बसस्टॉप

©अर्चना बोरावके "मनस्वी"



राजचं मन सध्या अजिबात थार्‍यावर नव्हतं. त्याला जिकडे तिकडे फक्त प्रियाच दिसत होती. 

प्रिया.... नावाप्रमाणेच किती सुंदर, तितकीच सालस ! तिचे बोलणे म्हणजे झुळझुळ वाहणारे पाणीच.... आवाज तर ऐकतच रहावा असा गोड... पण या सगळ्यात सुंदर काय असेल तर तिच्या गालावर पडणारी सुंदर खळी! 

त्या खळीने त्याला कित्येक दिवसांपासून वेडच लावलं होतं. तो त्याचा राहीलाच नव्हता. सगळीकडे त्याला प्रियाच दिसत होती. त्याच धुंदीत तो ऑफिसला जायला तयार झाला. नेहमीची बस चुकेल या भीतीने त्याने पळत पळतच बसस्टॉप गाठला.

" हुश्श, अजून प्रिया आलेली दिसत नाही", असे म्हणून तो नेहमीच्या जागेवर उभा राहिला. इतक्यात प्रिया तिच्या मैत्रिणीबरोबर येताना दिसली. 

तिला पाहताच त्याचा काळजाचा ठोकाच चुकायचा तेवढा बाकी राहिला. फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये काय दिसत होती ती! तिने एक चोरटा कटाक्ष राजकडे टाकला, आणि राज अजूनच घायाळ झाला.

दोघांचा बसस्टॉपही एकच होता आणि बसही! 

मागच्या जवळ जवळ सहा महिन्यांपासून दोघे एकमेकांना बघत होते.... अर्थातच एकमेकांना चोरून!

प्रियालाही राजचे व्यक्तिमत्व आवडले होते. उंच - पुरा, किंचित सावळ्या वर्णाचा राज चार चौघात उठून दिसायचा. राहणीमान साधे पण छाप पाडणारे, डोळे तर विलक्षण बोलके. त्या गहिऱ्या तपकिरी डोळ्यात बघतच बसावे असे तिला वाटे. पण ती कटाक्षाने तिच्या मनाला आवर घाली. 

खरं तरं दोघांचीही मने एकमेकांकडे ओढ घेत होती.....पण दोघेही आपापल्या मनाला लगाम घालत होते.

प्रिया घरातली सर्वात मोठी मुलगी. वडील पाच वर्षापूर्वीच वारले होते. तेव्हापासून घराची सर्व जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती. नोकरी करून तिने घराला बर्‍याच प्रमाणात सावरलं होतं. धाकटा भाऊ प्रतीकचा इंजिनिअरिंगचा सर्व खर्च, बहिणीची शाळा, घरखर्च असं सर्व ती मोठ्या हिमतीने करत होती. 

स्वतःची स्वप्ने , सार्‍या आकांक्षा तिने आपल्या आई आणि भावंडांसाठी केव्हाच सोडून दिल्या होत्या. तिला जणू स्वप्ने बघण्याचा अधिकारच नव्हता! आणि म्हणुनच ती, राजकडे ओढ घेणार्‍या आपल्या मनाला अडवू पाहत होती.

बसमधून रोज जाताना, प्रिया आणि तिची मैत्रीण राधाचे बोलणे राज ऐके. त्यालाही तिच्या सर्व परिस्थितीची कल्पना आली होती. आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व देणारी प्रिया त्यामुळे तर अजूनच आवडू लागली होती.
 
पण राजच्याही आयुष्यात काही कमी प्रश्न नव्हते. त्याचे वडील अर्धांग वायूचा झटका येऊन अंथरुणाला खिळले होते. आईही बर्‍याचदा आजारी असायची. 

त्या दोघांची काळजी घेणे, त्यांचा दवाखाना, औषधपाणी या सर्वांची जबाबदारी एकट्या राजवरच होती. 

त्यामुळे आई त्याला म्हणे, "राज अरे लग्न करून एखादी चांगली मुलगी तरी आण घरी. तुझी धावपळ कमी होईल आणि मलाही मदत होईल. "

राज कंपनीत चांगल्या हुद्यावर होता. पगारही उत्तम होता. त्याला खूप मुली सांगून येत. पण त्याला आई वडिलांचीच चिंता होती. 

तो आईला म्हणे, " आई अगं, आपल्या घरात अॅडजस्ट होणारी मुलगी हवी. ती तुमच्याशी प्रेमाने नाही वागली तर? आपण करायला जाऊ एक आणि होऊन बसेल दुसरच!" त्यामुळे तो पाऊल पुढे टाकायला साशंक होता. आणि प्रियामध्येही त्याचे मन गुंतले होते. 

तिच्या घरच्या परिस्थितिमुळे तिला तो विचारूही शकत नव्हता आणि तिचा विचार मनातून काढून टाकूही शकत नव्हता. 

म्हणुन नवी बाइक घेऊनही अजून तो बसनेच ऑफिसला जात होता. कधी ना कधी प्रिया त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देईल या आशेवर!
 
असेच जवळ जवळ सहा महिने गेले. राज एकदा आठ दिवसांसाठी ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला होता. आणि इकडे त्याच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिटच करावे लागले.

शेजारच्यांच्या मदतीने त्याच्या आईने त्यांना हॉस्पिटलमध्ये आणले. राजच्या आईला तर काही सुचेचना. राजला फोन करावा तर तो महत्त्वाच्या कामासाठी गेलेला. त्याला उगाच टेन्शन नको म्हणुन त्यांनी त्याला कळवलेच नाही. 

निराश अन दुःखी होऊन त्या आईसीयूच्या बाहेर खुर्चीवर बसल्या होत्या. तेव्हड्यात प्रियाचे लक्ष त्यांच्याकडे गेले. हो! प्रियाच ती! 

त्या हॉस्पिटलमध्ये नर्स होती ती. तिने त्यांना खूप धीर दिला. मायेने त्यांची विचारपूस केली. तिचीच ड्यूटी होती आईसीयूमध्ये.
 
" मावशी, काही काळजी करू नका. काका आता बरे आहेत. धोका टळला आहे. उद्या जनरल वॉर्ड मध्ये शिफ्टही करणार आहोत. काही लागले तर सांगा. मी आहेच इथे आज रात्रभर!"
 
प्रियाच्या आश्वासक बोलण्याने आणि धीर देण्याने राजची आई बरीच सावरली. दुसर्‍या दिवसापासुन जेव्हा जेव्हा प्रिया बाबांना औषधे द्यायला किंवा सलाईन लावायला येई, तेव्हा त्या दोघींच्या खूप गप्पा होऊ लागल्या. 

प्रिया मुळातच खूप बोलकी! प्रेमाने समजून सांगण्याची तिची हातोटी, कामाचा उरक, पेशन्टशी तिचे प्रेमळ वागणे आणि आस्थेने सगळ्यांशी बोलण्याची पद्धत यामुळे प्रिया तिथल्या सगळ्या पेशंटना आपलीशी वाटे. 

पेशंटच्या नातेवाईकांशीही ती खूप मोकळेपणाने बोले. ती आली कि, वार्ड मध्ये जणू एक चैतन्य येई. 

राजच्या आई बाबांना तर मोठा आधारच मिळाला होता तिच्यामुळे. राजची आई घरी जाई, तेव्हा प्रिया बाबांचे सर्व बघे. एका आठवड्यात त्या तिघांत एक आगळे नातेच तयार झाले होते. 

बाबा आता बरेही झाले होते. डिस्चार्ज देण्याचा दिवस आला. आज राजही दिल्लीवरुन येणार होता. तो आल्यावर बिल देऊन ते निघणार होते. 

प्रियाही त्यांना भेटायला आली. औषधे कशी घ्यायची आणि घरी त्यांची काळजी कशी घ्यायची हे त्यांना ती समजावून सांगत होती. तिने सगळे अगदी व्यवस्थित लिहून दिले. 

इतक्यात तिथे राजही आला. प्रियाला तिथे बघून तो जागीच थबकला . तिच्याकडे तो बघतच राहिला. 

आईच मग म्हणाली, " राज ये, तुझे बाबा आता ठीक आहेत बरं! ही सगळी कमाल इथल्या डॉक्टरांची आणि या प्रियाची! हिने खूप मदत केली आम्हाला. खूप धीर दिला रे तू नसताना!" राजही तिला " Thank you!" म्हणाला. 

राजला पाहताच प्रिया लाजलीच आणि काही तरी कारण सांगून तिथून सटकली.
 
पुढचे काही दिवस राजने बाबांची काळजी घेण्यासाठी सुट्टी घेतली होती. पण त्याचे मन मात्र त्या बसस्टॉपकडे सारखी ओढ घेत होते.

 " प्रिया आली असेल का आज? तिने बसस्टॉपवर मला मिस केले असेल का?" असे प्रश्न त्याला सारखे पडत होते. त्याचे मन सारखे तिकडेच धाव घेत होते. 

तिने त्याच्या आई वडिलांना केलेली मदत पाहून त्याला खात्रीही पटली होती की, प्रियाच त्याच्या आई वडिलांचे सर्व प्रेमाने करू शकेल.
 
इकडे प्रियाचीही अवस्था काही वेगळी नव्हती. राज चार पाच दिवसांपासून दिसला नाही म्हणुन तीही बेचैन होती . तिलाही राज आणि त्याचे कुटुंब आवडले होते. 

पण बोलायचे कसे? आणि तिच्या जबाबदार्‍या राज समजून घेईल का? एका बाजूला ही बेचैनी आणि दुसर्‍या बाजूला तिच्या घरी एक आनंदाची बातमीही आली.

 नुकत्याच इंजिनीअर झालेल्या तिच्या भावाला चांगली नोकरी लागली होती. तिचा आनंद तर गगनात मावत नव्हता. अनेक वर्षापासुन ती ह्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होती. तिच्या कष्टाचे चीज झाले होते.
 
आज ती आणि तिचा भाऊ प्रतीक त्या बसस्टॉपवर आले. त्याच्या ऑफिसचा पहिला दिवस होता. कोण अभिमान वाटत होता प्रियाला त्याच्याबद्दल! इंजिनीअरिंग सुटल्या सुटल्या लगेच नोकरी मिळवली होती त्याने!

 इतक्यात राजही तिथे आला. प्रतीक लगेच पुढे झाला आणि हात पुढे करून राजला म्हणाला, " गुड मॉर्निंग सर!"
 
" गुड मॉर्निंग, प्रतीक! आज पहिला दिवस ना ऑफिसचा? ऑल द बेस्ट! चल बरोबरच जाऊ आपण!"
 
गोंधळून गेलेल्या प्रियाला प्रतीक म्हणाला, " ताई, हे मिस्टर राज, ऑफिसमध्ये माझे सीनियर आहेत. त्यांच्यामुळेच मला ही नोकरी मिळाली."
 
प्रिया काही बोलणार तोच बस आली. तिचे प्रश्न तसेच राहिले. 

संध्याकाळी घरी येताच तिची मैत्रीण राधाचा फोन आला.," काय प्रिया, कसे वाटले सरप्राईज ? राज आणि प्रतीक एकाच ऑफिसमध्ये! "
 
" राधा अगं काय प्रकार आहे हा? आणि तुला कसे माहीत हे सर्व ? "

" अगं मीच दिला होता प्रतीकचा बायोडेटा राजला. राज रोज आपले बोलणे ऐकत असे बसमध्ये. त्याला तुला मदत करावीशी वाटली. पण तुला हे आवडेल कि नाही हे त्याला माहीत नव्हते. 

 तुझी नाइट ड्यूटी होती तेव्हा मी एकटीच होते बसस्टॉपवर, त्या दिवशी तो माझ्याशी बोलला. आणि तुला काही न सांगण्याच्या अटीवर त्याने प्रतीकसाठी हे सर्व केले. "

" अगं पण प्रतीकही काही बोलला नाही मला. "

" त्यालाही तुला सरप्राईज द्यायचं होतं ना ! प्रिया आता तरी राजला तुझ्या मनातले सांग. तोही तुझ्यावर तितकेच प्रेम करतो गं! काही न बोलताही त्याने तुमचा मोठा प्रश्न सोडवला. मनातले प्रेम आता तरी ओठावर आण. तो त्याचीच वाट बघत आहे केव्हापासून! "

दुसर्‍या दिवशी प्रिया मस्त तयार झाली. तिच्या आवडीचा गुलाबी ड्रेस चढवला . घरातून निघताना चार चार वेळा तरी आरशापुढे उभे राहून सर्व ठीक आहे ना याची खात्री करून घेतली. 

आज पहिल्यांदा त्या बसस्टॉपवर जाताना तीचं हृदय धडधडत होतं. राज आधीच बसस्टॉपवर पोहोचला होता. तोही तिच्या वाटेकडेच डोळे लावून बसला होता. 

त्याने घरच्यांनाही प्रियाबद्दल सांगितले होते. ते दोघे तर एकदम खुश झाले. त्यांना तर प्रिया आधीच आवडली होती. आता सगळ्या शंका, सगळ्या अडचणी दूर झाल्या होत्या.

 प्रिया बसस्टॉपवर पोहोचली. परत तीच नजरा नजर ! पण आता ते चोरटे कटाक्ष नव्हते. त्या नजरांमध्ये होतं प्रेम, विश्वास आणि आश्वासन! 

एकमेकांची साथ न सोडण्याचे आश्वासन, एकमेकांच्या घरच्यांना आधार देण्याचे आश्वासन आणि एकमेकांबरोबर आयुष्यभर राहण्याचे आश्वासन! 

त्या बसस्टॉप वरच्या रोजच्या भेटीचे रूपांतर आज एका नव्या नात्यात होत होते. तो बसस्टॉप होता साक्षीदार त्यांच्या अबोल प्रेमाचा आणि तिथूनच आज त्यांच्या जीवन प्रवासाची नवी सुरुवात होत होती.

©अर्चना बोरावके"मनस्वी"

सदर कथा लेखिका अर्चना बोरावके"मनस्वी" यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने