा रघु बघ, एक बेडरूम, हॉल आणि किचन इतकं छोटे घर आहे. त्यालाही दोन मुलं आहेत. पैसा सुध्दा गरजेपेक्षा कमीच. तू नेहमी पाहतो सून आणि मुलगा कसे काळजी घेतात.
तुझा इतका मोठा फ्लॅट तुला अपुरा पडतो का रे? तेव्हा तू म्हणाला होता, काकु तुमची लाईफ स्टाईल वेगळी आहे . आमची वेगळी. आठवतात का तुझे शब्द ?"
"अग आई त्यात मी चुकीचे काय बोललो ? आपली लाईफ स्टाईल वेगळीच आहे. त्याची बायको सतत घरकामात व्यस्त. चांगली शिकलेली पण नोकरी न करता घरी बसली. चार पैसे कमवले असते तर परिस्थिती किती सुधारली असती?
निदान कपडे भांडे करायला बाई ठेवली असती. पण नाही, यांना दारिद्र्यात राहायचे. रघु सुध्दा तसाच बावळट. ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा. तिला नाही करायची नोकरी. घर, मुलांचा सांभाळ हेच तिचं विश्व."
"जाऊ दे, मीच तुला चुकीचे उदाहरण दिले. तुला त्या सोहम चे उदाहरण द्यायला पाहिजे होते. "
"आई !"
"विशू !आता बोलण्यासारखे काहीच नाही.
दोन तीन दिवसात "मी घरी जाते" माझ्या हक्काच्या. विशू ऐकतोस न " मी घरी जाते म्हणाले, येते नाही ".जिथून मला कुणीही पुन्हा वृद्धाश्रमात पाठवणार नाही. जिथे मी कधीच अडगळ होणार नाही. ठेवते फोन. बाय!"
विशू फक्त आई ! आई !आई ! म्हणत होता.
"विशू ! माझ्या नवीन घराचा पत्ता व्हॉट्सॲप करते. जमेल तसे ये भेटायला. हो, सांगायच राहून गेल, निशा येणार आहे आमच्या लग्नाला. बाय !"
एवढे बोलून नंदाने फोन कट केला.
©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे
सदर कथा लेखिका सौ. प्रभा कृष्णा निपाणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.