लोभ? की नोकरीतील लाचारी !

© नीलिमा देशपांडे


"माफ करा सर, पण मी तुम्हाला फक्त या हॉस्पिटलचे नियम सांगतेय. तुमच्या बिलात लावलेल्या सगळ्याच गोष्टींचे पेमेंट तुम्हाला करावेच लागेल मग ते थर्मामीटर असो वा जास्तीची औषधं. 


तुम्ही दाखल झालात त्यांनतर वेळोवेळी तब्येत नीट होत गेली किंवा काही औषधं तुम्हाला सुट झाली नाही तर डॉक्टर ती बदलून नवीन लिहून देतात.

आता त्यांनी मधेच असे सगळे औषधं बदलून दिल्याने तुमची आधीची त्यांनी लिहून दिलेली औषध तशीच शिल्लक राहिली त्याला आमचा काही इलाज नाही.ती परत घेतली जात नाहीत आमच्या हॉस्पिटल मधे. हे काय मेडिकल स्टोर आहे का? 

दवाखाना म्हटले की खर्चापेक्षा पेशंटला बरे करणे जास्त महत्वाचे असते. त्यामूळे या बिलात आता काही बदल होणार नाही आणि ते भरल्याशिवाय तुम्हाला डिस्चार्जही मिळणार नाही. 

तुम्ही म्हणता तशी माझ्याकडे काही सुपरपॉवर असती तर मी काहितरी मदत केली असती. पण मी सुद्धा इथे नोकरी करणारी एक साधी व्यक्ती आहे!"

रिसेप्शनवर असलेल्या अंजलीचे हे सगळे बोलणे शांतपणे ऐकून झाल्यावर, सुरजने तिला वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न केला,

"हरकत नाही. तुमची अडचण मी समजू शकतो.अनेकदा आपण जिथे नोकरी करतो तिथे आपण काही चुकीचे वाटले तरी नोकरी टिकवण्यासाठी ते निमुटपणे सहन करतो.

चुकिच्या गोष्टी घडताना पाहूनही डोळे झाक करतो. राहिला प्रश्न सुपरपॉवरचा तर,... म्हटलं तर प्रत्येकात सुपरपॉवर नक्कीच असते. फक्त काहीजण ती ओळखतात आणि त्याचा अवतीभवती काही चुकत असेल तर सुधारणेसाठी वापर करतात."

"आमचा पेशंट ज्या कारणासाठी इथे दाखल केला होता तो कोणत्याही इमरजेंसीत नव्हता. तुम्ही पुर्ण तपासणी करुन मग ट्रिटमेंट सुरु करु शकत होतात.

नंतर काही बदल करावा लागू शकतो याचा विचार न करता तुम्ही आधी भरमसाठ औषधे लिहून दिली. नंतर तुमचे अनुमान चुकले म्हणून ती बदलली व नवीन औषधे लिहून दिली. असे दोन, तीन वेळा झाले. 

प्रत्येकवेळी तुम्ही एका दिवसाचा ट्रायल डोस न देता गोळ्यांची पुर्ण स्ट्रिप चार दिवस लागतील म्हणून पेशंट जवळच्या ड्रॉवरमधे आणून ठेवत गेलात. ज्यांची किंमत भरपूर आहे. 

त्यातल्या अवघ्या एक किंवा दोन गोळ्या वापरू शकलो आम्ही. उरलेल्या गोळ्या, इंजेक्शन जे तुम्हीच दिलेली होती ती औषधे तुम्ही स्वत:च परत घेणार नसाल तर अवघड आहे. चार पाच हजाराची औषधे पडून आहेत.

 हॉस्पिटलच्या नियमाच्या नावाने तुम्ही बळजबरी जास्तीची औषधं पेशंटला घेण्यास भाग पाडत आहात, जी त्यांच्या कामाची नाहीत. हे हॉस्पिटल आहे त्यामूळे इथेच नंतर आलेल्या पेशंटला तोच त्रास होत असेल तर निदान ती वापरात येतील. 

आम्ही घरी नेऊन त्यांचे काय करणार? पैसा कमावण्याकरता जो अतीलोभ तुम्ही करत आहात त्यात अनेक गोर गरीब भरडले जातात आणि मुख्य म्हणजे देशाच्या साधनांचा अपव्यय होतो. वाया घालवण्यापेक्षा हीच औषधे कुणाच्या उपयोगी येतील. 

हे सगळे मला खरे तर तुमच्या मैनेजमेंटशी बोलायचे आहे पण तुम्ही त्यांच्यापर्यंत जावू दिले नाही त्यामूळे तुमच्याशी बोललो. आता हे त्यांना पटवून देण्याची जबाबदारी तुमची आहे नाहीतर मी मिडियावाल्यांना कळवतो. आल्या दिवसापासून ते आताचे आपले बोलणे याची मी रिकॉर्डिंग केलेली आहे."


मग मात्र माफी मागत लगेच ही गोष्ट वरपर्यंत पोहचवली गेली आणि तेंव्हापासून त्या हॉस्पिटल मधले हे बळजबरीने थोपवलेले, पैसे लुबाडण्यासाठी केलेले नियम कायमचे बदलू अशी ग्वाही देण्यात आली. 

एखाद्या चांगल्या बदलासाठी प्रसंगी आवाज चढवावा लागला किंवा समज देवून नीट करावे लागले तरी आपली लढाई चांगल्या कारणी लागली समजावे.

********

अनेक चांगले डॉक्टर आणि हॉस्पिटल आजही एक आशेचे स्थान आणि जीवनदान देणारे ठिकाण आहे. त्यांच्या चांगूलपणामूळे आजही आपण त्यांना देव मानतो. त्यांचे स्थान अढळ आहे यात आपल्या कुणाचेही दुमत नाही.


अशा अनेक चांगल्या लोकांमधे काही त्यांचा स्वार्थ साधताना दिसतात तेंव्हा त्यावर हिंमत करुन कुणीतरी आळा घालण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते.


अनेक ठिकाणी मग ती नोकरी असो वा आपल्या अवतीभवती घडत असलेल्या घटना, आपण कधी आपली ताकद किंवा एकजूट वापरुन काही बदल करू शकतो हा विचार कमी वेळा करतो. कधी ती जागा आपल्या नोकरीचे ठिकाण असेल तर सहसा आपल्या मताला मानण्या इतके आपले वय, पोज़ीशन किंवा महत्व त्या ठिकाणी नसते आणि डोळ्या देखत किंवा माघारी ज्या घटना घडत असतात त्या कधीकधी कुणी बाहेरुन येवून सोडवतो. 

या कथेतील प्रसंग हा सत्य घटनेवर आधारीत असून जयपुर येथील एका नामांकित हॉस्पिटल मधील आहे.



© नीलिमा देशपांडे


सदर कथा लेखिका नीलिमा देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.











टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने