सुंदर मुलगी हवी

© वैशाली जोशी





"वहिनी, माझ्या जावेच्या बहिणीची पुतणी लग्नाची आहे.. दिसायला सुंदर आहे. छान शोभेल प्रणवला" मेघनाची नणंद मानसी स्थळ सुचवत होती.


" तुला आठवते का गं आई...सारिका, म्हणजे आमच्या सुनीता ची बहीण गं.... माझ्या पुतण्याच्या मुंजीत आली होती बघ.... तिचीच पुतणी ही.... अगदी आईवर गेलीये... सडपातळ... सुंदर... गोरीपान..."


"हो, आठवली अगं... तेव्हा पंधरा-सोळा वर्षांची असेल सारिकाची पुतणी " छानच आहे हो... मेघनाच्या सासूबाईंनी स्मरणशक्तीवर जोर दिला.


"तर काय, तेव्हापासून हेरून ठेवलीये मी आपल्या प्रणवसाठी. तसंही सुनीता आणि सारिका दोघी बहिणीचं खूप छान जमतं. आमच्या जाऊबाई माझ्या शब्दाबाहेर नाही आणि सारिकाचे दीर तर भावाचे भक्त आहेत अगदी ! सुनीताला सांगून आलेय मी... ह्यावेळी प्रणवसाठी शब्द टाकते मी दादाकडे म्हणून! आणि माझा शब्द फायनल समज." मानसीनं ड्रेसला नसलेली कॉलर टाईट केली.


"अय्या! छानच हो! काय शिकलीये मुलगी?" मेघनानं पुढची चौकशी केली.


"अगं बी.एस्सी.झालीये.."


"पण आपला प्रणव एम टेक एम बी ए झालाय तर निदान पोस्ट ग्रॅज्युएट मुलगी हवी असं म्हणत होता तो."


"काही काय गं वहिनी! संसार मुलीशी करायचाय की तिच्या डिग्रीशी? मुलगी अगदी सुंदर आहे..दहाजणीत उठून दिसेल!" मानसीनं मुद्दा पुढे रेटला.

आता नणंदेला एकदम कसं टाळायचं म्हणून मेघनानं पुढचा प्रश्न टाकलाच - "प्रणव आत्ता नोकरी करत असला तरी पुढच्या दोन वर्षात बिझनेस डेव्हलप करायचं म्हणतोय हे माहितेय ना त्या मंडळींना? तशी कल्पना देऊन ठेऊया बाई! म्हणजे पुढे जाऊन प्रॉब्लेम नको."


"छे!छे! वेडी का खुळी तू? अश्याने लग्न कसं जुळणार प्रणवचं? आता मेघनाच्या सासूबाई पुढे सरसावल्या.. "त्याला म्हणावं हे बिझनेसचं खूळ सध्या तरी काढून टाक डोक्यातून. 

एकदा का डोक्यावर अक्षता पडल्या की मग कर म्हणावं काय करायचं ते! मुलीची मामी भेटली होती मला भुसावळच्या लग्नात... ती सांगत होती मुलीला बिझनेसमन नवरा नकोय ते..

इतकी सुंदर मुलगी हातातून नाही घालवायचीय..एकदा लग्न झालं की झालं! मग काय करणार ती ! मग जा म्हणावं सोडून हिंमत असेल तर...अन् तिला थोडीच सांगतोय आपण बाहेर जाऊन कमव म्हणून.... प्रणव बघेल ना काय ते!" सासूबाई पुटपुटल्या.


"तर काय! एकदा लग्न झालं की मुलीला अन् तिच्या घरच्यांना काय करायचंय मुलगा काय करतो ते... त्यानं कमावून आणलं म्हणजे झालं! मग नोकरी करो नाहीतर बिझनेस... नाहीतर अजून काही.... त्यांच्या दाराशी तर नाही पाठवत ना आपण आपल्या मुलाला... हँ... मानसीनं नाक मुरडलं.


"अहो, पण मुलीच्या पण काही अपेक्षा असतील ना भावी आयुष्याबद्दल. त्या योग्य की अयोग्य असं नाही ठरवू शकत आपण... पण ह्याबाबतीत स्पष्ट असलेलं बरं... नाहीतर दोघांचीही विनाकारण ओढाताण " मेघना दुसऱ्या बाजूनंही विचार करत होती.


मेघनाला आठवलं... तिच्या मैत्रीणीला पुण्या-मुंबईकडे सेटल व्हायचं होतं.... तिथेचं ब्युटीशियन चा कोर्स करून तिला मोठं ब्युटी पार्लर टाकायचं होतं... 

म्हणून पुण्यात नोकरी करणारा मुलगा बघितला. तर जेमतेम सहा महिने पुण्यात नोकरी केल्यावर तिच्या नवऱ्यानं तिला जराही विश्वासात नं घेता नोकरी सोडली अन् त्यांच्या गावी घेऊन गेला....


जेमतेम पंचवीस हजार लोकवस्तीचं गांव ते... तिचं पार्लर आता थ्रेडिंग, वॅक्सिंगपुरतं मर्यादित झालंय तिथे!


दोन वर्षांपूर्वी भेटली तेव्हा सांगत होती ... तसं घरची शेतीवाडी आहे, कश्शाला कमी नाही म्हणाली... पण सासरच्या मंडळींचं आधीच ठरलं होतं म्हणे लग्न ठरण्यापुरती नोकरी करायची अन् द्यायची सोडून..."


कळलं तेव्हा फार दुखावली गेली ती... म्हणजे गावात राहायला हरकत नाहीये तिची पण फसवणूक झाल्याचं दुःख अजूनही उराशी कवटाळून आहे.


"बरं, मी काय म्हणते, मुलीला देवधर्माची कितपत आवड आहे?, पर्यटन करायला आवडतं का?, पुढे अर्थार्जन करायची आवड आहे का?, नातेवाईक/मित्रमंडळ ह्यामध्ये रमते का? ह्याची माहिती विचारूया आपण आधीच.. 

कारण कसंय, आपलं घर फार नास्तिक नसलं तरी फार आस्तिकही नाहीये आणि बुवा-महाराज तर प्रणवच्या बाबांना अजिबात पटत नाहीत. त्यांच्याकडे त्या ××××× महाराजांचं फार प्रस्थ आहे म्हणे! ही मुलगीदेखील फार देवदेव करणारी असेल तर...?" मेघनाच्या शंका संपतच नव्हत्या.


"अगं तिला करायचं असेल तर करू देत की, आपलं काय जातंय?" सासूबाई.

"नाही. तिला पटतंय तर तिनं करावंच पण प्रणवला ह्या बाबतीत अजिबात रस नाहीये हे ठाऊक आहे नं तुम्हाला? त्यामुळे ह्या गोष्टीची चर्चा अगोदरच झालेली बरी.. याउपर प्रणवला पटत असेल तर ठीकाय नं!" मेघनानं सफाई दिली.


"शिवाय आपले प्रणवकुमार आहेत नातेवाईकांच्या गराड्यात रमणारे... त्याची पत्नी जर नातेवाईकांची आवड असणारी असेल तर छानच की! नाहीतर माझा आतेभाऊ! त्याच्या बायकोला मुळी नातेवाईक नकोच असतात.. 

एक सासू-सासरे आणि सख्खा दीर सोडले तर कुणाकडे जाणं नाही न् येणं नाही.नातेवाईक नकोच्चेत म्हणे तिला. माझ्या लग्नात देखील एकटाच आला होता.. 

सगळे विचारत होते बायको का नाही आली तर एव्हढंसं तोंड झालेलं त्याचं...फार कुचंबणा होते हो अश्यावेळी." मेघना आठवणीत रमली होती.


"झालं! अश्या अटी ठेवून होणार होय मुलाचं लग्न! बघ आई, इतकी सुंदर मुलगी हातची गमावायला निघालीये ही. शिवाय दोघी बहिणीच आहेत त्या. म्हणजे आईवडिलांनंतर सगळी इस्टेट/प्रॉपर्टी प्रणवचीच!"मानसीनं आपला मुद्दा पटवायला आईला पुढ्यात घेतलं.

"बघा बुवा! मी चांगलं सांगतेय तर ऐकतच नाहीये ही . तसं कितीतरी जण चौकशी करताहेत ह्या मुलीसाठी... पटत असेल तर घाई करून "बघण्याचा" कार्यक्रम उरकून घ्यावा असं वाटतं मला... नाहीतर इतक्या देखण्या मुलीला स्थळांची कमतरता नाही हो !" मानसी अगदी घायकुतीला आलेली.


"माझी आई बोलतेय ते अगदी बरोबर आहे आत्या!" एव्हढा वेळ आतल्या खोलीत मोबाईल बघत बसलेला प्रणव बाहेर आला...


"सारखं सुंदर मुलगी- सुंदर मुलगी काय गं? मी तर सावळा आहे आणि स्थूलदेखील.. पण वाईट दिसतो का मी? की आपली ताई सावळी आहे म्हणून कमी स्मार्ट दिसते? 

किती हुशार आहे ती! किती निगुतीनं संसार करतेय! माझी आईपण दिसायला नसेल चांगली पण घर किती उत्तम सांभाळलंय... नातेवाईकांना धरून आहे, काटकसरीने संसार केला म्हणून चार पैसे गाठीशी बांधून आहे. 

आम्हां भावंडांवर किती चांगले संस्कार केलेत तिनं! नुसतं सुंदर दिसणं हा लग्नासाठी एकमेव निकष नाही लावायचा मला!"

"आणि माझे भविष्याचे प्लॅन्स पक्केच आहेत तर त्याची चर्चा होणाऱ्या पत्नीशी करणारच ना मी! कारण पुढच्या आयुष्यात मला तिची साथ हवीये प्रत्येक बाबतीत. 

तुमच्या म्हणण्याप्रमाणे खोटं बोलून माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात नाही करू शकत मी.मला बिझनेस करायचाय. माझं पॅशन आहे ते. उद्या ती हे नाही स्वीकारू शकली तर??? 

किंवा सासरच्या मंडळींनी माझ्यावर मी नोकरीच कंटिन्यू करावी असा दबाव टाकला तर माझी फार घुसमट होईल गं आजी! त्यापेक्षा ह्या गोष्टी बोलून स्पष्ट झाल्या तर काय हरकत आहे? प्रणवनं उत्तराच्या अपेक्षेनं समोर बघितलं.


"खरंय अरे! मानसीआत्यानं मान डोलावली. तसं वहिनी म्हणतेय तेही खरंय.. एकमेकांच्या आवडी -निवडी जुळायला हव्यातच... नसल्या जुळत तरी एकमेकांच्या प्रेमाखातर दोघांनी स्वभावात बदल केला किंवा सुवर्णमध्य साधला तर तो भाग वेगळा... ह्या बदलाचं निश्चितच स्वागत आहे. पण ही तडजोड नको ठरायला..


माझी जाऊ संगीत विशारद आहे पण भाऊजींना गाणं आवडतच नाही अजिबात. त्यामुळे तिला इच्छा असूनही गाण्याचा छंद नाही जोपासता आला. 

तिचा पहाटेचा रियाझसुद्धा उपद्रव वाटतो त्यांना.. तिची किती इच्छा होती संगीताचे क्लासेस घ्यावेत म्हणून पण नाही जमलं अन् आता तिचं गाणं कौटुंबिक गेटटुगेदर मध्ये म्हणण्यापूरतं मर्यादित झालंय." मानसी विचाराधीन झाली होती.


"अन् तुझ्या आईला नोकरी नव्हतीच करायची. तिला गृहिणी म्हणूनच राहायचं होतं.. आणि तशी तिच्या नोकरीची आर्थिकदृष्टया गरजही नव्हती, आजही नाही. पण तुझ्या बाबांनी "इतकी शिकलीयेस तर घरात बसून नको राहूस" म्हणत शिक्षिकेची नोकरी करायला लावून "पुढारलेला नवरा" होण्याचा मान पटकावलाच!" आजीदेखील आता अंतर्मुख झाली होती.


"जाऊ देत हो! पण मला आवडली शिक्षिकेची भूमिका अन् समरसून करतेय मी नोकरी. जबरदस्तीने नाही हो!" मेघनानं सासूबाईंच्या पाठीवर हलकेच थोपटलं.


"पण मी काय म्हणतेय, नुसतं मुलीचं सौन्दर्य आणि तिच्या वडिलांची इस्टेट पाहून लग्न नकोच... खरंतर ते लग्न नव्हेच. ती तर तडजोड... आयुष्यभराची... आयुष्यभराशी! 

आपल्याला काय कमी आहे? आणि प्रणवदेखील कमवेल की त्याच्या मुलाबाळांसाठी! हो किनई रे प्रणव?" आईनं साद घालताच प्रणवनी हुंकार भरत लाडाने आईच्या गळ्याभोंवती हात टाकले.


ही काल्पनिक कथा असल्याने कथेतील पात्राना नायकाचा मुद्दा पटला अन् कथेचा शेवट गोड झाला.


पण लग्न होणं हे जीवनाचं अंतिम ध्येय,एकदाचं लग्न झालं की झालं... पुढचं पुढे पाहून घेऊ...ही विचारसरणी अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे.


लग्न होणं हा आयुष्याचं अंतिम ध्येय नसून दोन जीवांच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे आणि ती खोटेपणावर ,दिखाऊपणावर बेतलेली असू नये, हे मात्र अगदी खरं!


तुम्हाला काय वाटतं?

© वैशाली जोशी

सदर कथा लेखिका 
वैशाली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने