सेलची साडी

© सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी





रत्नपारखी कुटुंबात आनंदाला अगदी उधाण आलं होतं. त्याला कारण म्हणजे रत्नपारखी कुटुंबाची एकुलती एक सून शर्वरी हिने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे सगळेच आनंदाच्या आभाळात गिरक्या घेत होते. 

शर्वरीच्या नवऱ्याला म्हणजेच विक्रांतला अन् तिच्या सासुबाई सुहासिनीताईंना तर शर्वरी अन् बाळाला कुठे ठेवू अन् कुठे नको असे झाले होते.

महिन्याभरानंतरच्या एका सुमुहुर्तावर बाळाचे थाटामाटात बारसे केले जाणार होते. म्हणून सुहासिनीताईंची बाळासाठी बाळलेणे , शर्वरीसाठी सोन्याचा एखादा दागिना अन् देण्या घेण्याच्या साड्याखरेदीची लगबग सुरू होती.

त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या वासंती दामले काकू अन् सुहासिनीताई यांची खूप छान मैत्री होती , अगदी घरोबाच म्हणा ना ! 

सगळे सणवार , व्रतवैकल्ये दोघी मिळूनच पार पाडायच्या , भाजी खरेदी असो वा गौरी गणपती , दिवाळीसाठी घरच्या सजावटीचे सामान असो , दोघी कायम बरोबरच असायच्या.

जशा सणवारांसाठी या दोघी एकत्र असायच्या तशाच साडी खरेदीसाठी देखील त्या एकत्रच बाहेर पडायच्या. मान्सून सेल लागला असेल तर काही बघायलाच नको. चांगल्या २/३ तास मार्केटमध्ये अन् सेलमध्ये घालवून एका फेरीत कमीतकमी ४/५ साड्या तरी घेऊनच यायच्या. 

सुहासिनीताईंचे यजमान श्यामराव अन् वासंतीताईंचे यजमान प्रभाकरराव कायमच या दोघींना समजावयाचे की साड्या खरेदीला ना नाही , पण सेल मधल्या साड्या म्हणजे वर्षभर न खपलेला माल असतो त्यामुळेच तुम्हाला २०००/- ची साडी ५००/- ला मिळते. पण क्वालिटीच्या नावाने बोंब असते. 

पण या दोघी अगदी चोखंदळ होत्या त्यामुळे साड्या घेताना अशातशा साड्या त्या अजिबात उचलत नसत. त्यामुळे त्या घरी आल्यानंतर त्यांच्या नवऱ्यांना साड्यांना नावं ठेवायला जागाच मिळत नसे.

आजही दामले काकू अन् सुहासिनीताई नातवाच्या बारशाची खरेदी अन् इतर तयारी बद्दल बोलत होत्या. 

दामले काकू म्हणाल्या ,"अगं सुहास , आपण नेहमी जातो त्या मान्सून सेलमध्ये यावेळेस नेहमीपेक्षा खूप छान साड्या आल्या आहेत बघ , अगदी बनारसी , कांजीवरम , येवला पैठणी वगैरे पण आहेत . आपण उद्या जाऊया खरेदीला ,म्हणजे तुला आहेराच्या साड्या पण घेता येतील एकाच ठिकाणी."

"हो गं , मला बऱ्याच साड्यांची खरेदी करायची आहे. एकाच ठिकाणी मिळाल्या तर मस्तच होईल. जाऊ आपण उद्या दुपारी. बाळ २ ते ४ झोपला असतो तेव्हा पटकन जाऊन येऊ."

अन् दुसऱ्या दिवशी खरंच या दोघी त्यांच्या ठरलेल्या सेल मधून आहेरासाठी खूप सुंदर अशा साड्या घेऊन आल्या. बनारसी , कांजीवरम , अशा एक ना अनेक तब्बल ५,०००/- च्या साड्यांची खरेदी झाली. 

यावेळेस देखील दोघींच्या नवर्यांना साड्यांना नावं ठेवायला जागा नव्हती इतक्या सुरेख साड्या दोघींनी आणल्या होत्या. शर्वरीला देखील सगळ्या साड्या आवडल्या.

बारसे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. बाळाचे नाव विराज ठेवण्यात आले. सुहासिनीताईंनी आपल्या नणंदबाई , विहीणबाई , जाऊबाई यांना आहेर म्हणून दिलेल्या साड्या खूप आवडल्या. 

प्रत्येकीचा आवडता रंग लक्षात ठेऊन सुहासिनीताईंनी साडीचा आहेर केला. आपला आवडता रंगच मिळाला म्हणून प्रत्येक स्त्री खुश होऊन प्रसन्न अंत:करणाने घरी गेली.

साधारण १५ दिवसांनंतर रत्नपारखींच्या घरचा फोन खणखणला. श्यामरावांनी फोन घेतला. पलीकडे त्यांची पुण्याला राहणारी धाकटी बहीण शकुंतला होती.

"कसा आहेस दादा ? आणि वहिनी , विक्रांत , विराज , शर्वरी कसे आहेत ? बारसं खूप छान केलं हो शर्वरीच्या आई वडिलांनी ! आणि वहिनी आहे का रे घरी , मला महत्वाचं बोलायचंय तिच्याशी, दे बरं लगेच तिला फोन !

श्यामराव - "अगं हो , हो , हो , जरा श्वास घे ! एकदा का तुझी रेल्वे स्टेशनवरून सुटली की अगदी नॉनस्टॉप धावतच राहते. मग अधला मधला कोणी जर असेल तो तुला दिसतच नाही....बरं ते जाऊ दे.... इथे आम्ही सगळे मजेत आहोत. आणि काय एवढं महत्वाचं बोलायचं आहे तुला तुझ्या वहिनीसोबत ?"

शकुंतला - "तिने मला दिलेल्या साडी बद्दल."

तिचं बोलणं पूर्ण देखील न होऊ देता तिच्या बोलण्याच्या स्पीडवरून श्यामराव समजले की सुहासिनीने सेल मधून साड्या आणल्या अन् आहेर म्हणून दिल्या अन् त्यांत नक्की काहीतरी डीफेक्ट निघाला म्हणून शकूने भावजयीला सुनावण्यासाठी फोन केला आहे. 

त्यांनी लगेच फोन होल्डवर ठेवून , सुहासिनीताईंना बोलावून सगळी कल्पना दिली अन् म्हणाले ," तुला मी कायम सांगत असतो या सेल मधल्या साड्या घेत जाऊ नकोस म्हणून. बघ आता ती शकू कशी फैलावर घेईल तुला साडी खराब निघाली म्हणून. बोल तिच्यासोबत."

"अहो , त्या तसं काही म्हणाल्या का ? फक्त सेलमधल्या साडीबद्दल बोलायचं आहे म्हणजे ते वाईटच असेल असं गृहीत का धरता तुम्ही ? मी बघते काय ते. "

"बोला वन्स , काय म्हणता?"

"अगं वहिनी , काय सुंदर निघाली गं तू मला दिलेली साडी ! एकतर माझ्या आवडीचा मोरपंखी रंग अन् त्यात पदरावर राघू मैनेची सुंदर जोडी... आज माझ्याकडे कीट्टी पार्टी होती ना ,त्यात नेसले होते मी. 

माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण खूप आवडली गं आणि एवढंच नाही तर माझ्या ३ मैत्रिणींनी तर बजावून सांगितलंय की आम्हाला पण अगदी सेम साडी हवी आहे तेव्हा तू तुझ्या वहिनीला सांगून मागवून घे. 

वहिनी , तू उद्याच साड्या घेऊन ये आणि उद्याच्या उद्या मला कुरिअर पाठवून दे. आणि हो , पैसे मी तुला उद्या पाठवते , मला सांग किती पाठवायचे ते. ओके ? चल , बोलते नंतर, बाय." असं म्हणून शकुने फोन ठेवला देखील. 

सुहासिनीताईंनी सगळी हकीकत श्यामरावांना सांगितली अन् म्हणाल्या , "तुम्ही मला नेहमी नावं ठेवता ना सेल मधल्या साड्या आणते म्हणून ? पण बघा , तुम्हाला नाही पण तुमच्या बहिणीलाच कित्ती आवडली साडी अन् त्यांनाच नाही तर त्यांच्या मैत्रिणींना सुद्धा. 

आता उद्या परत सेल मध्ये जाऊन त्यांच्या ३ मैत्रिणींसाठी तशाच साड्या घेऊन उद्याच त्यांना कुरिअर पाठवून देते. आज हीच सेलमधली साडी माझ्या अन् शकुताईंच्या नात्यातली गोडी वाढवणारा दुवा ठरली आहे , काय समजलात ? "


बायकोच्या ' मान्सून साडी सेल ' प्रेमापुढे अखेर आज श्यामरावांना मान तुकवाविच लागली होती.


© सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी

सदर कथा लेखिका सौ.वैष्णवी परेश कुळकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा आणि खालील लिंकवर क्लिक करून आमच्या मजेशीर स्पर्धेत  भाग घ्यायला विसरू नका. 

इथे क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने