तिढा (पूर्वार्ध)

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)



आडगाव फाट्यावर बस थांबली तसं जुईने बसच्या दरवाज्यातून किंचित झुकून बघितलं.. पण ओळखीची खूणगाठ दिसेना! 'ह्या थांब्यावर उतरू की नको' ह्या विचारात काही क्षण निघून गेले अन् मागून कंडक्टरचा आवाज आला.. "चला, उतरा ताई, लवकर!"


"पण आडगाव फाटा हाच का?" जुईने चाचरत विचारलं.


"हो, हाच! चला उतरा.." जुईला जवळजवळ बसच्या बाहेर काढत कंडक्टरने लगेच डबल बेल दिली सुद्धा!!


आडगाव फाट्यावर उभी राहून जुई विचार करू लागली.. "आपण इथे येण्याचा निर्णय घेतलाय खरा! पण मामामामी कसे रिॲक्ट करतील कोण जाणे! हा आपला आगाऊपणा तर ठरणार नाही?"


जुई आपल्याच विचारांच्या तंद्रीत असताना आजूबाजूला उभ्या असलेल्या तीन ऑटोरिक्षा चालकांनी तिला घेराव घातला.


"भैरोबा मंदीर जायचंय!" जुईने एका दमात सांगितलं अन् एका रिक्षावाल्याकडे बोट दाखवत उरलेले दोन ऑटोरिक्षावाले आपोआप बाजूला झाले.


"चाळीस रुपये लागतील!" उरलेला ऑटोवाला तंबाखूची पिंक थूकत म्हणाला अन् जुई निमूट त्याच्या रिक्षात जाऊन बसली. रिक्षात बसताच जुई समोरून भूतकाळाचा पट भराभर सरकू लागला.


जुई आज जवळपास अठ्ठावीस वर्षांनी तिच्या आजोळी निघाली होती. लहानपणी दरवर्षी शाळेची परीक्षा संपल्या संपल्या ती तिच्या आईसोबत आजोळी यायची.. आजोळचा मोठ्ठा चौसोपी वाडा.. संत्र्याच्या बागा.. शेतीवाडी.. चापून चोपून नऊवारी नेसलेली अन् कपाळावर रुपयाएवढं लालचुटूक कुंकू लावणारी आजी.. तिला सगळेच जीजी म्हणत. पांढरं शुभ्र धोतर अन् शुभ्र अंगरखा.. कपाळावर नाम अन् गळ्यात जानवं असे तिचे आजोबा म्हणजे आबा.. सगळं सगळं जुईच्या डोळ्यांसमोर जस्संच्या तस्सं उभे राहिलं.


जिजी आणि आबांना दोन मोठे मुलगे आणि एकच धाकटी मुलगी! तीच जुईची आई! एकुलती एक मुलगी आणि शेंडेफळ म्हणून जिजी आणि आबांचा जुईच्या आईवर फार जीव होता. जुईची आईदेखील हुशार होती. त्यांच्या छोट्या गावातून तालुक्याला शिकायला जाणारी ती पहिली मुलगी! जुईचे दोन्ही मामा मात्र फार शिकले नाहीत. दोघांचं शिक्षणात लक्ष नाही म्हटल्यावर आबांनी दोघांना शेतीच्या कामात सहभागी करून घेतलं अन् साजेशा मुली बघून दोघांचीही लग्नं उरकली.


जूईची आई मात्र शिकली.. वकील झाली अन् नंतर तिचं लग्न झालं.. प्रेमविवाह.. पण घरच्यांनी राजीखुशीने लावून दिला. आबांनी देखील लग्नात काही कसूर ठेवली नाही. हजारभर माणसं लग्नात जेवून गेली.. लाखांच्यावर खर्च केला.. शिवाय वर्षभरातले सगळे सणवार धूमधडाक्यात साजरे केले. जुईच्यावेळेचं बाळंतपण जीजीनीच रीतीप्रमाणे केलं अन् जुईला बारशाला दीड तोळ्यांचा गोफ केला. जेव्हा जेव्हा ती आईबरोबर आजोळी जात असे तेंव्हा आईला साडी, कधीमधी एखादा सोन्याचा किंवा चांदीचा डाग अन् जुईला नवा ड्रेस जरूर मिळे.


दोघं मामा जुईचे भरपूर लाड करत. शेतावर फिरवून आणत.. पण आपल्या बहिणीच्या म्हणजे जुईच्या आईच्या मात्र वाऱ्यालाही उभे राहत नसत. दोघी मामी मात्र निर्विकार असत. जुई अन् तिच्या आईशी आदराने बोलत.. पण अगदी मोजकं.. कामापुरतं! तिघा मामेभावंडांशी मात्र तिची अगदी छान गट्टी जमायची. निदान भावाबहिणीत असलेल्या शीतयुद्धाची झळ अजून मुलांपर्यंत पोहोचली नव्हती.


खरं तर जुईने आजोळ अन् तिथल्या मनमोकळ्या वातावरणाबद्दल किती कल्पना केलेल्या! पण कितीही आवडत असलं आजोळच्या वातावरणातला तटस्थपणा जुईला कुठेतरी खटकत असेच. तिने कधीच आईला मामांकरिता राखी पाठवलेली आठवत नव्हती की भाऊबीजेला मामा घरी आल्याचं तिला स्मरत नव्हतं.


"तुझे दोघेही मामा उडाणटप्पूच!!" आई नेहमीच जुईला सांगायची.. "जिजी आणि आबांच्या खूप अपेक्षा होत्या दोघांकडून! पण दोघेही शाळा सोडून घरी बसले. दोघांच्या टेन्शनमुळे जीजी आणि आबा दोघेही वेळेपूर्वीच वृद्ध झाले."


"शेवटी आबांनी दोघांना शेतीच्या कामाला लावलं. पण ते ही त्या दोघांना धड जमलं नाही. खूप सारं कर्ज करून ठेवलं दोघांनी!" आईला आठवून खूप दुःख व्हायचं.. "मी बाहेरगावी शिकायला होते तर जिजी आणि आबांनी मला काही समजू दिलं नाही.. खरं तर मला सारं काही कळत होतं.. पण ते बाहेरच्या व्यक्तींकडून! जीजी आणि आबांना त्या दुःख होऊ नये म्हणून मी कधी बोलले नाही." आई सांगायची.


"हद्द तर तेव्हा झाली जेव्हा हेच माझे दोघं भाऊ मिळून आबांशी भांडू लागले.. "आधीच तिच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च झालाय.. आता लग्न रजिस्टर पद्धतीने करून द्या म्हणून! एवढंच नाही तर मला आबा काही देतात म्हटलं की दोघांच्या कपाळावर आठ्याच यायच्या!! स्वतःच्या बायकांना साड्या घेऊन देताना‌ अन् बायकोला कसली तरी ट्रीटमेंट देताना नाही आठवायचा त्यांना वाढता खर्च!!" आई पोटतिडकीने बोलत राहायची.. "मग मी त्यांना भाऊ मानणंच‌ बंद करून टाकलं!! आपण आडगावला जायचो ते जीजी आणि आबांसाठी! ते आहेत तोवर माहेर आहे हे पक्कं जाणून होते मी!!" आईचं सांगणं जुईचं काळीज चिरत जायचं..


"जिजीच्या पाठोपाठ सहा महिन्यातच आबा गेले तर हे दोघं भाऊ त्यांचे दिवसकार्य करायला देखील तयार नव्हते.. मी आणि तुझ्या बाबांनी मिळून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना सगळं साग्रसंगीत करायला लावलं.. नाहीतर माझे आईवडील अनाथ असल्यासारखे..!" आईचा पदर आपसूक डोळ्याजवळ जायचा.


"आबा गेल्यानंतर तर दोघांनी मिळून कहर केला.. चक्क आडगावचा राहता वाडा विकायला काढला. त्यांना कुणी तरी सांगितलं की बहिणीची सही पण लागेल वाडा विकण्यासाठी.. तर आले होते दोघे.. 'सही दे' म्हणायला.. मी नाही दिली! माझ्या माहेरची एकुलती खूण तो वाडा.. माझ्या बालपणीच्या.. आबा आणि जीजीच्या आठवणी असलेला तो वाडा विकायचा!!" नुसत्या आठवणीनं देखील आईच्या अंगावर संतापानं काटा उभा राहायचा. "त्यांना वाडा विकून मिळालेला पैसा परस्पर खाऊन ढेकर द्यायचा होता!! मी हे कधीच होऊ दिलं नाही. माझ्या वडिलांच्या वाड्यात राहता तर राहा.. अन् त्यांच्या पैशावर गिळता ते गिळा म्हणावं.. मी मरेपर्यंत तो वाडा विकला जाणार नाही.." जुईच्या आईचं पक्कं ठरलं होतं..


पण आईची सत्तरी उलटली अन् जुई देखील आता चाळीशीपार पोहोचली. हल्लीच तिच्या आईची प्रकृती खालावली. तिच्या आईचं गुडघ्यांचं ऑपरेशन झालं अन् ती काही काळ अंथरुणावर होती. जुईचे बाबा गेल्यानंतर तशीही आई अंतर्मुख झाली होतीच. तिला सतत बालपणीच्या अन् वाड्याच्या आठवणी येत.


आई माहेरच्या वाड्याला अन् भावंडांना मिस् करतेय हे जुईच्या ध्यानात आलं होतं पण आई आणि मामांमधलं वितुष्ट बघता आई त्याबद्दल काहीच उघड बोलणार नाही हे ही तिला ठाऊक होतं. म्हणूनच आईला न सांगता फक्त नवऱ्याच्या कानावर घालून जुई आडगावला जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसली.


"भैरोबा मंदीर आलंय!" ऑटोरिक्षावाल्याच्या आवाजाने जुई भानावर आली. तिने लगबगीने शंभरची नोट काढून ऑटोरिक्षावाल्याला दिली.
"चिल्लर नाय.." पुन्हा रस्त्यावर लाल पिचकारी टाकत रिक्षावाल्याने उत्तर दिलं अन् तो मख्खपणे बघत बसला.


जुईने‌ सभोवताल नजर टाकली. भैरोबा मंदिराचा कायापालट झाला होता. जुन्या पडक्या मंदिराला आता विटा अन् सिमेंटचं पक्कं बांधकाम झालेलं दिसत होतं. मंदिरासमोर फुलं आणि प्रसाद विकणारी तीन चार दुकानं थाटलेली होती. बाजूलाच एक लहानसं पेढ्याचं दुकान होतं.. "भैरोबा स्वीट मार्ट!"


जुई झटकन त्या पेढ्यांच्या दुकानात शिरली. "मला शंभरचे सुट्टे मिळतील का? म्हणजे मला पेढे घ्यायचेच आहेत.. पण आधी रिक्षावाल्याला सुट्टे पैसे देऊन येते.." जुईनं घाईघाईनं सांगितलं.


"किती द्यायचे आहेत?" दुकानदारानं विचारलं.


"चाळीस रुपये!" जुईनं शब्द उच्चारताच दुकानदारानं दहाच्या चार नोटा काढून दुकानात काम करणाऱ्या पोऱ्याच्या हातात दिल्या अन् बाहेर उभ्या असलेल्या ऑटो रिक्षाकडे अंगुलीनिर्देश केला.


"अहो, पण कशाला..?" ती म्हणणार होतीच.. तेव्हढ्यात " जुई ना गं तू?" दुकानदारानं विचारलं.


"हो.. पण आपण?? मला ओळखता??" जुईनं आश्चर्यानं विचारलं.


"दुकानदार हसला.. पण काहीही न बोलता त्याने तिला हाताने मागोमाग येण्याची खूण केली.. अन् जुई त्याच्या मागोमाग चालत राहिली.


"आपण ओळखतो का एकमेकांना?" जुईनं त्या दुकानदाराला पुन्हा अधीर होत विचारलं.


"अगं, मी सौरभ!दुकानदारानं उत्तर देताच जुई गडबडली. तिनं पुन्हा एकदा त्याच्याकडे निरखून बघितलं.


वय साधारण चाळीशीच्या आसपास असेल.. पण दिसण्यात पन्नाशीच्या पुढे वाटणारा.. डोक्याला बऱ्यापैकी टक्कल.. पांढऱ्या मिशा अन् मळकट कपड्यातला सौरभ.. तिचा सख्खा मामेभाऊ तिला ओळखू देखील आला नाही. क्षणभरात तिच्या डोळ्यांसमोरून बालपणीचा सौरभ तरळून गेला. ती त्याला शेवटची भेटली तेव्हा तो बारा वर्षांचा असेल.. गोरापान.. कुरळ्या केसांचा.. गोबऱ्या गालांचा.. गोलमटोल सौरभ.. तिचा धाकटा मामेभाऊ!! मामाच्या लग्नानंतर जवळपास दहा वर्षानी झालेला!!


"अरे, किती बदललास तू! मी तर ओळखूच शकले नाही! पण तू मला बरं ओळखलंस.. विसरला नाहीस!" जुईनं विचारलं.. अन् सौरभनं काही उत्तर देण्यापूर्वीच दोघे वाड्याच्या दरवाज्यासमोर येऊन ठेपले.


जुई गावाला काय.. भैरोबा मंदिराला काय किंवा सौरभला काय.. कुणालाच ओळखू शकली नव्हती.. ती वाड्याला तरी काय ओळखणार! तिच्या समोर उभा असलेला वाडा तिला तिच्या आठवणीतल्या किंवा आईच्या वर्णनातल्या वाड्यापेक्षा फारच वेगळा भासला.. अतिशय जीर्ण.. वृद्ध अन् मान तुकवलेला!!


"आपण उगाच इथवर आलो!" जुईच्या मनात येऊन गेलं. "जर नसतो आलो तर नजरेसमोर तो जुना वैभवशाली वाडा असता.. वाड्याची ही दुर्दशा पहावी लागली नसती!"


दोघांच्या बोलण्याचा आवाज ऐकून मामा बाहेर आले अन् जुईला बघून थबकलेच! "संगीता! तू?" मामांच्या तोंडून अभावितपणे शब्द बाहेर पडले.


क्रमशः

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने