दिवस सरतात आठवणी मात्र मनात घर करतात

© सौ. प्राजक्ता पाटील




शिवम अगदी शिवाचा अवतार होता. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला समंजस मुलगा. वडील व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे सतत पैशांसाठी आईशी भांडण होते. 

रोजरोज वडील दारू पिऊन घरी आल्यावर नेहमीच मार खाऊन, स्वतः दिवसभर शेतात राब राब राबून कष्टाने मिळवलेले जे काही रूपये असायचे ते आई रागाच्या भरात वडीलांना देऊन टाकायची. मग त्यासाठी घरातल्या सगळ्यांना उपवास घडायचा. 

मुलांच्या तोंडातील घास काढून दारू पिऊन आलेल्या अशा व्यक्तीस वडील म्हणावे का ? हा प्रश्न शिवमला सतत पडत होता. 

मुलांना जन्म दिल्यावर त्यांच्यासाठी अवघं आयुष्य समर्पित करणारे आईवडील पाहताना शिवम च्या मनात 'देवाने मलाच का असे वडील दिले असतील ?' हा प्रश्न सतत येत होता.

शिवमला लहानपणापासून असं वातावरण बघून दप्तर बाजूला ठेवून हातात कुदळ , फावडे आणि खुरपे घेऊन कामाला जावं लागंल. पण मनातून शिक्षणाची आवड असल्यामुळे त्याने आपल्या लहान बहिणीला जोशनाला मात्र खूप शिकवायचं अशी मनात खूणगाठ बांधली होती. 

तिच्या शिक्षणात कोणताही अडचण येऊ नये म्हणून शिवम नेहमी तत्पर असायचा. पुढे सतत दारू पिऊन पिऊन शिवम च्या वडिलांचे लिव्हर खराब झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

 जोशनाही मन लावून अभ्यास करत होती. बीएस्सी मध्ये फर्स्ट क्लास जोशनाने मिळवला होता. शिवमसाठी कोमलचं स्थळ आलं होतं. 

कोमल आणि शिवमची चांगली ओळख होती. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती हे शिवमला माहित होतं. कोमलला सावत्र आई होती जी तिला सतत त्रास द्यायची. पण कोमल मात्र दिवसभर काम करून रात्री अभ्यास करून जोशनापेक्षा चांगल्या मार्काने पास झाली होती.

"शहाणी,शिकलेली मुलगी आपल्या घरात आल्यावर आपल्याला तिच्या तालावर नाचावे लागेल हे मात्र नक्की हो...!" आई म्हणाली..


"हो..! आई.., मलाही तसंच वाटतंय.. अगं दादाचं नववी शिक्षण असून सुद्धा कोमल बीएस्सी शिकलेली मुलगी दादा सोबत लग्न करायला हो का म्हणाली असेल..?

नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे तिच्यामध्ये..!" जोशना म्हणाली..

शिवम कोमलच्या कोमल स्वभाव आणि वाणी यांनी केव्हाच प्रभावित झाला होता.. दिवसभर राबराब राबणारी कोमल नाईट कॉलेजला ऍडमिशन घेऊन बीएस्सी पास झाली होती.. केवळ सावत्र आईच्या अट्टाहासामुळे ती या लग्नाला तयार झाली होती..

शिवम मूग गिळून गप्प बसला.. "आपलेच दात आणि आपलेच ओठ.." कोणाला काहीच बोलायचं नाही.. असं शिवमने ठरवलं.. 

शिवमला लहान वयातच घराची जबाबदारी स्वीकारावी लागली.. वडील वारल्यामुळे पुढचे शिक्षण तो घेऊ शकला नाही.. त्याची बहीण जोशना ला मात्र शिवम शैक्षणिक सुविधा मिळवून देत होता.. जोशनाने खूप शिकावं; खूप मोठं व्हावं.. अशी त्याची इच्छा होती..

शिवम बहिणीच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र एक करून काबाड कष्ट करतोय हे कोमलला ठाऊक होतं.

कमी शिकलेला असला, तरी तो माझ्या शिक्षणाचा आदर करेल हे कोमलला माहित होतं.. म्हणूनच शिवमशी लग्न करण्याचा कोमलने दूरदृष्टीतून निर्णय घेतला होता..

"ज्याचं माप जिथं असेल ; तिथं ती व्यक्ती जाते.." अशी पूर्वीची म्हण कोमलच्या बाबतीत सार्थ ठरली.. 

शिवम च्या आई आणि बहिण यांचा विरोध असतानाही कोमल लग्न करून शिवम ची सुखदुःखाची सात जन्माची जीवन साथी बनली.

आता तो क्षण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं कोमल आणि शिवम एकमेकांच्या जवळ येणार होते.. आणि त्यादिवशीच शिवम ने कोमल ला तो तिच्या पुढील शिक्षणासाठी हवी ती मदत करेल हे आश्वासन दिलं.

जगातली सगळ्यात नशीबवान मुलगी मीच आहे..असंच कोमलला त्यादिवशी वाटलं..

घरच्या वातावरणापासून अनभिज्ञ असलेली कोमल भविष्याची स्वप्न रंगवू लागली.. दुसऱ्या दिवशी शिवम आणि सासुबाई पहाटे शेतावर जातात आणि तेही डब्बा घेऊन हे कोमलला समजलं.

कोमल ही लवकर उठून दोघांचा अगदी प्रेमानं डबा भरून देत असे.. शिवम ने ठरल्याप्रमाणे कोमल चे एमएसी चे ऍडमिशन केले.

कोमल ही कामात तरबेज होती.. दिवसभर घरचं सगळं काम करून ती नाईट कॉलेजला जाणार हे मात्र सासूबाईंना पचनी पडेना..

"लग्न झाल्यावर शिकायची गरज काय आहे..? एवढ शिकून काय करणार आहे..? या सासूबाईंच्या वाक्यावर शिवम म्हणाला, "आई, जोशना माझी स्वप्न पूर्ण करणार आहे ; कोमल पण तीच स्वप्न पूर्ण करू पाहते.. मग तू असं का बोलतेस..??

आई म्हणाली.., "शिवम, जोशना तुझी बहिण आहे आणि माझी मुलगी तिच्या शिक्षणाची जबाबदारी तुला आणि मला घ्यावीच लागेल.."

त्यावर शिवम म्हणाला.., "आई, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट.." असच झालं तुझं..

कोमल आता माझी अर्धांगिनी आहे.. या घरची सून..सून म्हणून ती सर्व जबाबदाऱ्या पार पाडणार...? मग तिच्या आकांक्षांना, इच्छांना पूर्ण करणं आपली जबाबदारी नाही का...?

मनापासून नसली तरी आई कोमल च्या शिक्षणासाठी तयार झाली ; यातच शिवम ला आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद झाला.

 कोमल आणि जोशना एकाच वर्गात असल्यामुळे दोघीचे एकाच नाईट कॉलेजमध्ये शिवमने ॲडमिशन केलं.. वहिनी आणि माझी तुलना नाही होऊ शकत.

दोघीही दादाच्या लाडक्या नाही होऊ शकत.. लहानपणापासून आपल्यावर प्रेम करणारा दादा वहिनी ची बाजू घेतोय हे काही जोशना ला मान्य नव्हतं..

वहिनीला घरी बसवण्यासाठी जोशना च्या संकुचित मेंदूत एक घाणेरडी कल्पना अवतरली.. तिने वहिनीला तिच्याच एका मित्राला लवलेटर लिहायला सांगितलं.

आवर्जून दादाच्या आणि आईच्या नजरेस पडेल असं ठेवलं.. मजकुराचं वाचनही मोठ्या मनोरंजकपणे केलं.. तेव्हा मात्र साशंक नजरेने पाहणारे शिवम चे डोळे कोमलच्या डोळ्यातील निष्पाप भाव ओळखू शकले नाहीत असेच कोमल ला वाटले.

सासूबाईंचे बोचक शब्द कोमलच्या काळजाला जाऊन भिडले.. पण न डगमगता कोमल ने सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले.. कर नाही त्याला डर कशाला.. ? 

पण त्या दिवसापासून शिवम चे बोलणे, वागणे सर्व काही बदलले होते.. ते कोमलला लवलेटर पेक्षाही जास्त त्रासदायक वाटत होते..

दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात माणूस स्वतः पडतो.. हे अगदी खरं..!! 

ज्याच्याकडून जोशनाने चिठ्ठी लिहून घेतली होती.. तो रवी.. वारंवार जोशनाला ब्लॅकमेल करत होता.

आज तर त्याने जोशना ला लॉजवर भेटायला ये.. नाहीतर तुझ्या भावाला आणि घरच्या सगळ्यांना "लवलेटर" बद्दल खरं काय ते सांगेल..?? अशी घाणेरडी धमकी दिली हे कोमलला जोशना च्या मैत्रिणीकडून समजल...

कोमल ने जोशना ला सतत ब्लॅकमेल करणाऱ्या त्या रवीला खडे बोल सुनावले..जोशना साठी कोमलने जणु "दुर्गेचे" रूप धारण केले होते.

ज्या वहिनीशी आपण चुकीचे वागलो ; ती वहिनी किती चांगली आहे.. मोठ्या मनानं तिने सगळं बाजूला ठेवून आपल्याला मदत केली.. म्हणून जोशना धायमोकलून रडू लागली.

वहिनीची माफी मागू लागली... दादाला ही जोशनाने सर्व काही खरं ते सांगितलं.. "तुझा गुन्हा माफ करण्यासारखा नाही.. नवरा-बायकोच्या पवित्र नात्यात दुरावा निर्माण करण्याचा तुला काहीही अधिकार नाही.. पण ही तुझी पहिली आणि शेवटची चूक समजून तुला मी माफ करतोय.." असे दादाने सुनावल्यावर अशी चूक परत होणार नाही म्हणत जोशनाने दादा वहिनीचे पाय पकडले..

वहिनीच्या रूपात मला माझी मोठी बहीणच मिळाली आहे..!! तिलाही शिक्षणाचा अधिकार मिळायला हवा..!! तिलाही तिच्या पायावर उभे राहता यावे.. यासाठी "आई, तु ही विरोध करणार नाहीस.. असं मला वचन दे.." अस म्हणून "जुनेच नाते नवीन ऋणानुबंधच्या धाग्याने गुंफले गेले.."

जेव्हा जोशना आणि कोमल शिक्षिका होऊन गावी सुट्टी निमित्त जमल्या तेव्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या..

दोघींच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या... ते म्हणतात ना...! "दिवस सरतात.. आठवणी मात्र मनात घर करून जातात तसंच काहीसं झालं..

वाचकवर्गाला हेच या लेखातून सांगणं "प्रेमाचा गैरफायदा कोणत्याच नात्यात घेतला जाऊ नये.. घरातील सून आणि मुलगी यांना समान वागणूक मिळावी.."


© सौ. प्राजक्ता पाटील

सदर कथा लेखिका सौ. प्राजक्ता पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने