काटकसरीचे घाव

© वर्षा पाचारणे.



शिक्षण एम ए बी एड, गोरा रंग, वाणीत मधाचा गोडवा आणि वागण्यात निरागसपणा ओतप्रोत भरलेली पुनम लग्न होऊन पुण्याजवळच्या एका निमशहरी गावात राहत होती.

नवऱ्याचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता... प्रतिकचा प्रेसचा व्यवसाय फार काही चांगला चालत नसल्याने, मिळकत तशी कमीच होती.

कधी मिळाले तर चांगले पैसे मिळायचे नाही तर कधी एखाद्या महिन्यात अगदीच खडखडाट असायचा... एकच जमेची बाजू म्हणजे लग्नाआधी वडिलोपार्जित संपत्तीच्या मिळालेल्या पैशात प्रतीकने बंगला बांधला होता..

लग्न होऊन नव्या नवलाईचे दिवस संपल्यानंतर खरा संसार सुरू झाला आणि नव्यानेच डाळ, तांदळाचे भाव माहीत होऊ लागल्याने तुटपुंज्या मिळकतीमध्ये घर खर्च भागवणं पूनमसाठी जिकिरीचं होतं चाललं होतं.. 

काहीतरी करून संसाराला हातभार लावणं गरजेचं होतं.. तिने अनेक शाळा, कॉलेजेस मध्ये नोकरीसाठी प्रयत्न करून पाहिला.. पण मानधन म्हणून मिळणार्‍या रकमेपेक्षा जाण्या-येण्यासाठी लागणारा खर्च अधिक होणार असल्याने तिने कुठलीही नोकरी स्वीकारली नाही..

मेहनती असलेली पूनम आता घरगुती काही व्यवसाय करता येईल का, या गोष्टीकडे लक्ष देत होती.. माहेर पुण्यातच असल्यामुळे पुण्यातील रस्त्यांची, मार्केटची खडानखडा माहिती पूनमला होती. 

त्या विचाराने तिने सुरुवातीला पुण्यातून स्वस्तात महिलांची अंतर्वस्त्र आणून घरगुती स्वरूपाचा व्यवसाय सुरू केला.. तिच्या बोलण्यातला गोडवा ओळखीपाळखीच्या महिलांना कपडे खरेदी करण्यासाठी भाग पाडत होता... व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीचा महिना अगदी छान मिळकतीचा ठरला.

पण ओळखीपाळखीतले लोक साधारणपणे एकदा-दोनदा वस्तू घेणार पण त्यानंतर आता पुन्हा पुढच्या महिन्यात काय?, हा प्रश्न भेडसावू लागला होता.. तरीही हार न मानता पूनम रोज सकाळी नाश्तापाणी झाल्यानंतर एका बॅगमध्ये सारे कपडे भरून घरोघरी जाऊन त्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करत होती.. 

दारात आलेल्या सेल्स गर्लचे म्हणणे दिवसभरात जास्तीत जास्त एखादी महिला ऐकून घेण्यासाठी तयार असायची.. त्यामुळे अशी उन्हातान्हाची वणवण करण्यात काहीच अर्थ नाही, हे पूनमने जाणले होते.

शेवटी तिने ओळखीपाळखीतल्या लोकांमध्ये सेलच्या किमतीत कपड्यांची विक्री करून टाकली.

प्रतिकला या महिन्यात तर प्रिंटिंगचे काहीच काम न मिळाल्याने कुठून पैसे येतील अशी तिळमात्रही शक्यता नव्हती... पूनमला पुन्हा एकदा काहीतरी शक्कल लढवणं गरजेचं होतं.

कपड्यांच्या व्यवसायात मिळालेल्या पैशावर पुढचा महिनाभर ठीकठाक घर चालू शकत होतं.

एक दिवस अशीच पुनम माहेरी गेलेली असताना, येताना पुणे स्टेशनच्या बाहेर तिला मोरावळ्यासाठी लागणारे आवळे दिसले.

आवळे पाहताच पुनमच्या डोक्यात झटकन मोरावळा करून विकावा, असा विचार आला... तिने सोबत असलेल्या पैशात साधारणपणे चार साडेचार किलो आवळे विकत घेऊन घरी येऊन त्याचा मस्त मोरावळा बनवून ठेवला..

शेजाऱ्या पाजाऱ्यांना मोरावळ्याची चव चाखायला देत, तो किती आयुर्वेदिक पद्धतीने बनवला आहे, हे सांगत तिने बऱ्यापैकी खप केला.

पण हा व्यवसाय काही कायम स्वरूपाचा ठरू शकत नाही, या विचाराने 'चला, हा महिना देखील ठीकठाक गेला', असंच तिला वाटलं... 'पण असं आणखी किती वर्ष?', या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नव्हतं.

 या सार्‍याच्या बरोबरीनेच तिचे नोकरीसाठी देखील प्रयत्न सुरू होते... अशातच बाळाची चाहूल लागली आणि आनंदाऐवजी आता काळजी वाढू लागली.

'जिथे आपल्याच खाण्यापिण्याचे इतके हाल, तिथे येणाऱ्या जीवाला सगळ्या सोयी सुविधा कशा देऊ शकणार?', या विचाराने तिचा जीव कासावीस होऊ लागला. 

तरीही ती पुन्हा एकदा मोठ्या जिद्दीने येणाऱ्या दिवसांसाठी जोमाने सज्ज झाली.

आता फार दगदग करून चालणार नव्हतं.. घराबाहेर पडून, धावपळ करून पोटातल्या बाळाला त्रास होईल, अशी कुठलीही गोष्ट ती करणार नव्हती.

घरातल्या घरात शिकवण्या घेऊन चार पैसे कमवता येतील या विचाराने तिने घराबाहेर शिकवणीचा बोर्ड लटकवला.

जवळपासची मुलं शिकवणीसाठी येऊ लागली... एम ए, बी एड झालेली पुनम खऱ्या अर्थाने एक उत्तम शिक्षिका होती.. फक्त नोकरीच्या ठिकाणी मिळणारे वेतन कमी असल्याने, इतके वर्ष इच्छा असूनही शिकवता न आल्याची खंत आता मिटून गेली होती..

पुनमला नववा महिना लागला आणि शिकवणी बंद करावी लागली.. पहिलं बाळंतपण माहेरी असल्याने पुनम माहेरी निघून गेली.

पूनमला तिच्यासारखाच गोरापान, गोबऱ्या गालांचा, कुरळ्या केसांचा मुलगा झाला... तिने त्याचे नाव अर्णव ठेवले.. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पूनम स्वतःच्या घरी परतली... पुन्हा सासरी आल्यावर पहिले पाढे पंचावन्न.

आता तर बाळामुळे एक क्षणही तिला हलता येत नव्हते... त्याचं रडणं, उठणं, शि शू, अंघोळ, खाणं-पिणं यात तिचा अख्खा दिवस जात होता.

मानसिकदृष्ट्या येणारा ताण वाढत चालला होता... एकीकडे पैशामुळे होणारी चिडचिड आणि दुसरीकडे बाळामुळे येणारा थकवा दोन्ही असह्य होत होतं..

महिन्या दोन महिन्यांनी मिळणारे पैसे आता घरखर्चासाठी पुरत नसल्याने प्रतीकला देखील मनातून खूप त्रास होत होता, पण इलाज काहीच नव्हता.

शेवटी आता मिळेल तशा पगारावर नोकरीसाठी तयार व्हायचे, असा दोघांनी मिळून निर्णय घेतला.. गावातल्याच एका शाळेत पुनम ला बऱ्यापैकी पगाराची नोकरी मिळाल्याने आता मात्र तिला थोडं हायसं वाटलं.

 नोकरी गावातल्या गावातच असल्याने कुठल्याही प्रकारचा ये-जा करण्याचा खर्च करण्यापेक्षा शाळा दूर असूनही ती चालत जाण्याचा पर्याय निवडायची. त्यातून वाचलेले पैसे भाजी, दूध आणण्यासाठी वापरायची.. काटकसरीपणा करून अगदी निगुतीने संसार करण्यात तिचा हात खरंच कोणी धरू शकलं नसतं..

पण एक दिवस असंच प्रतीक आणि पूनममध्ये पैशांच्या खर्चावरून शुल्लक वादावादी झाली आणि रागाच्या भरात प्रतीकने पुनमवर हात उचलला.

संसारात इतका सारा तणाव असताना, प्रत्येक वेळी मोडकळीस आलेल्या संसाराला हातभार लावताना केलेल्या कष्टांपेक्षा आजचं प्रतिकचं वागणं तिच्यासाठी जास्त संतापदायक ठरलं.

भावना दुखावलेली पुनम क्षणाचाही विलंब न लावता अर्णवला घेऊन माहेरी निघून गेली.

पुनम निघून गेल्यावर मग मात्र प्रतीकला स्वतःची चूक जाणवली... 'रागाच्या भरात काय करून बसलो मी?', असं म्हणून त्याने पूनमच्या माहेरी फोन केला.

'तुम्ही दोघे जण जरा शांत डोक्याने विचार करून एकमेकांशी बोलावत, असं मला वाटतं', असं सासर्‍यांनी सांगताच प्रतीक दुसऱ्या दिवशी पूनमला पुन्हा घरी घेऊन येण्यासाठी गेला.

पुनम मात्र आता पुन्हा त्याच तडजोडी करण्यासाठी तयार नव्हती

 'आपण बंगला भाड्याने देऊन, इथे पुण्यातल्या पुण्यातच राहू आणि शहरात असल्याने नोकरी देखील चांगली मिळेल', या विचाराने दोघांनी या वेळी मुलाच्या भवितव्याचा विचार करता गावाकडच्या सगळा गाशा गुंडाळला आणि शहरात धाव घेतली.

अर्णवला जवळच्याच नावाजलेल्या मराठी शाळेत ऍडमिशन घेतली.. इंग्रजी शाळांपेक्षा मराठी शाळांचा खर्च कमी असल्याने आणि शिक्षण उत्तम मिळत असल्याने दोघांनीही हा पर्याय निवडला होता..

वर्ष दोन वर्षांच्या कष्टदायक, खडतर आर्थिक प्रवासानंतर पुनमला पुण्यातल्या एका नावाजलेल्या शाळेमध्ये नोकरी मिळाली आणि एक मोठी रक्कम पगाराच्या स्वरूपात दर महिना न चुकता घरात येऊ लागल्याने, सारेच प्रश्न संपुष्टात आले.

शाळेतील मुलांना उत्तम मार्गदर्शन मिळावं, यासाठी पुनम सतत प्रयत्नशील असायची... तिच्या या प्रयत्नांना यश मिळत, आज ती उपमुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती.. 

'कमवा आणि शिका', या संकल्पनेचे महत्त्व वर्गातील मुलांना शिकवताना मनात कुठेतरी तिला तिचा भूतकाळ आठवत होता.

 'त्यावेळी दाखवलेली हिम्मत, न डगमगता केलेले कष्ट आठवून आजचं सुख पाहता, जगण्याची लढाई आपण यशस्वीरीत्या जिंकलो', याचंच तिला समाधान वाटत होतं...


वाचकहो, अनेकदा शिक्षण असूनही मनाजोगती नोकरी न मिळाल्याने पदरी पडलेली सुशिक्षित बेरोजगारी मानसिक खच्चीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरते... जगण्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणारा पैसा तुटपुंजा पडू लागला की जीवनही नकोसं वाटू लागतं... पण अशा परिस्थितीतही अनेक महिला जगण्याची ही लढाई जिंकायचीच अशीच जिद्द ठेवत जिवाचं रान करतात, पडेल ते कष्ट करण्याची तयारी दाखवतात, तेव्हा अर्धी लढाई त्या तिथेच जिंकलेल्या असतात.. अशाच अनेक जिद्दीने लढणाऱ्या महिलांसाठी आजची कथा समर्पित..


© वर्षा पाचारणे.

2 टिप्पण्या

  1. अप्रतिम सत्यकथा ! अशीच कथेतील पुनम माझ्या जीवनात आहे, माझी पत्नी राजश्री. तिची अशीच स‍ाथ मिळतेय मला ! अन मला तीचा सार्थ अभिमान आहे.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने