प्राक्तन

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)






"बुवा, अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे चारूचं लग्न ठरलं बघा.. तुम्ही म्हणाला होतात ना.. पश्चिमेकडचं स्थळ मिळेल म्हणून!! मुलगा नाशिकचा आहे.. एका कंपनीत मॅनेजर आहे.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे छोटं कुटुंब आहे.. आईवडील आणि एकुलती एक विवाहित बहीण!!" चारूची आई मुलीला अपेक्षित स्थळ मिळाल्याने पेढे घेऊन फडकेबुवांकडे आली होती.

मुलगी तिशीत आली तरी मनासारखं स्थळ मिळेना तेव्हा चार महिन्यांपूर्वी फडणीस दाम्पत्य चारूची पत्रिका दाखवायला फडके बुवांकडे आलेले!! फडके बुवांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे चारूसाठी स्थळ बघितलं अन् त्यांनी सांगितलेल्या सुमारास चारूचं लग्न ठरलं सुद्धा!!


खरं तर हा फक्त फडणीसांचाच नव्हे, तर अवघ्या पंचक्रोशीचा अनुभव होता. कुणाला कसलीही समस्या असली तरी त्याचं उत्तर फडकेबुवांकडे असणार हे निश्चित!! त्यांचा जन्मकुंडलीचा व्यासंग दांडगा होता.. अन् त्यांच्या अभ्यासाला अध्यात्माची जोड होती.

फडकेबुवांचे वडील नामांकित ज्योतिषी होते. त्यांच्या हाताखाली बुवांनी ज्योतिष्य शास्त्राचा श्रीगणेशा गिरवला. ऐन तिशीतच फडकेबुवा एक उत्तम ज्योतिषी म्हणून गणले जाऊ लागले.

"हे बघ, श्रीरामा.. आपल्याला पत्रिका बघून काही चांगले योग दिसतात.. तर काही वाईट गंडांतरं देखील जाणवतात. पण कुणाला कधीही काहीही वाईट घडणार असेल तर सांगायचे नाही.. पत्रिकेत जातकाचे आयुष्य किती असेल ह्याचा अंदाज बांधता येतो.. पण त्याबाबत कधीही वाच्यता करू नये!" फडकेबुवांच्या वडिलांनी फडकेबुवांना आधीच इशारा देऊन ठेवलेला!


फडकेबुवा देखील वडिलांच्या शिकवणुकीला‌ जागले. ते केवळ जातकांना सौम्यपणे धोक्याची सूचना देऊन ठेवत. जेणेकरून धोक्याची तीव्रता कमी होईल.


फडकेबुवांच्या वडिलांनी त्यांना दिलेली पुढची सूचना म्हणजे "स्वतः ची पत्रिका कधीही अभ्यासू नकोस!"


"मी जर इतरांना मार्गदर्शन करू शकतो तर माझ्या विद्येचा उपयोग मी माझ्याकरिता का करू नये?" बुवांनी तीर्थरूपांना विचारलेच.


"ज्योतिषशास्त्राचे काही नियम आहेत, बेटा! डॉक्टर अथवा वैद्य देखील स्वतःवर किंवा जवळच्या नातलगांवर उपचार करत नाहीत असंच समज काहीसं!" वडिलांनी सांगितलं खरं.. पण हे काही बुवांच्या पचनी पडेना!


दिवसामागून दिवस गेले अन् वृद्धापकाळाने बुवांच्या तीर्थरूपांचे देहावसान झाले. वडीलांच्या मृत्यूने बुवांची मृत्यूबद्दलची जिज्ञासा अधिकच बळावली. 

"स्वतः ची पत्रिका बघू नये असे बाबा म्हणाले होते खरे! पण खरंच त्यांनी त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला नसेल का? त्यांना त्यांचा मृत्यू जवळ आल्याचं जाणवत होतं खरं!! खरंच त्यांना स्वतःच्या मृत्यूची तारीख कळली असेल??" विचारांचा भुंगा आतल्या आत बुवांचा मेंदू पोखरू लागला.


बुवांची अवस्था जानकीबाईंना.. बुवांच्या पत्नीला समजत नव्हती असं नाही.. पण ती सत्शील पतीच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी श्रद्धाळू स्त्री! ती काय बुवांची समजूत घालणार!


मनावरचा ताण असह्य होऊन एक दिवस बुवांनी स्वतःची जन्मकुंडली वडीलांच्या जुन्या बाडातून काढलीच. कुंडलीतील ग्रहमान बघून त्यांना जाणवलं.

त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना जणू तंतोतंत कुंडलीत मांडल्यात. त्यांचं शिक्षण.. व्यवसाय.. अध्यात्माची आवड.. लग्नाचे योग.. पत्नीचा स्वभाव.. अगदी सगळं कसं तंतोतंत घडून आलं होतं..

पण बुवांना जिज्ञासा होती ती मृत्यूचा समय बघण्याची!! आपलं अजून किती आयुष्य शिल्लक आहे हे पाहण्याची त्यांची इच्छा त्यांच्या वडीलांच्या शिकवणीला पुरून उरली.

बुवांनी वडिलांची जुनी बाडं माळ्यावरून खाली काढली. त्यात कित्येक जुने ग्रंथ होते जे अजूनही बुवांनी वाचले नव्हते. 

बुवांनी सगळ्या ग्रंथांवरची धूळ झटकली. सगळे ग्रंथ देवघरात ठेवून शुचिर्भूत होऊन त्यांची यथासांग पूजा केली अन् ते त्या ग्रंथाच्या साहाय्याने आपल्या उत्तरायुष्याचे चित्र बघू लागले.


बुवांच्या अपेक्षेप्रमाणेच त्यांची अध्यात्मिक अन् सांसारिक भरभराट त्यांना ग्रहदशेवरून दिसत होती.. पुढे बदलत्या ग्रहमानाचा अभ्यास करता करता दिवस सहज उलटून जाऊ लागले.


अन् एक दिवस बुवा थबकले.. त्यांनी पुन्हा पुन्हा कुंडलीतील ग्रहांचा आढावा घ्यायला सुरूवात केली.. पण त्यांची आकडेमोड त्यांना एकच उत्तर देत होती.. पत्नीवियोग!! त्यांच्या वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्यांना पत्नी वियोग होण्याचे योग होते!!


जानकीबाई बुवांपेक्षा नऊ वर्षांनी लहान! वयाच्या अवघ्या छप्पनाव्या वर्षी त्या सवाष्णपणी इहलोकाचा निरोप घेण्याचे योग बुवांना स्पष्ट दिसत होते. आता मात्र बुवा घाबरले. 

गेल्या कार्तिकात त्यांना चौसष्ट वर्षं पूर्ण झाली होती.. म्हणजे येत्या सहा महिन्यांत प्रिय पत्नीचा वियोग!! बुवांचे हातपाय थंडगार पडले. त्यांनी सर्व ग्रंथ अन् जन्म कुंडली उचलून फडताळात ठेवून दिली.

बुवा रोज कसला तरी अभ्यास करताहेत अन् गेल्या एक दोन दिवसांत स्वारींचं काही बिनसलंय ह्याची जानकीबाईंना थोडीफार कल्पना आली होतीच! 

रात्री त्या बुवांजवळ बसून त्यांचे पाय चेपून देऊ लागल्या. "माझ्या माघारी नीट राहा बरे! सूनांच्या राज्यात जास्त अपेक्षा करू नये माणसाने! सगळ्यांना सोयीचे होईल असे राहावे!" जानकीबाई धीर करून बुवांना म्हणाल्या.

जानकीबाईंचे शब्द ऐकून बुवा ताडकन उठून बसले. "हे काय बोलतेस, तू.. जानकी..!" बुवा अचंब्याने म्हणाले. जन्मोजन्मीची सहचारिणी आहेस तू! दोघांनी सोबत जायचं!!" बुवांनी जानकीबाईंचा हात हातात घेतला.


"का कोण जाणे! पण फार पुढचं काही डोळ्यांसमोर येत नाही.. अन् आयुष्यात आता काही फारसं करण्याजोगं उरलं नाही. मुलांची लग्नं झाली.. सूना घरात आल्या.. त्यांचे संसार मार्गी लागले.. आता पैलतीराची ओढ लागलीय!" एक उसासा सोडून जानकीबाई म्हणाल्या अन् बुवा पुन्हा विचाराक्रांत झाले.


"बाबांची अध्यात्मात चांगलीच प्रगती झाली होती.. म्हणूनच त्यांना मृत्यूची चाहूल लागली असावी.. पण जानकीचं काय! ती तर चारचौघींसारखी संसारी बाई! चूल अन् मूल यापुढे जर तिने काही केलं असेल तर नवरा अन् सासऱ्यांची सेवा! पण तिला तिचा मृत्यू जाणवतोय! अन् मी मात्र एव्हढा विद्वान! मला माझं भविष्य समजू नये!" बुवा पुन्हा एकदा व्यथित झाले.


दुसऱ्या दिवशी सकाळीच बुवांनी पुन्हा संदर्भ ग्रंथ अन् जन्मकुंडली मांडली. "अहो, पुन्हा का ते बाड घेऊन बसलात? असा अभ्यास करत बसता अन् मग अस्वस्थ वाटतं तुम्हाला!!" जानकी बाई बुवांच्या अभ्यासिकेत येऊन बोलल्याच. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून बुवांनी आपलं काम पुढे सुरू केलं.


खरं तर जानकीबाईंच्या माघारी बुवांना एक दिवस देखील अवघड आहे हे बुवा पूर्णपणे जाणून होते. त्यांच्या सूना भल्या होत्या.. पण एका पिढीचे अंतर! शिवाय बुवांचे सोवळेओवळे भरपूर!! "आजकालच्या मुलींना कसलं जमतंय हे!" बुवांनी मनातच विचार केला.


बुवांची आकडेमोड जसजशी वाढली तसतसे बुवा अस्वस्थ होऊ लागले. त्यांच्या अटकळीप्रमाणे ते त्यांच्या वडिलांप्रमाणेच दीर्घायुषी होते.. 

त्यांनी पुन्हा पुन्हा आकडेमोड केली.. पंच्याऐंशी.. हो जवळपास पंच्याऐंशी वर्षांचं आयुष्य लाभलं होतं बुवांना!! "म्हणजे जानकीच्या माघारी वीस वर्षं!" बुवांनी गणित केलं.. 

"वीस वर्षं काय मी वीस दिवस देखील राहू शकत नाही जानकीशिवाय!" बुवांच्या मनात आलं.


एव्हढ्यात त्यांना दिसू नये ते दिसलं अन् जाणवू नये ते जाणवलं.. तीन पापग्रहांचा तो अभद्र त्रिकोण!! बरोब्बर सहा महिन्यांनी.. जानकी वियोगाच्या सुमारास.. आणखी काही तरी सुचवत तर नाहीये..??


बुवा पुन्हा एकदा घाबरले.. पुन्हा आकडेमोड सुरू झाली.. "हो.. हो.. हाच तो दुष्ट योग! जातकाला शारीरिक अन् मानसिक अपंगत्व देणारा अन् अंथरुणात खितपत पाडणारा!!" बुवांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली अन् ते घेरी येऊन जागीच पडले.


"त्यांना शुद्ध आली तेव्हा ते त्यांच्या झोपण्याच्या खोलीत होते. जानकीबाई त्यांना पेपरने वारा घालत होत्या. त्यांची सून डॉक्टरांशी बोलत होती. 

"त्यांना कसला तरी ताण आलाय! मी झोपेच्या गोळ्या लिहून देतो! त्यांना रात्री देऊन विश्रांती घेऊ द्या!" डॉक्टर सूनबाईला सांगत होते.


"आई, बाबांचं ते कसलं बाड आहे ते उचलून पुन्हा माळ्यावर टाकून देऊ!" मुलगा आईला सांगत असलेलं बुवांनी ऐकलं. 

खरं तर आता ते बाड इथे राहिलं काय किंवा माळ्यावर ठेवलं काय.. बुवांना काहीच फरक पडत नव्हता.. त्यांच्या प्राक्तनात काय लिहिलंय हे त्यांना पुरतं कळून चुकलं होतं.. अन् ते त्यांच्या मनातून मिटू देखील शकत नव्हतं.


*******************************


बुवा जरी हिंडते फिरते झाले तरी मनाने खचून गेले होते. हल्ली त्यांनी प्रकृतीचे कारण देत पत्रिका पाहणं बंद केलं होतं. कित्येक गरजू लोक त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय माघारी जात.


एक दिवस न्हाणीघरात पाय घसरून जानकीबाई पडल्या अन् त्यानंतर त्यांच्या शरीरात बऱ्याच गुंतागुंती झाल्या.. एक दिवस हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली.


जानकीबाईंचे दिवसकार्य पार पडले अन् बुवा अधिकाधिक उदास राहू लागले. त्यांनी खाणे पिणे सोडले. घडणाऱ्या घटनेची जरी त्यांना कल्पना होती तरी प्रत्यक्षात हा धक्का पचवणं त्यांच्यासाठी सोप्पं नव्हतंच.


"बुवा डिप्रेशनमध्ये जाऊ लागलेत!" मुलांनी लगेच ताडलं अन् बुवांना लागलीच एका चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची ट्रीटमेंट सुरू झाली. बुवा जरी डिप्रेशन मध्ये होते तरी त्यांना त्यांनी अभ्यासलेल्या त्यांच्या भविष्याची‌ जाणीव होतीच. 

"पुढील वीस वर्षं शारीरिक आणि मानसिक अपंगत्व अन् बिछान्यात खितपत पडणं!!" बुवांसमोर त्यांचं भविष्य अक्राळविक्राळ रूपात हिडीस नृत्य करू लागलं.


आज जानकीबाईंना जाऊन बरोब्बर महिना झाला होता. काही कारणाने घरी बरेच पाहुणेदेखील होते. त्यामुळे सुनेला रात्री बुवांना दूध द्यायला जरा उशीरच झाला. 

बुवा त्यांच्या खोलीत गाढ निजलेले.. सूनेनं त्यांच्या खोलीत स्टूलावर दूध ठेवलं अन् ती त्यांना औषधाकरिता उठवू लागली.. पण बुवांना गाढ झोप लागली असावी.. "झोपू दे त्यांना!" मनातच विचार करत सून माघारी वळली.


"कोणत्याही परिस्थितीत बुवांच्या गोळ्या चुकवू नका!" खोलीच्या बाहेर पडताच सूनबाईला डॉक्टरांचे शब्द आठवले अन् ती पुन्हा बुवांच्या खोलीत शिरली अन् बुवांना बळेच उठवण्याचा प्रयत्न करू लागली. 

पण बुवांचं शरीर तिला नेहमीपेक्षा जड वाटलं.. तिने घरातल्या इतर मंडळीना हाक दिली.. बुवा बेशुद्ध होते.. त्यांच्या तोंडातून फेस येत होता.. अन् मानसोपचारतज्ञांनी दिलेल्या महिन्याभराच्या गोळ्यांच्या डब्या रिकाम्या होऊन त्यांच्या पलंगाखाली घरंगळत होत्या.


****************************


घरातल्या मंडळींनी तातडीने बुवांना दवाखान्यात हलवलं.‌ ताबडतोब उपचार सुरू झाले. "बुवांचे प्राण तर वाचलेत.. पण 'त्या' गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे त्यांच्या मेंदूवर घातक परिणाम झालाय!" डॉक्टर त्यांच्या मुलांना सांगत होते.. "ते उठून बसू शकत नाहीत.. अन् त्यांना सामान्य माणसाइतकी काय तान्ह्या बाळाइतकी देखील समज नाहीये."


"बाबा बरे होण्याचे चान्सेस किती?" मुलानं साशंक होत विचारलं.


"चान्सेस जवळपास नाहीतच. पण अशा अवस्थेतही ते जगू शकतील.. कितीही.. अगदी अगदी सहा महिन्यांपासून तर वीस वर्षांपर्यंत !!" डॉक्टरांनी बोलणं थांबवलं अन् पाण्याचा पेला तोंडाला लावला.


*****************


बुवांनी आयुष्यभर ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला अन् अध्यात्माचा देखील! संसाराच्या प्रयोग शाळेत देखील ते बरंच काही शिकले पण "आपण प्राक्तन बदलू शकत नाही.. ह्याउलट प्राक्तन बदलण्याची आपली धडपडच आपल्याला आपल्या प्राक्तनापर्यंत घेऊन जाते!" हा नवा धडा शिकायला मात्र जरासा उशीरच झाला होता.

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा आणि खालील लिंकवर क्लिक करून आमच्या मजेशीर स्पर्धेत  भाग घ्यायला विसरू नका. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने