खुंटलेली हौस



© वर्षा पाचारणे.




"अरे वा! छानच कि! म्हणजे तुम्ही पुण्यात राहता... मग काय हौसे मौजेला मोल नाही"... बगीच्यात बाकावर बसले असताना बाजूला बसलेल्या समवयस्क स्त्रीने पाच दहा मिनिटांच्या ओळखीनंतर विचारलेला प्रश्न ऐकताच तिने फक्त हसून होकारार्थी मान हलवून प्रतिक्रिया दिली... पण त्या प्रश्नानंतर प्रतिभा मात्र विचारात गढून गेली..

लग्नाची पन्नास वर्ष ओलांडली होती... कुठून सुरू झालेला हा प्रवास कुठवर येऊन ठेपला होता... या विचारात असतानाच गुंगलेली प्रतिभा त्या महिलेच्या बोलण्याने आणखी विचारात पडली.

भूतकाळात अडकून पडायचं नाही म्हटलं, तरीही ते मनाला थोडंच कळतं...

पन्नास वर्षांपूर्वी प्रतिभा आणि सुहासचं लग्न झालं... अवघी सोळा वर्षांची असलेली प्रतिभा अन् एकविशीतला सुहास अशी ही जोडी... घरात सासू-सासरे ,प्रतिभा आणि सुहास एवढं कुटुंब.

प्रतिभा घाबरट स्वभावाची असल्याने सुरुवातीपासूनच सासरी दबकून वागायची.. पुण्यासारख्या शहराची ओळख व्हायला वेळ लागणार होता... लग्नाआधी एकत्र कुटुंबात वाढलेली प्रतिभा घरच्या पुरुषांच्या मनमानी कारभारामुळे आणि कायम त्यांच्या दबावाखाली वावरणाऱ्या स्त्रियांच्या वागणुकीला बघून अगदीच भित्रा ससा बनली होती.

वडील, काका, आजोबा-पणजोबा सारेच अगदी कडक शिस्तीचे.. त्यामुळे त्यांच्यासमोर घरातील स्त्रियाच काय, पण कर्ती सवरती तरणीताठी पोरंदेखील निमुटपणे खाली मान घालून उभी रहायची.

अशा वेगळ्या वातावरणातून आल्याने तिला लग्न झाल्यानंतर आता कुठे थोडं हायसं वाटू लागलं होतं... 'किमान आतातरी आपल्याला छान वेगळ्या आयुष्याची ओळख होईल', या आनंदाने ती हरखून जायची.

सुहास अबोल असला, तरी एखाद्या वेळेस असा काही स्पष्टवक्तेपणा दाखवायचा आणि तिच्या चुकांवर बोट ठेवायचा, की प्रतिभाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहिलेच पाहिजे.

पुण्यात अगदी गजबजलेल्या पेठेत राहून देखील सुहास कधी म्हणून तिला घराबाहेर फिरायला नेत नसे.. 'नवीन लग्न झालेल्या मुलींच्या काही अपेक्षा असतात', याची तसूभर देखील त्याला जाणीव नव्हती..

सुरुवातीचे वर्ष सासू-सासर्‍यांना, नव्या घराला ओळखण्यात गेलं.. वन रूम किचनच्या घरात स्वयंपाक घरात ही जोडी आणि बाहेर सासू सासरे झोपत असल्याने अगदी बांगड्यांचा आवाज झाला तरी प्रतिभा दचकायची.

 नवऱ्यासोबत बोलायचं म्हणलं, तरी कुजबूज करत बोलावं लागायचं... कारण स्वयंपाक घराला मध्ये दरवाजा नसून फक्त पडदा लावलेला होता... लग्नानंतर या गोष्टीमुळे खरं तर तिचं दडपण आणखी वाढत होतं.

आज गुरूवार असल्याने सुहासच्या ऑफिसला सुट्टी होती... एरवी वेळ नसल्याने घराबाहेर पडणं शक्यच नसायचं... "आज आपण संध्याकाळी जवळपासच्या मंदिरात जाऊन यायचे का?", असं प्रतिभाने सुहासला विचारताच 'अवतार पाहिलास का स्वतःचा?', असं म्हणत सुहासने तिने मनात रचलेल्या सप्नांना एका झटक्यात सुरुंग लावला.

क्रीम, परफ्यूम, पावडर यावर ढिगभर खर्च करणाऱ्या सुहासचं राहणीमान अगदी स्टायलिश होतं.. खरं पाहता रंगाने काळाकुट्ट, थोडसं पोट वाढलेलं, डोक्यावर मध्येच थोडासा टक्कल असा स्वतःचा अवतार असतानाही गोर्‍यापान नाजूक प्रतिभाला नावं ठेवताना कदाचित त्याच्या मनात पुरुषी अहंकार आड येत असावा.

नवऱ्याकडून अश्या उत्तराची अपेक्षा न केलेली प्रतिभा डोळ्यातलं पाणी लपवायचा प्रयत्न करून पुन्हा कामात गुंतली..

चार वर्ष झाली, तरी घरात पाळणा हलेना, म्हणून नातेवाईकात, शेजारपाजाऱ्यात होणारी कुजबुज तिच्यापासून लपली नव्हती. एरवी एवढ्या छोट्या घरात येऊन यथेच्छ पाहुणचार करून घेणाऱ्या नातेवाईकांना घराबाहेर पडल्यावर मात्र प्रतिभा आणि तिची अजूनपर्यंत न उजवलेली कुस हा एकच विषय असावा कदाचित..

नातेवाईक मंडळींमधल्याच एक दोन वयस्कर महिलांनी तर 'सुहासचं दुसरं लग्न लावून दे बाई', असं प्रतिभाच्या सासूला सांगायला देखील कमी केलं नाही.

चार वर्षानंतर घरात आनंदाची बातमी समजली.. 'पहिल्या खेपेसच मुलगा होऊ दे', असं म्हणत रोज देवाला आळवणाऱ्या सासुबाई पाहिल्या की नव्यानेच चाहूल लागलेल्या या गोड आनंदाची सुद्धा प्रतिभाला भीती वाटू लागायची.

"आई, अहो इतक्या वर्षांनी आपल्या घरात पाळणा हलणार आहे... मुलगा, मुलगी काहीही झालं तरी बाळ सुदृढ आणि निरोगी राहावं, अशी प्रार्थना करा ना", असं म्हणत एक दिवस मनातला सारा राग, भीती, घुसमट प्रतिभाने शब्दांतून व्यक्त केली.

झालं... तेवढाच काय तो विषय... पण घरात भांडणाला रंग चढला.

"एकतर चार वर्ष ज्या गोष्टीची वाट पाहतोय, ती आत्ता कुठे पदरात पडतेय... त्यातून आतातरी जरा शुभ बोल", असं म्हणत सासुबाईंनी तिच्यावरच जोरात आवाज चढवला.

"शुभ बोल म्हणजे?"... "मुलगी झाली, तर आपण काय तिला वाऱ्यावर सोडणार आहोत"... "अहो लेक नशिबानेच जन्माला यावी लागते... पोटात आई बापासाठी काळजी आणि काळजात भरून राहणारी माया, हे फक्त लेकिच्या रूपात अनुभवायला मिळते"... असं म्हणून जणू काही लेकच जन्माला येणार आहे आणि तिच्या पाठीशी मी कशी खंबीरपणे उभी असेल, हे दाखवून देताना सशाप्रमाणे घाबरट असलेल्या प्रतिभाच्या बोलण्याला एक वेगळीच धार आली होती.

दोन-चार दिवस या वादामुळे घरातले वातावरण अबोल्याने पुरते बिघडुन गेले होते... नऊ महिन्यात घरात आनंदी वातावरण मिळेल, असे खूपच कमी क्षण प्रतिभाच्या नशिबी आले होते.. नऊ महिने पूर्ण झाले आणि प्रतिभाला कळा सुरू झाल्या.

तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आले... प्रतिभाला मुलगा झाला.. घरात तर आनंदला पुन्हा एकदा उधाण आलं... "देवाने आपली इच्छा ऐकली", असं म्हणत सासूबाईंनी बोललेले अनेक नवस, उपास तापास पूर्ण केले..

चतुर्थीच्या दिवशी जन्माला आल्याने बाळाचे नाव गणेश ठेवण्यात आले.

खऱ्या अर्थाने नावाला शोभेल अशी गणेशमध्ये दिवसागणिक होणारी प्रगती वाखाणण्यासारखी होती.. कुशाग्र बुद्धी असलेला गणेश वर्गातही अव्वल ठरायचा.

 'किमान लेक तरी अशीच प्रगती करत ही असलेली परिस्थिती बदलेल', या आशेवर प्रतिभचं जगणं सुरू होतं.

पुण्यात राहूनही कधी तुळशीबाग, सारसबाग, शनिवार वाडा न पाहिलेली प्रतिभा या गोष्टी केवळ शेजारपाजाऱ्यां कडूनच ऐकत होती.

कधीही कुठल्याही मंदिरात, बागेत फिरायला जाणं तर सोडाच, परंतु चार गोड शब्दांचीही अपेक्षा सुहासकडून करणे म्हणजे तिला आज-काल नकोच वाटायचं.

कारण बाहेर फिरायला नेणं तर दूरच, पण त्यावर आणखी काही चार शब्द उलट-सुलट ऐकण्यापेक्षा रोजचं रडगाणं ठीक', असं म्हणत वर्षामागून वर्ष सरत होती.

वयोमानाप्रमाणे आलेला प्रौढपणा आणि त्या वयातली समज थोड्याफार फरकाने आता कुठे सुहासला जाणवू लागली होती.

आज पहिल्यांदा त्याने स्वतःहून प्रतिभा आणि गणेशला सारसबागेत नेलं. इतक्या वर्षात पहिल्यांदा असं मोकळेपणाचं जगणं तिच्या नशिबी आलं होतं. सारस बागेत एका कोपऱ्यात बसून गणेश आणि ही जोडी भेळ खात असतानादेखील बाहेरच्या वातावरणाचा गंध नसलेली प्रतिभा बुजल्यासारखी बसली होती. 

ती भेळ खातानाही आपल्याकडे कोणी पाहात तर नाही ना? आपण नीट तर बसलोय ना?, याकडे तिचं जास्त लक्ष होतं... खरं पहाता त्यात तिची काही चूक नव्हती... कारण तिने ना कधी लग्नाआधी स्वच्छंदी वातावरण अनुभवलं होतं ना लग्नानंतर.

अशातच सुहासची कंपनी बंद पडली आणि नोकरी गमावल्याने आर्थिक उत्पन्नाचा कणाच मोडला.. 'उत्पन्न कसे मिळवावे?', या विचारातच शेवटी रिक्षा घेण्याचा विचार ठरला.

नोकरी असतानाही एका कवडीचीही बचत न केलेल्या सुहासकडे रिक्षा घेण्यासाठीही पैसा शिल्लक नव्हता.. अशातच प्रतिभाला तिच्या वडिलांनी लग्नात घातलेला लक्ष्मी हार मोडून त्याने रिक्षासाठीचे पैसे जमवले..

रिक्षा चालवायला जातानाही सुहास इतका रुबाबात असायचा, की जणू काही तो घरच्यांवर पैसे कमवून उपकारच करतोय.

परफ्यूमचे फवारे, गडद रंग आणि बटबटीत डिझाईनचे शर्ट, केसांचा एक वेगळ्याच प्रकारचा भांग अशी त्याची स्टाईल पाहून तो रीक्षा चालवायला निघाला आहे, का कुठे एखाद्या समारंभासाठी तयार होऊन निघाला आहे, असा प्रश्न पडावा.

 त्यातही कंपनी बंद पडल्यापासून एक ते चार ही त्याची झोपायची वेळ ठरलेली ... त्यामुळे दहा वाजता गेलेला सुहास एकच्या ठोक्याला न चुकता घरात हजर असायचा. एवढ्या दोन तीन तासात जेमतेम शंभर रुपये त्याने कमावलेले असायचे.

पुन्हा चार वाजता चहा पाणी करून तो निघून जायचा. चार ते आठ वाजेपर्यंत रिक्षा चालवून पुन्हा स्वारी घरी.... आता पुढच्या दोन-तीन तासात सुद्धा जेमतेम पुन्हा एकदा शंभर रुपयेच मिळालेले असायचे.. 

त्या आलेल्या पैशात भागवताना प्रतिभाची मात्र तारांबळ व्हायची... कधी तेल संपले, तर कधी पीठ संपलंय अशी अवस्था होती... बरं सुहासला काही बोलायला गेलं, तर 'पैसे काय झाडाला लागतात का?', असं म्हणून तिच्यावर आवाज चढवायला मोकळा.

सगळ्यांची मनं सांभाळताना, आर्थिकदृष्टया कमकुवत असलेली परिस्थिती सांभाळताना, कुठलीही हौस पूर्ण झालेली नसताना, केवळ लेकाच्या राज्यात तरी सुखाचे दिवस येतील या आशेवर राहण्याशिवाय तिच्याकडे आता काहीच पर्याय नव्हता.

सुहासला देखील त्याची मिळकत कमी असल्याने तितकाच मानसिक त्रास होत होता. तसं तो तिला कधीतरी बोलूनही दाखवायचा.

त्यावर मग त्याने उपाय शोधून काढला... शाळेच्या मुलांना सोडण्यासाठी आपली रिक्षा लावली तर दर महिना ठरलेली रक्कम घरात येईल आणि इतर वेळेत जवळपासचे भाडे मिळाले, तर त्यात आणखी भर पडेल या विचाराने त्याने ओळखीपाळखीतल्या लोकांच्या मुलांना शाळेत सोडण्याचे काम सुरू केले.

आता दर महिना होणारी पैशाची चणचण बऱ्याच अंशी कमी झाली होती.. प्रतिभा देखील येणाऱ्या रकमेतून जमेल तशी चिल्लर डब्यात साठवून ठेवत होती. दरम्यानच्या काळात सासू-सासर्‍यांचे वृद्धापकाळाने निधन झाले..

वन रूम किचन देखील आता तिघांसाठी मोठं वाटू लागलं होतं.. वयाची पन्नाशी ओलांडलेली प्रतिभा आता बारीक सारीक दुखण्यांनी आजारी पडू लागली होती.

मुळात काळी मोडी असलेली शरीर यष्टी आणखीनच कृश झाली होती... लेकाने शिकून-सवरून स्वतःच्या हिमतीवर चांगल्या पगाराची नोकरी मिळवली होती .. 'आपल्याला नोकरी मिळाल्याने आपल्या वडिलांनी आता कष्ट न करता निवांत आयुष्य घालवावे', या विचाराने गणेशने वडिलांना रिक्षा भाडेतत्वावर द्यायला लावली.

सगळं काही ठीक-ठाक पद्धतीने सुरळीत चालू होतं.

गणेशचं लग्नाचं वय झाल्याने आता वधू संशोधनाची वेळ आली होती. 'बेताची परिस्थिती अन वन रूम किचनच्या घराला आजकालची कुठली मुलगी सहजा सहजी तयार होणार नाही', या विचाराने आपल्यासारखीच सामान्य कुटुंबातली मुलगी सून म्हणून आणण्याचा विचार करून तशाच पद्धतीने स्थळं बघण्यास प्रतिभाने सुरुवात केली.

 नात्यातल्या मंडळींकडूनच गणेशसाठी अतिशय उत्तम मुलीचं स्थळ सुचवण्यात आलं. मुलगी मनमिळाऊ, समजूतदार होती... एका छोट्याशा प्रायव्हेट ऑफिसमध्ये ती कामाला होती.

तिच्याही घरची परिस्थिती बेताचीच असल्याने आई-बाबांना मदतीचा हात मिळावा, या हेतूने तिने कॉलेज करता करताच नोकरी मिळवली होती. 'आई-बाबांच्या कष्टाची जाण असलेली मुलगी, आपल्याही घराला नक्कीच स्वर्ग बनवेल यात शंका नाही', या विचाराने प्रतिभाने लग्नाची जुळवाजुळव केली.

माधुरी गणेशची बायको बनून लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली. आपल्या आई-बाबांप्रमाणेच गणेशच्या आई-वडिलांचीही तितक्याच प्रेमाने काळजी घेऊ लागली.

'तसूभरही अंगावर सोनं नसलेल्या सासूच्या हौसेसाठी काहीतरी करावं', अशी तिला खूप इच्छा होती... असंच एक दिवस बोलता-बोलता गप्पांमध्ये रिक्षाचा विषय निघताच प्रतिभा पटकन बोलून गेली. 'माझ्या वडिलांनी लग्नात दिलेला लक्ष्मीहार मोडून त्या काळात रिक्षा घ्यावी लागली होती.

आई वडिलांनी दिलेला शेवटचा दागिना देखील परिस्थितीमुळे मला जपता आला नाही'... तिच्या मनाची बोचरी सल आज इतक्या वर्षांनी सुहासला जाणवत होती.

वर्षभराने गणेशने कर्ज काढून फ्लॅट घेतला.. 'किमान आपल्या प्रमाणेच होणारी आपल्या सुनेची घुसमट तरी कमी होईल', या विचाराने आज प्रतिभाला खरंच मनापासून बरं वाटत होतं.. 'नवरा बायकोतला एकांत, हक्काने एकमेकांशी बोलाव्या अशा गोष्टी, महागडे नाही पण किमान खिशाला परवडतील एवढे तरी तिचे पुरवले जाणारे हट्ट, या साऱ्या बायकोच्या नवऱ्याकडून असलेल्या अपेक्षा आपल्यासारख्या किमान या वेळी तरी अपूर्ण राहणार नाहीत', यामुळे तिला मनोमन समाधान मिळत होतं.

पण कितीही म्हटलं तरी स्त्री मन ते... न मिळालेल्या गोष्टींसाठी कितीही झुरली तरीही असलेली सल मात्र कधी ओठावर येऊ दिलं नाही.

'आई बाबांच्या लग्नाचा पंचेचाळीसावा वाढदिवस छान साजरा करायचा', असं लेक आणि सुनेने आधीच जाहीर केलं होतं. 

दोघांनी आपल्या पगारातून दर महिन्याला थोडी थोडी रक्कम बाजूला सारून आईसाठी लक्ष्मीहार बनवला होता.. सुनेने खास सासूच्या आवडत्या रंगाची पैठणी आणून मापाने ब्लाउज देखील आधीच शिवून आणला होता.

एरवी कुठल्याही साडीवर कुठलाही ब्लाऊज घालणारी प्रतिभा हे सारं पाहून खरंच मनातून हरखून गेली होती. किमान इतक्या वर्षानंतर तरी आज सगळी स्वप्न पूर्ण होत असल्याचं पाहताना तिचं मन इतक्या वर्षांच्या मन मारून जगत आलेल्या प्रवासाला नकळत विसरत चाललं होतं.

लग्नाचा वाढदिवस उद्यावर येऊन ठेपला होता. सकाळी उठून कामावर जायच्या आधी सुनबाई सासू-सासर्‍यांचं औक्षण करणार होती.

रात्रीच तिने केक आणून फ्रिजमध्ये ठेवला होता... सकाळी उठून पैठणी बरोबर काचेच्या हिरव्या बांगड्या, गजरा आणि लक्ष्मीहाराची पेटी टेबलवर काढून ठेवली होती.

पण रोज स्वयंपाकघरात जरा खुडबुड झाली, तरी लगेच उठून बसणाऱ्या सासुबाई आज मात्र' खूप थंडी वाजते आहे', असं म्हणत अंगावर ब्लॅंकेट घेऊन कुडकुडत पडून होत्या.

माधुरीने अंगाला हात लावून पाहताच सासूबाईंचे अंग गरम लागत होते... त्यांच्या अंगात उठून बसण्याचीही ताकद शिल्लक राहिली नव्हती... एक दोन शब्द बोलून प्रतिभाला भोवळ आली... गणेशने तातडीने आईला हॉस्पिटल मध्ये भरती केले.

प्रतिभाच्या अंगातल्या पांढऱ्या पेशी अतिशय कमी झाल्या होत्या... किमान चार-पाच दिवस तरी हॉस्पिटलमध्येच ऍडमिट करावे लागणार होते... आणि त्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यावरही घरी गेल्यावर तिला संपूर्ण विश्रांतीची गरज होती.

प्रतिभाच्या अशा अचानक आजारी पडण्याने सुहास मात्र मनातून खूप धास्तावला होता... 'आयुष्यभर जिच्याकडे कायम दुर्लक्षच केले, जिची कुठलीही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण असमर्थ ठरलो, ती अचानकच आपल्याला सोडून तर जाणार नाही ना?', या विचाराने हॉस्पिटलच्या एका बाकड्यावर बसून तो एखाद्या लहान मुलासारखा रडत होता.

"मी आयुष्यभर खूप चुकलो", असं म्हणत प्रतिभाचा हात हातात घेत तो पुन्हा एकदा गहिवरला.

'आयुष्यभर ज्या गोष्टीची अपेक्षा आपण केली होती, ती आज या मरणाच्या वाटेवर पूर्ण होताना पाहून आनंद मानावा की दुःख?', अशी प्रतिभाची अवस्था झाली होती.

सुनबाईने मात्र आनंदावर विरजण पडू नये, म्हणून हॉस्पिटलमध्ये असूनही सासूबाईंच्या केसात गजरा माळला. त्यांच्यासाठी मोठ्या प्रेमाने आणलेला लक्ष्मीहार गळ्यात घालत प्रतिभा आणि सुहासचा एक छान फोटो काढला.

 प्रतिभा आणि सुहासच्या लग्नात फोटोचे जास्त खुळ नसल्याने केवळ एकच काढलेला कृष्णधवल फोटो आठवण म्हणून तिने जपून ठेवला होता... पण सुनबाईच्या मोबाईलमधला आजचा हा रंगीत फोटो मात्र तिच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत अविस्मरणीय ठरणार होता.

'गेलेले क्षण परत येत नाहीत', याची जाणीव ठेवून किमान एकदा सुहासने प्रतिभाच्या मनाचा विचार केला असता, तर आजवर तिच्या मनातल्या कित्येक आकांक्षांचा बळी गेला नसता.

महागडे हट्ट तिचे कधीच नव्हते. पण असेल त्या परिस्थितीत एकमेकांसोबत सुखाचे क्षण घालवणं तर आपल्याच हातात असतं. वडिलांनी दिलेला लक्ष्मीहार परिस्थितीमुळे मोडावा लागला, तरी लक्ष्मीच्या रूपाने घरी आलेल्या या लेकीने मात्र आयुष्यभर उपेक्षित राहिलेल्या 'या आईची' इच्छा या वयात पूर्ण केल्याने प्रतिभाने माधुरीच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

आज खऱ्या अर्थाने एक कुटुंब सुखात न्हाऊन निघालं होतं.. 'पोटी मुलगाच जन्मावा', असा हट्ट असलेल्या लोकांना लेकीप्रमाणे जीव लावणारी सूनच असते', हे मात्र अनेकदा मृतशय्येवर पोहोचल्यावरच जाणवतं, याची प्रचिती स्वतः प्रतिभाने घेतली होती.

सून गरोदर असताना देवाकडं 'मुलगाच होऊ दे' असे साकडे घालणारी सासू आजही तिच्या डोळ्यासमोर दिसत होती... पण अंथरूणावर खिळल्यावर मात्र सासू-सासर्‍यांची सारी दुखणी, काय हवं नको, ते सारं काही प्रतिभानेच केलं असल्याने कदाचित त्या आत्म्यांचा आशीर्वाद नकळत तिला सुनेच्या रूपात मिळाला होता.

आयुष्यभर जगलेली जगण्याची लढाई आयुष्याच्या संध्याकाळी ओंजळीत भरभरून सुख टाकत होती.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर योग्य ती विश्रांती घेऊन 'दररोज नित्यनेमाने बागेत एक फेरफटका मारून यायचाच', असा नियम सूनबाईने सासू-सासऱ्यांना घालून दिल्याने किमान आतातरी दररोजची बागेची फेरी ठरलेलीच असायची.

 बागेत बसून एकमेकांसोबत भेळ, पाणीपुरी खाण्यासाठी, कधी काय हवं नको असेल ते खरेदी करण्यासाठी गणेश बाबांकडे दर महिना न चुकता ठराविक पैसे देत होता.

'आपल्या वडिलांना आपल्याकडे पैसे मागताना कमीपणा वाटू नये', यासाठी पगार झाल्याच्या दिवशीच तो ती रक्कम बाबांच्या हाती सुपूर्त करायचा. 

आजही बागेतल्या बाकड्यावर बसून भेळ खाण्याची इच्छा प्रतिभाने बोलून दाखवताच सुहास बागेबाहेरच्या भेळ वाल्याकडून भेळ आणण्यासाठी गेला. 

बागेत येणाऱ्या समवयस्क आजीबाईंनी बोलता बोलता 'तुम्ही पुण्यातच राहता का?', असा प्रश्न विचारताच भूतकाळात हरवलेली प्रतिभा सुहासच्या हाकेने भानावर आली.

"अगं, भेळ खायची आहे ना?"... "कुठल्या विचारात हरवलीस?", सुहासने असे विचारताच स्मितहास्य करत प्रतिभा म्हणाली ,

"आज पुन्हा एकदा भूतकाळ जगून आले"... तिच्या बोलण्यावर स्मित हास्य करत सुहासने तिचा हात हातात घेतला... भेळ संपवून पुन्हा हे वार्धक्यातलं प्रेमी जोडपं एकमेकांचा आधार बनत घराकडे मार्गस्थ झालं...

वाचकहो, अशा कितीतरी महिला आजूबाजूला दिसतात, ज्यांची स्वप्नं फार मोठी नसतात... ज्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं खरंतर जोडीदाराला किंवा घरातील इतर मंडळींना सहज शक्य असतं. 

आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या ठराविक वेळेला मिळाल्या, तरच त्यांचं मोल अधिक ठरतं... वार्धक्यात नवरा बायकोने आयुष्यातील अर्ध्यापेक्षा अधिक काळ एकमेकांसोबत घालवलेला असतो... अशावेळी 'आयुष्याची संध्याकाळ तरुणपणाच्या सोनेरी आठवणीनेच सुखद होत असते', हे जाणून सुरवातीपासून एकमेकांना घट्ट साथ दिली तर लग्न ही केवळ तडजोड न राहता किंवा जगण्याची लढाई न राहता आयुष्याचा सोहळा होऊ शकतो...

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने